सुट्टी आणि मी : भाग ०१

मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे “धिंगाणा” घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते. शनिवारी सकाळचे नित्यकर्म आटपून चहाचा (सकाळ पासूनचा दुसरा) घोट घेत घेत देशात चाललेल्या घोटाळ्यांच्या बातम्या चाळत बसलो होतो. तितक्यात माझे कन्या रत्न झोपेतून उठून डोळे चोळत चोळत माझ्या मांडीवर येऊन पहुडली. या भानगडीत वर्तमानपत्राचा चोळामोळा झालेला आहे, चहाच्या कपाचा फुटबॉल होता होता वाचला होता हे तिच्या ध्यानीमनी पण नव्हतं. मी म्हणालो “काय माऊ, आज उठल्या उठल्या लादी गोडी? बोला काय हवं ते बोला” बरयाच मागण्या होत्या परीक्षेच्या आधी पासून तुंबलेल्या त्या सगळ्या एका झटक्यात माझ्यापुढे मांडल्या. बहुतेक स्वप्नात हे सगळं आलं असणार. काय आहे … आपण अगोदर दिलेली आमिष, लालूच, वचनं कालमानापरत्वे विसरून जातो पण ही मुलं मात्र सगळं लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी आपल्याला कोंडीत पकडून आपला बाजीप्रभू करतात. सगळ्यात मोठी मागणी होती फिरायला जायची. सगळं बोलून झाल्यावर तिचा रेटा चालू झाला …. “आपण कुठे तरी फिरायला जाऊ”. मि म्हटलं “हो जाऊ या ना …. आज बागेत जाऊ, उद्या मॉल मध्ये जाऊ, केंव्हातरी मुंबई बघायला जाऊ. “नाही नाही असं फिरायला नाही, कुठे तरी लांब जाऊ … हॉटेलमध्ये राहू, खूप खूप मस्ती करू, शॉपिंग करू” माझ्या कन्येचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या भात्याला गदागदा हलवत होता. मी जरा सारवासारव करत म्हणालो “पण हे प्रॉमिस केलं नव्हतं मी” कन्या माझ्या वरताण “मग काय झालं आत्ता कर ना” अडलेल्या हरीच्या अविर्भावात तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं (म्हणजे तिने ते घेतलं). काम फत्ते होताच टुणकन उडी मारून ही स्वारी आई कडे पळाली. बहुतेक शाळा संपली आहे हे लक्षात न येता माझी शि.प्रि. बायकोने तिला फैलावर घेतले “उठल्या उठल्या चिकटलीस त्याला? जा आधी आवरून घे … तू ही तसलीच आणि तुझा बाबा म्हणजे ….” आताशा माझे कान सवयीने बंद झाले होते आणि मी घोटाळे वाचण्यात रंगून गेलो.

आज्ञाधारक मुलीने सगळे पटापट आवरले आणि कागद पेन घेऊन माझ्या समोर नाचवू लागली. “बाबा चल आपण प्लान करू. काही असेल तर तु लगेच कागद पेन घेऊन बसतोस ना म्हणून मीच घेऊन आले”. माझ्या लेकीने अगदी चंगच बांधलं होता. तिचं पण बरोबरच आहे म्हणा … सगळ्या मैत्रिणी फिरायला कुठे ना कुठे गेल्या आहेत आणि त्या आल्यावर त्यांनी केलेली गम्मत जम्मत सांगणार मग मी त्यांना काय सांगू हा यक्ष प्रश्न. कागद पेन घेऊन बसणार तितक्यात शि.प्रि. ची आज्ञा झाली “कुठेही जायचं नाहीये. आणि आता सगळी कडे बुकिंग फुल असणार. तिला विचारूनच ५ दिवसांच्या उन्हाळी शिबिरात तिचं नाव टाकलंय. नंतर आपण नागांवला जाणार आहोत. तिथे ताई, कलश, माधुरी आणि ओम … सगळे येणार आहेत.” झालं, आमचा प्लान कागदावर येण्या आधीच बारगळला होता. आणि डोळ्यांच्या मागे भरून ठेवलेल्या अश्रूंच्या टाकीची तोटी हळूहळू वाहायला लागली होती. “आपण प्लान तर करू, तु काळजी करू नको … या सुट्टीत नाही तर दिवाळीच्या सुट्टीत जाऊ” माझ्या समजूतदार पोरीला माझे हे सांत्वनपर शब्द एकदम जादूच्या छडी सारखे वाटले. डोळे पुसतच तिने मान डोलवली आणि म्हणाली “आपण दोघंच जायचं … तिला नाही न्यायचं.” आमच्या कुणावर जर माझी पोर नाराज असेल तर ती आमचा उल्लेख तो/ती असाच असतो हे मी जाणून असल्याने तिच्या वाक्यातली “ती” म्हणजे कोण हा प्रश्न मला पडला नाही. मी फक्त बरं म्हटलं. मी कुठे जायचं हे विचारण्याच्या आताच कन्यका म्हणाली “बाबा आपण काश्मीरला जाऊया. मला बर्फात खेळायचंय आणि बोटीत पण बसायचंय त्या देवयानी सारखं.” “माऊ सध्या तु जरा जास्तच सिरियल्स पाहतेस ना? त्या “देवयानी” सिरीयल मध्ये दाखवलं असेल काश्मीर. ” माझा थोडा तक्रारीचा सूर ऐकून कन्या वैतागली. “अरे ती देवयानी नाही माझ्या वर्गातली मैत्रीण. तिने मला दिवाळीच्या सुट्टीतले तिचे काश्मीरचे फोटो दाखवले” मी म्हटलं “अगं आत्ता बर्फ नसतो मग आत्ता गेलं तर तुला बर्फात खेळता येणार नाही.” मग बर्फ आत्ता का नसतो, दिवाळीतच का असतो? …. बाकीच्या वेळी जर तिथे बर्फ नसतो तर तिथे गोळेवाल्यासारखा विकत मिळत नाही का? या अश्या शंका “वितळे” पर्यंत मी बर्फ या विषयावर निरुपण केले आणि तिची जिज्ञासा थंडगार केली. प्लानिंग आत्ताच करायचं पण जाऊया दिवाळीत या वर ती ठाम होती. तिच्या समाधानासाठी एक ढोबळ आराखडा तयार केला आणि लेक खुश. आईला सांगून तिने तो कागद तिच्या डेस्क वर चिकटवला. रात्री शि.प्रि. म्हणाली “कशाला आत्ता पासून सांगून ठेवतोस? आणि आत्ता इतका खर्च करून तिच्या काही लक्षात राहणार आहे का? थोडी मोठी झाल्यावर जाऊ” मी म्हटलं “जाऊ या गं … याच कारणाने गेल्या ३-४ वर्षात कुठेही लांब नेलं नाही तुम्हांला” बायको मनापासून खुश झाली होती. 😉

सिद्धेश्वर भ्रमण

नागांवला आमच्या घरी दर वर्षी कृष्ण जन्माचा उत्सव असतो. आमच्या करता हा एकदम महत्वाचा सोहळा कारण याला ५-६ पिढ्यांचा इतिहास आहे. जवळचे सगळे नातलग आवर्जुन या उत्सवाला हजेरी लावतात. त्यामुळे नविन वर्षाची दिनदर्शिका हाती पडताच काही महत्वाच्या तारखांच्या नोंदी करताना श्रावण कृष्ण अष्टमीचा देखिल अंतर्भाव असतोच. त्यात सुद्धा कुठे विकांत लागून येत असेल तर मग आधी पासूनच वेगवेगळे बेत मनात घोळत राहतात. २-४ वर्षांपूर्वी अश्याच लागुन आलेल्या सुट्टी मध्ये फ़णसाडच्या धरणावर केलेली धम्माल, त्याच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत. या वर्षी म्हणजे २०१४ साली गोकुळाष्टमीला जोडून १५ ऑगस्ट आल्यामुळे ४ दिवसांची सलग सुट्टी मिळाली. अश्या वेळी अनिल दादाने जवळ पासच्या भ्रमंतीचा नेम नाही केला तरच नवल. अश्या भटकंतीसाठी आमचे दादासाहेब अतिशय उत्साही. तसा तो एक व्यक्तीचित्राचे मटेरियल आहे. (त्या बद्दल एखादी वेगळी पोस्ट लिहेन). यावेळी आम्ही सिद्धेश्वरला जायचे ठरवले. काही अडचणी मुळे १६ च्या ऐवजी १७ तारीख नक्की केली. मेम्बरांची गळती आधीच सुरु झाली होती पण काही झाले तरी आपण जायचे यावर दादा, मी आणि अभय ठाम होतो.  आणि शेवटी आम्ही तिघेच राहिलो ….. सिद्धेश्वर भ्रमंती साठी.

संह्याद्रीच्या मूळ पर्वतराजी पासून पश्चिमेकडे समुद्रा पर्यंत काही पर्वत रांगा पोचल्या. कोकणात हे दृश्य बरेच वेळा बघायला मिळते. अलिबाग पासून अशीच एक दक्षिणोत्तर रांग रोह्या पर्यंत गेली आहे. सदाहरित नसले तरी हे उघडे बोडके डोंगर थोडा जरी पाउस पडला तरी हिरवी शाल पांघरून घेतात. याच डोंगर रांगांमध्ये सिद्धेश्वर, सागरगड, कोरलाई, कनकेश्वर, रामधरणेश्वर, फणसाडचे अभयारण्य अशी अनेक निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळे आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. पेण अलीबाग रस्त्यावर कार्लेखिंड ओलांडली की खंडाळे/खंडाळा नावाचे एक छोटे गाव लागते. या गावातुन सिद्धेश्वरला जायला मार्ग आहे. चालायला अंतर कमी, पायऱ्या, सहज सोपा मार्ग असल्याने जास्त प्रचलित आहे. बाकी राना वनातून वाट फुटेल तिथे दूर वर गेलेल्या पायवाटा बऱ्याच आहेत पण तिथे आदिवासी, कातकरी, गुराखी यांचाच वावर अधिक. अश्या वाटा म्हणजे जंगला मध्ये चुकण्या साठी आणि चुकवण्या साठी रचलेला सापळाच…. निसर्गाचा भूलभूलैय्या.

आता भटकंती करायची म्हणुन खंडाळा मार्गे जायचे नाही हे आधीच ठरलेले होते. दर वर्षी मुखाने साईनाथ म्हणत पदयात्रेला शेकडो किलोमिटर चालत जाणार्या आमच्या दादाला पायऱ्या चढायचा कंटाळा म्हणुन त्याला पर्याय म्हणजे कमी वर्दळिच्या, भुमिपुत्रांच्या पदस्पर्शाने जागलेल्या जगलेल्या पायवाटा. भुरभुरणारा पाउस मध्येच श्रावणातिल सोनसळी उन्हाची पखरण याची मज्जा रानवाटांवरच अधिक. बरं तिघेच जण असल्याने जरी इच्छित स्थळी पोहोचू शकलो नसतो तरी जिथे दुपारच्या जेवणाची वेळ होईल तिथे निसर्ग भोजन करायचे आणि आल्या पावली परत फिरायचे हे निश्चित केले होते. कारण आधी म्हटल्या प्रमाणे अश्या वाटांवर चुकण्याचीच भीती जास्त.

प्रस्थान

सकाळी ६:३० वाजता निघणारे आम्ही तब्बल दोन तास उशिरा म्हणजेच ८:३० वाजता झाली. कुठली गाडी म्हणजे दु का चार चाकी न्यायची या वर विशेष चर्चा न करता चारचाकी मध्ये आम्ही तिघे विराजमान झालो. गाडी सहाण-गोठी या गावात रस्त्या लगत सुरक्षित जागी “दाबुन” लावली. सहाण-गोठी हे गाव अलीबाग – रोहा रस्त्यावर, सिद्धेश्वराच्या दक्षिणेला दोन डोंगर ओलांडून पायथ्याशी वसलेले एक छोटे टुमदार गाव. या गावातूनच एक रस्ता डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जातो.

Anuvina-Siddheshwar-01

याच रस्त्याची पुढे पायवाट झाली आणि आमच्या भटकंतीला खर्या अर्थाने सुरुवात झाली

गावात शिरतानाच एका बाप्याला “याच रस्त्याने सिद्धेश्वरला जायचे ना?” अशी विचारपूस केल्यावर “जास्त उजवी कडे नका जाव …डाव्या अंगाशी र्हा” हा सल्ला प्रमाण मानून वाट पकडली. त्यामुळे बिनदिक्कत पणे बरेच उजवीकडचे फाटे सोडून डाव्या बाजूला जात राहिलो. मध्येच छोटी चढण, मातकट वाटेच्या दोन्ही बाजूला हिरव्याशार गवताची दुलई. त्याच गवतावर मधूनच चमकणारे पावसाचे थेंब, छोटी छोटी रानफुले आणि मधूनच अंगा भोवती फेर धरणारा गार गार वारा …. आहाहा … वाटेत लागलेल्या पाण्याच्या ओहाळा मध्ये पाउले भिजवतानाचा जो काही अनुभव आहे तो खरच शब्दात सांगणे कठीण आहे.

….आणि आम्ही वाट चुकलो

Anuvin-Siddheshwar02

म्हशीचा Natural Bath Tub

Anuvin-Siddheshwar03

हिरवाईच्या कोंदणात उठून दिसणारी झोपडी

आम्ही तीन भाऊ एकत्र येण्याचा योग तसा विरळाच. त्यामुळे भटकंतीचा आणि गप्पांचा कैफ चढत होता. डावे अंग म्हणता म्हणता सागाच्या झाडोर्यात आम्ही अतीच डाव्या बाजूला आलो. आणि समोर एक झोपडी दिसायला लागली. तिथे सगळाच शुकशुकाट होता. एक म्हैस एका डबक्या तिल पाण्यात बसून सूर्य स्नान घेत होती. कुणी माणुस भेटे पर्यंत आहे त्या वाटेवरुन चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण आमचे नशीब जोरावर होते. एका कुडाच्या झोपडी बाहेर बसलेल्या मामांनी आम्हाला थोडे पुढे नेउन मार्ग दाखवला. बरीच लालुच दाखवून मंदिरा पर्यंत येता का असे विचारून पण झाले पण मामा काही बधले नाहित. “जाल हो …. आता कुठे चुकाचा नाय … पाउण तासात पोचाल …. माला अलिबागला जायचय .. न्हायतर आलो असतो सोबतीला” मामांच्या हातावर चिवड्याची पुडी ठेवली आणि पुढे निघालो. या सराईत मामाचा पाउण तास म्हणजे आमचा दिड तास हे समीकरण गेले कित्येक वर्षांच्या भटकंतिने पचनी पडले होते. त्याने सांगितलेल्या वाटे वर पुढे कुठे चुकायला झाले नाही. काही वेळातच आम्ही गर्द झाडी मध्ये एकरूप झालो.

दिंडच्या शोधात

“अभ्या, मामीने दिण्ड आणायला सांगितले आहे बघ कुठे दिसले तर” जेंव्हा आम्ही टार रोड सोडला आणि दादाने अभयला वर्दी दिली. अभय ने तेंव्हाच आपली असमर्थता व्यक्त केलि होती. पाउलवाटे वर ठेवली आहेत दिण्ड वाट बघ …. ती केंव्हाच बाजारात विकायला गेली असतील. हा अभयचा युक्ती वाद रास्त होता कारण जंगलातील हंगामी भाज्या, फळे येथे राहणारे आदिवासी कातकरी लोकं जवळच्या बाजारात विकायला नेतात. त्यामुळे एखादी अमुक वनस्पती हवी असेल तर वाट वाकडी करावी लागणार होती. त्यात वनस्पतीची ओळख कुणालाच नाही. दादाला वाटले मला माहित असेल पण कसले काय?? मला फार तर दंड माहित किंवा धिंड माहित. थोडा वेळ जंगली सुरण वरून अभय आणि दादाची जुंपली होती आणि शेवटी अभयला शरणागती घेण्यास भाग पडले. “पण हे असेच काहीसे असते. त्याच्या देठावर तांबडे जांभळे डाग असतात.” अशी एक खुण सांगून शोध मोहीम वाटेच्या कडे कडेने चालूच होती. वाटेवरच एक दिंड(?) सापडले पण ते फारच कोवळे आहे आणि ते एक नेऊन काय करणार म्हणून नुसता फोटो काढून घेतला.

Anuvina-Siddheshwar04

पण दिंडचा शोध शेवट पर्यंत चालूच होता. पुढे जाऊन अजून अभयला एक साक्षात्कार झाला. आधी बघितलेले दिंड नसून वेगळीच वनस्पती होती आणि खरे दिंड सापडले आहे. मग स्वतःच्या ज्ञानवर्धना साठी त्याने दोन चार फांद्या सोबत घेतल्या म्हणजे घरी विचारता येईल आणि परत अशी फजिती होणार नाही. ते झाड बघितल्यावर मी अतिशय चाणाक्षपणे जाणवू दिले नाही कि हे दोघे Leea indica नावाच्या वनस्पतीला दिंडा म्हणतात. नाहीतर तिथेच यांनी माझे दंड पकडले असते.

Anuvina-Siddheshwar05

Leea indica अर्थात मराठी स्थानिक भाषेत दिंडा

पाऊस, बदलेल्या वाटा आणि …..

मामांनी आम्हाला लावलेल्या वाटेने जात असताना दिंडाचा शोध चालूच होता आणि आमच्या गप्पा पण. जुन्या आठवणी, भूतकाळाची वर्तमानाशी सुरु असलेली सांगड, तिघेच जण असल्याचे फायदे आणि तोटे असे अनेक विषय पायाखालच्या वाटां प्रमाणे एकमेकांना छेद देत मार्गक्रमण करत होते. विषय जरी track सोडत असले तरी त्यातल्यात्यात मळक्या पाउलवाटे वरून आमची भटकंती चालू होती. निसर्गाची किमया डोळ्यात साठवून घेत होतो …. सागाच्या फुलांचा सडा देखील छोट्या बकुळीच्या फुलांसारखा भासत होता. विविध पक्ष्यांचे गुंजन, रातकिड्यांची किरकिर एखाद्या पार्श्वसंगीता सारखी वाटत होती. मुंग्यांची, वाळवीची वारुळे म्हणजे अप्रतिम कलाकारीचा नमुना होता. चिमुकल्या हातापायांनी एखादा प्राणी स्वतःचे घर किती सुंदर रीत्या बनवू शकतो याचे उत्तम उदाहरण. असंख्य आकाराची, रंगांची फुलपाखरे त्या घनगर्द झाडी मध्ये जणू लापाछपी खेळत होती. आणि आम्ही मिळेल तेवढा शुद्ध प्राणवायु शरीराला मिळवून देत होतो. याच दरम्यान कोवळे ऊन, जमा होवू लागलेले करड्या रंगाचे आभाळ आणि आम्हाला साथ द्यायला, भिजवायला आलेला पाऊस म्हणजे जंगलातली भ्रमंती सार्थकी लागल्याची नांदी होती. मस्त नखशिखांत भिजवूनच त्याने आमची रजा घेतली आणि परत आलाच नाही.

अभय आणि दादाच्या बोलण्यातून एक मात्र जाणवत होते कि जुनी वाट वेगळी होती. जवळची होती. जरी आम्ही रस्ता चुकलो असलो तरी फार फिरून यावे लागले असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात मला सगळेच सारखे. ;). सिद्धेश्वरला सहाण-गोठीच्या बाजूने जायला १ डोंगर पार करावा लागतो. याच डोंगरावरची बरीचशी जागा कुण्या एका श्रीमंत भय्याने विकत घेतली आहे आणि त्याच्या जागेला कुंपण घातले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांना तो आडकाठी करतो. त्यामुळे त्याच्या जागेला वळसा घालून जावे लागते. अशी माहिती आम्हाला आधीच विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. आम्हाला कुणी अडवले नाही पण दोन ठिकाणी त्याने टाकलेल्या कुंपणाला भगदाड पाडून गावकऱ्यांची येजा चालूच होती. अशी जंगलाची जागा कशी काय विकत घेतली जाऊ शकते?, जो मूळ रहिवासी आहे त्याचा मार्ग कसा काय बंद होऊ शकतो? हे आणि असे अनेक प्रश्न मला त्यावेळी भेडसावत होते. अलिबागला लागून असलेल्या या पर्वतराजी वर अजून एक लावासा होऊ घातल्याची सुरुवात तर नाही ना या विचाराने तर अंगावर काटाच आला.

पोचलो एकदाचे ….

Anuvina-Siddheshwar06

हर हर सिद्धेश्वर

वाटेत जिथे जिथे जवळच्या भ्रमणध्वनी मधील गुगल साहेबांच्या नकाशाची मदत घेता येईल तितकी घेतली. आणि साहेबांच्या अचूकते बद्दल प्रचंड आश्चर्य वाटले. दोन वेळेला अनधिकृत रीत्या कुंपण ओलांडून एकदाची “महादेवाच्या मंदिरा कडे” अशी मोडकी पाटी दिसली आणि आपण पुन्हा एकदा जुन्या मार्गाला लागल्याचा आनंद झाला. चला आता महादेवाचे दर्शन पण होईल आणि निवांत बसून भोजन पण करता येईल. जवळ जवळ दीड तासाची पायपीट, चुकलेल्या वाटा, पावलांना झालेला मातीचा, ओहाळातून वाहणाऱ्या पाण्याचा स्पर्श, बरेच वर्षांनी जुळून आलेल्या गप्पांचा डाव या सगळ्यांनी म्हणा किंवा वातावरणात असलेल्या एकदम शुद्ध प्राणवायू मुळे अजिबात थकवा जाणवत नव्हता. देवळाच्या घंटेचा नाद गर्द झाडीतून ऐकला आणि आवाजाच्या रोखाने एका मोठ्या ओढ्या जवळ येऊन थांबलो. ओढ्यात विशेष पाणी नव्हते. हाच ओढा पुढे कड्यावरून कोसळताना अक्राळविक्राळ धबधब्याचे रूप घेतो. ओढा ओलांडून महादेवाच्या मंदिरापाशी दाखल झालो. हर हर महादेव म्हणत विजयी विरांच्या आवेशात दर्शन घेतले. एव्हाना ११:१५ वाजले होते. त्यामुळे पुढे सागरगडावर जायचा मोह टाळला आणि ती कामगिरी पुढच्या फेरीवर ढकलली. खंडाळा वाटेवर जरा खाली उतरून धबधबा बघून आलो(लांबूनच). त्या कोसळणाऱ्या पाण्याखाली सचैल स्नानक्रीडा करणाऱ्या तरुणांना पाहून दादाला देखील परत भिजण्याची खुमखुमी आली होती पण जाताना परत वाट चुकलो तर निदान अंधार पडायच्या आत तरी जंगल पार करायचे असल्याने त्याची ती खुमखुमी आम्ही दोघांनी यशस्वीपणे दाबून टाकली. माकडांपासून लपवत लपवत बरोबर बांधून आणलेले खाद्य पदार्थ क्षणार्धात फस्त केले. थंड पाणी पिवून उसळलेला जठराग्नी शांत केला.

वरून दिसणारा दूरवर पसरलेला अथांग अरबी समुद्र, त्या समुद्रातले ४ शिलेदार खांदेरी, उंदेरी, कुलाबा आणि कोरलाई हे किल्ले, RCF च्या चिमण्या आणि या सगळ्या पुढे एकदम छोटी छोटी वाटणारी अलिबाग, आक्षी आणि नागांव मधील घरे, आक्षीच्या खाडीत डोलणाऱ्या होड्या सगळंच नयनरम्य. एक वेगळाच अनुभव गाठीला बांधून २ वाजता परतीच्या प्रवासाला लागलो.

परतीच्या प्रवासात ….

आता वाट चुकण्याची चिंता नव्हती कारण सगळ्याच खाली जाणाऱ्या वाटा आम्हाला रस्त्यावर घेऊन जाणार होत्या. तरी पण चुकलोच. आम्ही भलत्याच दिशेने जात आहोत हे गुगल साहेबांच्या नकाशाने तत्परतेने दाखवून दिले. जिथे गाडी ठेवली होती तिथून किमान एक किलोमीटर पुढे उतरलो आणि रस्त्यावरून चालत जाणे कंटाळवाणे झाले. एकंदरीत आम्हा तिघांची ही भटकंती मस्त जमून आली. आता पुढच्यावेळी सागरगड  …..

क्षणचित्रे

वसंत

vasant-Poem

झाडाची फांदी
फांदी वर पान
पानात भरलय
हिरवे रान

हिरव्या रानाचा
हिरवा चुडा
मातीत मिसळलाय
फुलांचा सडा

फुलाची पाकळी
पाकळीचे रंग
फुलांच्या प्रेमात
वाराही दांग

रानातले तळे
तळ्यातली कमळे
चिखलात उभे
ध्यानस्थ बगळे

आकाशात मेघ त्याची
शाल निळी निळी
पहाटेच्या किरणांना
कड सोनसळी

रानातल्या वाटेवर
वाजते पाउल
कोवळ्या पालवीच्या आड
देतो वसंत चाहुल.