आला श्रावण

आंतरजालावर सापडलेली प्रा. सदानंद रेगे यांची श्रावण महिन्यावरील अप्रतिम कविता.

आला श्रावण श्रावण
गुच्छ रंगांचे घेऊन,
ऊनपावसाचे पक्षी
आणी ओंजळीमधून.

निळे स्वप्न कुजबुजे
हळू पाखरांच्या कानी,
ऊन कोवळे दाटले
केशराच्या रानोरानी.

आता मेल्या मरणाला
जिती पालवी फुटेल,
गोठलेल्या आसवांना
पंख नवीन येतील.

आता धरतील फेर
कवडशांची डाळिंबे,
वर्षतील नभातून
शाश्वताची निळी टिंबे.

आला श्रावण श्रावण
ओल्या सोनपावलांनी,
दाही दिशा महिरल्या
यौवनाच्या मंजिर्‍यांनी.

– प्रा. सदानंद रेगे.

तुझ्या विना …

तुझ्या विना ही रात्र माझी सरते काळी काळी
तुझ्या विना मी लावून आलो संसाराची होळी ||

तुझ्या विना हा अल्लड वारा रुंजी घालत नाही
तुझ्या विना या पाउसधारा रुसून गेल्या काही ||

तुझ्या विना हा कुंद मोगरा गंध सांगत नाही
तुझ्या विना या मैफलीचा रंग रंगत नाही ||

तुझ्या विना बघ उडून गेले रांगोळीचे रंग
तुझ्या विना मी करत बसतो आठवणींशी संग ||

तुझ्या विना मी शोधात आहे जगण्याची आशा
तुझ्या विना मज अवगत नाही प्रेमाची भाषा ||

तुझ्या विना हे सुटतच नाही विरहाचे कोडे
तुझ्या विना हे मन म्हणते ‘श्वास उरले थोडे’ ||

-कवी “किंचित महाशब्दे”

छत्री

जरा उशिरा का होईना पण पावसाला सुरुवात झाली. मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी दमदार आणि दणक्यात आगमन झाले. आता सगळ्या नव्या जुन्या कवींनी त्यांच्या लेखण्या सरसावून कवितांचा पाऊस पडायला सुरुवात केली असेल. अश्याच कवितांमध्ये मला एक नवकवी “किंचित महाशब्दे” यांची “छत्री” ही नवकविता सापडली. दोन महिने पूर्ण पावसाळा काढल्यावर छत्रीची हालत काय झाली आहे ते या कवितेत मांडले आहे. त्यांचे नाव उघड न करण्याच्या अटी मान्य करून ही कविता इथे देत आहे.

पाउस थेंब झाला
क्षणात बरसुनी आला
तिच्या सकट मजला
चिंब भिजवूनी गेला.

चाहूल पावसाची
लागताच लगबग झाली
तिलाच शोधत होतो
पण हाती नाही आली

बळेच धरुनी तिजला
खेचून ओढले मी
उगीच केली कुरबुर
जेंव्हा पट्टे सोडले मी

मुठीवर देऊनी जोर
वस्त्रात घातला हात
हलवून तिचे अंग
डोकावून पाहिले आत

आताशा तिच्या उघडण्याची
मी आशाच सोडलेली
तिच्या काळ्या देहाला
अगणित भोके पडलेली

दोन महिने संगतीची
अशी अनोखी मैत्री
दर पावसात भिजणारी
माझी काळी छत्री

-कवी “किंचित महाशब्दे”