सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. स्त्री आदीशक्तीचे रूप …… स्त्री मुक्ती ….. स्त्रियांवरचे अन्याय …… स्त्री अनंतकाळची माता ….. झालच तर स्त्रियांचे समाजातील स्थान, स्त्रीचे श्रेष्ठत्व वगैरे वगैरे …………… अश्या कुठल्याही घासून गुळगुळीत झालेल्या विषयावर मी माझी मते मांडणार नाहीये. किंवा महिला दिन हा वेगळा साजराच का करावा लागतो अश्या निराशयघन विषयावर देखील चर्चा करणार नाहीये.
माझं जीवन समृद्ध करणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे आज मी आभार मानणार आहे. माझा जन्म घरातच झाला …… जुन्या घरातील कुठल्याश्या खोलीत. ते घर देखील नाही आणि ती खोली पण. मला जन्म देणारी माझी आई आणि मला या सृष्टीवर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारी सुईण या दोघींचे पांग मी जन्मजन्मांतरी फेडू शकत नाही. मी रागावलो, चिडलो, माझ्या कठोर शब्दांनी तिचे डोळे पाणावलेत …. बरेचदा… त्या अश्रूंमध्ये माझा राग वाहूनही गेला …मी तिच्या कुशीत शिरून माफी देखील मागितली…..आणि तिने अश्रू पुसत मला मोठ्या मनाने माफही केले….. बरेचदा. अजूनही करते. पण माझे अश्रू पुसणारी माझी माता, माझी आई … माझं सर्वस्व माझं, तिच्या मुलांचं, नातवंडांचे घरातल्या सगळ्यांचे जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध करत आहे. तिच्या कुशीची माया कशी कमी होईल?
तीन मुलांमध्ये मी मधला. त्यात मी एकटा मुलगा. देवाने देखील मोठ्या मनाने मला दोन बहिणींच्या मध्ये धाडले. अविरत प्रेम करणाऱ्या बहिणी लाभल्या. प्रसंगी दरडावून चूक दाखवतानाच, स्वतःची काळजी घे … आता वय वाढत चाललय, खूप धावपळ करतोस उगाच, काही त्रास नाही ना असं विचारताना हळवी होणारी ताई देव सगळ्यांनाच देतो असं नाही. पण ते दान माझ्या पदरात पडलंय. देवाने मुक्त कंठाने उधळण केलिये बहिणींच्या प्रेमाची. छोटी माधुरी पण तशीच कितीही भांडलो तरी शेवटी प्रेमाने विचारपूस करणारी. या मितीला त्यांना माझा आधार वाटतो आणि मला त्यांची जवळीक वाटते हेच आमच्यातल्या प्रेमाचे फलित… नाही का?
आधी प्रेयसी आणि मग माझी सहचारिणी म्हणून आलेली माझी पत्नी … माझ्या साठी सहचाराचा एक आदर्श. घरातील सगळ्यांना सांभाळून वर मला सांभाळण्याचे दिव्य पार पाडत आहे. मी केलेल्या असंख्य चुकांना सांभाळत, कुठल्याही नाते संबंधाना त्याची झळ लागू न देता माझ्या खांद्याला खांदा लावून कायम उभी राहणारी माझी जिद्दी, सोशिक पत्नी ….आजच्या स्वयंसिद्ध स्त्रीचे प्रतीरुपच. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात पण या मुलीने, माझ्या पत्नीने तर माझं जीवनच स्वर्ग बनवून टाकलं. ती माझ्या बरोबर असणं हीच एक दैवी देणगी आहे. माझ्यातल्या “ती”ला प्रेमळ सलाम.
लग्न झाल्यावर माझ्या आजूबाजूला असलेल्या ४-४ स्त्रीयांमुळे तटबंदी मजबूत झालेली. आई, दोन्ही बहिणी आणि बायको यांनी चारी दिशांनी नाकाबंदी केली होती. ऊर्ध्व दिशा जरा मोकळी होती पण देवाने एका मुलीचा बाप बनवून तिला माझ्या डोक्यावर आणून बसवले. ;). आर्या …. आम्हांला पडलेलं आणि सत्यात उतरलेलं एक गोड स्वप्न. आर्याचा जन्म झाल्यावर काही क्षणातच नर्सने तिला माझ्या हातात दिली. त्यावेळी अंगावर उभे राहिलेले रोमांच कधीच विसरू शकणार नाही. काही क्षणापूर्वी स्वतंत्र श्वास घ्यायला सुरुवात केलेली माझी कन्या माझ्या हातांवर उघड्या डोळ्यांनी टकामका मला बघत होती … बाप झाल्याची जाणीव याच डोळ्यांनी करून दिली. “बाबा माजा, बाबा माजा” म्हणत अख्ख्या जगासाठी असलेली एक वेगळीच ओळख मला दिली. जिच्या बिलगण्यामुळे, मस्ती मुळे, बडबडीमुळे मी माझ्या सगळ्या व्यथा/ताप विसरतो त्या तिच्यातल्या “आमच्या” अंशाला शतशः धन्यवाद.
माझे विद्यार्थी जीवन बऱ्याच शिक्षकांनी तडीस नेले. त्यात शिक्षिकांचा वाटा अधिक. कुलकर्णी, गोरबाळकर, बर्वे, पळधे, टांकसाळे, महाजन, तळेगांवकर, दाणी, अत्रे, केळकर अश्या अनेक शिक्षिकांनी माझ्यावर सरस्वतीची कृपा केली. आमच्या वेळी विद्यार्थ्यांना गोडी-गुलाबीने समजावून वगैरे सांगण्याचे दिवस नव्हते. छडी वाजे छम छम हेच ब्रीद वाक्य. पण त्यामुळे शिक्षकांचा भीतीयुक्त आदर होता. त्यावेळी असलेल्या वृत्ती प्रमाणे शिक्षकांना बराच त्रास दिलाय, नावं ठेवली …. पण आता मात्र त्या गोष्टींचा पश्चात्ताप होतो. माफी मागवीशी वाटते पण त्यांच्या पैकी कुणी समोर आलं तर आजही तोंडातून शब्द फुटत नाही आणि नकळत दोन्ही कर जुळतात. आज त्यांनी मन लावून, प्रसंगी स्वतःचे विश्व बाजूला ठेऊन आमचे विश्व घडवले त्या सगळ्या शिक्षिकांना साष्टांग दंडवत.
अश्या अनेक ज्ञात अज्ञात स्त्रिया ज्यांना माझ्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे अश्या सगळ्या स्त्रियांना आणि त्यांच्यातील आदिशक्ती स्वरूपाला माझा प्रणाम.