दिवाळी खरेदी

दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा. दिवाळीचा उत्साह द्विगुणित करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे अलोट गर्दीच्या साक्षीने केली जाणारी दिवाळी साठीची स्पेशल खरेदी. तिथे रोजच्या वापरातील बाजारहाट वगैरे शब्द पण खुजे ठरतात. समाजातील प्रत्येक स्तरातिल व्यक्ती या सणाच्या निमित्ताने आपला खिसा झटकुन काही ना काही खरेदी करतोच करतो. महागातल्या महाग वस्तु देखिल सुलभ हप्त्यानी मिळत असल्या मुळे ऋण काढून सण साजरे करणे ही म्हण दिवाळी या सणापुरती तरी कालबाह्य झाली आहे. त्यात खरेदीदाराला सहज भुरळ पडेल अश्या अनेक योजना / सवलती दिवाळीच्या एक दोन महीने आधी पासूनच दुकानांच्या बाहेर झळकायला लागतात. अमुक अमुक टक्के सूट, हे घ्या म्हणजे ते मिळेल, 2 वर 1 किंवा 1 वर 2 मोफत इथ पासून ते दिवाळी लक्की ड्रा, बम्पर, जैकपोट अशी अमिषे म्हणजे पळण्याच्या मुड मध्ये नसलेल्या बैलाला हिरवळी चे गाजर दाखवून पराणी ने टोचत राहण्या सारखे आहे. पण अगदी सध्या तला साधा माणुस देखिल नकळत या जोखडाला जोडून घेतो …. दिवाळीतील खरेदिची धामधूम अनुभवण्या साठी. किंबहुना दिवाळी ला काहीतरी खरेदी केलीच पाहिजे नाही तर धनतेरस चा कुबेर आणि लक्ष्मी पुजनाची लक्ष्मीचा आशीर्वादाच मिळणारच नाही अशी धारणा झालेली आहे. गेली अनेक वर्ष याच जोखडाला जोडलेला मी पण तुमच्या सारखाच एक वळु दिवाळीच्या आधी अश्या अनेक दुकानांचे उंबरठे झिजवत आलेला आहे.

लहानपणी सगळी खरेदी आईच करायची …. कपड्यांचे रंग काय असायचे ते विशेष आठवत नाही. जेंव्हा ठराविक रंगान्व्यतिरिक्त रंग कळत नव्हते तेंव्हा एकच रंग माहीत होता … तो म्हणजे मळखाऊ. कपड्यां बरोबर हा अगम्य रंग माझ्या बालपणाला चिकटून राहिला होता अगदी भिंतीला लावलेल्या ऑइल पेंट प्रमाणे. कॉलेजला गेल्यावर कपड्यांचे रंग निट कळायला लागल्यावर मग मात्र तो मळखाऊ रंगाला ज़रा दूर केलं. कपड्यांची खरेदी आणि सण हे समीकरण पक्क होतं त्या वेळी. वाढत्या अंगामुळे वर्षा गणिक गणवेश बदलावे लागायचे ते सुद्धा नाईलाज होता म्हणून. दिवाळीला एक सेट मिळायचा आणि वाढदिवसाला दुसरा, झाली वार्षिक उंची कपड्यांची खरेदी पूर्ण….. अधे मधे कधी लग्न, मुंज किंवा तत्सम कार्य असेल तर अजुन एक सेट. असे जेमतेम 3 – 4 सेट मिळायचे …. पण भागायचे त्या कपड्यांवर. रेडीमेड चा ज़माना नव्हता असं नाही पण कापड घेउन शिंप्या कडून सदरा आणि विजार शिवून घेणे हाच पारंपारिक रिवाज. दिवाळीच्या वेळी अगदी एक एक महीना आगोदर शिंप्याला मापे देऊन यावी लागायची तेंव्हा कुठे वसुबारसेला आमच्या खांद्यावर नव्या कपड्यांची झूल पडायची. लहानपणी लाभलेली निसर्गादत्त शरीर संपदा अशी भन्नाट होती की शर्ट खांद्या वर निट बसला तर हात तोकडे आणि हात मिळवणी करायची झाली तर शर्ट घातला आहे की डगला तेच कळायचे नाही. त्या पेक्षा शिंप्या कडच्या फेर्या परवडायच्या. हे रेडीमेड वाले बहुल झाले आणि त्या बिचार्या शिंप्यांची शिलाई मशीन थंडावली. पण आता मात्र ही कपडे खरेदी वर वर होतच असते त्यामुळे दिवाळी ची कापड खरेदी अशी वेगळी अशी मजा काही राहिली नाही. हां पण दिवाळित येणार्या नविन फैशन मुळे म्हणा किंवा अमुक अमुक टक्के सूट (छोट्या अक्षरात upto) लिहून दाखवलेल्या  प्रलोभनाच्या गाजरा पाई पाय आपोआपच कापड खरेदी साठी दुकाना कड़े वळतात.

नविन कापड खरेदीची हौस भागवून झाली की मग घरासाठी काहीतरी घ्यावे किंवा घरात एखादी आवश्यक वस्तु नाही याची जाणिव घराच्या दिवाळी पूर्व साफसफाई दरम्यान जाणवते. कधी कधी ही खरेदी पूर्वनियोजित असते. म्हणजे कसं …. धुलाई मशीन जुने झालय, फ्रिज जुना झालाय, टेलिव्हिजनच्या कुरबुरी वाढल्यात, अजुन काही घरातील वापरायची यंत्रे जुनी झाली असतील तर अशी मोठी खरेदी दिवाळीच्या निमित्ताने करण्यासाठी झुंबड उडते. जोडीला दुकानादारांचे सवलतींचे गाजर असतेच. आता या खरेदी मध्ये नवनवीन मोबाईल्स ची भर पडली आहे हे वेगळे सांगायला नकोच. तीच गत दुचाकी आणि चार चाकींची पण आहे. प्रत्येक जण आपापली स्वप्ने या दिवाळीतील खरेदीच्या माध्यमाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.

वर्षभर कितीही खरेदी केली तरी दिवाळीचे शॉपिंग काही चुकलेले नाही. महागाई अगदी गगनाला भिडली तरी, प्रसंगी खिश्याला चाट लावून आपण जिवाची दिवाळी करतच राहणार. एकच मनात येतं …. खरेदीच्या वेळी जसा घरातील बाल गोपाळांचा विचार करता तसाच वयोवृद्ध व्यक्तींचा देखील करा. त्यांच्या चेहेऱ्या वरचे हास्य PRICELESS असतं एखाद्या लहान बाळासारखेच.

रंगांची उधळण

holi

वर्षभर हिंदू संस्कृती प्रमाणे आपले सणवार चालू असतात. आणि प्रत्येक सण आपण तितक्याच उत्साहाने साजरा करतो. दिवाळी, दसरा, गणपती, पाडवा, होळी, धुळवड, गोपाळकाला असे आणि बरेच सण आपल्या उत्साहात भर घालत असतात. सगळे आपापल्या परीने हे उत्सव साजरे करतात, गरीब, श्रीमंत कुणीही असला तरी उत्साह तोच. आनंद तोच.

असाच एक सण येतोय, सगळ्यांना सामावून घेणारा, विविध रंगात नटणारा. फाल्गुन शुक्ल पौर्णिमा अर्थात होळी आणि त्या नंतर रंगांची उधळण घेऊन येणारी धुळवड आणि रंगपंचमी. सगळ्या लहान थोरांना आपल्याच रंगात रंगायला लावणारी धुळवड. बालपणी ची मज्जा असलेली धुळवड, तरुणाईची मस्ती असलेली धुळवड, भांगेच्या थंडाई मध्ये मिसळलेली धुळवड, वरिष्ठांच्या आनंदात सामावलेली धुळवड. अशीच धुळवड आपण बुधवारी साजरी करणार आहोत. अगदी नेहेमीच्याच उत्साहात रंगांची उधळण करत. पण जरा सांभाळून. उत्साह तोच असला तरी रंगांचे स्वरूप बदललंय. जास्त गडद पणा आणि टिकाऊपणा यावा म्हणून या रंगांमध्ये घातक रसायने मिसळली जात आहेत. त्याने पर्यावरणाची हानी होतेच पण ते आपल्या जीवाला देखील अपायकारक असू शकतात. त्या मुळे शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करा. सध्या बाजारात असे नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत.

drought01पाणी ….. खरंच या वर्षी खुपच टंचाई निर्माण झाली आहे पाण्याची. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर दुष्काळ पसरला आहे. गावंच्या गावं पाण्यावाचून स्थलांतरित झाली आहेत. रोजच्या पिण्याच्या, वापरण्याच्या पाण्याची वानवा आहे. तळी आटली आहेत, विहिरींचा तळ लागला आहे, नद्या कोरड्या पडल्या आहेत. रोज टँकरद्वारा पाणी पुरवठा करून जीवनावश्यक गरज भागवली जात आहे. आत्ताशी मार्च महिना सरत आहे अजून वैशाख वणव्याची झळ बसायची आहे. असे सगळ्या महाराष्ट्राचे चित्र असताना आपण धुळवडीच्या दिवशी जी पाण्याची नासाडी करणार आहोत ती जरा विचार पूर्वक करा. इतके वर्ष अगदी रस्त्यात पाण्याची पिंप भरून सगळ्यांना बुचकळून काढलंय. नळाला पाईप लावून सगळ्यांवर फवारे सोडलेत. एक वर्ष हे सगळं “लिमिटेड एडिशन” मध्ये केलं तर नाही चालणार? आता तुम्ही म्हणाल की आपल्या कडे कुठे दुष्काळ आहे. रोज तर पाणी मिळतंय. मग कशाला कमी वापरायचं? हो पण मिळणारे पाणी कमी कमी होत जाणार आहे. मुंबईच्या आजूबाजूला बरेच ठिकाणी कमी दाबाने पाणी यायला सुरुवात झाली आहे. मुंबईकरांची पाण्याची तहान (आणि नासाडी) पुरवताना त्याच्या आजूबाजूचे जिल्हे आणि धरण कोरडी पडणार आहेत. कारण शेवटी कमी पाण्याची आणि वैशाख वणव्याची झळ आपल्याला पण सोसावी लागणार आहे. त्या साठी आत्ता पासूनच कंबर कसायला हवी. पाण्याची काटकसर करण्यासाठी धुळवडी पेक्षा चांगला मुहूर्त कुठला असू शकतो?

सगळ्यांना होळी आणि धुळवडीच्या (बिनपाण्याने) शुभेच्छा.

(सर्व फोटो आंतरजालावरून साभार)

शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०६

माफ करा…आज बरेच दिवसांनी या कथेचा ६वा भाग लिहून पूर्ण झाला. पुढच्या भागात ही कथा संपेल आणि तो भाग पण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०५

वेदमूर्ती बंडोपंत केळकर गुरुजींच्या सुस्पष्ट मंत्रघोषात गणपतीची प्रतिष्ठापना यथासांग पार पडली. मधू आणि सुलभा पवार दाम्पत्याने यजमान पद भूषवले. धोतर कुर्ता घातलेला मधू आणि नौवारी नेसून सजलेली सुलभा खुपच छान दिसत होते…. अगदी दृष्ट लागण्या जोगे. केसरभाई मात्र पुजेला आवर्जून उपस्थित होता.
——————————————————————————————

सकाळीच पूजा झालेली असल्यामुळे नंतर विशेष काही कार्यक्रम नव्हते. केसरभाई आणि कुटुंबीय संध्याकाळी दर्शनाला आले होते. जाताना बाळू आणि कंपनीला भेटून पूजेचे आयोजन उत्तम झाले असल्याची पावती दिली. रोजच्या तेल पाण्याची, फुले, हार, नैवेद्य आणि प्रसादाची सगळी व्यवस्था केसरभाईंनी केली होती. हे कळताच नानाचं ब्लड प्रेशर शिट्टी वाजवायला लागलं. शेवटी न राहवून आपल्या मोडक्या तोडक्या बंबैय्या हिंदीत तो केसरभाईला म्हणाला “देखो केसरभाई, हमारा गणेशोत्सवका बजेट जो है ना वो थोडा कमीच है. और आप ऐसे बिना पूछे अपने जेबसे ऐसी उधळपट्टी करेंगे तो अपुन के बजेट की तो वाट लाग जायेगी” नानाच्या तोंडातून असे संजय दत्त स्टाईल शब्द ऐकून सगळेच चपापले. केसरभाई नाना कडे बघून मिश्कील हसत होता.
बाळू नानाची री ओढत म्हणाला “तुम्ही ती मिरवणूक, ती वाजंत्रीची सोय केलीत. मोदकांचा प्रसाद पाठवलात पण हे सगळं आमच्या बजेटच्या बाहेर जातंय”
“आणि या सगळ्याचा त्रास नानाला झाला. त्याच्या रक्तान उसळी मारलंनीत. परत काही झाले असते म्हणजे निस्तरावे चाळकरींना लागले असते.” अप्पाने तलवार चालवली.
इतकं सगळे बोलत असून सुद्धा केसरभाई गप्पच होता. २-३ मिनिटे शांततेत गेल्यावर केसरभाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले. “तुमी लोग खर्चाची चिंता कशाला करते? मी हाये ना. काय पण काळजी करू नको. मी बघते सगळा. तुमचा बोलून झाला असेल तर आता मी काय सांगते ते बघ. मी जे काय पण तुम्हांला न विचारता केले त्याचा रोकडा मागितला काय? जो चीज मी आणला त्याचा पैसा मीच देनार. उलट तुमाला पण अजून पैसा लागला तर सांग. मी तुमाला पैसा देते. आप लोग इतने बरसोंसे इस घर में रह रहे हो. ये जगह जब मैने बेच दी तब मुझे मालूम था की कोई टेनंट मुझे किसी बात पार तकलीफ नाही देगा. और आप सब ने मुझे अच्छा कोऑपरेट किया. उसी दिन मै आप सबको बोला की आजसे हम सब एकही लेवल पे है. अब मै मालिक नही. इस चालने मुझे बहुत कुछ दिया. बहुत अच्छी अच्छी यादे जुडी है इसके साथ.” केसरभाई बोलता बोलता खूप भावूक झाला होता. “आपका अपनापन मै कभी भूल नाही पाऊंगा. अगर इस चाल केलिये मै कुच्छ करना चाहता हुं तो वो मेरा हक है. और मुझे बहुत अच्छा लागता है आप सबके साथ. मेरे बर्तावसे अगर आपको कुछ तकलीफ हो गयी है तो मुझे माफ करना”. मधूला वाटलं की आता केसरभाई आसवं गाळणार म्हणून लगेच खिशात हात घालून रुमाल तयार ठेवला होता. तितक्यात केसरभाईनेच स्वतःच्या खिशातून रुमाल काढून न आलेले अश्रू पुसले आणि फरफरून भरलेलं नाक रिते केले. त्याची कृती बघता मध्याने आवंढा गिळला आणि मनातच म्हणाला बरं झालं आपण रुमाल पुढे नाही केला. घसा खाकरून झाल्यावर केसरभाई या पाचही जण काय प्रतिक्रिया देतील या  उत्सुकतेने त्यांच्या चेहेऱ्याकडे आलटून पालटून बघत होता. पण केसरभाईंच्या या अश्या आतडे पिळवटून केलेल्या अनपेक्षित वक्तव्यामुळे हे पाचही जण जणू स्तंभित झाले होते. सगळे एकमेकांकडे पहात होते आणि अप्पा म्हणाला “ठीक आहे. तुमची तशी इच्छा असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण जे काही करणार असाल ते आम्हाला पण सांगा. आम्हाला पण जमेल तशी मदत करूच.” केसरभाई चालेल म्हणाला आणि आवजो करून निघणार इतक्यात बंडोपंतांनी त्याला थांबवला. “केसरभाई मग उद्या तुम्ही आणि भाभीच सत्यनारायणाची पूजा करा”. बाकीच्यांनी पण बंड्याच्या मताला दुजोरा दिला. केसरभाई खुश झाला आणि म्हणाला “एकदम माजा मनातला बोलला बंडू शेठ. मी आणि बायडी तयार हाय. सकाळी १० ला येतो”. नाना मात्र तटस्थ होता. त्यांनी परत बजेटची शंका काढली कारण सत्यनारायणाची पूजा उत्सवाच्या रुपरेषेत धरली नव्हती. केसरभाई परत हसला आणि म्हणाला “नाना साब, मी आत्ताच सांगितला ना …मी सगळा खर्चा करते म्हणून मग काय प्रॉब्लेम हाय?” “केसरभाई चोपडीचा वसूल आहे. जो पर्यंत रोकडा जमा होत नाही तो पर्यंत खर्चात धरत नाहीत” नाना मिश्कील हसत म्हणाला. बाकीच्यांना काहीच कळले नसले तरी केसरभाईला बरोब्बर समजलं. त्याने सरळ १००० रुपयांच्या पाच नोटा काढून नानाच्या हातावर ठेवल्या. उद्या सकाळी अजून ५ देतो असे सांगून केसरभाई निघून गेला. अप्पा जरा नाराज झाला नाना वर..म्हणाला “काय बोलतस ते तुला तरी कळता का? अरे तो इतकं म्हणाला ना सगळा खर्च तोच करणार तरी पण त्याला पैसे द्यायला भरीस पडलंनीच तू. एका रात्रीत जणू तो पळूनच जाणार होता जसा?” मधुने पण अप्पाला दुजोरा दिला. नाना स्पष्टपणे म्हणाला “व्यवहार हा व्यवहार असतो. रोकडा हातात आला की आपला. मी खर्च करीन असं तो ढीग बोलला पण जोवर पैसे समोर ठेवत नाही तोवर कसा विश्वास ठेवणार? माझे व्यवहार रोखठोक असतात. नाही आले पैसे तर आपलीच लागेल सगळ्यांची. कुणाला हे पटत नसेल तर ही जबाबदारी घ्यावी आणि मला यातून मुक्त करावे”. आधी पासूनच केसरभाई वर विशेष विश्वास नसलेला बाळू मात्र सहमत होता. त्याने आपला लष्करी बाणा दाखवलाच. “बरोबर आहे नाना तुझं. ५ दिवसांचा उत्सव, आपण वापरणार वर्गणीतून आलेले पैसे त्यामुळे हिशोब चोख हवा. जमा किती आहेत त्यावरूनच ठरेल ना खर्च किती करायचा? उगाच हवाल्याच्या टवाल्या हव्यात कशाला? म्हणाला ना खर्च करीन खर्च करीन मग टाकू दे ना जरा दमड्या झोळीत”. बाळूचे विचार ऐकून आता मात्र बाकीचे माना डोलवू लागले.

चाळीत गणपती असल्याने खूप उत्साहाचे वातावरण होते आणि या उत्साहाला केसर रूपी मायेचा मुलामा चढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी केसरभाई मंडपाच्या इथे एका इसमाला घेऊन एक बोर्ड तयार करत होता. मधुने आपल्या चष्म्याची बैठक नीट करून बोर्डावर जे काही लिहिलं होतं त्याची सार्वजनिक घोषणा केली. “उद्या केसरभाई चाळी मध्ये गणेशोत्सवाप्रित्यर्थ सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले आहे. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.” बाजूलाच नाना आणि अप्पा होतेच. “बरे झाले याला मराठी येणारा रंगारी मिळाला. नाहीतर याची मराठी म्हणजे नारायण नारायण म्हणत प्रत्यक्ष विष्णुच अवतरला असता. ” नाना हळूच कुजबुजला आणि त्याचे हे बोलणे ऐकताच मधू खी खी करून हसला. इतक्यात केसरभाई त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला “काय …कसा झालाय बोर्ड? एकदम चोक्कस”. तितक्यात बाळू पण आला आणि त्यने पण बोर्डावर एक नजर टाकली. थोडा चिंताजनक चेहेरा करून म्हणाला “केसरभाई, महाप्रसाद म्हणजे जेवण? उगीच घाट घालताय इतका.चहा कॉफी नास्ता वगैरे ठीक आहे डायरेक्ट जेवण म्हणजे ….” त्याचे बोलणे अर्धवट तोडत केसरभाई म्हणाला, “हे बगा बाळू शेठ, तुमी काय बोलू नका, आमचा महाराज है ने त्याने सगडी अरेंजमेंट केली हाय. चाळी मंदी १० घर म्हणजे जवळपास ४० माणस, बिल्डर आणि आमचा माणस धरून आजून २० जन व्हाढणार. मेनू एकदम सादा, पुरी भाजी पुलाव आणि जिलेबी. मधू शेठ तुमाला सकाळच्या नाश्त्याची ओर्डर द्यायची हाय. पोहा चहा आणि कॉफी. काय होईल बिल ते सांग नंतर पेमेंट करून टाकते. पण आत्ता हे हजार रुपया घेऊन ठेव.” असं म्हणून केसरभाई ने मधूच्या हातात ५०० रुपयांच्या २ नोटा टेकवल्या. मधूला धंदा मिळाला म्हणून मधू खुश आणि एक वेळचं जेवण फुकट मिळणार म्हणून चाळकरी खुश. सगळी कडे तोंडाची वाफ उडत होती….”भाग्य लागतं असा मालक मिळायला” “यात पण काहीतरी गोम असणार त्याचा नाहीतर एकदम पुळका बरा आला चाळीचा.” “एक दिवसाचे भाडे पण कधी सोडले नाही आणि आज हजारो खर्च करायला तयार?” “काळा पैसा खपवायचा असेल म्हणून इतका उदार झालाय.” एक ना अनेक मुद्द्यांवर चर्चा. हे पाच जन मात्र या सगळीकडे दुर्लक्ष्य करून विघ्नहर्तामय झाले होते. केसरभाईंच्या रुपाने त्यांना विघ्नहर्ता पावला होता.