सिद्धेश्वर भ्रमण

नागांवला आमच्या घरी दर वर्षी कृष्ण जन्माचा उत्सव असतो. आमच्या करता हा एकदम महत्वाचा सोहळा कारण याला ५-६ पिढ्यांचा इतिहास आहे. जवळचे सगळे नातलग आवर्जुन या उत्सवाला हजेरी लावतात. त्यामुळे नविन वर्षाची दिनदर्शिका हाती पडताच काही महत्वाच्या तारखांच्या नोंदी करताना श्रावण कृष्ण अष्टमीचा देखिल अंतर्भाव असतोच. त्यात सुद्धा कुठे विकांत लागून येत असेल तर मग आधी पासूनच वेगवेगळे बेत मनात घोळत राहतात. २-४ वर्षांपूर्वी अश्याच लागुन आलेल्या सुट्टी मध्ये फ़णसाडच्या धरणावर केलेली धम्माल, त्याच्या आठवणी अजुनही ताज्या आहेत. या वर्षी म्हणजे २०१४ साली गोकुळाष्टमीला जोडून १५ ऑगस्ट आल्यामुळे ४ दिवसांची सलग सुट्टी मिळाली. अश्या वेळी अनिल दादाने जवळ पासच्या भ्रमंतीचा नेम नाही केला तरच नवल. अश्या भटकंतीसाठी आमचे दादासाहेब अतिशय उत्साही. तसा तो एक व्यक्तीचित्राचे मटेरियल आहे. (त्या बद्दल एखादी वेगळी पोस्ट लिहेन). यावेळी आम्ही सिद्धेश्वरला जायचे ठरवले. काही अडचणी मुळे १६ च्या ऐवजी १७ तारीख नक्की केली. मेम्बरांची गळती आधीच सुरु झाली होती पण काही झाले तरी आपण जायचे यावर दादा, मी आणि अभय ठाम होतो.  आणि शेवटी आम्ही तिघेच राहिलो ….. सिद्धेश्वर भ्रमंती साठी.

संह्याद्रीच्या मूळ पर्वतराजी पासून पश्चिमेकडे समुद्रा पर्यंत काही पर्वत रांगा पोचल्या. कोकणात हे दृश्य बरेच वेळा बघायला मिळते. अलिबाग पासून अशीच एक दक्षिणोत्तर रांग रोह्या पर्यंत गेली आहे. सदाहरित नसले तरी हे उघडे बोडके डोंगर थोडा जरी पाउस पडला तरी हिरवी शाल पांघरून घेतात. याच डोंगर रांगांमध्ये सिद्धेश्वर, सागरगड, कोरलाई, कनकेश्वर, रामधरणेश्वर, फणसाडचे अभयारण्य अशी अनेक निसर्गरम्य प्रेक्षणीय स्थळे आवर्जून भेट देण्यासारखी आहेत. पेण अलीबाग रस्त्यावर कार्लेखिंड ओलांडली की खंडाळे/खंडाळा नावाचे एक छोटे गाव लागते. या गावातुन सिद्धेश्वरला जायला मार्ग आहे. चालायला अंतर कमी, पायऱ्या, सहज सोपा मार्ग असल्याने जास्त प्रचलित आहे. बाकी राना वनातून वाट फुटेल तिथे दूर वर गेलेल्या पायवाटा बऱ्याच आहेत पण तिथे आदिवासी, कातकरी, गुराखी यांचाच वावर अधिक. अश्या वाटा म्हणजे जंगला मध्ये चुकण्या साठी आणि चुकवण्या साठी रचलेला सापळाच…. निसर्गाचा भूलभूलैय्या.

आता भटकंती करायची म्हणुन खंडाळा मार्गे जायचे नाही हे आधीच ठरलेले होते. दर वर्षी मुखाने साईनाथ म्हणत पदयात्रेला शेकडो किलोमिटर चालत जाणार्या आमच्या दादाला पायऱ्या चढायचा कंटाळा म्हणुन त्याला पर्याय म्हणजे कमी वर्दळिच्या, भुमिपुत्रांच्या पदस्पर्शाने जागलेल्या जगलेल्या पायवाटा. भुरभुरणारा पाउस मध्येच श्रावणातिल सोनसळी उन्हाची पखरण याची मज्जा रानवाटांवरच अधिक. बरं तिघेच जण असल्याने जरी इच्छित स्थळी पोहोचू शकलो नसतो तरी जिथे दुपारच्या जेवणाची वेळ होईल तिथे निसर्ग भोजन करायचे आणि आल्या पावली परत फिरायचे हे निश्चित केले होते. कारण आधी म्हटल्या प्रमाणे अश्या वाटांवर चुकण्याचीच भीती जास्त.

प्रस्थान

सकाळी ६:३० वाजता निघणारे आम्ही तब्बल दोन तास उशिरा म्हणजेच ८:३० वाजता झाली. कुठली गाडी म्हणजे दु का चार चाकी न्यायची या वर विशेष चर्चा न करता चारचाकी मध्ये आम्ही तिघे विराजमान झालो. गाडी सहाण-गोठी या गावात रस्त्या लगत सुरक्षित जागी “दाबुन” लावली. सहाण-गोठी हे गाव अलीबाग – रोहा रस्त्यावर, सिद्धेश्वराच्या दक्षिणेला दोन डोंगर ओलांडून पायथ्याशी वसलेले एक छोटे टुमदार गाव. या गावातूनच एक रस्ता डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जातो.

Anuvina-Siddheshwar-01

याच रस्त्याची पुढे पायवाट झाली आणि आमच्या भटकंतीला खर्या अर्थाने सुरुवात झाली

गावात शिरतानाच एका बाप्याला “याच रस्त्याने सिद्धेश्वरला जायचे ना?” अशी विचारपूस केल्यावर “जास्त उजवी कडे नका जाव …डाव्या अंगाशी र्हा” हा सल्ला प्रमाण मानून वाट पकडली. त्यामुळे बिनदिक्कत पणे बरेच उजवीकडचे फाटे सोडून डाव्या बाजूला जात राहिलो. मध्येच छोटी चढण, मातकट वाटेच्या दोन्ही बाजूला हिरव्याशार गवताची दुलई. त्याच गवतावर मधूनच चमकणारे पावसाचे थेंब, छोटी छोटी रानफुले आणि मधूनच अंगा भोवती फेर धरणारा गार गार वारा …. आहाहा … वाटेत लागलेल्या पाण्याच्या ओहाळा मध्ये पाउले भिजवतानाचा जो काही अनुभव आहे तो खरच शब्दात सांगणे कठीण आहे.

….आणि आम्ही वाट चुकलो

Anuvin-Siddheshwar02

म्हशीचा Natural Bath Tub

Anuvin-Siddheshwar03

हिरवाईच्या कोंदणात उठून दिसणारी झोपडी

आम्ही तीन भाऊ एकत्र येण्याचा योग तसा विरळाच. त्यामुळे भटकंतीचा आणि गप्पांचा कैफ चढत होता. डावे अंग म्हणता म्हणता सागाच्या झाडोर्यात आम्ही अतीच डाव्या बाजूला आलो. आणि समोर एक झोपडी दिसायला लागली. तिथे सगळाच शुकशुकाट होता. एक म्हैस एका डबक्या तिल पाण्यात बसून सूर्य स्नान घेत होती. कुणी माणुस भेटे पर्यंत आहे त्या वाटेवरुन चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण आमचे नशीब जोरावर होते. एका कुडाच्या झोपडी बाहेर बसलेल्या मामांनी आम्हाला थोडे पुढे नेउन मार्ग दाखवला. बरीच लालुच दाखवून मंदिरा पर्यंत येता का असे विचारून पण झाले पण मामा काही बधले नाहित. “जाल हो …. आता कुठे चुकाचा नाय … पाउण तासात पोचाल …. माला अलिबागला जायचय .. न्हायतर आलो असतो सोबतीला” मामांच्या हातावर चिवड्याची पुडी ठेवली आणि पुढे निघालो. या सराईत मामाचा पाउण तास म्हणजे आमचा दिड तास हे समीकरण गेले कित्येक वर्षांच्या भटकंतिने पचनी पडले होते. त्याने सांगितलेल्या वाटे वर पुढे कुठे चुकायला झाले नाही. काही वेळातच आम्ही गर्द झाडी मध्ये एकरूप झालो.

दिंडच्या शोधात

“अभ्या, मामीने दिण्ड आणायला सांगितले आहे बघ कुठे दिसले तर” जेंव्हा आम्ही टार रोड सोडला आणि दादाने अभयला वर्दी दिली. अभय ने तेंव्हाच आपली असमर्थता व्यक्त केलि होती. पाउलवाटे वर ठेवली आहेत दिण्ड वाट बघ …. ती केंव्हाच बाजारात विकायला गेली असतील. हा अभयचा युक्ती वाद रास्त होता कारण जंगलातील हंगामी भाज्या, फळे येथे राहणारे आदिवासी कातकरी लोकं जवळच्या बाजारात विकायला नेतात. त्यामुळे एखादी अमुक वनस्पती हवी असेल तर वाट वाकडी करावी लागणार होती. त्यात वनस्पतीची ओळख कुणालाच नाही. दादाला वाटले मला माहित असेल पण कसले काय?? मला फार तर दंड माहित किंवा धिंड माहित. थोडा वेळ जंगली सुरण वरून अभय आणि दादाची जुंपली होती आणि शेवटी अभयला शरणागती घेण्यास भाग पडले. “पण हे असेच काहीसे असते. त्याच्या देठावर तांबडे जांभळे डाग असतात.” अशी एक खुण सांगून शोध मोहीम वाटेच्या कडे कडेने चालूच होती. वाटेवरच एक दिंड(?) सापडले पण ते फारच कोवळे आहे आणि ते एक नेऊन काय करणार म्हणून नुसता फोटो काढून घेतला.

Anuvina-Siddheshwar04

पण दिंडचा शोध शेवट पर्यंत चालूच होता. पुढे जाऊन अजून अभयला एक साक्षात्कार झाला. आधी बघितलेले दिंड नसून वेगळीच वनस्पती होती आणि खरे दिंड सापडले आहे. मग स्वतःच्या ज्ञानवर्धना साठी त्याने दोन चार फांद्या सोबत घेतल्या म्हणजे घरी विचारता येईल आणि परत अशी फजिती होणार नाही. ते झाड बघितल्यावर मी अतिशय चाणाक्षपणे जाणवू दिले नाही कि हे दोघे Leea indica नावाच्या वनस्पतीला दिंडा म्हणतात. नाहीतर तिथेच यांनी माझे दंड पकडले असते.

Anuvina-Siddheshwar05

Leea indica अर्थात मराठी स्थानिक भाषेत दिंडा

पाऊस, बदलेल्या वाटा आणि …..

मामांनी आम्हाला लावलेल्या वाटेने जात असताना दिंडाचा शोध चालूच होता आणि आमच्या गप्पा पण. जुन्या आठवणी, भूतकाळाची वर्तमानाशी सुरु असलेली सांगड, तिघेच जण असल्याचे फायदे आणि तोटे असे अनेक विषय पायाखालच्या वाटां प्रमाणे एकमेकांना छेद देत मार्गक्रमण करत होते. विषय जरी track सोडत असले तरी त्यातल्यात्यात मळक्या पाउलवाटे वरून आमची भटकंती चालू होती. निसर्गाची किमया डोळ्यात साठवून घेत होतो …. सागाच्या फुलांचा सडा देखील छोट्या बकुळीच्या फुलांसारखा भासत होता. विविध पक्ष्यांचे गुंजन, रातकिड्यांची किरकिर एखाद्या पार्श्वसंगीता सारखी वाटत होती. मुंग्यांची, वाळवीची वारुळे म्हणजे अप्रतिम कलाकारीचा नमुना होता. चिमुकल्या हातापायांनी एखादा प्राणी स्वतःचे घर किती सुंदर रीत्या बनवू शकतो याचे उत्तम उदाहरण. असंख्य आकाराची, रंगांची फुलपाखरे त्या घनगर्द झाडी मध्ये जणू लापाछपी खेळत होती. आणि आम्ही मिळेल तेवढा शुद्ध प्राणवायु शरीराला मिळवून देत होतो. याच दरम्यान कोवळे ऊन, जमा होवू लागलेले करड्या रंगाचे आभाळ आणि आम्हाला साथ द्यायला, भिजवायला आलेला पाऊस म्हणजे जंगलातली भ्रमंती सार्थकी लागल्याची नांदी होती. मस्त नखशिखांत भिजवूनच त्याने आमची रजा घेतली आणि परत आलाच नाही.

अभय आणि दादाच्या बोलण्यातून एक मात्र जाणवत होते कि जुनी वाट वेगळी होती. जवळची होती. जरी आम्ही रस्ता चुकलो असलो तरी फार फिरून यावे लागले असे त्यांचे म्हणणे होते. अर्थात मला सगळेच सारखे. ;). सिद्धेश्वरला सहाण-गोठीच्या बाजूने जायला १ डोंगर पार करावा लागतो. याच डोंगरावरची बरीचशी जागा कुण्या एका श्रीमंत भय्याने विकत घेतली आहे आणि त्याच्या जागेला कुंपण घातले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गावकऱ्यांना तो आडकाठी करतो. त्यामुळे त्याच्या जागेला वळसा घालून जावे लागते. अशी माहिती आम्हाला आधीच विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली होती. आम्हाला कुणी अडवले नाही पण दोन ठिकाणी त्याने टाकलेल्या कुंपणाला भगदाड पाडून गावकऱ्यांची येजा चालूच होती. अशी जंगलाची जागा कशी काय विकत घेतली जाऊ शकते?, जो मूळ रहिवासी आहे त्याचा मार्ग कसा काय बंद होऊ शकतो? हे आणि असे अनेक प्रश्न मला त्यावेळी भेडसावत होते. अलिबागला लागून असलेल्या या पर्वतराजी वर अजून एक लावासा होऊ घातल्याची सुरुवात तर नाही ना या विचाराने तर अंगावर काटाच आला.

पोचलो एकदाचे ….

Anuvina-Siddheshwar06

हर हर सिद्धेश्वर

वाटेत जिथे जिथे जवळच्या भ्रमणध्वनी मधील गुगल साहेबांच्या नकाशाची मदत घेता येईल तितकी घेतली. आणि साहेबांच्या अचूकते बद्दल प्रचंड आश्चर्य वाटले. दोन वेळेला अनधिकृत रीत्या कुंपण ओलांडून एकदाची “महादेवाच्या मंदिरा कडे” अशी मोडकी पाटी दिसली आणि आपण पुन्हा एकदा जुन्या मार्गाला लागल्याचा आनंद झाला. चला आता महादेवाचे दर्शन पण होईल आणि निवांत बसून भोजन पण करता येईल. जवळ जवळ दीड तासाची पायपीट, चुकलेल्या वाटा, पावलांना झालेला मातीचा, ओहाळातून वाहणाऱ्या पाण्याचा स्पर्श, बरेच वर्षांनी जुळून आलेल्या गप्पांचा डाव या सगळ्यांनी म्हणा किंवा वातावरणात असलेल्या एकदम शुद्ध प्राणवायू मुळे अजिबात थकवा जाणवत नव्हता. देवळाच्या घंटेचा नाद गर्द झाडीतून ऐकला आणि आवाजाच्या रोखाने एका मोठ्या ओढ्या जवळ येऊन थांबलो. ओढ्यात विशेष पाणी नव्हते. हाच ओढा पुढे कड्यावरून कोसळताना अक्राळविक्राळ धबधब्याचे रूप घेतो. ओढा ओलांडून महादेवाच्या मंदिरापाशी दाखल झालो. हर हर महादेव म्हणत विजयी विरांच्या आवेशात दर्शन घेतले. एव्हाना ११:१५ वाजले होते. त्यामुळे पुढे सागरगडावर जायचा मोह टाळला आणि ती कामगिरी पुढच्या फेरीवर ढकलली. खंडाळा वाटेवर जरा खाली उतरून धबधबा बघून आलो(लांबूनच). त्या कोसळणाऱ्या पाण्याखाली सचैल स्नानक्रीडा करणाऱ्या तरुणांना पाहून दादाला देखील परत भिजण्याची खुमखुमी आली होती पण जाताना परत वाट चुकलो तर निदान अंधार पडायच्या आत तरी जंगल पार करायचे असल्याने त्याची ती खुमखुमी आम्ही दोघांनी यशस्वीपणे दाबून टाकली. माकडांपासून लपवत लपवत बरोबर बांधून आणलेले खाद्य पदार्थ क्षणार्धात फस्त केले. थंड पाणी पिवून उसळलेला जठराग्नी शांत केला.

वरून दिसणारा दूरवर पसरलेला अथांग अरबी समुद्र, त्या समुद्रातले ४ शिलेदार खांदेरी, उंदेरी, कुलाबा आणि कोरलाई हे किल्ले, RCF च्या चिमण्या आणि या सगळ्या पुढे एकदम छोटी छोटी वाटणारी अलिबाग, आक्षी आणि नागांव मधील घरे, आक्षीच्या खाडीत डोलणाऱ्या होड्या सगळंच नयनरम्य. एक वेगळाच अनुभव गाठीला बांधून २ वाजता परतीच्या प्रवासाला लागलो.

परतीच्या प्रवासात ….

आता वाट चुकण्याची चिंता नव्हती कारण सगळ्याच खाली जाणाऱ्या वाटा आम्हाला रस्त्यावर घेऊन जाणार होत्या. तरी पण चुकलोच. आम्ही भलत्याच दिशेने जात आहोत हे गुगल साहेबांच्या नकाशाने तत्परतेने दाखवून दिले. जिथे गाडी ठेवली होती तिथून किमान एक किलोमीटर पुढे उतरलो आणि रस्त्यावरून चालत जाणे कंटाळवाणे झाले. एकंदरीत आम्हा तिघांची ही भटकंती मस्त जमून आली. आता पुढच्यावेळी सागरगड  …..

क्षणचित्रे

जागतिक वन्य दिवस

Anuvina-WorldForestDay

Anuvina-WorldForestDay01आज ६ वा जागतिक वन्य दिवस साजरा केला जातोय. जागतिक पातळीवर साजरे केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक इतकंच त्याचं महत्व आहे का? आज पृथ्वीतलावरील जंगल झपाट्याने कमी कमी होत आहे. त्याचा दृश्य परिणाम तर आपल्या समोर आहेच. वाढलेलं तापमान, बदललेलं ऋतुचक्र, वारंवार होणारे भूकंप, त्सुनामी हे सगळे “निसर्गाचा कोप” असे लेबल लावून आपल्या समोर उभे आहेत. हे सगळं आपण बदलू शकतो कारण अजूनही वेळ गेलेली नाही. आजही पृथ्वीवर ३०% पेक्षा जास्त जंगले तग धरून आहेत. संपूर्ण मानव जातीला प्राणवायू पुरवण्याचे काम प्राणपणाने करत आहेत.

Anuvina-WorldForestDay02

६व्या जागतिक वन्य दिवसाचे प्रतिक चिन्ह

फेब्रुवारी २००७ मध्ये ऑक्सफोर्ड, इंग्लंड येथे साध्याशाच एका वन्य संरक्षण भेटीचे रुपांतर “जागतिक वन्य दिन” मध्ये होईल असं कुणालाही वाटले नव्हते. त्या नंतर दर वर्षी २१ मार्चला जागतिक पातळीवर Center for International Forestry Research (CIFOR) आणि Collaborative Partnership on Forests (CPF) तर्फे वन संरक्षण परिषद भरवली जाते. जागतिक पातळी वर वने आणि वातावरणातील बदल या विषयांवर संशोधन पर चर्चा सत्र आयोजित केले जाते. यंदाची परिषद दोहा, कतार येथे संपन्न होत आहे. सध्याच्या काळात ही परिषद वन संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची मानली जाते.

भारतातील परिस्थिती:
भारतीय राज्य शासनाच्या वनविभागाच्या २०११ च्या अहवाला नुसार, संपूर्ण भारतात एकूण क्षेत्रफळाच्या २३.८१% म्हणजेच जवळ जवळ ७८.२९ मिलियन हेक्टर वन्य क्षेत्र आहे. मध्यप्रदेश मध्ये सर्वात जास्त म्हणजे ७७,७०० चौ.किमी. त्यानंतर अरुणाचलप्रदेश मध्ये ६७,४१० चौ.किमी. वन्यक्षेत्र आहे. इतर बऱ्याच देशांपेक्षा भारतात अधिक प्रमणात जैवविविधता आढळते. संरक्षित वने आणि अभयारण्ये यांच्या मार्फत भरता मध्ये वन्य संरक्षणाचा चांगला उपक्रम राबवला जातो. नियमा प्रमाणे १ झाडं तोडल्यास १० झाडे लावली पाहिजेत असा वन्य खात्याचा कायदा सांगतो. दुर्दैवाची गोष्ट अशी की इतर कायद्यांप्रमाणे हा कायदा देखील धाब्यावर बसवला जातो.

Wildlife-Sanctuaries-n-NParks

दरवर्षी संपूर्ण पृथ्वीवरील कित्येक लाख हेक्टर वन्य जमीन मानवाच्या हव्यासा पायी नष्ट होत आहे. कित्येक वन्य जाती, प्रजाती समूळ नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वी झाडे वाचावा, पक्षी वाचवा असं म्हटलं जायचं पण आता तर चक्क पक्ष्याच्या नावानिशी आवाहन केलं जातं “चिमणी वाचवा” आणि जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो.  मानवाची अशीच वाटचाल राहिली तर रोज कुठल्याना कुठल्या तरी पक्षाचा/प्राण्याचा जागतिक दिवस येईल. आज काय कावळा वाचवा, उद्या मोर वाचवा,  आज जागतिक गरुड दिवस, उद्या जागतिक ससाणा दिवस, असे दिवस साजरे केले जाण्याची शक्यता आहे. व्याघ्र प्रकल्प चालू आहेतच. चित्त भारतातून केंव्हाच नामशेष झालाय.

अहो … साजरं काय केलं जातं हाच मोठा प्रश्न पडलाय. सण साजरे करावे, आनंद साजरा करावा, कुणाचे नाहीसे होणे, हानी होत असणे हे आपण कसें साजरे करू शकतो? खरं तर हे असे दिवस म्हणजे शोक दिवस पाळले गेले पाहिजेत, वर्षातील एक दिवस …. श्रद्धांजली वाहण्या साठी…कृतज्ञता व्यक्त करण्या साठी.

(सर्व माहिती आणि फोटो आंतरजालावरून साभार)

देवराई

(नुकत्याच झालेल्या वसुंधरा दिनाचे प्रयोजन साधून भूतकाळात निसर्ग सानिध्यात घालवलेले काही हिरवेगार क्षण आठवले … ते आपणांपुढे मांडत आहे.)

१९९८ साली B.N.H.S. डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार “देवराई संवर्धन” या विषयावर काम करण्याचा योग आला. मी, डॉ. उमेश मुंडले आणि डॉ. अजित अणेराव असे तिघे जण या प्रोजेक्ट वर काम करत होतो. तसा “देवराई” हा विषय आमच्या साठी नवीनच होता. काम चालू करण्या आधी पूर्वी या विषयावर कुणी कुणी संशोधन केले होते त्याचे संदर्भ गोळा केले. प्रा. माधव गाडगीळ आणि डॉ. वर्तक हे या विषयातील संशोधनाचे प्रवर्तक मानले जातात. १९७० च्या सुमारास त्यांनी महाराष्ट्रातील जवळ जवळ २५० देवरायांची नोंद केली होती. यातील बहुतांश देवराया या पश्चिम घाट, कोंकण या भागात होत्या. तशी देवराई ही संकल्पना पूर्ण भारतात तसेच जगाच्या काही भागात जिथे जुनी संस्कृती टिकून आहे अश्या भागात आढळते. या व्यतिरिक्त “देवराई” वर विशेष संशोधन झाले नसल्यामुळे किंवा जी माहिती उपलब्ध होती ती कालबाह्यते मुळे परत नव्याने नोंदी करायचे ठरले आणि आम्ही खऱ्या अर्थाने कामाला लागलो.

देवराई हा विषय थोडा वेगळा, जुन्या समजुती, जंगलातील देवता, देव देवस्की अशा अनेक समजुतींमुळे कुतूहल जागृत करणारा. अशातच अवघ्या महाराष्ट्रातील देवरायांची नोंद करण्याचे आणि त्यातील काही प्रातिनिधिक देवरायांचा अभ्यास करण्याचे काम आम्हां सगळ्यांसाठी thrilling होते. जुन्या नोंदी आणि सरकारी कागदपत्रे यांची मदत घेउन २ गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या देवरायांची सूची बनवली आणि त्याचे पडताळणी करण्याचे काम चालू केले. देवराई मधील देवता, त्यांच्या बद्दल असलेल्या रुढी, परंपरा, त्याच्याशी निगडीत असलेल्या श्रद्धा/अंधश्रद्धा खरंच थक्क करणाऱ्या आहेत. अगदी ढोबळ भाषेत सांगायचे झाले तर देवराई म्हणजे देवाची राई, अर्थात देवासाठी राखलेली जमीन, त्या जमिनी वरील झाडे, दगड माती … अगदी कण अन् कण देवाचा, देवाच्या मालकीचा. काही ठिकाणी देवराईला देवबन, देवरहाटी असे देखील म्हणतात. देवराईच्या रुढी, परंपरा अजूनही पिढी दर पिढी जपलेल्या आहेत. या संकल्पनेचे मूळ हे वेदिक संस्कृती पासून असावे असे जाणकारांचे मत आहे. तसं बघायला गेलं तर प्रत्येक गावात, खेड्यात देवस्थानाची, विशेषतः ग्रामदेवतेची लहान मोठी जमीन असते. पण म्हणून या सगळ्याच जमिनींना देवराई म्हणता येणार नाही. एखाद्या जमिनीवर देऊळ बांधून आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणणे हास्यास्पद ठरेल. देवराईच्या अस्तित्वाला, संवर्धनाला आणि ऱ्हासाला देखील कित्येक पिढ्या साक्षी आहेत.

देवरायांचा अभ्यास करता करता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे एखाद्या परिपूर्ण अश्या परीसंस्थेतील(ecosystem) जैवविविधता(biodiversity). इथे आढळणारे प्रत्येक वनस्पती अस्सल भारतीय, इथल्याच मातीत उगम असलेली. निबिड घनदाट अश्या वृक्षराजींनी नटलेली एखादी देवराई पहिली की पुराणातील गोष्टींमधील अरण्य कसे असू शकेल याची कल्पना येते. देवराईतील देवळापर्यंत जाणारी एखादी पायवाट सोडली तर इतरत्र सगळी कडे माजलेली अजस्त्र झाडे आणि मस्तवाल वेली दिसून येतात. अंबा, फणस, जांभूळ, ऐन, साग, किंजळ यांचा आकार बघितला तर विश्वास बसत नाही. वड, पिंपळ आपल्या पारंब्यानी अख्खी राई कवेत घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांच्या पारंब्यांच्या विस्तारामुळे कधी कधी नैसर्गिक मांडव तयार झालेला असतो.एखादे माडाचे झाड सूर्यप्रकाशाच्या ओढीने सरळ वाढण्याचा बाणा सोडून नागमोडी वळणे घेत वाट काढत असतं. Gnetum, Entada सारख्या अजस्त्र वेलींचे झुले झालेले असतात. अश्या धष्टपुष्ट झाडांवर बांडगुळे, ऑर्किड्स दिमाखात वसाहत करून रहात असतात. झाडांच्या खोडांना चिकटलेली दगडफुले तेथे असलेल्या १००% शुद्ध वातावरणाची ग्वाही देतात.

या सगळ्यांमधून कानाला गोड वाटणारे पक्षांचे गुंजारव चालू असते.मधूनच कुठे तरी रातकिड्यांचा कर्कश्य आवाज काळजाचा थरकाप उडवून जातो. विविध आकाराचे कीटक टणाटण उड्या मारत असतात. नाना रंगांची फुलपाखरे फुलांचे माधुर्य चाखण्यात मग्न असतात. कुठेतरी झाडांच्या जाळीमधून राजनर्तकाची जोडी आपले नृत्य कौशल्य दाखवून जाते. एखादा पिंगळा झाडाच्या फांदीवर बसून धीरगंभीर नजरेने बघत असतो. सुतार पक्ष्याची चोच झाडाच्या खोडावर टक टक आवाज करत असते. कुठेतरी एखादी सुगरण आपलं अपूर्ण राहिलेलं घरटं पूर्ण करण्यात मग्न असते. जवळपास जर पाणवठा असेल तर मासेमारी करून दमलेला खंड्या क्षणभर विश्रांतीसाठी येतो.असे एक ना अनेक जीव या परीसंस्थेचा उपभोग घेत असतात. हे सगळं बघताना तेथील समृद्धीचा आणि संपन्नतेचा हेवा वाटल्याशिवाय रहात नाही. सूर्य माथ्यावर आला तरी त्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही. अश्या ठिकाणी किती वनसंपदा असू शकते याचा अंदाज येतो. वर्षानुवर्षे राखलेल्या या देवराया म्हणजे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या अनेक प्रजातींची निसर्गदत्त स्थाने आहेत.

देवराई: संकल्पना
देवराईचे मूळ वैदिक संस्कृती पासून असल्याचे जाणवते. पुराणकाळापासून असलेले मानव आणि निसर्गाचे नातेसंबंध इथे प्रकर्षाने जाणवतात. देवराई या संकल्पनेचा उगम कसा आणि केंव्हा झाला या बद्दल अनेक मतप्रवाह आहेत. या संकल्पनेचा मूळ गाभाच हा श्रद्धा या नाजूक विषयावर बेतला असल्याने तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात. अश्मयुगीन माणसाला जेंव्हा शेतीचे महत्व कळू लागले तेंव्हा लागवडी योग्य शेतजमीन निर्माण करण्यासाठी प्रचंड प्रमाणात जंगल तोड झाली असावी. त्यावेळी सुद्धा तत्कालीन मानव बहुतांशी जंगलावर निर्भर होता. शेती मध्ये कितीही उत्क्रांती झालेली असली तरी लाकूडफाटा, खाद्य, वनस्पतीजन्य ओषधे अश्या अनेक गोष्टींसाठी त्याला जंगलावरच अवलंबून राहणे भाग होते. तसेच मोकळ्या मैदानापेक्षा वास्तव्यासाठी  जंगल जास्त सुरक्षित असावे. आत्ता जसे भूखंड माफिया, बिल्डर नावाची मानवाची वेगळीच प्रजाती निर्माण झाली आहे तसेच त्या काळी “शेती माफिया” असावेत ज्यांनी शेतीसाठी वनसंहाराला हातभार लावला. अश्याच वेळी जंगलाचे महत्व जाणणारे देखील होते याची खात्री या देवरायांच्या अस्तित्वावरून जाणवते. मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलांच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला. त्यासाठी गणपती, श्रीराम, कृष्ण यांच्या सारख्या सौम्य देवतांचा वापर न करता देवी किंवा शंकर यांचे कडक आणि जहाल रूप दिले. या देवरायांतील देवतांची नावे पण विचित्र, झोलाई, कालकाई, वाघजाई, सोमजाई, वेतोबा, डुंगोबा, बापदेव, म्हसोबा अशी कधी न ऐकलेली. देवराईतील कुठल्याही साधन संपत्तीचा ह्रास झाला तर त्या देवतेचा कोप होतो. इतकंच काय पण बऱ्याच देवरायांमध्ये प्रवेश देखील निषिद्ध आहे. अश्या अनेक भ्रामक कल्पनांमुळे देवराया आपले अस्तित्व टिकवून आहेत. अंधश्रद्धेचा इतका उत्तम आणि वैधानिक उपयोग आजपर्यंत कुठेही बघितला नाही.

अश्या देवरायांवर कित्येक श्रद्धा/अंधश्रद्धा, त्यातून निर्माण होणाऱ्या दंतकथा यांचा पगडा असल्याने आजही हे हिरवे तारकापुंज शाबूत आहेत. खरा प्रश्न हा आहे की अजून किती दिवस शाबूत राहतील? सध्याच्या आधुनिक विचारसरणी पुढे या पिढीजात रुढींचा टिकाव लागणे जरा कठीणच आहे. या आधुनिकीकरणाचे पडसाद हळू हळू दिसू लागले आहेत … देवरायांचे क्षेत्र, विस्तार कमी होताना दिसत आहे. त्यामुळे तिथे आढळणाऱ्या अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. अशी जंगले एका दिवसात किंवा एका वर्षात उभी राहू शकत नाहीत तर ती एक मुक्त प्रक्रिया आहे वर्षानुवर्षे चालणारी. सामाजिक वनीकरण हा एक उपाय असला तरी तो जबरदस्तीने लादलेला आहे त्याला नैसर्गिक संवर्धनाची सर नाही. जैवविविधतेने समृद्ध अश्या देवरायांचे संरक्षण आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी गरज आहे ती सामाजिक पातळीवर प्रयत्न करण्याची, देवराया आणि आपली वनसंपदा वाचवण्याची.

(वरील लेख कुठलीही शास्त्रीय माहिती देत नाही याची वाचकांनी नोंद घावी. कुणी जाणकाराने काही मार्गदर्शन केले तर हा लेख अजून चांगला आणि शास्त्रशुद्ध बनवता येईल. या लेखातील माहिती बद्दल कुणास काही आक्षेप असल्यास कृपया coolgrahica at-the-rate gmail dot com वर कळवावे.)