पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ४

इतका वेळ ताटकळत असलेल्या ललीथा बाई दुडूदुडू चालत आल्या आणि त्यांनी त्या मिटींगचा ताबा घेतला. विद्यार्थ्यांच्या या लाडक्या टीचर गणित शिकवणार होत्या. ज्या पद्धतीने या गुरुमाऊलीने मुलांना लळा लावला होता ते बघता गणितासारख्या कठीण विषयाची गोडी देखील लागेल याची खात्री होती. आता पाळी होती अल्पसंख्यांक गटाची. भुजबळ मास्तर आणि पाटील मास्तर आले, बोलले आणि परत कोपरा पकडला. अश्या पद्धतीने ओळख परेड संपली. या वर्षात मुलांकडून आणि त्यांच्या पालकांकडूनकाय काय अपेक्षा आहेत याची स्पष्ट शब्दात सुनावणी झाली. शाळेचे लिखित आणि अलिखित नियम पालकांवर अक्षरशः बिंबवले जात होते. एकंदरीत शिस्तबद्ध वातावरण असणार याचा अंदाज आधीच आला होता जेंव्हा आमची कन्या शाळेचे ओळखपत्र घरीच विसरली होती आणि त्याबद्दल नियमावर बोट ठेवून नियमाप्रमाणे तिच्या रोजनिशीमध्ये एक सूचना आली होती.

तितक्यात इंग्रजीच्या बाई म्हणाल्या “Raise your hands…..”. तसे आधीच या ओळख परेड मुळे गोंधळलेला असल्याने आणि त्यात अचानक प्रश्न विचारला गेल्या मुळे मी माझे दोन्ही हात वर केले. त्याच क्षणी मला परत कोपराचा धक्का बसला …आणि तोच धीरगंभीर दबका आवाज माझ्या शेजारून आला. “अरे हात खाली कर. ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी हात वर करायचे आहेत” माझं प्रत्युत्तर, “मला माहीत होतं तु हात वर नाही करणार म्हणून तुझ्या वाटणीचा मीच केला …. ह्या ह्या ह्या …. इतकंच काय त्यांची प्रथा आहे  असं समजून सांगितलं असतं तर पाय पण वर केले असते”. चाणाक्ष मुलीने नको तिथे नाक खुपसले ..”म्हणजे बाबा, मी खोटं खोटं मारते आणि तु खोटं खोटं पडतोस आणि दोन्ही पाय वर करतोस तस्सं?” अवघा पालक वर्ग, शिक्षक महोदय आमच्या या लीलांकडे तन्मयतेने बघत होता …सगळ्यांच्या चेहेऱ्यावर “वा काय कुटुंब आहे!” असेच भाव होते. “आता जर परत तुम्ही दोघे काही बोललात तर वर्गाच्या बाहेर जावे लागेल” हिने आम्हां दोघांना दमात घेतले. एकंदरीत वातावरणाचा हिच्या वर परिणाम होतो माहीत होतं पण इतका????.

नेहेमीच्या सवयी प्रमाणे एक शिपाई बेधडक आत आला आणि न्यायालयात पुकारा करतात त्याप्रमाणे मोठ्या आदबीने म्हणाला “शाळेच्या बशी अजून २० मिनिटात निघतील. ज्यांना जायचं असेल त्यांनी घंटा वाजल्यावर शाळेच्या गेटापाशी जमा.” समोर उभ्या असलेल्या प्राजक्ता मराठे टीचर म्हणाल्या “सखाराम हा रोजचा वर्ग नाहीये. पेरेंट्स मीट चालू आहे. जरा सावकाश”. सगळेच शिपाई अंगकाठीने “मल्ल” या गटात मोडणारे होते. काही गोंधळ गडबड झाली तर ४-५ मुलांना लीलया उचलून घेऊन जाऊ शकतील … आणि गरज पडली तर शिक्षकांना आणि काही आगाऊ पालकांना देखील. ;). मग त्याच बाईनी सखारामने दिलेली सूचना एकदा हिंदीत आणि एकदा इंग्रजीत भाषांतर करून सांगितले. “आत्ता तर कुठे पेरेंट्स मिटींग चालू झाली आणि अजून २० मिनिटात बस निघणार? आता कसं काय सगळं विचारणार? शी बाई इतक्या लांब शाळा आहे …धड रिक्षा पण मिळत नाही” अश्या पद्धतीची कुजबुज महिला पालकांच्यात चालू होती. जे स्वतःचे वाहन घेऊन आले होते ते निश्चिंत होते. ही सगळी कुजबुज भेदून एक किरटा आवाज वर्गाच्या एका कोपऱ्यातून आला. तिच्या आवाजाची पट्टीच संगत होती की ही कुणीतरी “बेन” असावी. रेंगाळलेल्या माना तिच्या दिशेने फिरल्या. मुलाच्या तक्रारींचा पाढाच वाचून दाखवला तिने. आपल्या या नतद्रष्ट पोराला शाळेतले शिक्षकच वठणीवर आणि शकतील अशी खात्री दाखवत तिने आपल्या कर्तव्याचे ओझे त्यांच्या खांद्यावर रिते केले. आता घरात हिचा दिवटा काय दिवे लावतो त्याला टीचर काय करणार? पण या बाईने शिक्षकांना गळच घातली की तुम्हीच या मुलाला सुधरवू शकता. असे म्हणून टीचर काही सांगायच्या आताच ही बाई धावत बस पकडायला निघून गेली. आता ज्यांना शाळेच्या बशीने जायचं होतं त्या सगळ्यांनी थोडक्यात त्यांच्या समस्या सांगितल्या आणि त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. अश्यामुळे या पहिल्या वहिल्या पेरेंट्स मीटला गावातल्या चावडीचे स्वरूप आले होते. शिक्षक म्हणजे पंच आणि पालक म्हणजे तक्रारदार गावकरी. तंटामुक्ती केंद्राची बैठक काही फार वेगळी नसावी. मी आणि माझी बायको सगळ्यांचे बोलणे आणि त्यावरच्या शिक्षकांच्या प्रतिक्रिया नीट ऐकत होतो. बायको तिने आणलेल्या डायरीत काहीश्या नोंदी करत होती. सहजच वाटलं की मुलांच्या वर्तणुकीचा आलेख सर्वसाधारण सारखाच आहे.  विभक्त (संकुचित) कुटुंबातील बहुतांश पालकांच्या समस्या साधारण सारख्याच होत्या. आपल्या पाल्याची शाळेतील प्रगती जाणून घेण्याची गरज विशेष कुणालाच वाटली नाही. काहींना वेळ नव्हता, कामावर जायचं होतं, शाळेने बस ची सोय केली होती ती गाठायची होती, इतक्या धावपळीत वेळ कुणाला आहे? नुसतं मुलाला शाळेत सोडले की आपली जबाबदारी संपते का? मग अश्यातच अजाणत्या वयात मुलाला त्याच्या आई वडीलांचा हवा तितका सहवास नाही मिळाला तर त्याने काय करावं? लहान मुलंच ते … काही करून पालकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतं. घरात मूळ नीट वागत नाही, हट्ट करतं, उलट उत्तरं देतं, आदळाआपट करतं. पण याला तो शाळेत शिकवणारा शिक्षक काय करणार? लहान मुले अनुकरण करतात …खरं तर अंधानुकरण, त्यांच्या आई वडिलांचं, त्यांच्या जवळच्या माणसांचं. त्यांच्या साठी नकळत आई बाबच आदर्श असतात. त्यामुळे त्यांची वर्तणूक हा प्रत्येक पालकासाठी देवाने दाखवलेला आरसाच आहे. आपल्या एखाद्या लकबीची हुबेहूब नक्कल करणाऱ्या आपल्या मुलाला आपण हसून टाळ्या वाजवून दाद देतो पण हेच जर तो आपल्याला उलटं बोललं तर प्रसंगी आपण दोन रट्टे पण ठेऊन देतो. पण त्याने हे असे उलटे बोलणे आपल्याच घरात बघितले आहे हे आपण सोयीस्कर रित्या विसरतो. पैसे कमावुन सगळी ऐहिक सुखे देण्याच्या नादात त्या कोवळ्या जिवाच्या संगोपनासाठी आवश्यक असणारा वेळ मात्र आपण देऊ शकत नाही हीच खेदाची गोष्ट आहे. विचार करता करता मन सुन्न झालं आणि अश्या वेळी संदीप खरेच्या कवितेची आठवण झाली

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी?
कोणी बोलायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी?
खेळ ठेवले मांडून … परि खेळगडी नाही

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s