मोऱ्या बापट (भाग ४)

योगायोगाने मध्ये एकदा शाम्या भेटला. मोऱ्याचा विषय निघाल्यावर तो देखील त्याच्या लग्नाच्या मुद्द्यावरून “पिडीतग्रस्त” होता. चला मोऱ्याचे लग्न ही माझी एकट्याचीच डोकेदुखी नसून त्याने सगळ्या जवळच्या मित्रांना कामाला लावले होते. त्यामुळे मोऱ्याच्या लग्नाच्या बाबतीत मि आणि शाम्या समदुःखी होतो. मोऱ्या रोज कितीही डोक्याला चावत असला तरी एकदा त्याचे लग्न होऊन त्याची गाडी मार्गी लागावी असे मनापासून वाटत होते. आणि आमची या कचाट्यातून सुटका होण्याचा “मोरोपंतांचे लग्न” हाच एकमेव मार्ग होता. देणेकरी, हप्तेवले यांच्या तगाद्या पेक्षा मोऱ्याचा ससेमिरा अधिक कष्टप्रद होता.

एका शनिवारी मोऱ्या सकाळी सकाळी नाक्यावर भेटला. रात्री अपरात्री गल्लीतले कुत्रे मागे लागल्यावर घरी पोहोचण्याची जी घाई असते तश्या घाईत स्वारी अण्णाकडे धडकली. लगेच अण्णाला हुकुम सोडला “५ मावा दे दो …. बहोत घाई में है”. अण्णा तितक्याच लगबगीने म्हणाला “कल के ५ मावा का पैसा?” मोऱ्या म्हणतो “देता है ना …. किधर भाग के जाने वाला है क्या? आजतक कभी तेरा पैसा बुडाया है क्या?” अण्णा मिश्कील हसला “इतना बाग बाग के आया … इसलिये मुझे लागा अबी आयेगा नाही” अण्णा आणि मोऱ्याची अशी जुगलबंदी नेहेमीच चालायची. अण्णाने ५ मावा चोळून हातात दिले आणि मोऱ्या ते घेता घेता मला म्हणाला “चल जरा घाईत आहे. ४-५ दिवसांनी भेटू.” माझ्या चेहेऱ्यावरचे अनावश्यक कुतूहल बघून मोऱ्या म्हणाला “सांगतो रे बाबा … सविस्तर भेटून… आता मला जाऊंदे.” असं बोलून मोऱ्या निघून गेला. आता नेहेमीप्रमाणे ३-४ दिवस तरी शांतता राहणार होती. मि अण्णाला विचारलं “किधर गया रे ये कमीना?” असं विचारल्या बरोब्बर अण्णा फिसकटला, “क्या मालूम. सठीया गया है. ये उमर में कौन करेगा इसके साथ शादी. हमेशा बोलता रेहेता है की घर का खाना नाही मिलता … वो इतने सारे पोली भाजी के दुकान है उसमे तो घर जैसा ही मिलता है. कुछ नाही … अपने कॉ क्या चुतीया समझता है …. रात को औरत के बिना निंद नाही आती होगी….. खाने पिणे केलिये कम और सोने केलिये उसको बीवी चाहिये.” इतकी पार टोकाची प्रतिक्रिया ऐकून मि सुन्न झालो … कदाचित बायको शोधण्याच्या कामाला मोऱ्याने अण्णाला पण लावला असणार.

५-६ दिवसांच्या पाहुणचारासाठी गेलेला मोऱ्या दुसऱ्या दिवशी नाक्यावर दत्त म्हणून हजर. केस रंगवलेले, तुळतुळीत दाढी .. वा! मोऱ्या नुसता चमकत होता. कानातील अत्तराच्या बोळ्याचा वास अधिक तीव्र झाला होता. खिशातले कागदाचे चिठोरे गायब झाले होते. प्यांट जिथे असायला हवी तिथेच होती. बेल्ट चे बक्कल बरोबर मधोमध टिकून राहिले होते. मोऱ्याच्या एकूणच पर्सनॅलिटीमध्ये एका रात्रीत बराच फरक झालेला होता. या मेक ओव्हरचे कारण काय असेल याचा अंदाज बांधत असतानाच मोऱ्या हात पुढे करत म्हणाला “आनंदा लेका, हात मिलाव …. मेरा शादी फिक्स हो गया… साला इतना शोधने के बाद बाजू वाली गल्लीकी औरत निकली”. मि तीनताड उडालो आणि पानवाल्या अण्णाचे तोंड बराच वेळ उघडे राहिले. मि स्वप्नात नाहीये ना हे बघण्यासाठी मोऱ्यालाच चिमटा काढला आणि मोऱ्याने बोंब मारली. मग मि जरा त्याची टर खेचायला लागलो. त्याच्या एकंदरीत दिसण्यावरून, अत्तराच्या वासा वरून. अण्णा पण त्याची मस्त पिळत होता. मि म्हटलं “चायला काय रे …. ५-६ दिवसांनी भेटतो म्हणून निघून गेलास आणि परत पण आलास?? का गेलाच नाहीस?” “अरे तीच तर गम्मत आहे …. मि गेलोच नाही” मोऱ्या रंगात येउन सांगायला लागला आणि ती जी काही गम्मत आहे ती ऐकण्यासाठी माझ्या पेक्षा अण्णाच कान देऊन ऐकायला लागला. “अरे आज सकाळीच राजापूरला जायला निघणार तेवढ्यात दामल्यांचा फोन आला. काही दिवसांपूर्वी त्यांचं स्थळ बघितलं होतं. मला पसंत होतं पण त्यांच्या कडून काही उत्तर आलं नव्हतं. ते आज सकाळी आलं. दामले म्हणाले मुलगी तयार आहे … केंव्हा बोलणी करायची? त्यामुळे म्हटलं बा झवत गेलं ते राजापूर प्रकरण, आधी चायला मुलगी सापडली आहे तेंव्हा लग्नाचं बघू. मग सकाळीच त्यांना भेटलो आणि सगळं ठरवून आलो” मि हळू हळू चाट पडत होतो.

मोऱ्याने हे दामले प्रकरण माझ्यापासून लपवून ठेवलं म्हणा किंवा सांगायला विसरला …. काहीही असलं तरी मला त्याचे हे वागणे अजिबात आवडले नव्हते. मोऱ्या बऱ्याच गोष्टी एकदम रंगात येऊन सांगत होता. त्याच्या या रंगाचा बेरंग होवू नये म्हणून मि त्याला काहीच बोललो नाही. पण शेवटी न राहवून त्याला टोमणा हाणलाच “मग काय लग्न व्हायचंय का ते पण करून आलास??” या शाब्दिक दणक्याने जरा मनाला बरं वाटलं आणि मोऱ्याच्या चेहेऱ्याचा रंग बदलला. “अरे तुला सांगणारच होतो पण आपला योग येत नव्हता. साहेब तुम्हाला लग्नाला बोलावल्याशिवाय कसं चालेल? तारीख ठरली की नक्की सांगेन” मोऱ्या ने जरा सावरून घेतलं. मि परत त्याला हाणला “बघ हा …. नाहीतर असंच एके दिवशी येशील तुझ्यातला नवरा मिरवत मिरवत आणि सांगशील अरे लग्नाची तारीख सांगणार होतोच पण आपला भेटीचा योगच नाही आला” मोऱ्या जे काही कळायचं होतं ते कळून चुकला होता. त्याच्या चेहेऱ्यावर अपराधीपणाची छटा दिसायला लागणार त्याच्या आताच मि तिथून काढता पाय घेतला.  रात्री बायकोला सांगितलं तेंव्हा ती नेहेमी प्रमाणेच म्हणाली “बघ तुला सांगतच होते. शेवटी त्याने तुला अंधारात ठेवलाच ना. सगळेच मित्र असेच तुझे. तु आपला मार मार मारतोस त्यांच्यासाठी आणि त्याने साधे लग्न ठरल्याचे पण इतक्या लेट सांगितले?” आता या मोऱ्या वर ही का उखडली होती कोण जाणे …. तरी बरं हिची किंवा माझी कुणी लांबची अडलेली नातेवाईक त्याच्या गळ्यात मारायची नव्हती …. नाहीतर …. विचार न केलेलाच उत्तम.

दुसऱ्या दिवशी मोऱ्याने कान पकडले …”तुला सांगायचे नव्हते असं काहीच नव्हतं … पण माझ्या कडून राहून गेलं हे मात्र निश्चित. मनातून मोऱ्या खुपच खजील झाला होता. शेवटी न राहवून मीच म्हटलं “सोड रे …. होता है ऐसा …. झालं ठरलं ना तुझं? सुटलास एकदाचा (आणि आम्ही पण सुटलो). मोऱ्याने खिशातून त्याच्या भावी बायकोचा …. सुनंदा दामल्यांच्या फोटो दाखवाला. आणि नाव सांगतानाच वरून ही पण कोटी केलीन “तिच्यात काहीच ‘सु’ नसल्याने तिला सगळे नंदा दामले म्हणतात. मि आपलं त्याच्या कमरेवर चिमटा काढून तुला इतक्यात काय ‘सु’ आहे आणि काय ‘कू’ आहे हे कसं काय कळलं म्हणून पिडायला लागलो. आपलं विषय बदलायचं निमित्त म्हणून मोऱ्या नंदा दामलेचा फोटो माझ्या डोळ्यासमोर नाचवत होता. फोटो बघितला मि मनात म्हटलं …ही sssssssssssssssssssss??? (नाही नाही …. ती काय माझ्या ओळखीची नव्हती. पण एकंदरीत फोटो बघून अनपेक्षित धक्काच बसला होता.) गौर वर्ण सोडला तर सगळंच दमदार प्रकरण होतं. मोऱ्या पेक्षा अंगापिंडाने आडवी आणि बुटकी … म्हणजे एकदम लंबगोल. मोऱ्या वाटोळा आणि ही लंबगोल … या दोघांची जोडी म्हणजे मोरयाच्या साथीला गोरा पैलवान. कधी कधी दोघांना कंटाळा आला तर ती आरामात मोऱ्याला पाठुंगळीला मारून पूर्ण मजल्यावर ‘कांदे-बटाटे’ खेळू शकेल.  मोऱ्या एखादा अहवाल वाचून दाखवावा या प्रमाणे मला माहिती पुरवत होता. मोऱ्याच्या प्रत्येक वाक्याला “अरे वा” “हो का” या शिवाय काही बोलण्याची गरज पडली नाही म्हणण्यापेक्षा मोऱ्या तितकी उसंतच देत नव्हता.  त्याने दिलेल्या अवांतर माहितीचा विचार करता दामल्यांचे स्थळ म्हणजे मोऱ्याला ज्याकपॉटच होता.  सुनंदा दामले एका सरकारी कचेरीत नोकरीला होत्या, स्वतःची राहायची जागा होती. आधीच्या विवाहातून झालेली एक ७-८ वर्षाची मुलगी देखील होती. कदाचित या सगळ्याचा वजनदार विचार करूनच मोऱ्याने तिचा वजनाकडे दुर्लक्ष्य केले असणार.

मोऱ्याचे “नंदा पुराण” संपले आणि त्याने आमची रजा घेतली. जाता जाता “काहीही करून तुला लग्नाला यावच लागेल” असं उडत उडत आमंत्रण द्यायला विसरला नाही. “बघू किती जमतंय ते” असं गुळमुळीत उत्तर दिलं असलं तरी मि जाणार होतोच. हे ऐकताच मोऱ्याने अख्या नाक्याला ऐकू जाईल अश्या आवाजात बोंब मारली “रविवारच आहे. कुठलीही सबब चालणार नाही … असशील तिथून उचलून घेउन जाईन” असं ऐकल्यावर मात्र नाईलाज होता … जाणं भागच होतं. कारण उचलून घ्यायला तो आला तर ठीक आहे …. सुनंदा तर माझ्या संपूर्ण कुटुंबासकट मला उचलून घेउन जाऊ शकते याची कल्पना होतीच. मागे एकदा मोऱ्या नोंदणी पद्धतीने लग्न करणार असं ओझरतं बोलला होता. कदाचित तिथे त्याच्या बाजूने साक्षीदार म्हणून स्वाक्षरी करायला कुणी नसावे म्हणून हा मला गळ घालत असावा. तो गेल्यावर “सुटलो एकदाचे” असे अविर्भाव माझ्याच नाही तर त्या पानवाल्या अण्णाच्या चेहेऱ्यावर देखील झळकत होते. एकंदरीत काय मोऱ्या “थंड” झाला होता आणि त्याचा तगादा देखील संपला होता. अश्या रीतीने मोऱ्याचा खाण्यापिण्याचा, राहण्या झोपण्याचा … सगळाच प्रश्न दामलेने एक हाती सोडवला होता. अधून मधून आम्ही मोऱ्याला चिडवायचो “बापटा तुला दामले दमवणार बर का” आणि मोऱ्या नवपरिणीत नवऱ्यासारखा लाजायचा. मोऱ्याने लग्नाचे आवताण नाक्यावरच दिले. अण्णाला बोलवायला पण तो विसरला नाही. याचाच अर्थ मोऱ्या रजिस्टर लग्न करणार नसून सगळे विधीवत करणार असल्याचे पक्के झाले. आमची Bachelor’s Party पण एकदम “झोकात” झाली आणि त्या झोक्यावरच मोऱ्याचे केळवण पण आम्ही उरकून घेतले.

मोऱ्याची खरेदी पण झटपट झाली, दुकान ठरलेले …. काय घ्यायचे ते ठरलेले. खरेदीसाठी मि होतोच…. अगदी अचानक न सांगता “जरा इथेच जाऊया” असे सांगून मला घेऊन गेला. माझ्या आग्रहाखातर त्याने एक छानसा मोतिया रंगाचा सलवार कुर्ता पण घेतला. नंदा वहिनीना साडी घेण्याच्या वेळेस मात्र वांदा झाला. मोऱ्याला त्यांची आवड निवड विशेष माहीत नसावी. साड्यांच्या दुकानात घाबरत घाबरत शिरलो आणि आम्ही नवशिके गिऱ्हाईक आहोत हे त्या दुकानदाराने लगेच ओळखले. बऱ्याच साड्या बघून सुद्धा पसंती काही जमत नव्हती. तो दुकानदार अगम्य भाषेत इरकली हवी का वल्कलं हवी? तनछोई हवी का जोर्जेट हवी? काठ पदराची हवी का साधी हवी? मोऱ्याने हळूच मला कोपराने ढोसून विचारले “साधीला पदर नसतो का रे?” मि वैतागून म्हटलं “नसत्या उठाठेवी कुणी अंगावर घ्यायला सांगितल्या आहेत तुला? तिच्या साड्यांची खरेदी तु का अंगावर घेतलीस?” तसं तो हळूच म्हणाला “अरे तिच्या साड्यांची खरेदी तीच करणार आहे. मि ही साडी तिला पहिल्या रात्री देणार आहे” असं म्हणून मला हळूच डोळा मारला. मि म्हटलं “लेका पहिल्या रात्री जी गोष्ट उतरवायची तीच काय तिला देतोस” मोऱ्या सॉलिड पेटला होता …. पहिली रात्र काय …. साडी काय …. एकदम रंगात आला होता. लगेच माझ्या डोळ्या समोर मोऱ्या खाटेवर बसलाय … दामलेबाई हातात दुधाचा पेला घेऊन येतात …. मोऱ्याने तिला बाजूला बसवले …. आणि मोऱ्या तिला घेतलेली साडी देतोय …. बास बास उगाच कुणाच्या मधुचंद्राचा आपण कशाला जास्त विचार करायचा.

लग्नाच्या आधी छान पैकी फेशियल करून, केसांना रंग लावून मोऱ्या बोहोल्यावर उभं राहिला तयार झाला. होणाऱ्या बापट वहिनींची तशी एक दोन वेळा तोंड ओळख झाली होती. दाखवलेल्या फोटो पेक्षा बऱ्या दिसत होत्या. अगदी मोजक्या माणसांच्या उपस्थितीत … अगदी लिमिटेड एडिशन प्रमाणे घरातल्या घरातच लग्न होतं. समस्त मित्र परीवारापैकी मि आणि शाम्या दोघेच, लग्न लावायला एक पुरोहित, वर आणि वधू धरून इनमीन १५ माणसांचा लवाजमा. लग्नाचे विधी अगदी विधीवत पार पडले. पण जेवणाची हालचाल काही दिसेना आणि तो संभ्रम माझ्या आणि शाम्याच्या चेहेऱ्यावर बघून मोरोपंतांनी रीतसर आवाहन केले “सगळ्यांच्या भोजनाची व्यवस्था श्री. भागवतांच्या खानावळीत केलेली आहे. जेवण झाल्यावर परत लग्नघरी येऊन चहापानाचा कार्यक्रम होईल. त्या नंतर हा समारंभ संपन्न होईल” (म्हणजेच तुम्ही सगळे आपापल्या घरी जायला मोकळे आणि आम्हाला मोकळे सोडा). भागवतांच्या खानावळीतले मोरेश्वर बापटांच्या खास लग्ना प्रित्यर्थ बनवलेली सुग्रास “राईसप्लेट” खाऊन परत मोऱ्याच्या घरी आलो. ओळख पाळख गप्पागोष्टी होता होताच ४ वाजले तसं मोऱ्याने सुनंदा वहिनीना चहा करण्यासाठी इशारा केला. आणि नवी नवरी चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेली. वहिनी अतिशय सराईत पणे घरात वावरत होत्या हे मला शाम्याने आधी खुणेने आणि मग दबक्या आवाजाने सांगितले. मुद्दाम मोऱ्याची खोडी काढायची म्हणून शाम्या म्हणाला “अहो मोरोपंत, जा आत वहिनींना साखर चहा पावडर कुठे आहे ते दाखवा” आणि मोऱ्या सहज बोलून गेला “तिने आधीच बघितलंय सगळं” तसा मी जवळ जवळ ओरडलोच “सगळं ssssss?” अर्थामधला अनर्थ जाणवल्याने मोऱ्या लाजत म्हणाला “अरे लग्ना आधी घर लावायला आली होती ही. घरी बघणारं कुणीच नव्हतं ना …..” शाम्या म्हणाला “बास बास आता पुरे झालं तुझं पाल्हाळ. आता आली ना बायको घरात”

पुढे मोऱ्याचे नाक्यावर येणं कमी झालं. आला तरी संध्याकाळीच पानाची तजवीज करून जायचा. जेंव्हा केंव्हा भेटायचा तेंव्हा निघण्याची घाई असायची. मी मुद्दाम त्याला चिमटे काढायचो “साल्या लग्ना अगोदर जेंव्हा माझे तास तास खायचास तेंव्हा काय आमची लग्न झाली नव्हती?” परत तो त्याच्या खास शैलीत लाजायचा. आता मोऱ्या कलकत्ता १२०/३०० पानाच्या सोबत खास चांदीचा वर्ख लावलेले मघई मसाला पान पण घेऊन जायला लागला. अधून मधून हा बापटांचा जोडा बाजारात, बागेत फिरताना पण दर्शन देऊ लागला. मोऱ्याची बायको काही बारीक झाली नाही पण मोऱ्या मात्र एका महिन्यात तिच्याशी स्पर्धा करू लागला होता. अश्या सुधृढ बांध्याच्या बायकोची जमेची बाजू म्हणजे तिची असलेली सरकारी नोकरी आणि तिची ८ वर्षाची छोकरी. त्यामुळे “एकावर एक फ्री” या थाटात एका लग्नामुळे दोन दोन नाती मोऱ्याच्या पदरात पडली आणि मोरेश्वर बापट उर्फ मोऱ्या उर्फ मोचि कृतकृत्य झाले.

मोऱ्याचा एकटेपणा दूर झाला, घर खेळतं झालं आणि काही वर्षापूर्वी पहाटे पहाटे उमटणाऱ्या चादरी वरच्या सुरकुत्या परत उमटू लागल्या. (आणि मी, अण्णा आणि शाम्या मुक्त झालो).

समाप्त.

मोऱ्या बापट (भाग ३)

दुसऱ्या दिवशी सुट्टी असल्याने रात्रीच्या प्रवचनाचा झोपेवर विशेष परिणाम झाला नाही. भल्या सकाळी ९ वाजता जाग आली तीच मुळी बायकोने तारस्वरात सुरु केलेल्या मंजुळ भूपाळीने. “कुठे रात्री अपरात्री भटकत असतोस देव जाणे. कधी कधी मला वाटतं की तुला कुणीतरी झपाटलंय. कारण आज काल तु झोपेत पण बडबडायला लागला आहेस. आज सकाळी पण काही तरी मोऱ्या, लेकुरवाळी, धोंड का खोंड असं काही तरी असंबद्ध बडबडत होतास.” माझ्या चेहेऱ्यावरील अविश्वासाचे भाव बघून “हो किनई गं माऊ?? बाबा सकाळी झोपेत बडबडत होता ना??” असं म्हणत बायकोने तिच्या बाजूने एक साक्षीदार उभा केला. “मम्मा म्हणाली ते खरंच आहे बाबा …. तु झोपेत सकाळी काहीतरी बडबडत होतास …. मी पण ऐकलंय ….” आता माझ्या मुलीने पण शपथेवर सांगितलं माझं धाबे दणाणले. मी झोपेत बडबडतो याचा साक्षात्कार मला नुकताच झाला होता.

शक्यतो मी बाहेरील मित्रांच्या, नाक्यावरच्या खबरी घरी सांगत नाही पण माझ्या या बडबडी मुळे मोऱ्या प्रकरण बायकोला सांगणं क्रमप्राप्त होतं. एकंदरीत मोऱ्या तिला “gossip” चा विषय वाटला. चहा पिता पिता तिने नेहेमीप्रमाणे मोऱ्यावर जास्त विश्वास न ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच त्याच्या साठी बायको शोधण्याच्या नसत्या भानगडीत पडू नये असे फर्मान सोडले … त्या साठी त्याचे नातेवाईक आहेत असेही ठासून सांगायला विसरली नाही. “४-५ महिन्या पूर्वी झालेल्या माणसावर किती विश्वास टाकायचा? काय माहित त्यानेच बायकोचा छळ केला असेल तर? या अश्या नवऱ्यांचा काय नेम?” आणि हे ती तिच्या नवऱ्याला सांगत होती. तिच्या मेंदूत मध्यमवर्गीय बायकी विचारांचा किडा रेंगाळत होता. अश्या सल्ल्यांच्या नादी लागू नये ही अनुभवाची शिधोरी गाठीशी असल्याने हिच्या बोलण्याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष केलं. माझे सगळे मित्र हिला लुच्चे, लफंगे आणि बेभरवशी का वाटतात या विचारात इतका गुंग झालो होतो की एक दोन वेळा चहाचा घोट घेण्यासाठी ओठांना लावलेल्या कपात चहाच शिल्लक नाही हे लक्षात देखील आले नाही. माझा हा वेंधळेपणा बघून माझी बायको इतकी गोड हसली की तिचे हास्य मोऱ्याचे विचार डोक्यातून काढून टाकण्यास पुरेसे होते.

पुढे २-३ दिवस मोऱ्या मला भेटला नाही. आणि नंतर जेंव्हा जेंव्हा भेटायचा तेंव्हा एकच वाक्य असायचं …”आपल्या कामाकडे लक्ष ठेवा साहेब…. जरा बघ कुठे काहीतरी सापडलं तर.” सापडलं तर??? “अरे मोऱ्या …. तुझ्या साठी बायको शोधायची म्हणजे बाजारात एखादी वस्तू शोधण्या सारखं आहे का?” असं मी म्हणालो की लगेच तो म्हणायचा …”इथे नाक्यावर उगीच वाच्यता नको. निदान या वर्षी तरी घरी दिवाळीत कंदील लागून दे रे”. कधी कधी त्याची कीव यायची आणि कधी कधी वाटायचं हा मला काय विवाह मंडळ चालवणारा समजतो की काय? मोऱ्याचं असं माझ्या मागे हात धुवून लागणं मला बेचैन करायचं. मोऱ्याचं वय आणि आर्थिक परिस्थिती हे सर्वात मोठी अडचण होती. माझ्या माहिती मध्ये मोरेश्वर बापट यांच्या स्थळाविषयी सांगून ठेवले होते पण म्हणावे तसे यश मिळत नव्हते. मध्ये एक दोन इच्छुक विधवांची स्थळे आली होती असं मोऱ्या म्हणाला. पण केवळ फोटो बघूनच मोऱ्याने नकार घंटा वाजवली होती. त्यामुळे सध्या तरी मोऱ्याच्या एकटेपणावर आणि मटर पनीर वर मार्ग मिळाला नव्हता. मोऱ्याचे दोनाचे चार होण्यासाठी मी काही विशेष प्रयत्न करत नव्हतो. अर्थात तसे प्रयत्न न करण्यामागे काही खास कारण देखील नव्हते. मोऱ्याला बायको मिळण्याचे सोयरसुतक नव्हते पण मोऱ्या सोकावत होता. रोज रात्री तो जे माझ्या मेंदूचे चाटून पुसून चावे घ्यायचा ते आता झेपण्या पलीकडे गेले होते. याची परिणीती एकच होणार होती …. हळू हळू मी मोऱ्याला टाळणार होतो. 😉

ऑफिस मध्ये माझा एक सहकामगार होता …. उदय सुर्वे. त्याचे “कांदेपोहे” कार्यक्रम चालू होते. एके दिवशी त्याला विवाह मेलनाच्या (matrimony) संकेतस्थळांवर रेंगाळताना बघितलं. फावल्यावेळात त्याची टर उडवत असताना लग्नाचा विषय निघाला आणि या अश्या वेबसाईटच्या मदतीने त्याचे लग्न जवळ जवळ “फिक्स” झाल्याचे कळले. मी जोरात (मनातल्या मनात) ओरडलो …. “युरेका”. माझी सौभाग्यवती लग्नाच्या ५ वर्षे आगोदरच “फिक्स” झालेली होती त्यामुळे मला असल्या उठाठेवी कधीच कराव्या लागल्या नाहीत. उदय कडून या अश्या संकेतस्थळांची संपूर्ण माहिती घेतली आणि हे पिल्लू मोऱ्यावर सोडायचे ठरवले. अर्थात या अश्या साईटवर माझा अजिबात विश्वास नव्हता पण उदयचे उदाहरण ताजे होते. तसं सध्या फेसबुक मार्फत पण लग्न ठरतात असं ऐकून होतो पण ते मोऱ्या साठी अती झालं असतं. त्याच रात्री मोऱ्याला भेटून त्याला या ऑनलाईन विवाह मेलनाविषयी माहिती दिली की माझा व्याप कमी होणार होता.

ऑनलाईन विवाह मेलनासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टी मोऱ्याकडे अस्तित्वातच नव्हत्या. या युगात ज्या मानवाला संगणक म्हणजे दूरचित्रवाणी संचाप्रमाणेच असलेला एक तापदायक खोका असे वाटते त्याच्या कडे ईमेल आयडी काय असणार … घंटा?? “हा सगळा प्रकार तुला अजिबात जमणार नाही” असे मोऱ्याला परोपरीने समजावले. पण मोऱ्या भलताच हुशार … त्याने माझाच मोरू केला. “अरे तु तर २४ तास त्या कॉम्पुटरवरच असतोस ना …. आणि तुझा तो आयडी का काय ते आहेच….. मग तुझाच आयडी टाक ना. आणि काही मेल आलाच तर तु चेक करशीलच ना. तसा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहेच.” मनातून त्याला एक कचकावून शिवी घातली आणि विचार केला साल्या म्हणे तसा विश्वास आहे काय?? जणू काही कुणी बाई या मोऱ्यावर भाळली आणि ती लट्टू असल्याचा मेल मला आला तर या मोऱ्याच्या ताकास तूर न लागू देता मीच त्या उतावळी बरोबर चतुर्भुज होणार आहे…. मोऱ्याला काकापुता करून बरेच समजावण्याचा निरर्थक प्रयत्न करून देखील मोऱ्याने आपला कोकणी चिवटपणा सोडला नाही. आता मोऱ्याचं हे पण लचांड माझ्याच गळ्यात पडणार होतं. मग आलीया भोगासी असं म्हणत २-४ विवाहमेलन संकेतस्थळांवर मोरेश्वर बापटाला विवाहेच्छू उमेदवार म्हणून उभा केला. मोठ्या हौशीने मोऱ्याने वेगवेगळया पोझ मधले आपले फोटो टाकले आणि सगळी माहिती भरली. अपेक्षित वधू बद्दलच्या अपेक्षा माफकच होत्या ….

त्या विवाहमेलनाच्या संकेतस्थळांवर मोऱ्या चांगलाच रुळला होता हे त्याच्या प्रफुल्लित चेहेऱ्या वरून कळतच होतं. सगळ्या फोटोंचे निरीक्षण, गणन आणि अनुमान यांचे मनातल्या मनात विश्लेषण चालले असावे. कारण ज्या फोटोवर तो जास्त वेळ घुटमळत होता त्या स्थळाबद्दल “ही कशी वाटते?” असा टिपिकल प्रश्न विचारताना मोऱ्या आपल्या भुवया पण उडवायचा. मि काय असेल ते माझे परखड मत द्यायचो. इतक्या सगळ्या विविध रंगाच्या, विविध ढंगाच्या आणि विविध अंगाच्या होतकरू बायकांना बघून मोऱ्या पार गोंधळून गेला होता. आता निश्चित कुणासाठी हात पुढे करावा हेच सुचत नसल्याने माझ्याकडे बघून मोरेश्वरपंतांच्या भुवया सारख्या उडत होत्या. शेवटी वैतागून त्याला म्हणालो “चायला बायको तुला करायची आहे. मग तु बघ तुला कुठली उचलता येईल ती…. म्हणजे तुला झेपेल अशी…. त्यात मि काय कप्पाळ सांगणार?” मग हो ना करता करता मोऱ्याने १५ – २० जणींना ऑनलाईन मागणी घातली. सगळं झाल्यावर मोऱ्या मला नाक्यावर घेउन गेला. आता आपलं लग्न झाल्यात जमा असल्याच्या अविर्भावात मोऱ्याचं धुम्रपान चालू होतं. अर्थात त्या पैकी एकाही बाईचं उत्तर आले नाही तो भाग वेगळा. आता मोऱ्या मला दुहेरी पिडणार होता आणि माझी परिस्थिती “गाढव अंगावर घेतलंय ना …. मग त्याचा सोस पूर्ण होई पर्यंत उतरवता येणार नाही” अशी झाली होती.

(क्रमश:)

मोऱ्या बापट (भाग २)

वय अंदाजे ४५ च्या आसपास. साधारण उंच आणि बऱ्या प्रमाणात रुंद. वयोमानापरत्वे विरळ झालेले केस. कानातच्या पाळीत घुसवलेला हीना अत्तराचा फाया. बोलता बोलता मधेच तर्जनीने तो बोळा घुसळून वास घ्यायची वेगळीच लकब. शर्टाचा खिसा कागदाच्या असंख्य चीठोर्यानी ओथंबलेला. पोटाचा घेर विशेष नसला तरी त्याचा ताण शर्टाच्या काही बटणांना निश्चित जाणवत होता. बापट या आडनावाला शोभेल असा गौर वर्ण आणि चित्पावनी वाणीला अस्सल राजापुरी वळण. संगीत आणि पानाशिवाय दुसरे कुठलाही शौक नसलेला शौकीन माणूस. दिसायला … वागायला तसा अजागळच. फटकळ नव्हता पण त्याच्या स्पष्टवक्तेपणा ठासून भरलेला.

आता मोऱ्या मला रोज रात्री न चुकता भेटायचा. त्याच्या बरोबर गप्पा मारण्यासाठी कधी विषय शोधावे लागले नाही. जुन्या आठवणी, कोकण आणि संगीत हे त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय. यात कधी आमच्या एकमेकांच्या व्यक्तिगत आयुष्यावर कधीच बोलणं झालं नाही. जीवनाच्या रंगमंचावरील व्यावहारिक नात्यातील मोऱ्या आणि व्यक्तिगत जीवनातील मोरेश्वर … या दोन भुमिकांमध्ये कमालीची तफावत होती. वरून अलबेल दिसत असलं तरी आत कुठली तरी नाजूक जखम मोऱ्याला सलत होती. हळू हळू त्याच्या जीवनातले विविध पैलू उलगडत गेले आणि माझ्या मनात असलेला मोऱ्याचा गुंता सुटत होता. नाक्यावर अघळपघळ असणारा मोऱ्या खासगी मध्ये तितकाच विचारी, बुद्धिवादी होता. कधी कधी वाटायचं …. आज मी ज्याचाशी बोलतोय तो मोऱ्या नसून त्याच्या शरीरात घुसलेला भलताच कुणी तरी आहे. तासंतास एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करतानाच मध्येच कधीतरी असंबद्ध आणि बाळबोध विचार मांडायचा. एखादा अट्टल बेवडा पण झुलणार नाही इतकी त्याची वैचारिक पातळी झुलायची. जितका तो विक्षिप्त होता तितकाच तो भावूक आणि हळवा देखील होता.

एकदा का मोरेश्वरपंतांची स्वारी गायब झाली की ८ – ८ दिवस दर्शन दुर्लभ असायचे. सडाफटिंगच तो …. कुणालाही न सांगता गायब व्हायचा. आणि जेंव्हा तो परत यायचा तेंव्हा नाक्यावरील गुज्जू कंपूचा टार्गेट असायचा. कुणीतरी खिजावायचं “काय मोरू शेठ …. कुणीकडे गेलं होता? कुणी भेटली का?? कुठे घेऊन गेला होता?” नाक्यावरच्या टवाळ संस्कृतीला साजेसेच हीन दर्जाचे आपुलकीचे आणि जिव्हाळ्याचे प्रश्न. मोऱ्या पण अस्सल राजापुरी मिश्कील उत्तरं देऊन त्यांची तोंड बंद करायचा. मी एक दोन वेळा मोऱ्याला या सगळ्या प्रकार बाबत हटकलं तर तो म्हणायचा …. “जाऊंदे रे …त्यांची थोडी करमणूक होते ना. आणि माझा पण टाईमपास. अश्या वांझोट्या गोष्टींना फाजील महत्व देऊ नये” मी काही बोलणार इतक्यात तो विषय तरी बदलायचा किंवा एखादे छानसे गाणे तरी म्हणायचा. सुरांच्या नावाखाली बोंबच होती तो भाग अलाहिदा. आताशा मोऱ्याची खूप सवय झाली होती. कधीतरी शाम्यापण हजेरी लावायचा. नाक्यावरच्या गप्पा अगदीच रंगल्या तर त्यांचा समारोप रेल्वे स्टेशन वरील चहा वाल्याच्या टपरीवर व्हायचा. मोऱ्याचं गायब होणं … अचानक प्रगट होणं चालूच होतं. फरक इतकाच होता की आता मला त्याचा ठावठिकाणा माहित असायचा. मोऱ्या एक उत्तम इलेक्ट्रिशियन होता आणि व्यवसायानिमित्त तो भ्रमंतीवर असे.

असेच एकदा एक आठवड्याच्या अज्ञातवासानंतर मोरेश्वरपंत नाक्यावर अवतीर्ण झाले. मोऱ्याच्या एकंदरीत हालचाली वरून काहीतरी बिनसले आहे हे माझ्या ध्यानात आले. त्या गुज्जू टोळक्याने परत टवाळकी चालू केली तसा कधी नव्हे तो मोऱ्या भडकला …. “भडव्यानो …. तुमच्या xxxxx बरोबर होतो इतके दिवस.” प्रसंग बाका होता …. टोळक्याला पण त्याची जाणीव झाली. मी मोऱ्याला लांब घेऊन गेलो. मोऱ्या दुकानाच्या कट्ट्यावर बसला…. कपाळावर हात …. नजर मेलेली. घाई घाई ने त्याने मोबाईल काढला …. इअरफोनची बोंड कानात घुसवली आणि गाणी ऐकू लागला. १० – १५ मिनिटांनी शांत झाला. पण चेहेऱ्यावरची आग थंड झाली नव्हती. मोऱ्या सॉलिड पेटला होता. त्याला इतकं पोटतिडकीने बोलताना पहिल्यांदाच बघितलं. “अरे या फोकलीच्याना काय जातंय चिडवायला? यांना काय माहित माझ्या आयुष्याचं काय मातेरं झालंय ते? दर वेळेला यांचं आपलं एकच …. बाई आणि बाटली. स्वतः मात्र बारा गावाचं पाणी प्यायलेत.”

एकंदरीत परिस्थिती हाता बाहेर जाण्याआधी मी मोऱ्याला तिथून खेचतच बाजूला नेला. “चल चहा मारुया” असं म्हटल्यावर एक चकार शब्द न काढता मोऱ्या बाईक वर टांग टाकून बसला. अश्या परिस्थितीवर एकच उतारा …. मस्त कडक वाफाळलेला चहा. मोऱ्याने सिगारेट शिलगवली. तर्जनी आणि मध्यमेच्या बेचकीत सिगारेट घट्ट धरून हाताची मुष्टी मुद्रा करून जोरदार कश मारला. सिगारेटच्या धुरासोबत वाफाळलेल्या चहाचे एक दोन घोट मोऱ्याच्या नाभी पर्यंत पोहोचल्यावर मोऱ्याची कुंडलिनी जागृत झाली. मोऱ्याने त्याच्या आयुष्याच्या इतिवृतांताचे कथन चालू केले. माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी त्या रात्री उमगल्या त्या वरून मोऱ्याचे विक्षिप्त वागण्याचे संदर्भ जोडत होतो. कोकणातील जागेच्या भानगडी, चुलात्यांचे त्रास, सलग ३ वर्षात घरातील अगदी जवळच्या माणसांची आजारपणे आणि त्या आजारपणात त्यांचे झालेले मृत्यू, बिघडलेली आर्थिक परिस्थिती …. आणि इतकं सगळं होऊन सुद्धा सगळ्या कडू आठवणी मनात दाबून ठेवून चेहेऱ्यावर त्याचा लवलेशही न दाखवण्याचा मानसिक कणखरपणा बाणावलेला मोऱ्या आपल्या अंतरंगाच्या विस्कटलेल्या रांगोळीचे रंग सारखे करण्याचा प्रयत्न करत होता. तो नुसता बोलत होता आणि मी ऐकत होतो. हो, नाही, बरं … ठीक आहे या व्यतिरिक्त मी तरी काय प्रतिक्रिया देणार. “नंदू …. कुठे हरवलास?” या वाक्याने मी भानावर आलो. ज्यांना ज्यांना मी माझे दुःख सांगतो त्यांचे असेच होते …. म्हणून तर मी माझे रडगाणे कुणालाही सांगत नाही. माझ्या हे रडगाणे ऐकण्या पेक्षा बाबूजींचे भावगीत उत्तम … “मग आज मला सांगण्याची उपरती का झाली??” मी जरा खोचकपणे विचारलं. “तु जवळचा वाटलास … अगदी लहान भावासारखा … इतके दिवस मनाचा कोंडमारा झाला होता. केंव्हापासून तुला या सगळ्या गोष्टी सांगणारच होतो. पण कधी योग आला नाही. आज तुझ्याजवळ जरा मन हलकं झालं.” मध्ये एक आवंढा गिळून मोऱ्या गप्प झाला.

बराच वेळ घेतलेल्या शाब्दिक विश्रामानंतर मोरेश्वर पंतांनी काहीतरी बोलण्यासाठी परत तोंड उघडले. “अरे गेली ८ वर्षे भोगतोय मी हे सगळं दुष्टचक्र. मनावर झालेले जे काही घाव सोसले आहेत ते तुझ्याच काय इतर कुणाच्याही वाट्यास येऊ नयेत” “माझ्या? … साल्या मोऱ्या … चहा पण चढायला लागला की काय?? …. तुला शत्रूला असे म्हणायचे आहे का?” मी जवळ जवळ ओरडलोच. मोऱ्या शरमला….. उगाच वजनदार साहित्यिक वाक्य टाकण्याच्या नादात भलतच काही तरी बडबडलो हे त्याला उमगल्याने त्याने लगेच सारवासारव केली …”तेच ते रे …. आनंदा…. तु भावना समजून घे रे” …. मी मनोमन कपाळावर हात मारून घेतला. “वर्षभर पलंगावर खितपत पडलेल्या आईने अखेरचा श्वास घेतला आणि तिच्या नंतर लगेच सासुबाईना देवाज्ञा झाली. आता मी त्यांच्या एकुलत्या एक कन्येचा एकुलता एक जामात असल्याने त्यांची सगळी नैतिक जबाबदारी माझ्यावरच नाही का??” मी मान डोलावून “हो हो ” म्हटलं. मोऱ्या नुसता कादंबरी छाप वाक्ये बोलत होता. आणि त्या गंभीर प्रसंगात देखील मला हसू येत होतं (मनातल्या मनात). “या दोन माउलींची आजारपण बायकोने तिच्या व्याधी कडे दुर्लक्ष केले. आणि ते दुर्लक्ष तिच्या जीवावर बेतले. माझा सुखी संसार उध्वस्त झाला. नशीब एखादे मुलबाळ सोडून नाही गेली नाहीतर आज आईविना त्या पोराची काय अवस्था झाली असती? त्याला कसं संभाळले असते ते परमेश्वरच जाणे. भरलेलं घर, त्या सोबतच्या असलेल्या सगळ्या गोड आठवणी घेउन गेली ती. ३ – ३ जणींचा आजारपणाचा खर्च पेलला नाही … मग स्वतःचे मालकीचे घर सोडून भाड्याच्या घरात राहायला आलो. पण तिच्या सोबत घालवलेल्या सोनेरी क्षणाच्या आठवणी अश्या सहजा सहजी थोडीच पुसल्या जाणार? कापड कितीही उसवलं तरी काही धाग्यांची वीण सुटता सुटत नाही” मोऱ्या एखादी कादंबरी उघडून त्याच्यातील छापील शब्द बोलत होता असे हळू हळू मला वाटायला लागले. “बरेच दा एकट्याला घर खायला उठतं. भिंती अंगावर धावून येतात असे वाटते. कुठेही कामानिमित्त बाहेर गेलो तरी माझ्या वाटेवर डोळे लावून बसणारं कुणी नाही. चार शब्द म्हणून कुणाशी बोलायचे असे वाटले तर घरात सगळंच निर्जीव …. आताशा सकाळी उठल्यावर चादरीला पडणाऱ्या चुण्या पण रुसून निघून गेलेल्या. थकलोय रे आता या एकटेपणाला.रोजचं बाहेर खाणे जमत नाही …. शेवटी घरच्या साध्या पण प्रेमाने भारलेल्या वरण भाताची गोडी बाहेरच्या पनीर मटरला नाही रे.” हे सांगता सांगता मोऱ्याचे डोळे पाणावले.  मोऱ्या एकदम काकुळतीला येवून बोलत होता आणि त्याची धग हळू हळू मला लागतं होती. “सध्या मराठी साहित्य जास्तच वाचतोस का?” असा खोडसाळ प्रश्न मी ओठांवरच रोखून धरला.

माझ्या इतक्या रात्री जागृत असलेल्या सद्सद्विवेक बुद्धीला अनुसरून मी बाळबोध प्रश्न विचारला “मग पुनर्विवाह का नाही केलास?” (मला ‘परत लग्न का नाही केलंस’ असं विचारायचं होतं बहुधा …. पण पुनर्विवाह हा शब्द म्हणजे मोऱ्याच्या बोलण्याचा इफेक्ट असावा) मी हा प्रश्न विचारणार हे माहित असल्यागत मोऱ्याची एका शब्दात उत्तरला “माझं अर्धवट वय आणि माझी आर्थिक परिस्थिती”. मोऱ्या गप्प झाला …. एखाद्या दिर्घविरामा सारखा. पण त्याच्या डोक्यात काहीतरी विचार चक्र चालू होती. अजून एक सिगारेट शिलगवत मोऱ्याने २-३ जोरकस कश मारले. अचानक मला विचारलं “बायको बघशील माझ्यासाठी?” मी पार उडालोच. मी आणि मोऱ्या साठी बायको शोधणार???? मैत्रीखातर केलेली मोऱ्याची ही विनवणी अजब होती. महिन्यातून एक दोन वेळा घरच्या जेवनाची सोय करू शकलो असतो फार फार तर … पण इथे तर डायरेक्ट बायको. आज काल सोन्याचे अंडे मिळू शकते पण इथे तर मोऱ्याने डायरेक्ट कोंबडीच मागितली. माझ्या चेहेऱ्यावरचे अगम्य भाव बघून मोऱ्या म्हणाला “तुला संकोच वाटत असेल तर राहून दे. पण कुठे असं स्थळ असेल तर लक्षात ठेव. अगदी कुणी पण चालेल … विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता … नाकी डोळी कशीही असली तरी चालेल पण हाती पायी धड असावी. लेकुरवाळी असेल तरी चालेल … मी जबाबदारी घ्यायला तयार आहे.” मोऱ्याच्या अपेक्षांचा नळ गळत होता. मी थोडं अवघडूनच म्हणालो “अरे कठीण नाही पण सोप्पं देखील नाहीये. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारी तुला हवी असलेली व्यक्ती आत्ता तरी माझ्या नजरे समोर नाही.” प्रसंग हलका करण्यासाठी मी त्याला म्हटले “स्त्री नाहीये पण एक पुरुष आहे …. चालणार असेल तर बघ. शब्द टाकतो तुझ्यासाठी. आजकाल अशी लग्न होतात … तु एक तडजोड म्हणून विचार कर. आणि पुढे मुलबाळ पण होणार नाही याची १००% खात्री.” माझा मिश्कील स्वभाव जाणून असल्याने मोऱ्या भडकला नाही. उलट थोडा लाजतच म्हणाला “कशाला थट्टा करताय गरीबाची. अरे, अडलेल्या गर्भार्शिनीला आणि उभ्या असलेल्या खोंडाला उगीच नाडू नये” मी मोऱ्याची उगीच खेचायची म्हणून म्हणालो “खोंड ??? कोण तु?? अंगावरच्या माशा हाकलायची गरज पडली तर शेपटी पण हलणार नाही तुझी. खोंड म्हणे खोंड … अरे धोंड आहेस तु धोंड.” हा संवाद इथेच संपला आणि मोऱ्याला त्याच्या घराखाली उतरवला. जाताना त्याच्या साठी सुशील, सद्वर्तनी सहचारिणी बघण्याचे आर्जव करायला विसरला नाही. आता जेंव्हा जेंव्हा मोऱ्या मला भेटणार होता तेंव्हा तेंव्हा “लग्न” या विषयावरून माझ्या मेंदूला “नग्न” करणार होता.

(क्रमशः)