सुट्टी आणि मी : भाग ०२

मुलीचं उन्हाळी शिबीर यथासांग पार पडलं आणि आमची नागांवला जायची तयारी सुरु झाली. सामानसुमान जमवणे त्याची बांधाबांध सगळंच नोकरीच्या वेळा सांभाळून शिस्तीच्या बडग्याखाली आमलात आणलं जात होतं. नागांवचे घर इतर वेळी बंदच असल्याने लागणारे बरेच समान घेऊन जायची सवयच झाली होती आणि यावेळेची वस्ती तर चक्क ८ दिवसांची होती त्यामुळे जाताना सामानामुळे गाडीची डिक्की भारलेली असणार हे निश्चित. आमचे कपडे, विविध खायच्या वस्तू, चकणा आयटम्स, निरनिराळी पीठे, आम्ही नसताना घरात फुकट जातील म्हणून उरलेल्या भाज्या, कांदे बटाटे अश्या अनेक गोष्टीनी डिकी सजली होती. डीकीचा दरवाजा लावताना आत काहीतरी तुटल्याचा आवाज आला पण आतले रचून ठेवलेले समान पत्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळेल म्हणून उगीच रिस्क नाही घेतली. जाता जाता वाटेमध्येच उसनी आणलेली कर्नाळ्यातील कांदे भज्यांची भूक आणि पळीच्या सोड्याची तहान भागवली. डोंबिवली पासून नागाव मात्र १०० की.मी. असल्याने ३ तासातच इच्छित स्थळी पोचलो. हेमंतानेआधीच सगळी साफसफाई करून ठेवली असल्याने समान लगेच जागच्या जागी लावण्यासाठी शि.प्रि. नी कंबर कसली. दिवसभरात हळू हळू पाव्हणेरावणे जमू लागले. पुण्याहून माधुरी, अभिजीत आणि ओम आले. बोरिवली वरून ताई, मिलिंद आणि कलश आले आणि कोरम पूर्ण झाला. घर कसं फुलून गेलं आणि रात्री गप्पांना ऊत आला. सकाळी सकाळी माझ्या भाच्यांनी आणि मुलीने मला झोपेतून उठवण्याचा चंग बांधला होता. प्रत्येक जण आपापल्या परीने खोड्या काढत मला उठवत होता. आणि जसा मी उठलो तसा “आजचा मेनू” अश्या अविर्भावात येत्या ५ दिवसात काय काय धम्माल या बच्चे कंपनीला करायची होती त्याचा पाढाच वाचून दाखवला. अगदी आंबे चिंचा गोळा करणे, बर्फाचा गोळा खाणे, शहाळी पडणे, हौदात डुंबणे, समुद्रावर फिरायला जाणे इथ पासून ते बैलगाडीत बसणे इथपर्यंत. त्यात बर्फाचा गोळा, हौद आणि समुद्र एकदम “अती महत्वाचे आणि अत्यावश्यक” या सदरातील. हे सगळे आणि अजून काही सुचेल ते आपण या सुट्टीत करायचे असे म्हटल्यावर एकच गलका झाला. आता इथे मामाच “राजी” म्हटल्यावर घरातला कुठलाही “काजी” काय बोलणार? तसंही घरातील समस्त महिला वर्गाने ढील दिली असल्याने सगळ्या बालक वर्गाचे पतंग हवेत मस्त बदत होते … आणि मी बदवत होतो.

हौद आधीच साफ करून ठेवला होता आणि पंप लावून हौद भरून घेत होतो. तर ही वानरसेना बोलावण्या अगोदर तयार. माझी मुलगी तर चक्क बिकिनी घालून “मुलांनो मारा उड्या” या आज्ञेची वाट बघत होती. तिघांनी हौदात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. १२ वर्षाचा कलश त्याच्या पेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या ७ वर्षाची आर्या आणि ४ वर्षाच्या ओम ची छान काळजी घेत होता. त्यांचा खोडकरपणा बाहेर उभं राहून बघणं जीवावर आलं होतं आणि त्यातच या तिघांनी मला पुरता भिजवला असल्याने मी पण हौदात उतरलो. सकाळी ९ वाजता चालू झालेले हे रासन्हाण १२ वाजता या सगळ्यांची आजी अर्थात माझ्या मातोश्री हातात शिपटी घेउन आली तेंव्हा संपलं. संध्याकाळी समुद्रावर जाऊन धमाल केली. शंख शिंपले जमवले. वाळूचा किल्ला केला, नक्षी काढली, समुद्राच्या लाटांमध्ये सैरावैरा धावलो. समुद्रावरचा गोळेवाला आमच्या गल्लीतूनच जात असल्याने दुसऱ्या दिवशी त्याला यायला सांगितले आणि बच्चे कंपनीने परत एकदा कल्ला केला “उद्या गोळा खायचा … उद्या गोळा खायचा”. समुद्रावरच इतकं खेळल्यावर अर्थात क्षुधाशमनार्थ भेळ आणि तृषाशमनार्थ थंडगार उसाचा रस ही मागणी देखील पूर्ण केली. दमून भागून माझी तिन्ही पाखरं गाढ झोपी गेली. सगळे इतके दामले असून देखील त्यांच्या चेहेऱ्यावर एक तजेला होता … स्थळ काळाचा परिणाम असेल कदाचित.

ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी गोळेवाला घंटानाद करत दरवाज्यात हजर झाला तसा पोरांनी “गोळा गोळा” म्हणत एकच गजर केला. थोरा मोठ्यांनी बर्फ आणि त्यात मिसळलेला गोड रस चुपून चुपून गोळा खाल्ला … इतकंच नव्हे तर सगळ्यांनी वरून रस मागून घेतला. मुलांसाठी चवीपेक्षा रंगाचे आकर्षण अधिक. कुणाला हिरवा, कुणाला गुलाबी लाल, कुणाला कालाखट्टा तर कुणाला मिक्स – अशी रंग आणि चवीची रेलचेल होती. मुलांनी अर्धे खाल्ले आणि अर्धे सांडवले आणि अंगणात सप्तरंगी बर्फाचा सडा पडला. बालगोपाळांचीच काय तर मोठ्यांच्या देखील काही ना काही मागण्या रोज पूर्ण करत होतो…नेम धरून आंबे चिंचा पडणं, शहाळी पिणं, अगदी बैलगाडीची रपेट पण मारून झाली. क्रिकेट, पत्ते याच बरोबर लंगडी, आबादुबी पण खेळलो. डुक्करमुसुंडी, विषामृत, डब्बा ऐसपैस, खांब खांब खांबोळी असे जागे अभावी लोप पावत चाललेले खेळ देखील शिकवले. खेळता खेळता मुलं पडायची धडपडायची पण उठून परत खेळायला सुरुवात…तिथल्या मातीचाच गुणधर्म असावा कदाचित. एक दिवस आजूबाजूच्या प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घडवून आणले. नागावच्या आजूबाजूला बघण्या सारखी बरीच ठिकाणे असल्याने कुठे जायचे हा प्रश्नच नव्हता. सुंदर सुंदर देवालयं, नारळी पोफळीच्या बागा, अथांग समुद्राच्या वाळूला खेटून उभी असलेली सुरुची बनं, जगप्रसिद्ध शिल्पकार श्री. करमरकर याचं कलादालन, कोर्लईचा किल्ला आणि दीपस्तंभ, शितलादेवी,  नांदगावचा सिद्धिविनायक,  हे सगळं करता करता चौलचा दत्त, कनकेश्वर मंदिर, सिद्धेश्वर, सागरगड, वंदरलिंगी, रामधरणेश्वर अशी जरा उंचावर असलेली ठिकाणे मात्र राहून गेली. मला आश्चर्य याचं वाटत होतं की ही सगळी मुलं शहरात असताना पायात चप्पल नसेल तर घरच्या बाहेर पडणार नाहीत पण इथे माझ्या बरोबर रानावनात, शेतावर अनवाणी यायला देखील एका पायावर तयार होती. मला मिळालेल्या ४-५ दिवसांमध्ये मी त्यांच्यात गावातील राहणीमाना बद्दलची आस्था जागवत होतो आणि जगत होतो.

हळू हळू तिथले वास्तव्य संपत आले आणि एकमेकांचा निरोप घेण्याची वेळ आली. अजून काही दिवस राहिलो असतो तर अजून मज्जा आली असती असं प्रत्येकाला वाटत होतं. स्वतःच्या रक्ताच्या ३ पिढ्या जेंव्हा अश्या एकत्र येतात तेंव्हा नात्यांमधील रेशमी वीण अशीच घट्ट होत जाते आणि या आठवणी चिरकाल टिकतात. पुढल्या सुट्टीत इथेच येऊ, दिवाळी इथेच साजरी करू, भरपूर फटके वाजवू असे म्हणत आमची पुढची पिढी एकमेकांचा निरोप घेत होती. हे बघून आमच्या मागील पिढीचे डोळे पाणावले नाही तरच नवल. आजी आजोबांनी डोळ्यांच्या कडा पुसत तिन्ही नातवंडांना खाऊ साठी पैसे दिले. घर जसं भरलं तसचं हलक्या फुलक्या आठवणी ठेवत रितं झालं. दरवाज्याला कुलूप लावताना माझी कन्या मला म्हणाली “दिवाळीच्या सुट्टीत आपण इथेच येऊ. अजून बाकीच्यांना पण बोलवू. कुठेतरी फिरायला जाण्यापेक्षा इथेच जाम मज्जा येते”. मुलीला ऋणानुबंधाची गोडी लावण्याचा माझा उद्देश सफल झाला होता.

नागांवच्या गोड आठवणी मनात ठेवून एकदम ताजे तावाने होत आम्ही सगळे एकमेकांच्या घरी पोहोचलो आणि रोजच्या जगरहाटीला सुरुवात झाली. नोकरी, प्रदूषण, ट्रेनचा प्रवास असह्य असलं तरी करणं भाग होतं. पण मुलीला दिवाळीत काश्मीरला नेण्याचा बेत काही डोक्यातून जाईना. एक कल्पना सुचली आणि धडाधड फोन फिरवले. दिवाळीचा काश्मीरचा बेत निश्चित केला …. हो पण फक्त आम्ही तिघं नाही. माणसं सगळी तीच फक्त स्थळ वेगळं. सहकुटुंब सहपरिवार काश्मीर पण दिवाळीचे फटाके नागांवच्या अंगणात फोडून झाल्यावरच.

सुट्टी आणि मी : भाग ०१

मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे “धिंगाणा” घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते. शनिवारी सकाळचे नित्यकर्म आटपून चहाचा (सकाळ पासूनचा दुसरा) घोट घेत घेत देशात चाललेल्या घोटाळ्यांच्या बातम्या चाळत बसलो होतो. तितक्यात माझे कन्या रत्न झोपेतून उठून डोळे चोळत चोळत माझ्या मांडीवर येऊन पहुडली. या भानगडीत वर्तमानपत्राचा चोळामोळा झालेला आहे, चहाच्या कपाचा फुटबॉल होता होता वाचला होता हे तिच्या ध्यानीमनी पण नव्हतं. मी म्हणालो “काय माऊ, आज उठल्या उठल्या लादी गोडी? बोला काय हवं ते बोला” बरयाच मागण्या होत्या परीक्षेच्या आधी पासून तुंबलेल्या त्या सगळ्या एका झटक्यात माझ्यापुढे मांडल्या. बहुतेक स्वप्नात हे सगळं आलं असणार. काय आहे … आपण अगोदर दिलेली आमिष, लालूच, वचनं कालमानापरत्वे विसरून जातो पण ही मुलं मात्र सगळं लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी आपल्याला कोंडीत पकडून आपला बाजीप्रभू करतात. सगळ्यात मोठी मागणी होती फिरायला जायची. सगळं बोलून झाल्यावर तिचा रेटा चालू झाला …. “आपण कुठे तरी फिरायला जाऊ”. मि म्हटलं “हो जाऊ या ना …. आज बागेत जाऊ, उद्या मॉल मध्ये जाऊ, केंव्हातरी मुंबई बघायला जाऊ. “नाही नाही असं फिरायला नाही, कुठे तरी लांब जाऊ … हॉटेलमध्ये राहू, खूप खूप मस्ती करू, शॉपिंग करू” माझ्या कन्येचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या भात्याला गदागदा हलवत होता. मी जरा सारवासारव करत म्हणालो “पण हे प्रॉमिस केलं नव्हतं मी” कन्या माझ्या वरताण “मग काय झालं आत्ता कर ना” अडलेल्या हरीच्या अविर्भावात तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं (म्हणजे तिने ते घेतलं). काम फत्ते होताच टुणकन उडी मारून ही स्वारी आई कडे पळाली. बहुतेक शाळा संपली आहे हे लक्षात न येता माझी शि.प्रि. बायकोने तिला फैलावर घेतले “उठल्या उठल्या चिकटलीस त्याला? जा आधी आवरून घे … तू ही तसलीच आणि तुझा बाबा म्हणजे ….” आताशा माझे कान सवयीने बंद झाले होते आणि मी घोटाळे वाचण्यात रंगून गेलो.

आज्ञाधारक मुलीने सगळे पटापट आवरले आणि कागद पेन घेऊन माझ्या समोर नाचवू लागली. “बाबा चल आपण प्लान करू. काही असेल तर तु लगेच कागद पेन घेऊन बसतोस ना म्हणून मीच घेऊन आले”. माझ्या लेकीने अगदी चंगच बांधलं होता. तिचं पण बरोबरच आहे म्हणा … सगळ्या मैत्रिणी फिरायला कुठे ना कुठे गेल्या आहेत आणि त्या आल्यावर त्यांनी केलेली गम्मत जम्मत सांगणार मग मी त्यांना काय सांगू हा यक्ष प्रश्न. कागद पेन घेऊन बसणार तितक्यात शि.प्रि. ची आज्ञा झाली “कुठेही जायचं नाहीये. आणि आता सगळी कडे बुकिंग फुल असणार. तिला विचारूनच ५ दिवसांच्या उन्हाळी शिबिरात तिचं नाव टाकलंय. नंतर आपण नागांवला जाणार आहोत. तिथे ताई, कलश, माधुरी आणि ओम … सगळे येणार आहेत.” झालं, आमचा प्लान कागदावर येण्या आधीच बारगळला होता. आणि डोळ्यांच्या मागे भरून ठेवलेल्या अश्रूंच्या टाकीची तोटी हळूहळू वाहायला लागली होती. “आपण प्लान तर करू, तु काळजी करू नको … या सुट्टीत नाही तर दिवाळीच्या सुट्टीत जाऊ” माझ्या समजूतदार पोरीला माझे हे सांत्वनपर शब्द एकदम जादूच्या छडी सारखे वाटले. डोळे पुसतच तिने मान डोलवली आणि म्हणाली “आपण दोघंच जायचं … तिला नाही न्यायचं.” आमच्या कुणावर जर माझी पोर नाराज असेल तर ती आमचा उल्लेख तो/ती असाच असतो हे मी जाणून असल्याने तिच्या वाक्यातली “ती” म्हणजे कोण हा प्रश्न मला पडला नाही. मी फक्त बरं म्हटलं. मी कुठे जायचं हे विचारण्याच्या आताच कन्यका म्हणाली “बाबा आपण काश्मीरला जाऊया. मला बर्फात खेळायचंय आणि बोटीत पण बसायचंय त्या देवयानी सारखं.” “माऊ सध्या तु जरा जास्तच सिरियल्स पाहतेस ना? त्या “देवयानी” सिरीयल मध्ये दाखवलं असेल काश्मीर. ” माझा थोडा तक्रारीचा सूर ऐकून कन्या वैतागली. “अरे ती देवयानी नाही माझ्या वर्गातली मैत्रीण. तिने मला दिवाळीच्या सुट्टीतले तिचे काश्मीरचे फोटो दाखवले” मी म्हटलं “अगं आत्ता बर्फ नसतो मग आत्ता गेलं तर तुला बर्फात खेळता येणार नाही.” मग बर्फ आत्ता का नसतो, दिवाळीतच का असतो? …. बाकीच्या वेळी जर तिथे बर्फ नसतो तर तिथे गोळेवाल्यासारखा विकत मिळत नाही का? या अश्या शंका “वितळे” पर्यंत मी बर्फ या विषयावर निरुपण केले आणि तिची जिज्ञासा थंडगार केली. प्लानिंग आत्ताच करायचं पण जाऊया दिवाळीत या वर ती ठाम होती. तिच्या समाधानासाठी एक ढोबळ आराखडा तयार केला आणि लेक खुश. आईला सांगून तिने तो कागद तिच्या डेस्क वर चिकटवला. रात्री शि.प्रि. म्हणाली “कशाला आत्ता पासून सांगून ठेवतोस? आणि आत्ता इतका खर्च करून तिच्या काही लक्षात राहणार आहे का? थोडी मोठी झाल्यावर जाऊ” मी म्हटलं “जाऊ या गं … याच कारणाने गेल्या ३-४ वर्षात कुठेही लांब नेलं नाही तुम्हांला” बायको मनापासून खुश झाली होती. 😉

चार भाई

माझा बालपणीचा बराचसा काळ डोंबिवली म्युनिसिपाल्टीच्या (त्या वेळचि डोंबिवली नगर परिषद) समोरच्या गल्ली मधल्या परिसरात गेला. खेळायला भरपूर जागा असल्याने आम्हा पोरा टोरांची दंगामस्ती चालायची.   बिबिकरांचा वाडा, तयशेट्ये यांची शुभांगी दर्शन (नार्वेकर ज्वेलर्स ची बिल्डिंग) वादळ बिल्डिंग, जुवेकरांचा वाडा, बाजुला कुलकर्ण्यांचा वाडा अशी आमची हद्द असायची. शुभांगी दर्शन चाळ स्वरुपाची असल्याने तिथे बिर्हाडकरू मुबलक आणि पर्यायाने बच्चे कंपनी पण भरपूर. प्रत्येक वयोगटाची 10-12 टाळकि असायचिच दंगामस्ती करायला ….त्यात मी आणि  माझे सवंगडी देखिल होते. आम्ही वादळ बिल्डिंगच्या तळ मजल्यावर रहायचो. घरासमोर आम्हाला खेळण्या पुरते आँगन होते. त्यामुळे काय खेळायचे असा प्रश्न कधीच पडला नाही. लंगड़ी, कबड्डी, लपाछपी, डबा ऐसपैस, लगोरी आणि क्वचित कधीतरी क्रिकेट …. अगदी फावल्या वेळात होपिंग करत करत सायकली पण धावडवल्या आहेत. सुट्टीच्या दिवशी तर ती गल्ली दणाणुन सोडली आहे.
शुभांगी दर्शन मध्ये दुसर्या मजल्यावर शहा कुटुंब रहायचे. दोन खोल्यांच्या बिर्हाडात शहा पति पत्नी आणि त्यांची ४ मुले ….. चारही मुलगे …. २ -४  वर्षांच्या अंतराने झालेले. सर्वात मोठा विजय उर्फ़ पप्पू (हा माझ्या पेक्षा देखिल 1-2 वर्षानी मोठा होता). क्रमांक दोन चा अश्विन, क्रमांक तिन अतुल, आणि क्रमांक चार विपुल. या चारही भावांमध्ये साम्य एकच ते म्हणजे ते चारही जण त्या काळच्या प्रसिद्ध ग्रीन्स इंग्लिश स्कुल मध्ये शिकायला जायचे. बाकी रंग, रूप, आकार यात कमालीचा फरक. बहुतेक वेळा हे चारही जण कायम एकत्र. खेळता खेळता त्यातला एकाला कुणाला जरी बोलावणे आले तरी चारही जण गायब व्हायचे. संध्याकाळी खेळायला येताना पण चारही जण बरोबर. धाकटा विपुल त्याच्या आई बरोबर असायचा पण नंतर मग तो पण शेपटा सारखा आमच्या मागे.
त्यांच्या आईला आम्ही पप्पुच्याई (पप्पू च्या आई) म्हाणायाचो. तिथे कुणीही बाई एकमेकींना नावाने का हाक मारत नसत हा त्या काळी पडलेल्या अनेक प्रश्नांपैकी एक गहन प्रश्न होता. अमक्याच्याई …. तमक्याच्याई …. ही काही तरी अजब प्रकारची हाक मारायची पद्धत. तर या पप्पुच्याई जाम कडक होत्या. शिडशिडित बांधा आणि टिपिकल गुजराथी. गुजराथी पद्धतीची साडी, लांबसडक केसांची वेणी, तार सप्ताकातिल किरटा आवाज. या चौघांपैकी कुणाला ना कुणाला तरी कायम ओरडत असायची. अर्थात चार दंगेखोर मुलांच्या आईला प्रत्येकाशी प्रेमाने बोलणे खुपच कठिण आहे हे अत्ता पटते.
पप्पू आणि मी जवळ जवळ सारख्याच वयाचे त्यामुळे आमच्या दोघांचे सख्य अधिक. पण बाकी सगळ्याच दृष्टीने कुठेच सारखे पणा नव्हता. ते जैन तर आम्ही पक्के कोकणस्थ ब्राह्मण. घरातील भाषाच काय पण शाळेतिल विषयांचे माध्यम देखिल वेगवेगळे. पण लहानपणी ही असली कुठलीही बंधने कधीच आड आली नाहित. पप्पू बरोबर एकदा मी त्यांच्या मंदिरात गेलो होतो …. उत्सुकता म्हणुन. तिथे तो जसे करत होता तसेच मी पण केले. पिवळा टिळा लावून घरी आलो आणि मग परत कधी जायचे धाडस झाले नाही. अश्विन माझ्यापेक्षा वयाने लहान. पप्पू स्वभावाने जितका शांत तितकाच अश्विन मस्तीखोर. मुळात तो आधी अजोळी रहायचा. माझ्याशी गप्पा मारताना तो त्याच्या अजोळच्या गोष्टी सॉलिड रंगवून सांगायचा आणि मी पण गुंग व्हायचो. त्याचे घोड्यावरून फ़िरणे काय …. तलवारी काय…. त्या मारामार्या काय …. जणू हे तिथले जहागीरदार किंवा वतनदारच. हे सगळे धादांत खोटे असणार हे अत्ता पटतय कारण त्याचे अजोळ होते “मरोळ”. अतुल …. तिन नंबर … हा नेहेमी मला कुठल्या ना कुठल्या पिक्चरची स्टोरी सांगायचा. उपकार या चित्रपटातले “मेरे देश की धरती” हे त्याचे फेवरिट गाणे. खेळताना याला आम्ही बरेच वेळा बकरा बनवायचो. धाकट्या विपुलशी कधी विशेष सूत जुळले नाही कारण त्याच्या आईने पदर झटकला की तो आमच्यात यायचा. आणि आम्ही कधी याची खोड काढली की रडत घरी जायचा. त्याचे असे निर्गमन झाले की हे तिघे त्यांच्या आईच्या हाकेकडे लक्ष ठेवून असायचे. वरून आरोळी आली की सगले धूम पसार.
पप्पुच्या घराचा उम्बराठा ओलाण्डायची वेळ कधीच आली नाही. बाहेर खेळायला इतकी मुबलक जागा असल्यावर आम्ही घराच्या चार भिंती मध्ये सामावणे निव्वळ अशक्य. बैठे खेळ देखिल जिन्यात किंवा चाळीच्या संयुक्त बालकनी मध्ये खेळले जायचे. संयुक्त बाल्कनी मध्ये यांच्या घरा समोर कायम काही ना काही तरी वाळवणे टाकलेली असायची. घर एकदम स्वच्छ …. लखलखित असायचे. कधी कुठे पसारा दिसायचा नाही …. एकंदरीत पप्पुच्याई कड़क शिस्तिच्या होत्या. या चार महात्म्यांचा पालनकर्ता बघितल्याचे आठवत नाही कारण त्यावेळी तिन्हीसांजेला आम्ही आपापल्या घरात असायचो. त्यांच्या पोषणकर्ती चा दराराच इतका होता की एकाला हाक मारली की क्रमाक्रमाने चारही बंधू घरी पोचायाचे.
परिक्षेच्या काळात मात्र या चौघांपैकी कुणीच खेळायला यायचे नाही. एकदाच त्याना बोलवायला गेलो होतो. तर हे चारही जण चार कोपर्यात भिंती कडे तोंड करून घोकम्पत्ति करत बसले होते. पप्पुच्याईने नुसते माझ्याकडे बघितले आणि मी तिथून पसार झालो. परीक्षा संपल्यावर मात्र धम्माल चालायची. सकाळचि अन्हिके उरकून सगळे खाली जमयचो मग जेवायला घरी. नंतरचा प्लान असायचा बाल्कनी मधे काहीतरी टाईमपास. 4 वाजले की पप्पुच्याई पप्पूला किंवा अश्विनला बोलवून त्याच्या हातात एक पिशवी आणि काही पैसे द्यायच्या. आणि बाकीचे तिघे हळु हळु घरी जायचे. पप्पू / अश्विन पिशवीतुन विब्स ब्रेड्चा पुडा घेउन यायचा. ब्रेड्च्या स्लाइसची चौघां मध्ये समसमान वाटणी व्हायची. पप्पुच्याई प्रत्येकाला कपात गरमागरम वाफालालेला चहा द्यायच्या. चहात पाव बुडवून खाताना चहा संपला तर परत मिळायचा. बाकीची आमची सेना हे सगळे कुतुहलाने पहात असायचो. कार्यभाग संपला की मग परत हे चौघे खेळायला बाहेर. एखादी गोष्ट भावंडामध्ये काटेकोर रित्या वाटुन खाण्याची अजब पद्धत होती त्यांची. आपापसात एकमेकाना लोळवतिल पण दुसर्या कुणी या पैकी एकाला जरी दमबाजी केली तर सगळे एक होतील. मला त्यांच्या याच एकीचे खुप अप्रूप वाटायचे.
माझ्या वयाच्या 12व्या वर्षी आम्ही ती जागा सोडली आणि चार रस्ता चौकातील डोंगरे यांच्या नविन बिल्डिंग मध्ये रहायला आलो. नविन जागी स्थिरावताना नविन मित्र जोडले गेले आणि हे चारही भाऊ माझ्या पासून कायमचे दुरावले. कालांतराने त्यानी देखिल डोम्बिवली सोडल्याचे ऐकले. या घटनेला आता जवळ जवळ 25 एक वर्षे झाली असतील. पण आजही त्या गल्लीत गेल्यावर बालपणी चा गंध रोमारोमाला स्पर्श करुन जातो. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असं म्हणताना उगीचच वाटत राहतं … कुठे असतील ते सगळे असेच एकत्र असतील का भरकटले असतील वार्यावर उडालेल्या रांगोळीच्या कणां सारखे?