वटसावित्री

(तात्या अभ्यंकर यांच्या फेबू. भिंती वरून डायरेक्ट अनुविना वर)

जी बाई ‘जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे’ असं म्हणते ती वटसावित्री,

आणि जी बाई एकाच जन्मात ७ नवरे करते ती चा-वट सावित्री… :))

महिला दिन – पुरुष ‘दीन’

कवी: रणजित पराडकर

मूळलेखन: http://www.ranjeetparadkar.com/2011/03/blog-post_08.html

——————————————————————————————————–

जागतिक महिला दिनाचं ठिक आहे हो..
अगतिक पुरुषांचं काय?

म्हणे, महिलांवर अत्याचार होतो..!
च्यायला, हे बरं आहे..
आम्ही केला तो अत्याचार
तुम्ही केला तो चमत्कार?

अहो, कंटाळा आलाय मला ह्या जगण्याचा
रोज घाबरत घरात शिरण्याचा
“आज काय झालं असेल ?
कामवाली आली नसेल?
की शेजारीण भांडली असेल..?
माझ्याशी नीट वागेल ना?
उखडलेली नसेल ना?”

आता होतं कधी कधी माणसाकडून
कामाच्या व्यापात जातो काही विसरून
दिवसभरात फोन केला नाही
म्हणून इतकं का चिडायचं?
“तुझं माझ्यावर प्रेम नाही” म्हणून
डोळ्यात पाणी आणायचं?
फारच अवघड काम आहे
लग्न करणंच हराम आहे

बारा तास ऑफिसात सडल्यानंतर
थोडा विरंगुळा लागतो
कधी एखादी मॅच
कधी एक्शन सिनेमा असतो
पण रोज हिची कोणती तरी
फालतू सीरियल असते
ब्रेकमध्येसुद्धा चॅनल बदलायला
मला मनाई असते

ऑफिस मध्ये बॉस बसू देत नाही
घरी आल्यावर ही झोपू देत नाही
जरा डोळा लागायचा अवकाश
कर्कश्श घोरायाला लागते
जागं करून सांगितलं तर–
“मी कुठे घोरते…!!”
डोक्याखालची उशी मी
कानावरती घेतो
मलाच माहीत कसा मी
झोपेत गुदमरतो!!

तरी अजून तुम्हाला
भांडणांचं सांगितलं नाही
कटकट, भुणभुण करण्यासाठी
कारणही लागत नाही..!
“चादरीची घडी केली नाही..
पेपर उचलून ठेवला नाही..
पंखा बंद केला नाही..
दूधवाला आला नाही..(??)
माझ्या भावाने याँव केलं
माझ्या “जीज्जू”ने त्याँव केलं
माझंच असलं नशीब फुटकं
वाट्यास आलंय ध्यान मेलं..!!”

वीकेंडलाच घेतो मी
एखाद-दोन पेग
त्याच्यावरून हिची
आदळआपट.. फेकाफेक..
मोठेमोठे डोळे तिचे
आणखी मोठे करते
माझ्या अख्ख्या खानदानाचा
उगाच उद्धार करते!
तरी मी बिचारा सगळं सहन करतो
प्रत्येक अपमान पचवतो अन् तोंड बंद ठेवतो..

आजकाल मला प्रत्येक पुरुष दीनवाणा दिसतो
‘बायको’ नावाच्या भुताने पछाडलेला वाटतो !!
आणि तुम्ही म्हणता
महिलांवर अत्याचार होतो..?

च्यायला, हे बरं आहे!!

मुंबईची लोकल आणि नव वर्षाचे सेलिब्रेशन

मुंबईतील लोकल ट्रेनशी लागेबांधे नसलेला सामान्य माणूस शोधून पण सापडणार नाही. नोकरी धंद्या निमित्त ट्रेन ने प्रवास करणारा चाकरमानी, ट्रेन मधील गर्दीला शिव्या घालत घालत त्या गर्दी मध्ये कधी मिसळून जातो ते त्यालाच कळत नाही. आणि एकदा का इच्छित ट्रेन मिळाली की चेहेऱ्यावर जे समाधान मिळते त्याची तुलना केवळ ……… कशाशीच होवू शकत नाही ;). अव्याहत आणि अविरत धावत असणारी ही लोकल सगळ्या उपनगरांना या मायानगरीशी जोडणारी एक दैवी देणगी आहे. इथे खच्चून भरलेल्या लोकल ट्रेन मध्ये सामान्य मुंबईकर दिवसातील २-३ तास घालवतात. त्यामुळे लोकलचा डब्बा म्हणजे एक प्रती विश्वच आहे.

इथे काय नाही मिळत?? ….. फुकटच्या सल्ल्या पासून ते जीवाभावाच्या मैत्री पर्यंत …. सगळं मिळतं. जिथे पाय ठेवायला जागा नसते तिथे भजनी मंडळ, रमी क्लब, हौशी कलाकार गुण्यागोविंदाने नांदत असतात. हळदी कुंकू (अर्थात बायकांच्या डब्यात), सत्यनारायणाची पूजा, दिवाळी, होळी, गुढीपाडवा असे सगळे सण झाडून साजरे केले जातात. पण हे सगळं सहप्रवाश्यांच्या सोयी नुसार. सणाच्या दिवशी सुट्टी असल्याने बरेच सण आदल्या दिवशीच साजरे केले जातात. कारण रोज ट्रेन पकडायची कसरत सुट्टीच्या दिवशी कोण करत बसतंय.

भल्या पहाटे कधीतरी कर्जत वरून सुटणारी एक ट्रेन डोंबिवलीला सकाळी ८:०३ ला येते. म्हणजे ते तिचे वेळापत्रकातील टाईम असले तरी त्या टायमाला जर चुकून कधी तरी आली तर …. जाऊंदे उगाच कशाला स्वप्न बघा. अर्थात कर्जत वरून येत असल्यामुळे आणि अंबरनाथ बदलापूर येथे प्रचंड प्रमाणात लोकसंख्या वाढ झाली असल्याने या लोकलला दुथडी भरून गर्दी असते. त्यामुळे कधी त्या गाडीत चढायला मिळतं तर कधी खाली उभं राहूनच दुसऱ्या गाडीची वाट बघावी लागते. तर या गाडी मध्ये जिवाभावाचे काही मित्र मिळाले. नवीन वर्षाच्या निमित्ताने आमच्या ट्रेन मधील या “चुलबुल मित्र मंडळ” ने अमावास्येलाच म्हणजे २२ मार्चलाच पाडवा साजरा करायचे ठरवले. २१ ला गाडी पकडता न आल्यामुळे प्रशांत ने खिडकीतून ओरडूनच सांगितले “काहीही करून उद्या गाडीत ये …. पाडवा सेलिब्रेशन करायचंय”. आम्हाला गाडीत चढायला मिळेल याचीच शाश्वती नसते तर “काही आणू का?” हे विचारणं मूर्खपणाच ठरला असता.

आज सकाळी नेहेमीची कसरत करत कसाबसा ट्रेन मध्ये चढलो. याच ग्रुप मधला डोंबिवलीचा गौरव जावळेकर आधीच चढला …. मोठा इरसाल गडी. चपळाईने दोनचार डबे आधी उभारतो आणि चालत्या गाडीत चढतो. नितीन संत चा पत्ताच नव्हता. चढायला तर मिळालं …. आता घाई होती ग्रुप पर्यंत पोहोचण्याची. ठाण्याला आत जायचा योग आला …. नाहीतर डोंबिवली ते ठाणे दरवाज्यात लटकतच होतो. ठाणे स्टेशनला गाडी टेकली आणि मी आजूबाजूच्या चारचौघांना रेटा मारत ग्रुप पर्यंत पोहोचलो. आज झाडून सगळे आजी-माजी सभासद आले होते. बघितलं तर यांचे पेय-पान चालू होते. मनात विचार आला …. चायला याचं सगळं संपलं की काय? .. आणि काय आश्चर्य … नितीन संत ठाण्यात चढला. हे महाशय डोंबिवलीत चढता येणार नाही म्हणून आधीच्या गाडीने ठाण्याला आले आणि ठाण्याला आम्हाला सामील झाले. काय जबरदस्त इच्छाशक्ती आहे या माणसाची. जे नेहेमी ठाण्याला उतरतात आज ते पण दादर पर्यंत येणार होते. तर ठाण्याला आमचा ग्रुप पूर्ण झाला.  And the party begins.

आम्ही डोंबिवली नंतर चढलेल्या ३ जणांना आमच्या मित्रांनी लगेच बसायला जागा दिली. त्यांनी आणलेल्या पेपर डिश मध्ये इडली चटणी काढून दिली. कल्याणच्या अजय डोरले नी आणलेली इडली अप्रतिम होती. प्रशांत म्हणत होता …. “हे काहीच नाही अजून खायचंय” असं म्हणत त्याने मस्त जिलेबी दिली खायला. जलेबी संपली तर गुलाबजाम वाट बघताच होते. असा शाही फराळ झाल्यावर कोल्ड्रिंक प्यायलं. अधून मधून फोटो काढणे चालूच होते. इतक्या गर्दीत देखील सगळ्यांना सांभाळून … इतरांना त्रास न देता आमचं पाडवा सेलिब्रेशन चालू होतं. कचरा इतस्ततः न टाकता आणलेल्या पिशव्यांमध्ये नीट भरून ठेवला. सगळा हिशोब करून सगळ्यांकडून पैसे जमा केले गेले. हे सगळं करे पर्यंत दादर आलं. दादर स्टेशनच्या बाहेर अजून एक ग्रुप फोटोसेशन झालं. एकमेकांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन प्रत्येक जण आपापल्या कामाच्या ठिकाणी रवाना झाला.

उद्या कदाचित गाडीची वेळ बदलेल. नोकरीचे ठिकाण बदलेल. आत्ता जे होते ते उद्या काही कारणास्तव असतीलच हे सांगता येणार नाही. पण अवघ्या ४० रुपयांमध्ये साजरा केलेला चुलबुल ग्रुपचा पाडवा कायमच लक्षात राहील हे मात्र नक्की.

चुलबुल ग्रुपची मित्र मंडळी:

आनंद भातखंडे, प्रशांत इंगळे, सतीश सरोदे (चुलबुल पांडे), प्रसाद राजे, सतीश पुजारी, सुधीर पंडित, नीरज महेश्वरी, विजय जाधव, नितीन संत, गौरव जावळेकर, विवेक, अजित गुंजाळ, सचिन टिचकुले, हरेश तुपे (छोटा रिचार्ज), अजय डोरले, काका (वांगणी)

लोकल ट्रेन मधील बऱ्याच गमती जमाती लिहायच्या आहेत … पण ते परत कधी तरी.