पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ६

आमच्या अश्या शांत आणि मार्मिक संवादामुळे एकंदरीत वर्गातील इतर पालकांची करमणूक मात्र झाली. काही पुरुषांनी नंतर खाजगीत मला हे देखील सांगितले कि पुढील मिटिंग ला तुम्ही येणार असाल तरच आम्ही येऊ. शिक्षिका देखील पहिल्याच पालकांच्या बैठकी दरम्यान मुलांची चौकस बुद्धी आणि त्यांना मिळणारी वागणूक या माझ्या पत्नीने विचारलेल्या प्रश्नांवर खुश होत्या. “आता बघ मी कशी बोलते” असा पवित्रा घेऊन जशी आम्हांला घरी ढकलत ढकलत मुद्द्यावर आणून ठेवते तसाच अविर्भाव इथे पण दाखवला असल्याने बऱ्याच मातांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. मुलांची प्रगती त्यांचा पुढील वार्षिक अभ्यासक्रम यावर जुजबी चर्चा होऊन सभा तहकूब झाली. “तुम्ही थांबा बाहेर मी आलेच” याचा अर्थ तुमच्या अपरोक्ष मला टीचर ना काहीतरी विचारायचे आहे हे कळण्या इतपत मी मुरलेला असल्या कारणाने मी आणि मुलगी तिथून बाहेर पडलो.

काही पालक नंतर माझ्याशी सुसंवाद साधत असतानाच हिचे तेथे आगमन झाले. एक वेगळीच लकाकी होती तिच्या चेहेऱ्यावर, अगदी भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर वरील बायकांच्या तोंडावर असते तशीच. कदाचित आमच्या बद्दल (मी चे आदरार्थी बहुवचन) प्रशंसनीय गौरवोद्गार काढले असावेत अशी उगाच शंका मनात येऊन गेली. “काय म्हणत होते बाकीचे पेरेंट्स” – ती. मी म्हटले “त्यांना मी सामुपदेशक वाटलो …. मी पण मग बाण सोडला … आपण इतरांशी जसे वागतो तसच दुसरे कुणी आपल्याशी वागले तर कसे वाटेल हा विचार करून वागा. सर्वसामान्य माणसेच पुढे सर्वमान्य होतात आणि कीर्तन संपवले” पुढे मी जे काही बोललो ते ऐकून घेण्याच्या ही मनस्थितीत दिसत नव्हती. गाडीला किक मारली … आणि अहो आश्चर्यम् … एका किक मध्ये गाडी चालू झाली पण. तिघे जण स्वार होऊन घरा कडे निघालो. मुलगी पुढे उभी राहून नेहेमीपणे अविरत बडबड करत होती. बायको जरा जास्तच जवळीक साधत कानात म्हणाली “मग येणार ना पुढच्या मिटिंगला? टीचर म्हणत होत्या तुमच्या मिस्टरांना आणू नका, खूप बोलतात आणि इतर पालकांचे लक्ष वेधून घेतात. मध्येच हायपर काय होतात. But seems to be a good father, मी पण म्हणाले आहेच तो असा वेगळा वेगळा”. अशी मिश्कील संधी मी थोडीच सोडणार? “छे छे मी येणारच …. मी बघितले, मी बोलत असताना त्यांचा तरुण शिक्षक आणि पालक वर्ग कसा भान हरपून बघत होता माझ्याकडे” – या वेळी कोपर मारायला जागा न मिळाल्याने कमरेवर नाजूक चिमटा मात्र बसला होता.

या पेरेंट्स मिटिंग मुळे एक मात्र झाले, आज कित्येक वर्षांनी परत एकदा त्या बेंच वर बसायचे भाग्य मिळाले. पाय मुडपून बसायला लागत असल्याने आपण मोठे झालो आहोत याचे भान असले तरी वर्गात बसायला मिळाल्याचा आनंद अवर्णनीय होता. तो काळा फळा, त्याच्या चौकटीवर ठेवलेले डस्टर, खडू, पोलिश केलेले टेबल, दोन हात असलेली लाकडी खुर्ची, दोन्ही बाजूला असलेल्या खिडकीतून वाहणारी वाऱ्याची झुळूक मला परत माझ्या शालेय जीवनातील मोर पिसार्याप्रमाणे जपलेल्या आठवणींच्या गावी घेऊन जायला आतुर झाले. बऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्या आड गेल्या असल्या तरी एकंदरीत माझे शालेय जीवन माझ्या पालकांसाठी जिकरीचेच होते असे मानायला हरकत नाही. त्या वेळी अश्या मिटींगा असत्या तर केवळ माझ्या सारख्या काही मुलांमुळे दर महिन्याला न घेता दर आठवड्याला भरवल्या गेल्या असत्या आणि आमच्या मातोश्रींनी तिथेच १५ मिनिटे मला उभे केले असते. दर आठवड्याला शाळेत विसरलेल्या वस्तूंमुळे खाल्लेला मार आणि त्या परत आणण्यासाठी पितृपक्षाकडून झालेली बोळवण कसा विसरू शकेन. काही शिक्षकांनी जितका मार दिलाय तितकेच प्रेम आणि संस्कारही दिलेत. रानडे सर, कुलकर्णी सर, भंडारी सर, महाजन सर, शिंपी सर, कुलकर्णी बाई, बर्वे बाई, पळधे बाई, टांकसाळे बाई, अत्रे बाई, गोखले बाई, महाजन बाई, संगीत शिक्षिका दाणी बाई, शिवणकाम शिक्षिका साखरे बाई (यादी बरीच मोठी आहे) यांच्या सारख्या अगणित शिक्षकांनी आमचे जीवन समृद्ध करण्या साठी जि धडपड केली आहे, जे अतोनात कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. त्यावेळी चालू असलेल्या विद्यार्थी दशेमुळे कदाचित ते क्लेशदायक, निरर्थक वाटत असले तरी आता आयुष्यातल्या अनुभवाने उमगले कि सगळे गुरु निष्णात होते, भरभरून ज्ञानदान करत होते पण त्यांच्या कडून आत्मसात करायला कुठे तरी कमी पडलो.

Anuvina-parentsMeet-border

3 thoughts on “पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ६

 1. पहिल्यांदाच तुमच्या ब्लॉग वर आले आहे. आणि पेरेंट्स मीट चे ६ हि भाग एका दमात वाचून काढले.
  अप्रतिम लिखाण. तुमची लेखन शैली खूप आवडली. सगळा प्रसंग तुम्ही जसाच्या तसा डोळ्या समोर उभा केलात. हे सहा भाग वाचतांना मी इतकी हसले आहे कि आता पोट दुखते आहे. पण तरीही लिहिते आहे.
  असाच लिहित रहा आणि हसवत रहा.
  शुभेछ्या.

 2. खूप खूप खूप छान!
  इतके दिवस हा ब्लॉग कुठे होता असा प्रश्न पडलाय.
  हे ६ भाग तर वाचलेच, पण आता मागच्या शेकडो पोस्ट्स वाचायला बसलोय…

  • धन्यवाद रजत जोशी साहेब,
   गेले वर्षभर काही कारणा मुळे लिखाण करायला जमले नाही त्यामुळे सूची मध्ये हि अनुदिनी येत नसावी.
   प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे.
   लोभ असावा,
   आनंद भातखंडे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s