चहाट(वा)ळकी -०८: झाडा(डू)झडती

“साहेब पेढा घ्या” गण्याने पेढ्याचा बॉक्स पुढे करत सुतकी नजरेने माझ्याकडे बघितले. “कसले रे हे पेढे?”बॉक्स मधून पेढा घेत घेत गण्याला प्रयोजन विचारले.  सकाळी सकाळी पेढा समोर आल्यावर कुणाचीतरी गुडन्यूज असेल आणि आपल्या सहकर्मचार्यांचे तोंड गोड करण्याचा कुणाचा उदात्त होतु आहे याचे प्रचंड कुतूहल चेहेऱ्यावर दर्शवत मी गण्याकडे मोठ्या आशेने बघत होतो. पण गण्याची ढिम्म सुतकी नजर, पडलेला चेहेरा आणि एकंदरीत ओठ विलग करताना पडत असलेले कष्ट बघता मला हा विरोधाभास सहन करण्याच्या पलीकडे जात होता. “अहो साहेब दिल्ली मध्ये त्या केजरीवालच्या आप ने सगळ्या बाकीच्या पक्षांची वाट लावली ना त्याचे पेढे आहेत हे. त्या टायवाल्या डीप्सने वाटायला सांगितले ऑफिस भर.” गण्या माहिती पुरवत होता.

“डीप्सने? ओह म्हणजे त्या दिपंकरने का? मागच्या वेळेला पार भारावून गेला होता आपचे विचार ऐकून. पण जेंव्हा केजरीवाल आणि त्याच्या पार्टीने आतातायी पणा केला तेंव्हा वाट चुकलेल्या कोकरा सारखा वाटत होता. मला वाटले कि त्याचे हे आप-प्रेम संपले असेल” – मी मध्येच थांबवून गण्याच्या माहितीमध्ये भर टाकली.

“अहो नाही ना …. तेच तर सांगतोय ना. तुम्ही मोठी माणसे लिंक तोडता आमची. तर त्याला विचारले कश्याचे पेढे तर म्हणतो कसा आपले सरकार आले ना दिल्लीत त्याचे पेढे आहेत हे. मी म्हटले आपले?? अरे तुझे असेल आम्हीतर युतीच्या पालखीचे भोई. तिथेच झटकला त्याला. आता पेढा दिसायला तरी छान होता म्हणून खाल्ला नाहीतर अजून ४-५ वाक्ये ऐकवली असती. ती आप आणि तो केजरीवाल खुळ्याचा बाजार नुसता. मागच्या वेळी हाच केजरीवाल ४९ दिवसात सत्ता सोडून पळून गेला होता. मला पण नवल वाटते दिल्लीकरांचे. इतके होवून देखील त्याच्या मफलरात भरभरून मतांचे दान केले. भोळी जनता याच्या भूलथापांना बळी पडते हो. आता त्यांचे रक्षण केवळ परमेश्वरच करू शकतो. आणि आपल्या इथले शिकला सवरलेला तरुणवर्ग पण त्याच्या मागे पागल होतो. स्टेशनवर उभे राहून भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आवाहन करतो. डोक्यावर असलेली ‘मै आम आदमी’ टोपी हीच काय ती यांची ओळख. मागच्या वेळी त्या मफलर मानवाने मस्त टोप्या घातल्या सगळ्यांना.” गण्या थांबतच नव्हता. त्याच्यातला सैनिक जागा होण्या आगोदर त्याला थोपवणे गरजेचे होते.

थोड्या चढ्या आवाजात म्हटले “काय गणू भाऊ आज जबरदस्त फलंदाजी चालू आहे. अग्रलेख वाचून आला आहेस का? तो केजरीवाल हिट झाला तर दोन चार दिवसांनी तू पण टोपी घालून हिंडशील. आपली समाजातली पत काय आपल्याला कोण कोण ऐकतंय याचे भान ठेवून आपली जीभ सैल सोडावी. आता तो दिपंकर आला इथे तर पार्श्वभागाला पाय लावून पळशील. हे आप वाले वादाला कमी नसतात बरे. त्यामुळे जरा हळू. बाबू आला का बघ जरा. नसेल आला तर खाली जाऊन चहा घेऊन ये लवकर”

गण्याला चहा साठी धाडणार तितक्यात “वा कसले हो पेढे?” असे म्हणत बाबू किटली घेऊन हजर. “अरे त्या दिपंकरने आणले आहेत ऑफिस मध्ये वाटायला … आपण मोदी जिंकल्यावर वाटले नव्हते का तसेच त्याने आप जिंकल्यावर वाटले आहेत.” गण्या काही बोलण्याच्या आतच मी स्पष्टीकरण दिले. आता बाबूचे कथन सुरु होणार होते. मुळात बाबूचा ओढ भाजपा कडे, त्यातल्या त्यात अटलजी आणि मोदींकडे जरी असला तरी त्याच्या बोलण्यातून प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण साहेबांचा कॉमन मॅन डोकावायचा. भाजपचेच काय पण मोदींचे अंधानुकरण किंवा समर्थन कधीच केले नाही.

“भाजपाचे काहीतरी गणित चुकलेच हो साहेब. मतांची टक्केवारी वाढली पण जागा भरपूर कमी झाल्या असे कळले. त्यातली आकडेमोड माझ्यासारख्या कमी शिकलेल्या सामान्य माणसाला कळणे खूप कठीण आहे. पण ज्या अर्थी बाकीच्या कुठल्याच पक्षाला एकही जागा मिळाली नसल्याने त्यांचा हिस्सा आपच्या वाट्याला गेला असण्याची शक्यता असेल.” बाबूने रास्त शंका मांडली.

“अरे हो तसेच काहीसे झाले असेल. मुळात प्रचाराच्या सुरुवातीलाच त्याने जनतेची जाहीर माफी मागितली आणि परत सत्ता सोडण्याची चूक करणार नाही असे कबुल देखील केले. नुसते बोलून थांबला नाही तर मागच्या वेळी केलेल्या असंख्य चुका सुधारल्या. व्यक्तिगत टिका न करता दिल्लीकरांच्या सामान्य गरजांना हात घातला. तो ४९ दिवस मुख्यमंत्री असताना म्हणे खरच वीज आणि पाणी स्वस्त झाले होते, भ्रष्टाचार कमी झाला होता असे म्हणतात. खरे खोटे दिल्लीकरच जाणो. आता देखील त्यांनी केवळ विकासाचे मुद्दे उचलून धरले. केजरीवाल दिल्लीकरांची नस बरोब्बर जाणतो. दिल्लीकरांच्या भावनांना अगदी नियोजनबद्ध वश केले आणि त्याचेच परिणाम निकालात दिसले. जनतेने कॉंग्रेसला नेस्तनाबूत केलेच पण भाजपाला देखील समज दिली कि सामान्य जनतेला गृहीत धरू नका.” – माझे लक्ष आता बाबू काय बोलतो याच्याकडे लागले होते.

“मुळात भाजपाचे सरकार केंद्रात आल्या आल्या लगेच दिल्लीची निवडणूक ठेवायला हवी होती. ती खूप लांबवली गेली. सामान्य कार्यकर्ता डावलला गेल्याने स्थानिक पातळीवर म्हणावा तितका जोर लागला नाही. मुळात बेदी बाई कितीही चांगल्या असल्या तरी शेवटी त्या आधी केजरीवाल आणि कंपू मधल्याच होत्या. भाजपाचा प्रचार हा पूर्णपणे केजरीवाल केंद्रित होता. भूतकाळ जास्त वेळ उगाळून चालत नाही त्याचे परिणाम उलट होवू शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची निवडणूक. भाजपाने प्रसारित केलेली व्यंगचित्रे, भाषणे यांचा परिणाम केजरीवालाचा लोकानुनय वाढवण्यात जरी झाला नसला तरी भाजपाच्या शत्रू पक्षांसाठी कोलीत दिल्यासारखे झाले. कदाचित पदद्या मागे या बाकीच्या पक्षांनी भाजपा विरुद्ध आघाडी उघडली असली तर जो निकाल लागला आहे तो अपेक्षितच म्हणता येईल. नगाला नग उभा करुन अरविंदाचा रथ दिल्लीच्या तख्ता पर्यन्त पोचवला. दुसरे कारण म्हणजे दिल्लीतील जनता … दिल्लीतीलच काय पण समस्त भारतातील लोकांना फुकटचे पौष्टिक हे ब्रीद वाक्य आहे. आरक्षण, सबसिडी, रोजगार या सारखे तुकडे फेकले की जनता आंधळी होते. आणि शेवटी जनता जनार्दनापुढे कुणाचे काही चालत नाही. लाटा येतात, त्सुनाम्या येतात आणि कालांतराने विरुन जातात. पण जनता, त्यांच्या मागण्या आणि त्यांचे प्रश्न हे निरंतर तसेच राहतात. पक्ष नेते येतात खुर्चीचा आस्वाद घेऊन निघुन जातात पण पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता कायम झेंडा हाती घेऊन आदेश झेलत काम करत असतात.” बाबू ने नेहमी प्रमाणे नेत्या पेक्षा कार्यकर्ता किती महत्वाचा आहे ते अधोरेखित केले.

“तुला एक सांगू का बाबू … दिल्ली मधील भाजपाचा पराभव समर्थकांना खुप जिव्हारी लागला आणि भाजपा विरोधी लोकांना उन्माद आला. मग सुरु झाले आरोप, टिका, टिपण्णी. अरे इतकेच काय खुद्द बेदी बाई पण म्हणाल्या हा पराभव माझा नाही भाजपाचा आहे. अहो बाई तुम्ही भाजपाच्या कावडीत बसुनाच मुख्यमंत्री पदाच्या तीर्थयात्रेला निघाला होता ना? मोदींच्या नावाचा जो सुट होता त्याबद्दल अगदी टाइम्स ऑफ इंडिया सारख्या वृत्तपत्राने देखील जाहिर माफी मागितली होती तरी देखील त्यांच्या त्या कोटाचे भांडवल करुन त्याच्या मुळे भाजपाचा पराभव झाला असा जावईशोध लावला. काळा पैसा हा पण असाच एक मुद्दा ज्याचे चर्वीचरवण झाले. या सगळ्या गदारोळात शांत आणि संयमी होते ते फक्त मोदी. त्यांनी तडक केजरीवाल यांना दूरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या आणि भेट घेण्याची इच्छा प्रकट केली. केजरीवाल देखील खिलाडुवृत्तीने त्यांना भेटायला गेले आणि केंद्र सरकार आप ला सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही मोदिनी दिली. हे भारता सारख्या सशक्त लोकशाही मध्येच घडू शकते. शहा मोदींची रणनीति काही राज्यात चालली ती प्रत्येक राज्यात चालेल असे नाही. शत-प्रतिशत भाजपा हे ऐकायला कितीही चांगले असले तरी राज्य पातळीवर स्थानिक पक्षांना नाराज करुन चालणार नाही. इतर पक्षातील नेते फोडून, उसने घेऊन निवडणूक एकदा जिंकता येईल … दर वेळी तोच निकाल लागेल असे खात्रीने सांगू शकत नाही. अश्याने भाजपा मध्ये आंतर्गत बंडाळी माजण्याची शक्यता जास्त आहे. निदान या निवडणुकी वरुन तरी भाजपाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. नाहीतर जे कमावले ते ५ वर्षात गमावून बसतील आणि डोक्यावर आप येऊन बसेल.” आज माझे हे विवेचन ऐकून बाबू पण गप्प झाला. एव्हाना सैनिकाचे उसळते रक्त पण जरा शांत झाले होते. गरमागरम चहाचा आस्वाद घेणे चालु होते इतक्यात दिपंकर तिथे आला आणि म्हणाला “बघा मी मागेच म्हटले होते इस आदमी में कुछ ख़ास है. एक ना एक दिवस तो परत येणार आणि जिंकणार. आता खरी कसोटी लागेल ती आश्वासने पूर्ण करण्याची. शपथ विधी च्या वेळी देखील त्याने कुठलेही खाते घेतले नाही. आणि सगळ्या नेत्यांनी संयम बाळगावा अशी सूचना केली. बघू आता काय काय निर्णय घेतोय ते. कारण ही संधी पुन्हा येणार नाही. माझ्या सारखे अनेक तरुण आज त्याच्या कडे आशेने बघतात. त्यांची परत एकदा फसवणूक करू नकोस रे अरविंदा.”

निवडणुकीचा थरार – भाग ३

खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉

(निवडणुकीचा थरार – भाग १ इथे वाचा)

(निवडणुकीचा थरार – भाग २ इथे वाचा)

—————————————————————————————————————————————————————–

मोजणी आणि सत्ता संघर्ष

आपले भविष्य टांगणीला लागलेले आहे या जाणिवेनेच उमेदवारांना झोप पण येत नसावी. आणि आपल्या “पातेल्याचे” काय होईल या चिंतेने “चमचे” देखील जागे असतात. सकाळ पासून मतपेट्या लपवून ठेवलेले अंतरंग दाखवायला सुरुवात करतात आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे रंग पसरू लागतात. आश्चर्य म्हणजे निवडणुकीला उभ्या असलेल्या यच्चयावत उमेदवारांना आपणच जिंकणार याची खात्री असते. त्यात फक्त एक विजयी उमेदवार सोडून बाकी सगळ्यांचा भ्रमनिरास योग्य वेळ आली की होतो हा भाग अलाहिदा. मिडीयाने इतके दिवस चालवलेला खरा होता का नुसताच फुसका बार हे याच दिवशी उमगते. मत मोजणी चालू झाली की सगळ्यांच्या उत्कंठा शिगेला पोचलेल्या असतात. पहिल्या अर्ध्यातासातच खरा सामना कुणा मध्ये रंगणार हे निश्चित होते. क्षण क्षणाला झुलणारी दोलायमान परिस्थिती अनुभवण्या साठी प्रत्यक्ष मोजणीच्या ठिकाणी उपस्थित असाल तरच त्याचा खरा थरार तुम्हाला अनुभवता येईल. मोजणीच्या वेळी आघाडी मिळालेल्या पक्ष कार्यकर्त्यांचा सळसळता उत्साह अंगावर रोमांच निर्माण करतो. त्यांच्या घोषणा, नारेबाजी सगळंच थरारक. शेवटी मोजणी पूर्ण होते आणि विजेत्याच्या नावाची घोषणा होते. विजयी उमेदवार किती मताधिक्याने निवडून आला आहे हे पण सांगण्यात येते. विजेत्या उमेदवाराच्या गोटामध्ये जल्लोष आणि उत्सवाचे वातावरण तर पराजित पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्मशान शांतता ….. अश्या दोन विरुद्ध टोकाच्या प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया फारच कमी ठिकाणी पहायला मिळतात. एका बाजूला कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अविश्रांत मेहेनतीमुळे आणि जनतेच्या पाठिंब्यामुळे योग्य निकाल लागल्याचा आनंद तर दुसरीकडे जमीन आसमान एक करून सुध्दा पदरी पडलेला पराभव. किती हा विरोधाभास? काही निकाल अपेक्षित तर काही आश्चर्यकारक असणारच ना?

कार्यकर्त्यांच्या जल्लोषा बरोबरच विजयी उमेदवाराचे हात गगनाला भिडतात. वाजत गाजत मिरवणूक निघते. जनतेचे आभार प्रदर्शन, अभिष्टचिंतन, औक्षण या सगळ्या औपचारिक गोष्टी पण पूर्ण होतात. एखादी लढाई जिंकून आल्यावर योद्ध्याच्या चेहेर्यावरील हावभाव आणि या उमेदवाराच्या हावभावामध्ये विशेष फरक नसावा. आणि मनात मात्र “कसा पाडला लेकाला …. माझ्यासमोर उगाच गमजा करत होता” वगैरे वगैरे. मग परत एकदा स्वारी मिडीयाला “बाईट” द्यायला तयार होते. कितीही काहीही दर्शवले तरी शेवटी मीच कसा योग्य आहे हेच दर्शवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच रात्री कार्यकर्त्यांसाठी श्रमपरिहार आणि विरंगुळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आणि सगळे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे आभार मानून विजयाच्या धुंदीत “झुलत” असतात. बरेच दिवसांनी प्रत्येक कार्यकर्त्याला शांत झोप लागलेली असते …. उराशी एकाच स्वप्न घेऊन … कधी तरी माझीपण अशीच विजययात्रा निघेल …

पक्षाचे विजयी उमेदवार मग पक्षश्रेष्ठींची भेट घेतात. पक्षाला मिळालेल्या सर्वांगीण विजयावर पक्षाचे पुढचे पाऊल काय असेल हे निश्चित होते. सत्ता स्थापन करण्यासाठी काय अजेंडा असावा हे ठरवले जाते. बहुमत मिळाले असेल तर प्रश्नच येत नाही …. पण बहुमत नसेल तर आघाडी, युती, महायुती असे काहीतरी प्रयत्न करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला जातो. यात अपक्ष म्हणून जे निवडून येतात त्यांची चंगळ असते. गुप्त चर्चा, खलबतं यांना ऊत येतो. जिथे फायदा अधिक तिथे हे अपक्ष धावत असतात. काही अपक्ष उमेदवार अचानक गायब होतात …. कुणी तरी पोलिसात तक्रार करतं …. अमुक अमुक उमेदवारास अमुक अमुक पक्षाच्या नेत्याने पळवून नेले आहे. एकदम पोलिसांची सूत्र फिरू लागतात. मिडीयाला TRP वाढवण्यासाठी अजून एक खाद्य मिळते. जसा तो उमेदवार एकाएकी गायब होतो तसाच तो कुणातरी बड्या नेत्या बरोबर पोलीस स्टेशन ला स्वतःहून हजर होतो. याचाच अर्थ या दोघांमधली अर्थपूर्ण बोलणी सुफळ संपूर्ण झालेली असतात. असेच काही उमेदवार ज्यांना तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाच्या विरोधात उभे राहतात आणि नाकावर टिच्चून जिंकून येतात त्यांना पण परतीचे दरवाजे उघडे होतात …. अर्थात हे सगळे सत्ता स्थापन करण्याच्या अभिलाषेनेच. अपक्ष उमेदवारांना आपल्या बाजूने फिरवण्यासाठी रस्सीखेच चालू असते …… जो हा घोडेबाजार जिंकतो तोच पुढे जाऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रबळ दावेदार असतो.

“जिसकी लाठी उसकी भैंस” या उक्ती प्रमाणे ज्याच्याकडे साम, दाम, दंड, भेद या चारही नीती ज्याला अवगत आहेत तोच या राजकारणात आपला घोडा दामटवू शकतो ….. किमान ५ वर्षे तरी. दर ५ वर्षांनी हे थरारक नाट्य असंच चालू राहतं. नेते बदलत जातात, पार्ट्या बदलतात, कार्यकर्ते बदलतात पण निवडणूक आणि तिच्या अवती भवती घडणाऱ्या घटना नेहेमी प्रमाणेच रोमांचक … आणि थरारक.

(समाप्त)

निवडणुकीचा थरार – भाग २

खरं तर या शीर्षकाला काहीच अर्थ नाही …. आपलं काही तरी मसालेदार शीर्षक द्यायचं म्हणून दिलं इतकच. पण कधी कधी मात्र एखाद्या इंग्रजी चित्रपटाला लाजवेल इतका थरार अनुभवायला मिळतो. याची सुरुवातच मुळी जेंव्हा निवडणुका जाहीर होतात तेंव्हा पासून होते आणि हा थरार सत्ता मिळवून एखादे पद पदरात पडे पर्यंत राहतो. ज्या प्रभागात किंवा मतदारसंघात निवडणूक होणार असते त्यात वेगळेच वातावरण निर्माण होते. मोर्चेबांधणी आणि चमचेगिरीला ऊत येतो. असेच काही काही निवडणुकीतील थरार या लेखात दिले आहेत. उगाच गांभीर्याने घेऊ नका ….. 😉

(निवडणुकीचा थरार – भाग १ इथे वाचा)

—————————————————————————————————————————————————————–

फॉर्म भरून एकदा का उमेदवारी निश्चित झाली की यांचा राजेशाही थाट बघण्यासारखा असतो. कधी नव्हे ते ही लोकं सामान्य माणसाशी इतकी गोड बोलतात की क्षणभर असं वाटतं यांच्या तोंडातून मध गळतंय की काय. येता जाता हातवारे काय करतील, थांबून ख्याली खुशाली काय विचारातील आणि सर्वात शेवटी असं ही नमूद करतील “आपलं मत आम्हांलाच मिळालं पाहिजे बरं ….. मग तुमचे सगळे प्रॉब्लेम चुटकी सरशी सोडवून दाखवीन”. यात काही उमेदवार खरंच सामाजिक कार्य करणारे, जनतेसाठी झगडणारे असतात. पण यांची संख्या सध्यातरी नगण्य आहे. पण कधी कधी उमेदवारी हातात आल्यावर त्यांच्या डोक्यात पण हवा जाण्याची शक्यता असते. सगळेच उमेदवार असे फुगे होऊन तरंगत असतात. झुंडीने फिरत अनोखे शक्ती प्रदर्शन करणारे हे तथाकथित नेते आचारसंहिता लागू झाली की गोगलगाय होऊन जातात. या काळात शब्द न शब्द तोलून मापून बोलला जातो. कारण या काळात काही गडबड झाली तर सगळं मुसळ केरात. ;). त्यामुळे या काळात सगळं कसं शांत शांत असतं. कदाचित वादळा पूर्वीची शांतता असू शकते. पण या सगळ्या धकाधकीत कार्यकर्ते मात्र अविरत काम करत असतात. काही ठिकाणी खाण्यापिण्याची चांगलं तर काही ठिकाणी वेळेला पाणी देखील मिळत नाही. अश्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारची धडाडी असते. त्यांची निष्ठा पणाला लावून एक दिलाने ते प्रचार करत असतात. कधी मनापासून तर कधी “वरच्या” आदेशाचा मान राखून. उमेदवार जिंकला तर स्तुतिसुमने नाहीतर प्रचार नीट न केल्याचे खापर माथी मारलं जातं. घरोघरी जाऊन प्रचार करणे, मतदारांच्या याद्या तयार करणे इथपासून ते निकाल लागे पर्यंत अविश्रांत मेहेनत करणे थरारकच नाही का?

निवडणुकीचा दिवस

रोज टीव्हीवर वेगवेगळया पक्षातील नेत्यांच्या मुलाखती, चर्चासत्रे यांचे आयोजन करून वातावरण तप्त करत असतात. अशा कार्यक्रमांची नावे पण सुंदर असतात … “आपला आवाज”, कौल जनतेचा”, “इलेक्शन अजेंडा” इ. इ. हे असे कार्यक्रम म्हणजे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यासाठी मिळालेले हक्काचे व्यासपीठच. हे असे कार्यक्रम बघायला मला सॉलिड आवडतं. कुणाचा कुणाशी ताळमेळ नसतो. नुसती बोंबाबोंब.अगदी फुल २ करमणूक. निखिल वागळे सारखा कुशल सूत्रधार तर चर्चासत्रामध्ये सूत्र संचालन कमी आणि ओरडणाऱ्या विविध पक्षाच्या प्रवक्त्यांना गप्प करण्याचं काम जास्त करतो. अश्यावेळी मंचावर पट्टीचे सूत्रधार लागतात. ४-५ बोंबाबोंब करणाऱ्या नेत्यांना थोपवून धरण्याचं काम असं सहजासहजी शक्य नाही …. तिथे पाहिजेत जातीचे.

या सगळ्या धामधुमीत शेवटी तो कसोटीचा दिवस उजाडतो ज्याची प्रत्येक उमेदवार आतुरतेने वाट बघत असतो. इतके दिवस राबणारे कष्टकर्ते ( कार्यकर्ते या शब्दा पेक्षा कष्टकर्ते हाच शब्द इथे जास्त चपखल बसतो नाही का?) झाडून मतदान केंद्रांवर जमा होतात. कुणी गैरप्रकार, बेकायदेशीर काम तर करत नाहीये ना या साठी डोळ्यात तेल घालून पाळत ठेवून असतात. कुणी असं काही करताना आढळलं तर सरळ ती ब्याद मामाच्या हातात. कधी काही संवेदनशील विभागात मतदान केंद्र ताब्यात घेणे, मतपेट्या पळवण्याचे प्रकार घडले की त्या केंद्राला रणांगणाचे स्वरूप प्राप्त होते. सगळंच थरारक.

आपल्या मतदारांनी मतदान केले की नाही ते बघणे हे त्या दिवशीचे मुख्य काम. प्रसंगी एखाद्या स्थितप्रज्ञ म्हशीला जसे काठीने ढोसत ढोसत इच्छित स्थळी न्यावे लागते तसच मतदारांना देखील हलवावे लागते. इतकंच काय तर निवडणुकांप्रीत्यर्थ ज्या ज्या महत्वपूर्ण व्ही.आय.पी. लोकांना अर्थपूर्ण भेटवस्तू दिल्या असतात अश्या लोकांची योग्य ती सरबराई  ठेवावी लागते. मुंबई सारखा सुप्त मतदार असेल तर गर्दी झाली नाही म्हणून वरिष्ठांचा रोष होतोच. आता लोकांनी मतदाना सारख्या हक्कावर पाणी सोडले तर कार्यकर्ते काय करणार? आणि कार्यकर्तेसुद्धा अश्या निर्बुद्ध नेत्यांचे झेंडे हातात का धरतात ते विठ्ठलच जाणे. ;).

मतदान केंद्रावर नेते आपला मतदानाचा हक्क बजावायला येतात …. येतात म्हणजे ??? अगदी आपल्या खास व्यक्तीचा जथ्था सोबत घेऊनच. मला एक प्रश्न नेहेमी पडतो की यांना फिरायला बरोबर नेहेमी माणसं लागतातच का?? ….. यांना एकटं फिरायला भीती वाटते का उगाच चारचौघांना बरोबर घेऊन आपली ताकद दाखवायची हौस असते? या सगळ्या घोळक्यात त्या नेत्यांचे हुजरे, चमचे, आतल्या गोटातले कार्यकर्ते, पत्रकार आणि छायाचित्रकार यांची पिलावळ असतेच. मतदान केले की बाहेर येऊन विजयी अविर्भावात मिडीयाला “बाईट” दिल्या जातात. तारवटलेल्या डोळ्यांनी काय ती दोन चार वाक्ये बरळतात. पूर्वी मत दिल्याची खूण म्हणून तर्जनीवर निळी … सुकल्यावर न पुसता येणारी शाई लावली जायची. पण आता नवीन सरकारी नियमा प्रमाणे मधल्या बोटावर शाईचा फराटा मारला जातो. ही बोट बदलण्याची भानगड कुठल्या बेट्याने केली आणि का केली देवा जाणे. हा नियम लागू झाल्यावर जी पहिली निवडणूक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी काही मठ्ठ नेत्यांचे असे सुंदर फोटो आणि त्या फोटोखाली त्यांचे काढलेले वाभाडे काढले होते की हसून हसून पुरेवाट झाली. काही अडाणी नेत्यांनी सवयी प्रमाणे मतदान करून आल्यावर छायाचित्रकारांना एकदम स्टाईल मध्ये आपल्या हाताची शाई लावलेली मध्यमा वर करून दाखवली. आणि दुसऱ्या दिवशी मिडीयाने त्यांचेच बोट त्यांना दाखवले ….. पुराव्यानिशी. ज्यांना सगळी बोटं सारखीच वाटतात त्यांनी मध्यमा दाखवली काय किंवा करांगुली दाखवली काय. त्यावेळी काही मोजक्याच विद्वान लोकांनी मात्र हाताची चारही बोटं एखाद्या योगमुद्रे प्रमाणे दाखवली होती. असे क्षण मिडीयाला चावून चोथा करण्यासाठी पुरेसे असतात.

मतदानाच्या धकाधकीत दिवस सरत असतो आणि कार्यकर्ते हळू हळू विसावत असतात. कधी कधी उमेदवार तिथेच ठाण मांडून बसले तर ती देखील उसंत मिळत नाही. मतदानाची वेळ संपते आणि मतपेट्या उमेदवारांच्या भविष्याचे गुपित पोटात दडवून निपचित पडून असतात. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या टप्प्याचा थरार कलत्या सूर्याच्या साक्षीने संपलेला असतो. रात्री टीव्हीवर बातम्या झळकत असतात त्या मतदार राजाने दिलेल्या प्रतिसादाच्या. नेहेमी प्रमाणे सुशिक्षित पांढरपेश्या मतदारांचा वर्ग निवडणुकीला वाकुल्या दाखवून मिळालेली सुट्टी एन्जॉय करण्यात मग्न असतो …. अगदी ड्राय डे असून सुद्धा.

(क्रमशः)

(निवडणुकीचा थरार – भाग ३ इथे वाचा)