गाडीतल्या गप्पा

मी जरा लवकरच म्हणजे २:४५ ला चक्क हाफ डे घेऊन निघालो. विचार केलं ३:३० च्या आसपास कुठली तरी फास्ट लोकल मिळेल. आशेला नेहेमीच अपेक्षांचे पंख असतात नाही का? ऑफिस लोअर परळ येथे असल्याने दादरच्या गर्दीचा ससेमिरा चुकवण्यासाठी भायखळापर्यंत जाणे परवडते. बरं, भायखळ्याला गेलं की गाडीत चढायला मिळणार हे नक्की. ती शाश्वती दादरला उभे असणारे टीसी देखील देऊ शकणार नाहीत. बऱ्यापैकी वेळ असल्या मुळे रमत गमत भायखळा स्टेशन वर पोचलो. नवरात्रीचे दिवस, रिकामा प्लाटफॉर्म, त्यामानाने खुपच कमी गर्दी होती. पुरुषांच्या प्रथम वर्गाच्या डब्याच्या इथे तर आम्ही मोजून २-३ जण पण स्त्रियांच्या डब्याजवळ गर्दी फार होती. नवरात्रीचे कुलधर्म कुलाचार काय कमी असतात आणि त्याचा भार घरातल्या स्त्रीवरच अधिक. आज त्यातीलच एखादा महत्वाचा दिवस असेल म्हणून गर्दी असावी असा विचार करून मी गाडीची वाट बघायला लागलो.

तितक्यात धावत पळत एक बाई माझ्या बाजूला येऊन उभी राहिली. बघितलं तर ती फोन वर बोलत होती “अगं कुठे आहेस तू? त्याझ्यासाठी मी नरीमन पोईंट वरून पोचले देखील (नरीमन पोईंट ते भायखळा?? कम्माल आहे या बायकांची) आणि तुझं पत्ताच नाही. गर्दी तर पुष्कळ आहे. ये लवकर …. बसायला नाही तर निदान नीट उभं राहायला तरी मिळेल.” तिच्या मागूनच आवाज आला. “अगं पोचलेच मी” ही ‘अगं’ जर मागेच उभी होती तर हे फोन वर का सांगत होती ….अगम्य होतं हे संभाषण. ;). “तू पण ना….अशी कशी नाही येणार? एकदा सांगितलं मी येते म्हणजे येते. तुझं ऑफिस बदलल्या पासून भेटच नाही बघ आपली. कल्याणलाच राहतेस ना?” त्या ‘अगं’ ने येताच सरबत्तीला सुरुवात. “अगं नाही गं … मी म्हटलं येतेस की नाही. भेटायचं ठरलं तर आहे. पण तुला जमलं पाहिजे ना?” ती म्हणाली. मग ही संवादाची गाडी ‘ही भेटते का गं?’ ‘ती भेटते का गं?’ ‘तिचं बरं चालू आहे ना?’ इथून सुरु होऊन ‘ऑफिस आणि ऑफिस मधले सहकारी, त्यांचे गोसीप’ अशी स्टेशन घेत घेत शेवटी नवरात्र, नवरात्रीचे रंग, त्याच रंगाचे ड्रेस, साड्या, मग  घर आणि एकंदरीत होणारी दग दग इथे येऊन थांबणार हे काही वेगळे सांगायला नको. देवाने दिलेला ओठ नावाचा अवयव हा मनातले, पोटात खोल दडून बसलेले शब्द बाहेर फेकण्यासाठीच दिलेले असल्याने (अर्थात निव्वळ ओठांसाठी म्हणून जी नेमून दिलेली कामे आहेत ती यांच्या बाबतीत तितकीशी महत्वाची नसतात.) जेंव्हा असे अधीर झालेले कमीत कमी ४ ओठ जमतात तेंव्हा अद्भूत अशी शब्दांची रंगपंचमी बघावयास मिळते. कधी कधी अश्या ओठांचा मेळावाच भरला तर शिमगोत्सव सुद्धा होतो. ज्यांना हे जमत नाही ते उगीच अश्या मेळाव्यांना ‘कलकलाट’ ‘किलबिलाट’ ‘बडबड’ अशी निरर्थक नावे ठेवतात.

दोघींचे वय असेल साधारण ४०-४५ च्या आसपास. दोघी टिपिकल माध्यम वर्गीय नोकरदार स्त्रिया. अर्थात आमचे वर्गीकरण पण अश्याच मध्यमवर्गीयात होत असल्याने नोकरीवर स्वार होऊन घरच्या जबाबदारीचा तारू संभाळणे म्हणजे निव्वळ तर्वाराची कसरत याची जाण आहे. आधाराची काठी भक्कम असेल तर ठीक नाहीतर ही कसरत करताना अश्या स्त्रियांचे पाय लटपटायला लागतात. असो, तर नेहेमी प्रमाणे मध्यरेल्वेने आपला आब राखत गाडी वेळेत न आणण्याचा शिरस्ता कायम ठेवला. त्यामुळे गाडीला झालेला उशीर आणि वाढणारी गर्दी बघून या दोघींची घालमेल सुरु झाली. गाडी आली आणि मी सवयीने धावतच गाडी पकडली. कितीही स्टेशन रिकामे असले आणि गाडी पूर्ण रिकामी आहे हे आधी माहीत जरी असले तरी आम्ही धावतच गाडी पकडणार. गडी नुसती उभी असेल तर कदाचित आम्हाला चढताच येणार नाही ….सवयीचा परिणाम. तर मी धावत गाडीत चढलो आणि आत बसायलाच काय तर झोपायला पण मुबलक जागा होती. खिडकीजवळ ठाण मांडले आणि ४५ मिनिटांचा अलार्म लावून मस्त झोप काढावी. ;).

गाडी ने भोंगा दिला आणि आणि इतक्यात पाठच्या लेडीज डब्ब्यामध्ये गलका ऐकू आला. बघितलं तर मगाचच्या या दोन साळकाया माळकाया लेडीज मध्ये गर्दी होती म्हणून गडबडीने जेन्ट्स मध्ये चढल्या होत्या. तश्या ती आणि तिची ‘अगं’ माझ्या समोरच्या रिकाम्या बाकड्यावर बसल्या.
“काय नै बै … कित्ती ती गर्दी त्या लेडीज मध्ये आणि हा जेन्ट्स बघ रिक्कामा आहे. मेले लेडीज डब्बे वाढवणार कधी कोण जाणे?” ती म्हणाली.
त्यावर ‘अगं’ चे विचार “नशीब वेळेतच चढलो. कित्ती रिस्क आहे असं चढायचं म्हणजे. मी कधीच अशी चढत नाही. जर सेकंद इकडे तिकडे झाला आणि पाय निसटला की किती महागात पडेल नै? परत नाही बै मी अशी चढणार चालत्या गाडीत.”
कित्ती रिस्क??? हे सगळं गाडीत चढल्यावर निवांत जागा मिळाल्यावर आठवतं. आता या इतक्या दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणी म्हणजे गप्पांचा चांगलाच फड जमणार आणि माझे झोप घेण्याचे दिवा स्वप्न त्या फडात उध्वस्त होणार. मी मोबाईल काढला आणि त्याच्याशी चाळे करण्यात मग्न झालो पण कान मात्र अर्थातच त्यांच्या गप्पांकडे लागले होते. आज बऱ्याच दिवसांनी ते ही नवरात्रात दोन देव्यांकडून याची देहि याची डोळा पुराण ऐकायला मिळणार होतं. 😉

धावपळीत चालत्या गाडीत चढल्यामुळे श्वासाचा मेळ लागे पर्यंत तोंडाला जरा आराम होता त्यामुळे थोडा वेळ असाच शांततेत गेला. नाहीतर इतके दिवसांनी भेटलेल्या या मैत्रिणी गप्प थोडीच बसणार? तसंही स्त्रियांसाठी ओठांचा वापर मुख्यत्वेकरून दोनच क्रियांसाठी, एक म्हणजे चित्र विचित्र रंग फासण्यासाठी आणि दुसरा अतीमहत्वाचा म्हणजे सक्शन पंपाप्रमाणे पोटातले, मनातले सगळे शब्द, वाक्य, परिच्छेद खेचून खेचून त्यांचे उत्सर्जन करायचे. असे हे उत्सर्जन कार्य अविरत चालू असते. रेल्वेतली शांतता सहन न होऊन शेवटी अगं ने वाचा फोडली.
अगं: “सध्या कशी काय लवकर जातेस घरी?”
ती: “अगं नवरात्र चालू आहे ना. घरातलं सगळं बघावं लागतं. त्यात आमच्या कडे कुळधर्म कुळाचार भरपूर. आणि नवरात्रात तर जास्तच. घट बसतो ना घरी. रोज नैवेद्य, आरती, झेंडूची माळ ….. काही विचारू नकोस. नोकरी सांभाळून हे सगळं करणं म्हणजे दिव्य आहे बाई. ते जाऊन दे, तू कशी काय लवकर?”
अगं च्या मानाने ती जरा जास्त बोलघेवडी होती. तिचा संवाद सुद्धा साभिनय होता. बोलताना हातवारे करत हस्तलालित्य दाखवण्याची वेगळीच लकब होती. नशीब डोळे वगैरे हलवत नव्हती नाहीतर बोलताना देखील भरतनाट्यम् करते की काय असं वाटलं असतं. बरं जेंव्हा बोलत नसेल तेंव्हा हातानी बांगड्यांशी चाळे करणे किंवा वाऱ्यामुळे पुढे येणारे केसांचे सव्यापसव्य करणे हे प्रकार चालूच होते. अगं मात्र बरीच शांत होती. मुद्द्याचेच बोलणे ते सुद्धा तोलून मापून. कदाचित तिच्या मुळे अगं ला बोलायला संधीपण मिळत नसावी.
अगं: “सासूबाईंनी उद्या कुमारिका आणि सवाष्ण जेवायला सांगितली आहेत. त्यांची सगळी तयारी करायची आहे. मी स्पष्ट सांगितलं मी फार फार तर दीड दिवस सुट्टी घेऊ शकते त्यात काय ते करून घ्या. तुला बरं रोज लवकर जायला मिळते? बॉसने बरी परवानगी दिली?”
ती: “अगं, तो काय नाही देणार? काय बिशाद आहे त्याची? थोडी लवकर जाते रोजची कामं पूर्ण करते आणि निघते. आज सहज तुला फोन केला तर तू निघतंच होतीस. म्हटलं बरेच दिवसात काही गाठ नाही निदान प्रवासाच्या निमित्ताने तरी भेटू. नाहीतर सध्या कंपनी बदलल्यामुळे भेटच होत नाही.”
अगं: “पण आता तर तुझी मुलं मोठी झाली असतील आणि मोठी मुलगी तर हाताशी आली असेल ना? नवरे कंपनी कडून काही विशेष अपेक्षा नसतात म्हणा”
ती: “अगं, कसलं काय? नवर्याची होते थोडी मदत पण मुलांची काही विशेष होत नाही. आपलीच चूक म्हणा. अभ्यास करावा, खूप शिकावं म्हणून कधीच इकडचं भांड तिकडे करू दिलं नाही, कामाची सवय लावली नाही आणि आता तेच नडतय.”
अगं: “तुझ्या सासुबाई आहेत ना? त्यांची काहीतरी मदत होत असेलच की?”
बराच वेळ तिच्या कडून काहीच प्रतिक्रिया आली नाही म्हणून मी मोबाईल मधून लक्ष काढून हळूच वर बघितलं ता ती बया डोळ्यांना रुमाल लावून मुसुमुसु रडत होती. इतकी हळुवार की पटकन वाटावं रुमालाने गालाच्यावर आणि नाकाच्या बाजूला काहीतरी साफ करत आहे. ;). ती रडत आहे हे अगं च्या ध्यानात आलं. एका वाक्याने इतकं रडायला काय झालं असे भाव अगं च्या फेशियल वर दिसत होते.

अगं: “काय गं मिनू काय झालं असं एकदम डोळे भरून यायला? सासू त्रास देते का? मेल्या या सासवांचा जन्मच मुळी सुनांना त्रास देण्यासाठी झालेला असतो.”
मिनू अजून डोळ्याला रुमाल लावून डोके हलवून नाही नाही करत होती. अगंचे कुतूहल काही सहमत नव्हते. तिने अजून एक क्ल्यू विचारला.
अगं: “नवरा त्रास देतो का मुलं त्रास देतात? आपल्या बायकांचा जन्मच मुळी गप्प बसून सहन करण्या साठी असतो. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. काही तरी बोल नुसती अशी रडू नकोस.” आणि दबक्या आवाजात “सगळे बघत आहेत आपल्याकडे.”
परत मिनू नाही नाही करत होती. एकदाचा मिनुने हुंदका आवरला. डोळ्यांवरचा रुमाल बाजूला काढला. क्षणभर वाटलं की ही बाई रडतच नव्हती. नुसती उसासे भरत होती.
मिनू: “मनु, अगं २ महिन्यांपूर्वीच त्या अचानक गेल्या. अगदी ध्यानीमनी नसताना.”  (वाह … मैत्रिणींची जोडी देखील झक्कास होती. एक मिनू …म्हणजे कदाचित मिनल असावी आणि दुसरी मनु म्हणजे मानसी किंवा मनीषा…..असो, आपल्याला काय करायचंय? गप्पा ऐका.) “रोज सकाळी त्या त्यांचं त्यांचं आवरतात आणि मी माझी ऑफिसची तयारी करत असते.  मला चहा देऊन त्या देवपूजेला बसत असत. एके दिवशी अशीच माझी तयारी चालू होती आणि त्या देवासमोर पोथी वाचत बसल्या होत्या. मी घराबाहेर पडण्याआधी देवाला आणि त्यांना नमस्कार करण्यासाठी गेले आणि बघते तर काय? त्या बसलेल्या अवस्थेतच समोर पोथीवर डोकं टेकलं होतं. मला वाटलं नमस्कार करत असतील म्हणून मी ही थांबले पण ५ मिनिटे काहीच हालचाल दिसली नाही. हे नुकतेच स्टेशनला पोहोचत होते. त्यांना कळवले आणि ते येताना डॉक्टरांनी घेऊनच आले. तो पर्यंत मी आणि मुलांनी त्यांना नीट झोपवले. तेंव्हा पण काहीच हालचाल जाणवली नाही. डॉक्टरांनी थोडसं तपासलं आणि म्हणाले “Sorry, She is no more. Massive Cardiac Arrest”. त्यांना कसलाच त्रास नव्हता की कसलंच व्यसन नव्हतं.” (मी मनातल्या मनात ‘बाईला व्यसन??’) “साधा डायबेटीस किंवा बिपीचा पण नाही …कधी सर्दी पडसे व्यतिरिक्त औषधं पण नाहीत. एकदम खुटखुटीत होत्या सासुबाई. असं विचारलं तर डॉक्टर म्हणाले हे असं कुणाबरोबरही होऊ शकतं. काय नै बै …. बसलेली धडधाकट बाई त्या कार्डीयाक अरेस्ट नी कायमची आडवी?? एकदम निपचित पडल्या होत्या. खरंच भाग्यवान गं…महाराजांची पोथी वाचता वाचता कुडी रिकामी झाली. जणू महाराजांनीच बोलावून घेतलं.”

या दरम्यान तिच्या बाजूला बसलेल्या मनीला ‘हो का?’ ‘अरे बाप रे’ ‘चक् चक्’ ‘आई गं’ या व्यतिरिक्त कुठलीही प्रतिक्रिया द्यायला मिनूने चान्सच ठेवला नव्हता. आणि मी त्यांचे ते कारुण्य रसाने ओतप्रोत भरलेले संभाषण ऐकत होतो.

मनी: “किती भाग्यवान गं तुझ्या सासुबाई …. आणि तू पण”
मिनू: “मी कशी गं?” (कसला बाळबोध आणि अडगळीतला प्रश्न)
मनी: “अगं बघ ना एवढे वय झाले तरी आजारपण नाही की कसली कटकट नाही. नाहीतर या म्हाताऱ्या माणसांचे आजारपण म्हणजे कित्ती अडकायला होतं. एक पाय हॉस्पिटल मध्ये तर एक घरात. त्यात सासू सासरे दोघेही आजारी असतील तर बघायला नको. एकाला बाम फासला की दुसऱ्याला शेक देण्याची वेळ येते. (मी मनोमनी: चायला फासला?? यांनी तोंडाला पावडर लावायची आणि इतरांसाठी बाम फासायचा? यांनाच धुरी देण्याची वेळ आलेली आहे. ;)) कधी कुठे जाता येत नाही….काही करायची सोय नाही. आणि मोठं माणूस आजारी असताना आपल्या आजाराची चिंता, काळजी आहे कुणाला? मी सुटले बाई २ वर्षांपूर्वी या सगळ्यातून. तसा नाही पण असा सासुरवास भोगून झालाय गं”

मनी फुल टू सुटली होती. स्वानुभव असावा कदाचित. इतके दिवस दाबून ठेवलेलं ओसंडून बाहेर पडत होतं. आता वाटलं की या दोघींकडून उखाळ्या पाखाळ्या चालू होणार आणि तेव्हढीच प्रवासातील करमणूक. पण एकी कडे मन मात्र विषण्ण होत होतं…घरात एखादा असाध्य किंवा जटिल रोग जडलेली किंवा वार्धक्याने गांजलेली व्यक्ती असेल तर कालांतराने त्या आजारपणाला त्याच्या जवळची मंडळी कंटाळतात. पण त्याच वेळी त्या व्यक्तीला या आजारपणाचा, यातनांचा  आणि आपल्यामुळे इतरांना होणाऱ्या त्रासाचा किती वैताग आला असेल याचा आपण विचारच करत नाही. जाऊंदे …या सासवा सुनांच्या जगाचा मागोवा घेणे खरंच कठीण आहे.

मिनू लगेच फणकाऱ्याने म्हणाली (…आणि ती जे काही बोलली ते ऐकून मला फार म्हणजे फार म्हणजे फारच आश्चर्य वाटले.) “छे गं…. मला कधीच माझ्या सासूचा सासुरवास झाला नाही. उलट आमचे नाते दोन चांगल्या मैत्रिणीं सारखे होते. त्यांना मुलींची हौस होती पण दोन्ही मुलगेच झाले. मुलगी झाली पण जास्त जगली नाही. त्यांनी माझ्यात मुलीला पहिले आणि माझ्या नजरेत त्या सासूच्या ‘आई’ कधी झाल्या तेच कळलं नाही. दर वेळी मला त्यांनी खूप सांभाळून घेतले. अगदी रोजच्या कामांपासून ते कधी तरी येणाऱ्या रीतीभाती पर्यंत. मुलं झाल्यावर नोकरी सोडणार होते पण त्याच म्हणाल्या नोकरी सोडू नकोस. चार पैसे जमवून ठेव अडी अडचणीला उपयोगात येतात. चांगली शिकली सावरली आहेस तर आर्थिकदृष्ट्या विसंबून असू नये. त्यांनी पण काही वर्षे नोकरी केली होती म्हणे. नेहेमी नौवारी नेसायच्या. कामाच्या ठिकाणी पाचवारी साडी नेसण्याची सक्ती झाली म्हणून नोकरी सोडून दिली. खूप काळजी घ्यायच्या सगळ्यांची. नातेवाईकांमध्ये पण खूप आवडत्या होत्या. खूप माणसे जमवली होती जुळवली होती. देवाधर्माचं पण खूप करायच्या. मला तर सगळा स्वयंपाक त्यांनीच शिकवला.”

मनी लगेच म्हणाली “खरंच पुण्य लागतं गं बाई असं सासर मिळायला. आता माझं कुठे आलंय इतकं पुण्य?”
मनी पुढे काही बोलणार इतक्यात मिनू म्हणाली “खरं तर त्याच मुळे आता सगळा प्रॉब्लेम झाला आहे. २-३ महिने झाले त्यांना जाऊन पण अजून घर सावरलेलं नाही. मुलांना तर माझ्यापेक्षा आजीचीच सवय अधिक. सणवार, कुळाचार त्याच बघत होत्या. मला कधीच त्याची तोशिष पडली नाही. आणि आता त्याचाच सगळा गोंधळ उडतोय. अगं नवरात्रीच्या झेंडूच्या माळेत ९ फुलं की १० तेच कळत नव्हतं. त्या गेल्यामुळे आमच्या घरात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जणू संसाराचा गाडाच फिरायचा थांबलाय. त्यांच्या नसण्याची सवय व्हायला पण बराच काळ जाणार हे निश्चित. पण मला नेहेमी वाटतं, जाणवतं की त्या माझ्या बरोबर आहेत कायम माझ्या मदतीला. आणि मला मार्गदर्शन करत आहेत.” मिनूला हुंदका अनावर झाला आणि तिने डोळ्याला रुमाल लावला.

जिथे सासू सुनेचा ३६ चा आकडा असतो असं वाचलं आणि थोडं फार अनुभवलं होतं. एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचा छळ करते ई. ई. तिथे मिनूचं सासुपुराण माझ्यासाठी नवीनच होतं. यांचं काहीतरी वेगळंच होतं असं म्हणत सासवा सुनांनी गुण्यागोविंदाने रहाणे अगदीच अशक्य नाहीये असा सिंद्धांत मांडण्यासाठीची तोंडी पावतीच होती. एकदा मनात एक भयानक विचार देखील आला की या पुण्यवान स्त्रीची पायधूळ आपल्या घराला लागावी, बायको करवी तिची खणानारळाने ओटी भरावी. पण क्षणभरातच मी माझे कलुषित होऊ पाहणारे मन परत मूळ पदावर आणले. आणि म्हटले जे आहे तेच उत्तम आहे, अश्या गोष्टी जास्त दिवस सोसत नाहीत. रोज गोडधोड जेवण कसं जमेल? सगळं कसं संमिश्र असावं. कडू, गोड, तिखट वगैरे.

डोळ्यावरचा रुमाल बाजूला झाला. हुंदका आवरला. आणि आता मनु तिची कर्मकहाणी सांगायला लागली. आता इतकं सगळं चांगलं चांगलं ऐकून झाल्यावर काहीतरी बेसूर ऐकायची अजिबात इच्छा नसल्याने तिथून उठून दरवाज्यात वारा खात उभा राहिलो. मस्त वाऱ्यावर मन आणि मनातले विचार भरारी मारत होते. किंचित हेवा वाटला तिचा पण नंतर लगेच तिच्या सोन्यासारख्या संसाराला नजर लागू नये अशी भगवंताची मनोमन प्रार्थना केली. सगळीच घरे काही प्रमाणात अशी झाली तर परत विभक्त झालेली कुटुंब एकत्र येतील आणि देव पण म्हणेल “नांदा सौख्य भरे”.

शेजारधर्म

गिरगावातील केसरभाई चाळीची पुनर्बांधणी झाली आणि तिथे एक गगनचुंबी इमारत उभी राहिली. चाळीचा मालक केसरभाई पटेल भला माणूस. सगळ्या चाळकरींना या नवीन जागेत राहती जागा मिळणार असेल तरच पुनर्बांधणी करणार असा शब्द त्याने शेवट पर्यंत पाळला. सगळ्या भाडेकरूंना हक्काचे घर मिळाले आणि केसरभाईंना अख्खा एक मजला आणि वर मिळालेल्या गडगंज पैश्याने त्याच्या ५ पिढ्यांची अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची सोय झाली. सगळ्यांनी कृतकृत्य होऊन नव्या वस्तूचे नामकरण “केसर हाइट्स” असे करून टाकले. कुठलेही विघ्न न येता पूर्ण झालेली हीच एकमेव इमारत असावी याचं कारण म्हणजे भाडेकरूंचा केसरभाई प्रती असलेला विश्वास आणि चाळी प्रती असलेली आत्मीयता. तसंही या चाळी मध्ये रिटायर्ड होण्याच्या मार्गावर असलेले बरेच जण होते. त्यामुळे पदरी पडेल ते घ्यावे आणि रामनाम घेत बसावे हाच इरादा होता. तसे पक्के भाडेकरू देखील फार नव्हते. ७ – ८ होते आणि उरलेल्या खोल्या प्रायोगिक तत्वावर भय्ये, गुजराथ्याना आंदण दिल्या होत्या. हे पक्के भाडेकरू या इतर कच्च्या भाडेकरूंना “सुरक्षित अतंरावर” ठेवत. त्यात सुद्धा नाना कुलकर्णी, बाळू महाजन, अप्पा सावंत, मधू पवार आणि बंडू केळकर (गुरुजी) हे इरसाल पंजे. जीवनाच्या वेगवेगळया टप्प्यावर हे सगळे केसरभाईच्या आश्रयाला आले आणि चाळकरी झाले. या पंचकांच्या मैत्री मध्ये मिठाची चव, साखरेचा गोडवा आणि क्वचित प्रसंगी लवंगी मिरचीचा तडका देखील असायचा. कालच्या झालेल्या बारा भानगडींना तिलांजली देत परत हे पाचही जण एकत्र येत. कुठल्याही गोष्टीवर यांची मते एक व्हायची नाहीत आणि मग तात्विक वाद व्हायचे. या वादातूनच कुणी कुणाची खिल्ली उडवायचा, टर खेचायचा, पैजा लावायचा … शपथा तर अगणित घेतल्या गेल्या आणि तितक्याच मोडल्या गेल्या.

नाना कुलकर्णी: मूळ गाव नाशिक. सरकारी बँक मध्ये कारकून. रिटायर्ड होण्यासाठी २ वर्षे राहिली असताना सांगली येथे बढती वर बदली होईल या भीतीने स्वेच्छानिवृत्ती पत्करली. पत्नी मनोरमा कुलकर्णी बि एम् शी मध्ये कारकून. दोघेही स्वतःला सरकारमान्य पाट्या टाकणारे समजतात. एक मुलगा रमेश, महाड येथे इंजिनियरिंगला आणि राहायला होस्टेलवर. रमेशला उत्तम शिक्षण मिळावे म्हणून काटकसरीने पै पै जमवून इंजिनियरिंगसाठी प्रवेश मिळवला. रमेशपण हुशार आणि आज्ञाधारक.

बाळू महाजन: मूळ गाव (दुसरे कुठले ज्ञात नसल्याने) मुंबई. निवृत्त लष्कर अधिकारी. ब्रह्मचारी. बाकीच्यांच्या भाषेत लष्कराच्या भाकऱ्या भाजून थकलेला सडा फटिंग. सगळा कारभार लष्कराच्या धर्तीवर असल्याने सहसा याचे कुणाशी पटत नाही. जे काही लागे बांधे असतील ते फक्त इतर तीन जणांशी. केसरभाई अत्यंत पाताळयंत्री माणूस असून तो आपला कधीही घात करू शकतो अशी ठाम समजूत. (केसरभाईच्या दृष्टीने स्क्रू ढिला असलेला माणस) विक्षिप्त स्वभावामुळे नातेवाईकांचे येणे जाणे अत्यंत कमी. दर महा मिळणाऱ्या पेन्शन वर याचे उत्तम चालते.

अप्पा सावंत: अर्धा संसार कोकणात आणि अर्धा मुंबईत असलेला अस्सल कोंकणी माणूस. मुंबईतला खर्च परवडत नाही म्हणून बायका पोरांना रत्नागिरीस धाडलंनी. रत्नागिरीच्या वडिलोपार्जित जागेत वाटे नसल्याने आणि आंबा काजू उत्तम मिळत असल्याने अप्पाने काही न करता इथेच राहिले तरी चालेल असे त्याच्या बायकोचे मत आहे. पण अप्पा तिला न जुमानता इथेच मुंबईत राहतो. आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा तो इलेक्ट्रीशियन, प्लंबर, गवंडी अशी सगळी कामे करणारा एकमेव माणूस. मुंबईत कंटाळा आला की तो कोकणात पळतो आणि तिथे काही वाजले की तो मुंबईत येतो. अप्पाची चाळीत येणाऱ्या जाणाऱ्या वर करडी नजर असते. त्यामुळे चाळीतल्या सगळ्या भानगडी, कुलंगड्याची माहीत अप्पाकडे मिळते. दुसऱ्या माळ्यावरील साधना सरखोत या विधवेबरोबर याचे काही साटेलोटे आहे अशी प्रत्येकाला खात्री असली तरी अप्पा त्याकडे दुर्लक्ष करतो. गणपती आणि होळीला हटकून कोकणात पळणारा अप्पा पक्का मुंबईकर आहे. 

मधू पवार: परिस्थितीने गांजलेला एक अतिशय साधा भोळा माणूस. परळ येथील गिरणीत कामाला होता तेंव्हा ऐट बघण्यासारखा होता. गिरणी बंद पडली आणि सगळा बहर ओसरला. बायको सुलभा अतिशय फटकळ पण हुशार आणि व्यवहारी असल्याने याच्या संसाराचे तरु अजूनही शाबूत आहे. सुलभा घरच्या घरी शिवणकाम करते आणि शिवणकामाचे क्लास चालवते. एकुलती एक मुलगी लता कॉलेज मध्ये शिकते. गिरणी बंद पडल्यावर तिनेच अप्पाला स्वतःच्या पायावर उभे केले. चाळीच्या बाहेर चौकात वडापाव, भजीची गाडी टाकली. प्रचंड मेहेनत करून सचोटीने दोघांनी धंदा केला आणि त्याचे उत्तम दिवस आता ते अनुभवत आहेत. त्याच चौकात एक गाळा घेऊन तिथे धंदा चालू केला. सुलभाने मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यावर शिवणकाम बंद केले. सकाळी मधू गल्ला सांभाळतो तर संध्याकाळी सुलभा.

बंडू केळकर (गुरुजी): विद्यालयीन शिक्षणात चांगलेच दिवे लावलंनीत म्हणून याच्या बापानं याला लहानपणीच संगमेश्वरातील वेदपाठशाळेत धाडलं. भिक्षुकी शिकून गावी गेला पण तिथे काही बस्तान बसले नाही. शेवटी मोठ्या भावाच्या हवाली सगळं केलं आणि एकटाच मुंबईला पोहोचला. लांबच्या काका कडे काही महिने घालवल्यावर केसरभाई चाळीत शेवटी स्वतःची (भाड्याची) खोली मिळवून आजूबाजूच्या परिसरात भिक्षुकी चा व्यवसाय थाटला. गावातल्याच गोदावरी नामक मुलीशी लग्न झाले. भिक्षुकीचा व्यवसाय उत्तम चालू होता परिस्थिती इतर भाडेकरूंपेक्षा बरी म्हणायची. संसार उत्तम चालू होता पण या संसार वेलीवर फूल उमलले नाही. त्याची भरपाई म्हणून की काय या दोघांचा चाळीतील मुलांवर प्रचंड जीव होता. सकाळी पूजा अर्चादी कामे करायची आणि संध्याकाळी या बाकीच्या लोकांबरोबर चहाटळकी करायची किंवा कुणाला संध्या शिकव, कुणाला सहस्त्रनाम तर कुणाला रामरक्षा शिकव असे विद्यादानाचे कार्य चालू असते.

(तर मित्रांनो आता आपल्याला अधून मधून भेटत राहतील. त्यांचे विचार, वाद विवाद, गमती जमतींचा आनंद घेऊ.)

टिप: या लेखमालेतील सगळे संदर्भ काल्पनिक असून योगायोग होवू शकतात. 😉

तो एक बाप असतो

शाळेपासून बापाच्या, धाकात तो राहत असतो,
कमी मार्क पडलेलं, प्रगतीपुस्तक लपवत असतो,
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो,
डोळा चुकवून बापाचा, हुंदडायला जात असतो…

शाळा संपते, पाटी फुटते, नवं जग समोर येतं,
कॉलेज नावाच्या भुलभुलैयात, मन हरखून जात असतं,
हाती असलेले मार्क घेऊन, पायऱ्या झिजवत फिरत असतं,
बाप पाहतो स्वप्नं नवी, हे मुखडा शोधत असतं… Continue reading