काल सोनिया गांधी भाजपावर बरसल्या. म्हणाल्या की भाजपच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना ते आपल्या नेत्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीयेत आणि हा दुटप्पीपणा आहे.

वा रे वा …. यांनी तरी सांगावे की सोनिया बाईंच्या काँग्रेसने त्यांच्या तथाकथित भ्रष्ट नेत्यांवर काय कारवाई केली? अर्थात कुठल्याही पार्टीतले नेते हे धुतल्या तांदळासारखे नाहीत. पण काँग्रेस रूपी चोर उलट्या बोंबा मारत वर शिरजोर झाला आहे.

Android Apps: हिंदू कॅलेन्डर

सध्या स्मार्ट फोनची जबरदस्त चालती आहे. Android, IOS, windows आणि Blackberry या  प्रणालीवर बेतलेले अनेक फोन सध्या बाजारात उपलब्ध आहेत ते सुद्धा अगदी कमीतकमी किमतीत (अंदाजे ५ हजार). अनोखे रूप रंग याच बरोबर यांची खासियत म्हणजे या वर टाकता येणारी असंख्य Applications (Apps). ही Apps त्या त्या प्रणालीच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. या संकेतस्थळांना “Apps Store” म्हणतात. ही Apps Store म्हणजे अलीबाबाची गुहा आहे गुहा. या स्टोअर्स मध्ये काही Apps विकत घ्यावे लागतात तर बरीचशी चकटफू पण मिळतात. अश्याच एका Android आधारित Apps बद्दल थोडी माहिती देणार आहे.

“भिंती वारी कालनिर्णय असावे” असे म्हणत सुमंगल ने प्रत्येक घरातल्या भिंतीवर कालनिर्णय लटकवले आणि सगळ्यांची पंचांगाची सोय केली. तिथी वार निर्णय बघताना दाते/टिळक/रुईकर यांच्यासारखी सर्वसामान्यांसाठी क्लिष्ट पंचांग बघण्यापेक्षा कालनिर्णयची मदत घेणे जास्त सोप्पे होते. इंग्रजी पद्धतीवर आधारित असलेले कालनिर्णय पंचान्गाबद्दल जुजबी माहिती पुरवण्यासाठी पुरेसे होते. महिन्यातील महत्वाचे सण, तिथ्या, सुट्ट्या या सगळ्याची माहिती एकाच पानावर उपलब्ध असायची. सुमंगलने देखील असेच Apps स्मार्टफोन साठी विकसित केले आहे त्यात देखील जुजबी माहिती मिळण्याची सोय आहे. पण ही दिनदर्शिका केवळ २०१२ साठीच मर्यादित आहे. अश्या स्मार्ट फोनवर चालणाऱ्या हिंदू पंचान्गाशी निगडीत अनेक दिनदर्शिका उपलब्ध आहे. उदाहरण द्यायचे झाले तर हिंदू कॅलेंडर (३ वेगवेगळया विकासकांनी तयार केलेले), देसी कॅलेंडर, हिंदू कॅलेंडर २०१२, हिंदू कॅलेंडर फ्री इ. इ.

या सगळ्या उपलब्ध Apps मध्ये आलोक मांडवगणे यांनी विकसित केलेले “हिंदू कॅलेंडर” सगळ्यात आघाडीवर आहे. जवळ जवळ ५० लाख वेळा ते वेगवेगळया स्मार्ट फोनवर डाऊनलोड केले गेले आहे. ५ पैकी ४.५ मानांकन प्राप्त झालेले हे Apps वापरावयास खरंच सोपे आणि सुलभ आहे यात शंकाच नाही. हेच हिंदू कॅलेंडर विजेट म्हणून पण वापरता येते. यात तुम्ही तुमचे इच्छित ठिकाण निवडून त्या ठिकाणाचे पंचांग बघू शकता. अशी ३००० ठिकाणांचे पंचांग दाखवण्याची सोय या कॅलेंडर मध्ये केलेली आहे. इंग्रजी पद्धतीच्या दिनदर्शिके मध्ये मुख्य तिथी ठळकपणे दर्शवण्यात आल्या आहेत. हिंदू सणवार, महत्वाचे दिवस यांची यादी दिली आहे. प्रत्येक दिवसाचे पंचांग (तिथी, वार, योग, नक्षत्र आणि करण) तसेच हिंदू महिना (पौर्णिमान्त/अमावास्यांत), पक्ष (शुक्लपक्ष/कृष्णपक्ष) चंद्र राशी यांची देखील माहिती मिळते. आपण निवडलेल्या स्थळानुसार ढोबळ मुहूर्त ज्ञानासाठी रोजचे सूर्योदय/सूर्यास्त, चंद्रोदय/चंद्रास्त, चौघडिया, राहुकाळ, यमघंट या गोष्टींची देखील माहिती मिळते. एखाद्या दिवसाची ठराविक वेळेची अंशात्मक  ग्रहस्थिती देखील हिंदू कॅलेंडर मध्ये दर्शवली आहे. आलोक मांडवगणे यांनी विकसित केलेले Indian Sky Map हे Apps जर तुमच्या स्मार्ट फोन मध्ये असेल तर तुम्ही अवकाशातील ग्रहांची स्थिती देखील बघू शकता. तुमच्या महत्वाच्या तिथींची नोंद तुम्ही यात करू शकता आणि वेळोवेळी हिंदू कॅलेंडर याचे तुम्हांला स्मरण करून देते.
सध्यातरी हे App फक्त Android प्रणाली साठीच उपलब्ध आहे.

This slideshow requires JavaScript.

अधिक माहिती: श्री. आलोक मांडवगणे
Apps येथे मिळेल: हिंदू कॅलेंडर

विनोदाचा सरदार “जसपाल भट्टी”

image

माझ्या कॉलेज जीवनात हिंदी भाषेतील निखळ विनोद म्हटलं की एकमेव नाव समोर यायचं ते म्हणजे जसपाल भट्टी. सरदारांवर असलेले विनोदी किस्से बरेच होतात किंवा त्यांच्या नावावर खपवले जातात. पण अस्सल विनोदाचा सरदार हा एकमेव …”जसपाल भट्टी”. त्यावेळी वाहिन्यांची तोबा गर्दी नव्हती ….दूरदर्शन हेच एकमेव दृकश्राव्य माध्यम. फ्लॉप शो आणि उल्टा पुल्टा अश्या विनोदी मालीकांद्वारे त्याकाळी असलेल्या सामाजिक आणि राजकीय गुण दोषांवर विनोदाच्या माध्यमाने उपहासात्मक आणि प्रभावीपणे मांडले.

जसपाल भट्टी यांचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी अमृतसर येथे झाला. पंजाब इंजिनियरिंग कॉलेज, चंदिगढ येथून त्यांनी अभियांत्रिकी शिक्षणाची पदवी घेतली. परंतु पेशाने ते कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता होते. २४ हिंदी/पंजाबी चित्रपटांमध्ये त्यांचा सहभाग होता. तसेच ५ मालिका त्यांनी प्रस्तृत केल्या होत्या. त्यातील सर्वात लोकप्रिय होत्या त्या फ्लॉप शो आणि उल्टा पुल्टा.

आज दिनांक २५ ऑक्टोबर २०१२ रोजी पहाटे १ च्या सुमारास या महान विनोदवीराचा कार अपघातात दुर्दैवी अंत झाला. देवा! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश चरणी प्रार्थना.

अधिक माहिती:
http://en.wikipedia.org/wiki/Jaspal_Bhatti
http://www.jaspalbhatti.com/