वाढदिवस

जसे चार चौघांना त्यांचे मित्र सगेसोयरे जसे प्रश्न विचारतात तशीच गत माझी पण होते. माझ्या वाढदिवसाच्या आधी आणि नंतर माझ्यावर प्रश्नांचा भडीमार ठरलेला. दिवसागणिक ओघ जरी कमी कमी होत गेला तरी मुळ गाभा तोच. “मी माझ्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस कसा व्यतीत केला? कुठे गेलेला? काय काय केले? इ. इ.” अर्थात याची उत्तरे पण ठरलेलीच….. साचेबद्ध. आता वयाच्या ३८ व्या वर्षी पेला अर्धा भरला आहे का सरला आहे याचे गणित मांडता मांडता प्रश्नातील अगतिकते बरोबर उत्तरातील उत्साह कमी झाला आहे. कुठेतरी जेवायला गेलो…. धम्माल केली…. बस्स संपला वाढदिवस. कारण अश्या दिवशी काहीतरी वेगळं करणं हे जसं अध्यारूत असतं, किंवा असं काहीतरी घडावं अशी अपेक्षा असते. कारण तो आपल्या आयुष्यातील महत्वपूर्ण दिवस…. अगदी स्पेशल.

हा पूर्वी कॉलेज मध्ये असताना त्यात वेगळेपणा असायचा, नाविन्य असायचे. पण वाढत्या वयाबरोबरच जेंव्हा आपण आपल्या मुलांचे वाढदिवस साजरे करतो तेंव्हा स्वतःच्या वाढदिवसाकडे जरा दूर्लक्षच होतं… नाही का? त्या मुळे सध्या वाढदिवस म्हणजे रोजच्या सारखाच थोडासा वेगळा असलेला दिवस… असा दिवस कि ज्या दिवशी बायको महत्प्रयासाने ठेवणीतील शब्दांचा प्रयोग करणे टाळते, मुलगी केक खायला मिळणार आणि बाबाचा बड्डे म्हणून खुष असते, वडिलांना ४ अनुभवाच्या गोष्टी सांगायच्या असतात तर आईचं एकच पालूपद चालू असतं “एकदा औक्षण करून घे मग कुठे भटकायला जायचय तिथे जा.” त्या मुळे हा दिवस देखील साचेबद्ध झाला आहे. सुट्टी घेतली नसेल तर ऑफिस, तिथे सेलिब्रेशन, आणि घरी आल्यावर केक कापुन सहकुटुंब सहपरिवार एखादे भोजनालय गाठणे. अशी साधारण अळणी बेचव कित्येक वर्षे घासुन गुळगुळीत झालेली रूपरेषा. मग ज्यांना हा दिवस वेगळेपणाने साजरा करता येतो त्यांचा कधी कधी हेवा वाटतो. असो, ठेवीले अनंते तैसेची रहावे हे उत्तम. (नमनालाच किती पाणी वाया गेलं…. तरी बरं सध्या पाणी कपात चालू आहे)

यंदा माझ्याकडे देखिल काहीतरी वेगळं सांगण्या सारखे आहे. असं काही तरी वेगळं की जे फार कमी लोकांनी अनुभवले असेल. माझ्यासाठी अनपेक्षित, अद्भुत आणि अविस्मरणीय तितकाच स्वप्नवत.

माझा जन्म १८ नव्हेंबरचा, बरेच वेळा दिवाळीच्या आसपासचा. त्या मुळे तसंही उत्साहाचे वातावरण असते. दिवाळीच्या रग्गड खरेदीत माझा प्रकटदिन खपून जातो. त्या मुळे कधी कधी दिवाळीचा राग यायचा. कपड्यांचा एकच नविन सेट मिळायचा, दिवाळीसाठी तोच आणि वाढदिवस पण त्याच कपड्यात. असो, तर सांगायचा मुद्दा राहीला बाजुला. या वर्षी माझ्या वडिलांनी आमच्या नागांवच्या घरी श्री मद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले होते. दि. १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत ह. भ. प. श्री. हेर्लेकरशास्त्री (रा. बेळगांव) सुश्राव्य निरूपण करणार होते. आता माझा वाढदिवस या सप्ताहांत येणे हा एक योगायोगच म्हणा. कारण हा सोहळा माझ्या वडिलांनी सत्तरीत पदार्पण केल्याच्या निमित्ताने ठरवला होता. भागवत सप्ताह तसा ७ दिवस चालणारा मोठा सोहळा. रोज ५-५० पान प्रसादाला असायचे. त्या मुळे त्याच्या तयारी साठीची धावपळ २ महिने आधीपासूनच सुरू झाली होती. आम्ही सगळेच सकाळ पासून काही ना काही कामात व्यग्र असणार होतो. वाटलं होतं की या व्यापापुढे विसरून जातील वाढदिवस. बघु काहीच हालचाल दिसली नाही तर संध्याकाळी काहीतरी गोडधोड वाटू खरं तर वाढदिवसापेक्षा त्या दरम्यान होणार्या भागवत श्रवणाचा आनंद तो सुध्दा आपल्या आवडत्या ठिकाणी याचेच मला आणि माझ्या पत्नीला अप्रूप होते. दिवाळी पासूनच आम्ही सगळे नागांवच्या घरी दाखल झालो. दोन्ही बहिणी भाऊबीजेच्या दिवशी पोचल्या. १५ नोव्हेंबरला उरले सुरले पाहुणे आले. १६ नोव्हेंबरला सकाळी भागवत सप्ताहाला सुरूवात झाली. बाहेरच्या कामांसाठी माझी धावपळ चालूच होती. सकाळी संहिता वाचन, दुपारी प्रसाद, संध्याकाळी निरुपण आणि रात्री जेवण असा दिनक्रम होता.

‘तुझ्या क्रुपेने दिन उगवे हा ‘ असं म्हणत एकदाचा “तो” दिवस उजाडला. सकाळी लवकरच उठलो. आई ओट्या जवळ चहा गरम करत होती. मला बघताच तीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बाबा पण तिथेच होते. आई बाबांच्या चरणी मस्तक ठेवले. दोघांनी आशिर्वाद दिले. मग आजुबाजुला जे सगळे होते त्यांनी देखिल हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या. गेले कित्येक वर्षे न चुकता वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी ज्योत्स्ना मावशी तिथेच होती. “असाच मोठा हो, सगळ्या इच्छा पुर्ण होवोत” असं म्हणत प्रेमाने डोक्यावरून हात फिरवला माझ्या. वाढदिवस असला तरी भागवत सप्ताहाची कामे होतीच. मध्येच कुणीतरी भेटून अभिष्टचिंतन देत होते. आणि हे दिवसभर चालणार होतं.त्या दिवशी रविवार होता. बहिणींना सुट्टी नसल्याने त्या १८ ला निघणार होत्या. त्या मुळे भागवत सप्ताहाच्या अंतर्भूत असलेले कामधेनु पुजन त्या दिवशी करायचे ठरले होते. कामधेनु पुजन, वाढदिवस आणि तिथी कपिलाषष्ठी….. कपिलाषष्ठी योग म्हणतात तो हाच.

सवत्स धेनुचे यथासांग पुजन झाले. तिकडे शास्त्रीबुवांचे संहिता वाचन देखिल झाले होते. माझ्या वडिलांनी मला घरात बोलावून घेतलं. माझ्या बरोबर माझी पत्नी आणि कन्या दोघी जणी होत्याच. तिघेजण हेर्लेकरशास्त्रींच्या समोर हात जोडुन उभे राहिलो. वडिलांनी गुरुजींच्या हातात नारळ दिला आणि म्हणाले “आज आमच्या मुलाचा वर्धापन दिन आहे. आपण आशिर्वाद मंत्रांचे पठण करून श्रीफल प्रसाद म्हणून द्यावे” गुरूजींनी हातात अक्षता घेतल्या आणि उपस्थित ३०-३५ लोकांना वाटायला सांगितल्या. “ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः” या आशिर्वाद मंत्राने सुरू झालेले मंत्रोच्चारण जवळ जवळ १५ ते २० मिनीटे चालू होते. प्रत्येक क्षण, प्रत्येक शब्द गुरुजींच्या आणि माझ्या तिर्थरूपांच्या पवित्र वाणीतुन अभिमंत्रित होत होता. बरेचसे आधी ऐकलेले तर काही नवीन मंत्र ऐकताना अंतरात्मा तृप्त होत होता. सगळेच मंत्रमुग्ध झाले होते. गुरूजींचे मंत्र म्हणून झाले आणि बाबांनी “सविता पश्चातात्सविता पुरस्तात्सवितोत्तरात्तात्सविताधरात्तात्। सविता नः सुवतु सर्वतातिं सविता नो रासतां दीर्घमायुः॥” हा आशिर्वाद मंत्र घनाच्या आवर्तनात म्हणायला सुरूवात केली. घनाच्या आवर्तनात कुठलाही मंत्र म्हणायला अतिशय कठिण, त्या साठी अभ्यास आणि सराव दोन्ही आवश्यक असतं. हाच माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण, सुवर्णाक्षरांत न्हायलेला. आपल्या जन्मदात्याच्या मुखातून आपल्या वर्धापन दिनी वेदोक्त मंत्राशिर्वाद मिळणे यापेक्षा अधिक मौल्यवान भेट असू शकत नाही. माझं जीवन खर्या अर्थाने सफल झाले.

मंत्र म्हणून झाल्यावर बाबांनी त्यांच्या हातातील अक्षता आंम्हा तिघांच्या मस्तकावर टाकल्या. जमलेल्या पाहुण्यांनी आमच्या डोक्यावर अक्षता टाकुन वडिलांच्या कृतीचे अनुकरण केले. सगळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. गुरूजींनी हातातील अक्षता आणि श्रीफल माझ्या ओंजळीत दिले. रिवाजानुसार तो मिळालेला प्रसाद मी माझ्या पत्नीच्या ओटीत दिला. आम्ही उभयतां गुरूजींना वंदन केले. उपस्थित सर्व पाहुण्यांनी शुभाशिर्वाद दिले. माझ्या वाढदिवसाचे अचानक कळल्या मुळे सगळ्यांनी भेट म्हणून कॅशच दिली. गेले ३५-४० मिनीटे सरत असलेला प्रत्येक क्षण न क्षण माझ्या साठी अतुलनीय होता.

आता इतक्या छान रित्या माझं कौतुक झालं होतं तर सबके लिए कुछ मिठा तो बनता ही है. नाही का? मी तडक बाम काकांचे दुकान गाठले. ४० कप आईसक्रीम घेवून घरी आलो. दुपारची जेवणं नुकतीच झाली होती. सगळ्यांना आईस्क्रीमचा कप देवुन आश्चर्याचा शीतल धक्का दिला. या मितीला माझे ३७ वाढदिवस होवून गेले पण सगळे थोड्या फार फरकाने एकसुरी होते. १८ नव्हेंबर २०१२ मात्र जमून गेला. भागवत सप्ताह, पाहुण्यांनी दिलेल्या शुभेच्छा, कुटूंबाचे प्रेम आणि गुरूजनांचे मंत्रोक्त शुभाशिर्वाद या पेक्षा वाढदिवस अजुन चांगल्या पध्दतीने साजरा होवू शकतो? असेलही….. पण माझ्या साठी हेच सर्वोत्तम.