शंभरी

Anuvina-Abs100

वर्डप्रेसचं जग खरच अजब आहे. उभ्या आडव्या रेषा, फराटे मारून एखाद्या होतकरू चित्रकाराला असिमांत विशाल असा कैनवास मिळाला तर जो आनंद होईल तोच आनंद या वर्डप्रेस मुळे मला देखिल झाला. माझ्या सारख्या असंख्य शब्द वेड्या मंडळीच्या भावनांना वाट करून देणारे अथांग विश्व म्हणजे हा वर्डप्रेस. या विश्वाचे अंतरंग उलगडून पाहिले तर नवरसांच्या विविध पैलूंचे विधिवत दर्शन होईल. मिसळपाव वरून कधी फिरत फिरत वर्डप्रेस च्या या मराठी भाव विश्वात दाखल झालो ते कळलच नाही. ब्लॉगर हा वर्डप्रेस चा जुळा भाऊ पण सापडला पण वर्डप्रेस जास्त आवडलं. मी काही फार मोठा वाचन वेडा नाही …. अहो जिथे लोक एका रात्रीत किंवा 24 तासात संपूर्ण पुस्तकाचा फडशा पाडतात (आणि तरी भूक भागली नाही अशी वर तकरार पण असतेच.) तिथे एखाद दुसर्या पानाने माझे पोट भरते. पण इथल्या अनुदिनींवर, त्यांच्या विश्वात जीव रमतो. तर अश्या या आकाशगंगे मध्ये मला “अनुविना” नावाचा एखादा तारा गवसेल हे ध्यानी मनी देखिल नव्हतं. ज्या माउलीने मला कायम प्रोत्साहन दिले, मला माझ्या करियर मध्ये अमुल्य मदत केली त्या आदरणीय गणपुले काकुंबद्दल काहीतरी लिहावे असे ठरवून माझी अनुदिनी चालु केली. काहीतरी नविन करत होतो, ज्याची कधी कल्पना देखिल केली नव्हती. आणि असा हा शब्दांचा प्रवास शंभराव्या लेखा पर्यंत येऊन पोचला आहे.

तसा मी बऱ्याच बाबतीत आरंभ शूर असे आमच्या तीर्थरूपांचे मत …. पण शब्द वेगळे म्हणजे “तेरड्याचे रंग तिन दिवस”. नशीब मी फार काही प्रयोग केले नाहीत नाहीतर त्यांनी मला प्रेमाने ए तेरड्या म्हणूनच हाक मारली असती. अर्थात त्यांचेच असे नाही तर माझ्या कुठल्याही नूतन प्रयोगा बद्दल जवळच्या, लांबच्या, अतिदुरच्या (असल्या अनेकार्थी अती असलेल्या सुहृद मित्र परिवाराच्या देखील) सगळ्याच सृजनांच्या मते बघुया किती दिवस हे नाटक (सभ्यपणे सांगायचे झाल्यास थेरं) टिकते ते अश्याच प्रेमळ भावनांनी भारलेला असायचा. त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणण्यात काहीच अर्थ नव्हता कारण सगळेच निदक….. पण खरे हितचिंतक. त्यामुळे हि अनुदिनी चालू केल्याचे आधी कुणालाच सांगितले नाही. आणि जेंव्हा हि अनुदिनी शत-नेत्री झाली तेंव्हा आहाहा काय वर्णाव्या लोकांच्या प्रतिक्रिया …. तूच लिहिलेस सगळे? इथपासून कुठूनतरी उचलले असशील इथपर्यंत आणि माहित नव्हते हे गुण तुझ्यात आहेत इथपासून ते छान लिहितोस इथपर्यंत. इतक्या संमिश्र प्रतिक्रियांचे भाव पटल माझी अनुदिनी वाचलेल्या पाहिलेल्या ओळखीच्या सगळ्याच लोकांच्या चेहेऱ्यावर उमटलेले पाहताना आनंद पोटात माझ्या मायीना अशी अवस्था व्हायची माझी. पण आज त्यांच्या आणि इतर वाचकांच्या प्रेमा मुळेच शंभरी गाठण्याचा योग आला.

सगळ्यांच्या शंका कुशंकाना, पूर्वग्रह यांना नेस्तनाबूत करून लिखाणाचे (टायपिंगचे) काम चालू ठेवले. माझा हुरूप वाढवून माझ्या कडून शब्दांचे रतीब पाडून घेणाऱ्या काही माक्षिकापाती लोकांच्या मुळेच हा प्रथम शतकी योग येत असल्याने त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. 🙂 … तसेच अनुदिनी वाचण्याची सक्ती करून ज्यांना ज्यांना मानसिक त्रास, धक्का, बौद्धिक जाच झाला/दिला असल्यास त्यांची क्षमायाचना करण्यासाठी या पेक्षा वेगळा मुहूर्त शोधून सापडणार नाही.

दिसामाजी काहीतरी टायपावे या उदात्त हेतूने रोज काही न काही विचार इथे उमटायला लागले. वाचकांची वाढणारी संख्या … आपण लिहिलेले शब्द कुणीतरी आवर्जून वाचत आहे हि कल्पनाच निश्चितच सुखावणारी होती. मग सुरु झाली धडपड … आपले लिखाण अजून जास्तीतजास्त लोकां पर्यंत पोचवण्याची. त्यात या वर्डप्रेस ने “इथे लिहा … तिकडे दिसेल” अशी sharing ची सुविधा उपलब्ध करून दिल्या मुळे फेसबुक वरच्या वेगवेगळ्या समुहा मध्ये लेख दिसतील असा बंदोबस्त केला. माझ्या या अट्टाहासा मुळे काही ग्रुप वरून माझी गच्छंती झाली तो भाग वेगळा. ;). या रोज काहीतरी लिहून लोकांच्या गळी उतरवण्याच्या प्रकारात शेवटी शेवटी मलाच माझ्या वाचकांची दया वाटायला लागली आणि मी हे अत्याचार कमी करायचे ठरवले.

वजन कमी करायला जिम मध्ये आलेला माणसाचा आवेश पहिले काही दिवस एकदम दांडगा असतो आणि नंतर अंगातल्या स्नायूंनी बासरी वाजवायला सुरुवात केली कि वजन कमी करण्याच्या विचारांना ओहोटी लागायला लागते. काही जण प्रयत्न सोडून देतात तर काही आज थोडं उद्या थोडं असे करत आशेच्या हिंदोळ्यांवर झुलत राहतात. अनुभवाशिवाय परिपक्वता येत नाही असे म्हणतात ते असे. तद्वत शब्दांचे (आणि वाचकांचे) लचके तोडण्याची भूक हळू हळू कमी होत होत शेवटी माझ्या प्रतिभेला संतृप्तावस्था प्राप्त झाली. त्यामुळे अनुदिनीवर लेख प्रकाशित होण्याच्या कालावधी मध्ये अंतर पडू लागले. ते इतके कि जिथे दर दोन दिवसात एकदा अत्याचार व्हायचा तो चक्क आठवड्याला एकदा … कधी कधी महिन्याला एकदा असे झाल्याने वाचकांना श्वास सोडायला उसंत मिळू लागली. मी लिखाण बंद केले कि काय अशी शंका येऊन उन्मादाच्या भरात काही जणांनी माझ्या या ओघवत्या (ओघळत्या) छंदाची चौकशी देखील केली. पण अश्या मायबाप वाचकांचा निरास होवू नये याची योग्यती खबरदारी घेतल्याची जाणीव त्यांना माझ्या अनुदिनीवर करून दिली. त्यांच्या या काळजी मुळेच या स्टोन ला हा माईलस्टोन गाठता आला त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे.