चहाट(वा)ळकी – ०५ : टोल-वा-टोल-वी

शनिवार रविवार जीवाची मंडई (पुण्यातली) करून आल्यावर हिशेब मांडणी चालु होती. बायकोने तिने केलेल्या खरेदीचा जमा(?)खर्च आधीच माझ्या हाती ठेवला होता. मुळात मी दिलेल्या काही नोटां पैकी एकही परत आलेली नसल्याने माझी दिलेली जमा तिच्या खर्चाशी तंतोतंत जुळणार होती हे निःसंशय. तस्मात् वरील खर्चाची विभागणी आमच्या जमाखर्चाच्या वहीत असलेल्या बुडित खाते, अक्कल खाते, मनोरंजन भत्ता, गुप्त हप्ता या आणि अश्या अनेक रकान्यांमध्ये केली जाते. आता ठाणे ते पुणे प्रत्यक्ष खर्च लिहायला बसलो. सगळे म्हणजे अगदी द्रुतगती महामार्गावरील फुडमॉल मध्ये ₹२० देऊन खालेल्या वडापाव सकट सगळे बारीक सारिक खर्च मांडून सुद्धा साधारण पणे ₹५०० चा हिशेब काही लागत नव्हता. पाच दहा रुपये इकडे तिकडे असते तरी विशेष वाटले नसते…. पण पाचशे रुपये म्हणजे फारच झाले. आता हा पंच शतकी कीडा काही स्वस्थ बसु देत नव्हता. अगदी गरम पाण्याचा तांब्या डोक्यावरून घेताना देखील मनातल्या मनात आकडेमोड चालुच होती.

त्याच तिरीमिरीत ऑफिस ला जायला निघालो. जीना चढताना बाबु ने हात दाखवला तेंव्हा पण लक्ष नव्हते माझे. स्थिरस्थावर होताच लॅपटॉप उघडला आणि आता excel sheet काढुन परत सगळा खर्च टायपुन काढला. तरी देखील ₹ ५०० चे गौडबंगाल काही निस्तरले नाही. सकाळी सकाळी डोक्याला चालना द्यायची तर चहाचा गरमागरम घोट घेतल्या शिवाय तरणोपाय नाही असे म्हणत बाबुची वाट बघु लागलो. पण आज आपल्याला गरज असताना ती गोष्ट मिळणार नाही याची तरतुदच विधात्याने करुन ठेवली असावी. चहा विलंब योग आजच्या दिनमानात उच्च स्थानी असला पाहिजे.

वेळ मारुन न्यावी या हेतुने जे वर्तमानपत्र हाती लागले ते चाळायला सुरुवात केली. पहिल्याच पानावर बातमी होती “खारघर येथील टोल वसूली सुरु”. नुसता माथळा वाचला आणि माझ्या आकडेमोड्या मेंदूला साक्षातकार झाला. यूरेका यूरेका असे काहीएक न उच्चारता लक्षात आले की आपण जाता येता ज्या काही दमड्या करकरित रस्त्यां वरुन जाण्यासाठी वाटेत दांडी टाकून अडव्या येणाऱ्या टोळ भैरवांच्या दानपेटित टाकल्या त्याची गोळाबेरीज ही जवळ जवळ पाचशे रुपयांच्या घरात जाते. हा सगळा तालेबंद एकदाचा जुळला आणि मनाला जरा बरे वाटले. पण ३०० किलोमीटर साठी ५०० रुपयांचा टोल हे जरा जास्तच वाटले. बर एवढे पैसे देऊन सुद्धा प्रवास बिन त्रासाचा असेलच असे नाही. सुट्टीच्या दिवशी टोल नाक्यांच्या बाहेर लागणाऱ्या रांगा किंवा एखाद्या अपघातामुळे होणारी वाहतुक कोंडी या वर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने होणारी गैरसोय. हे सगळे ते पाचशे रुपये देऊन उसने विकत घेतल्या सारखे आहे.

“साहेब चहा घ्या” बाबु टेबलावर ग्लास ठेवत म्हणाला आणि माझी टोल-समाधी भंग पावली.

माझ्या चेहेऱ्यावर उमटलेले अतिसूक्ष्म प्रश्नचिन्ह बघून बाबुने विचारले “काय साहेब कसला इतका विचार करताय? आणि आज सकाळी सकाळी चहा पिण्या अगोदरच कामाला सुरुवात? कशी झाली पुणेवारी?” या बाबुच्या प्रश्नांची सरबत्ती बघून माझे “सर” अजुनच चक्करल्या सारखे झाले. मी जरा वैतागलेल्या सुरात म्हणालो “अरे हो रे बाबु … इथे माझी बत्ती गुल होता होता वाचली आणि तुझ्या प्रश्नांची धडक मोहीम चालुच आहे. जरा दमाने घेशील? चल चहा दे लवकर म्हणजे जरा तरतरी येईल आणि तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे पण देता येतील.”

या सकाळच्या गडबडी मुळे बाबुला चिमटा काढायला टोलचा विषय आयताच मिळाला होता. आणि त्यावर त्याची टोलवा टोलवी ऐकताना ऑफिस मधल्या कामाची सुरुवात तरी झक्कास होणार होती. इतक्यात बाबुनेच विषय काढला “शनिवार रविवार गेला होता म्हणजे एक्सप्रेस वे चा काय उपयोग झाला नसेल नै?? म्हणजे चारचाकी घेऊन गेला होता की सरकारी वोल्वो ने … शिवनेरी ने?” या बाब्याचे प्रश्न काही केल्या संपत नव्हते. मी आपला शांतपणे चहाचे घोट घशाखाली उतरवत त्याचे कुतूहल वाढवत होतो.
“एक्सप्रेस वे चे काही सांगू नकोस रे बाबु. दीड दोनशे रुपये देऊन पण विशेष फायदा तो कसला??? टोल नाक्यावर शनिवार रविवार मारुतीच्या शेपटाच्या लांबीला लाजवेल अश्या लायनी लागलेल्या असतात.” मी विषयाला हात घातला तसे बाबु म्हणाला “तुमच्या सारख्या गाडी वाल्यांचीच सोय केलिए सरकारने. चांगले रस्ते हवे… गाड्या दामटवायला हव्या मग भरा पैसे आणि जा खुशाल कॉलर ताठ करीत २ तासात पुणे गाठले ओरडत.”
“आधी शंभरीच्या आत असलेली रक्कम आता दोनशे गाठते आहे. असेच राहिले तर जितके पैसे पेट्रोलला लागतील तितकेच या टोळकरींना द्यावे लागतील. अरे आजकाल चांगला रस्ता दिसला कि घाबरायला होते कि पुढे कुठे टोलनाका वाटमारी साठी बसवला असेल कि काय? मस्त रमत गमत गाडी चालवत काही किलोमीटर जायचे आणि मग पुढे हे आपल्या समोर दांडा आडवा टाकुन उभे असतात. ३०-३५ रुपये घेतल्या शिवाय सोडताच नाहीत. ठाण्याच्या लोकांची फारच पंचाईत आहे … कुठूनही बाहेर पडा किंवा आत या टोल भरल्याशिवाय प्रवेशच नाही. घराच्या दरवाज्यांना जसे उंबरठे असायचे तसे ठाणे शहराला टोलनाके आहेत. चांगल्या रस्त्यांनी इंधन बचतीचा दावा करणाऱ्या या लोकांना टोलनाक्यांच्या इथे होणाऱ्या वाहतूक कोंडी मुळे होणारा इंधनाचा अपव्यय दिसत नाही हेच मोठे नवल आहे. राजकारणी लोकांना खुश ठेवले कि कुणीही या आणि कसेही लुटा.” मी थोडे नाराजीच्या स्वरातच बोललो.

“अहो साहेब राजकारणी लोकांनीच तर बांधा वापरा हस्तांतरित करा नावाची योजना आणली ती काय उगाच का? जनतेची सेवा या गोंडस नावाखाली जे काम सरकारने करायचे ते काम राजकारणी लोक बाहेर देतात. बांधून झाल्यावर वर्षानुवर्षे जनते कडूनच त्याचे अव्वाच्या सव्वा पैसे उकळतात. जनतेचे पैसे यांच्या आणि राजकारण्यांच्या तिजोरीत हस्तांतरित होतात पण योजना यांच्या खिशातच राहते. सरकारी तिजोरी रिकामी करायची आणि परत यांचा डोळा जनतेच्या पैश्यावर.” इति आमचा ऑफिस बॉय गणेश.

“किती वेळ लुटत राहणार बिचाऱ्या जनतेला. मोठमोठी आश्वासने देऊन निवडणुका लढवायच्या. त्या आश्वासनांना भुलून जनता भरघोस मतांनी यांना निवडून देते. एकदा का सत्ता मिळाली कि हेच राजकारणी यांच्या वचकनामा, वचननामा, जाहीरनामा या सगळ्या पासून नामानिराळे होतात. वर थातुरमातुर बतावणी चालू होते, ‘आम्ही प्रयत्नशील आहोत, लवकरात लवकर जनतेच्या भल्या साठी निर्णय घेऊ’ वगैरे तोंडपुशी बतावणी चालू होते. कधी ना कधी तरी जाणते मधल्या असंतोषाचा उद्रेक होतो. आणि या असंतोषाच्या तापलेल्या तव्यावर पोळी भाजून घ्यायला काही राजकारणी पक्ष तयारच असतात. या असंतोषाची धुनी बराच काळ धुमसत रहावी आणि सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्या साठी आंदोलने पण घडवून आणतात. टोलच्या मुद्द्याचे मोठे ‘राज’कारण काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील एका पक्षाने ऐरणी वर आणले होते. दिसला टोलनाका कि कर खळळ-खट्याक. बरेच दिवस टोलनाके त्यांच्या आंदोलनाने गाजवले पण नंतर अचानक सगळे शांत. कारण काय तर यांचे संशोधन चालू आहे कि या टोल प्रकरणात काही गफलत आहे का या वर.” चहाच्या प्रत्येक घोटा बरोबर माझे शब्द गेल्या दोन दिवसात दिलेल्या टोलदादां वर आसूड ओढत होते.

कधी नव्हे ते शांतपणे ऐकत असलेला बाबुने त्याचे मौन सोडले. “अहो साहेब, पैश्याचा मामला आहे सगळा. आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा. यांचे संशोधन आपण किंवा ते मरेस्तोवर संपणार नाही. कंत्राटदारांना यांनी इतके डोक्यावर चढवून ठेवले आहे कि यांच्या पुढे सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष हतबल आहेत.  जो कुणी राजकारणी या वर तोंड उघडतो त्याचे तोंड बंद करण्याची कला यांना चांगलीच अवगत आहे. त्यात टोल म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडीच. तिला ते कसे मरू देतील. प्रचंड पैसा खाऊन आणि घोटाळे करून टेंडर पास केल्यावर कंत्राटदारांचे मिंधे झालेले हे राजकारणी त्यांचे काही एक वाकडे करु शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यांच्या वर वचक ठेवायला सरकार तिजोरीत दुष्काळ पसरला आहे. राजकारण्यांची चर-खा संस्कृती याला कारणीभूत असली तरी त्याला आपण देखील तितकेच जबाबदार आहोत. त्यांना जाब विचारण्यासाठी लागणारे ऐक्य आपल्यात नाही. न्यायालय देखील हेच म्हणणार कंत्राटदाराने काम केले आहे त्याचे पैसे त्याला मिळालेच पाहिजेत. लोकांना खुश करण्यासाठी केलेल्या घोषणा भविष्यात महाग पडणार असे दिसते. नाही म्हणता काही टोलनाके बंद केले पण तसेही त्या रस्त्यांवरून होणारी (वर)कमाई विशेष नसावी. एकंदरीत बघता सत्ताधाऱ्यांना त्यांचा गड राखायचा असेल तर या टोलकरींचे काहीतरी करावेच लागेल.”

मी ग्लासातला चहा संपवून टेबलावर ठेवला. ग्लास घेता घेता बाबु म्हणाला “साहेब खरे सांगू … माझ्या सारख्या सामान्य माणसाला या टोलच्या असण्या नसण्या ने काही विशेष फरक पडत नाही. आम्ही प्रवास करणार येष्टीच्या लाल डब्यातून किंवा गावाकडे एखाद्या दुचाकी वरून. दुचाकीला टोल नाही आणि आता येष्टीला टोल मधून वगळण्याचे प्रयत्न चालू आहेत पण त्याने तिकिटावर काही विशेष फरक पडेल असे वाटत नाही. आमचे कोकणातले रस्तेच मुळात अरुंद आणि कमी गर्दीचे कोण टोल बसवणार आणि काय वसुल करणार. आता सगळेच रस्ते कंत्राटदाराला दिले तर घराच्या वेशीतून बाहेर पडल्या पडल्या पावती फाडावी लागेल.  हां ! आता मुंबई गोवा महामार्ग चार पदरी करण्याचे काम चालू आहे. तो एकच रोड बिना टोलचा होता तो झाला कि मग तिथेपण वाटमारी चालू होईल. नशीब अजून रस्त्यावरून चालण्याचा हप्ता घेत नाहीत. तसे झाले तर जनताच यांना टोल-वेल.”

शेवटी एकदा दिलेल्या टोलचे पैसे जमाखर्चात धरल्याने सगळा हिशोब बरोब्बर जुळून आला होता.

अनुविना.

चहाट(वा)ळकी – ०१ : मुंबई ला कोण वेगळे करणार?

आमच्या ऑफिस मध्ये येणारा बाबू चहावाला मोठा आसामी. त्याचे व्यावहारिक तर्क पण आसाम चहा सारखेच एकदम कड़क. मुळात कोकणातला असल्याने साखरेचा हात सढळ असला तरी जिभेवर गोडवा कमीच. बेताची उंची, गोल वाटोळे शरीर, चहाच्या रंगाशी साधर्म्य सांगणारा ताम्बुस काळपट रंग, कंगव्याची गरज न भासेल इतपतच केशसांभार उरलेला, कपाळावर जमिनीला समांतर जाणाऱ्या २ ठसठशीत मस्तकरेषा आणि नाकाच्या सरळ रेषेत उर्ध्वगामी ओढलेले अष्टागंधाचे बोट. पांढरा शुभ्र शर्ट आणि खाली विविध डाग लागलेली मळखाऊ पैंट. ऑफिसच्या जिन्या खालीच एका टेबलावर हा गेली कित्येक वर्ष चहाचा धंदा करतोय आणि आमची अमृततुल्य तृष्णा भागवतोय. रोज सकाळी डाव्या हातात चहाची किटली आणि उजव्या हातात काचेचे ग्लास घेऊन ही मूर्ती आमच्या दरवाज्यात हजर होते. मस्त आलं आणि पातीचहा घालून केलेल्या चहाचा सुवास याच्या येण्याची वर्दी देतो.

प्रत्येकाला चहा देत देत त्याच्या तोंडाची टकळी कायम चालू असते. सगळ्यांशीच त्याचे विशेष सख्य नसले तरी आमच्या दोन चार जणांच्या टेबला पाशी मात्र त्याचे गप्पांचे फड जमतात. त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय म्हणजे राजकारण, सामान्य पब्लिक, टिव्ही वरच्या मालिका आणि क्रिकेट. त्याचे प्रवचन चालते आम्हाला दिलेला चहा संपे पर्यंतच … एकदा का आमच्या हातातील कप रिते झाले कि बाबू “छोट्याश्या ब्रेक नंतर पुन्हा भेटू”म्हणून पसार होतो आणि परत कधी भेटला कि उरलेले प्रवचन पूर्ण करतो. ते जर केले नाही तर कदाचित रात्री झोप लागत नसावी किंवा दुसर्या दिवशी चहाची चव बिघडत असावी असा माझा दाट संशय आहे.

मला बरेच वेळा आश्चर्य वाटायचे कि हा साधा चहावाला एवढ्या वेगवेगळ्या विषयावर आपले मत समर्थपणे कसे मांडू शकतो. “काय नाय साहेब …. डोळे आणि कान उघडे ठेवले कि मुंबई मध्ये सगळ्या गोष्टी कळतात. शिक्षण धड झाले नाही .. मामा मुंबईला घेऊन आला. बघता बघता सगळ शिकवलं मुंबई ने”. खरेच आहे त्याचे म्हणा. कित्येक प्रकारचे रंगाचे ढंगाचे लोकं त्याच्या इथे चहा प्यायला येत असतील आणि याला फुकटात बातमी पुरवत असतील याचा काही नेम नाही. आमच्या साठी मात्र त्याच्या अमृततुल्य चहा सोबत मिळणारे ज्ञानामृत सकाळी सकाळी आमची गात्रे जागृत करून जायची. अशीच ही बाबूची खुमासदार चहाट(वा)ळकी तुमच्यासाठी पण….

“अहो साहेब … हे लोकं वेडे का खुळे?” बाबू कपा मध्ये चहा ओतत म्हणाला. “शिकले सवरलेले हे लोकं काय ना काय कुरापती उचकून काढतात आणि त्या आमच्या सारख्या चहावाल्याला उगीच त्रास देत राहतात”

“अरे देवा! आता तुझे टेबल उचलून नेले कि काय त्या अतिक्रमन विरोधी माणसांनी?” आमच्या ऑफिस बॉयचा उगीच खोचक प्रश्न.

“नाय रे गणेश, माझ्या टेबलाला हात नाय लावू देणार … रीतसर पावती फाडतो मी आणि आपल्या बिल्डींगच्या आवारात असल्याने कुणाची पण हिम्मत नाय” बाबुला मध्येच कुणीतरी प्रश्न विचारला कि बाबूचे कान वाकडे होतात आणि त्याला बाबू त्याच्या मूड प्रमाणे किंवा प्रश्न विचारणार्याची पत बघून वाटेला लावतो.

(इथे आमच्या सारखा चहावाला म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून ती व्यक्ती म्हणजे साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हांला गेल्या सहा महिन्यात कळायला लागले होते. त्यामुळे मी हा प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. ज्या दिवशी मोदी निवडून आले त्या दिवशी बाबू ने आम्हां सगळ्यांना फुकट चहा पाजला होता तो किस्सा परत कधी तरी)

“अहो साहेब, आता मला सांगा तुमच्या ऑफिस मध्ये नवीन साहेब कश्या साठी येतो?? धंदा वाढवण्यासाठीच ना??? मग मुंबई चा विकास करण्यासाठी आमच्या चायवाल्याने जर कुणी साहेब आणायचे ठरवले तर यांच्या पोटात का दुखतंय?” बाबू माझ्या उत्तराची वाट बघत होता.

“अरे बाबू असे काय करतोस. उद्या तुझ्या घरात येऊन तुला कुणी शहाणपणा शिकवायला लागले तर चालेल का?? आता काही जणांना वाटते कि मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचा दिल्लीश्वराचा डाव आहे त्याला कोण काय करणार? आणि या आधी देखील असे प्रयत्न झालेले आहेत मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचे. शेवटी उठाव झाला, मराठी बांधवांचे रक्त सांडले आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. शेवटी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे ना?” चहाचा घुटका घेत घेत बाबूच्या तोंडून काहीतरी श्रवणीय ऐकायला मिळावे या उदात्त हेतूने मी माझ्या तोंडाची वाफ मोकळी केली.

“कसली हो मराठी अस्मिता??” बाबूच्या या पहिल्याच वाक्याने आजचे निरुपण एकदम झक्कास होणार याची खात्री दिली. “मराठी माणूस राहिलाय का या मुंबई मध्ये? सगळे पळाले विरार, डोंबिवली, बदलापूर सारख्या उपनगरांमध्ये. अहो इथे दोन मराठी माणसे देखील एकमेकांशी इंग्रजी किंवा बम्बैय्या हिंदी मध्ये बोलतात. आज कुठलाही मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबई मध्ये घर घेण्याचे स्वप्न देखील बघू शकत नाहीत. दुकानाच्या पाट्या मराठीत करा असा फतवा ठाकर्यांच्या राज ने काढला होता … पण तेरड्याचे रंग तीन दिवस. त्याने पण पब्लीशिटी ष्टंट करून हवा तयार केली “राज”कारणाची. तो अगदी मराठी माणसाच्या भविष्यासाठी गळे काढत असला तरी सध्या त्याला विचारतेय कोण? आणि तसेही हे राजकारणी लोकं आपल्या सोयीचे बघतात.”

बाबूची गाडी सुसाट सुटली होती आणि ती आता राजकारण नावाच्या स्टेशन वर बराच वेळ रेंगाळणार हे नक्की. ते ऐकण्या साठी अजून चार पाच कानाच्या जोड्या सरसावल्या. बाबूचे प्रवचन चालू असताना बाकी कुणी मध्ये बोलायचे नाही हा दंडकच असल्याने प्रत्येक जण आता ही प्रभृती काय सांगणार या आशेवर चहा चा आस्वाद घेत होती.

“राजकारणी लोकं पण मोठे बेरकी … मुद्दा नसला कि असे काही ठेवणीतले विषय अस्मितेच्या नावाखाली भिजत ठेवायचे. अहो असे थोडीच एखादे शहर वेगळे करता येईल ??? काहीतरी कायदा असेलच ना? मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी पण सगळी बकाल करून ठेवली या लोकांनी. येणारे परप्रांतीयांचे लोंढे, वाढणारी गर्दी याच्या कडे मतांच्या बेगमी करीता डोळेझाक करणारे राजकारणी. याच भस्मासुराचा व्यवस्थेवर पडणारा ताण आणि विस्कटलेली मुंबई ची घडी. खरे तर जे आज मराठी अस्मितेचा कैवार घेऊन नाचत आहेत त्यांचीच तर सत्ता आहे मुंबई वर गेली कित्येक वर्ष. मुंबई बद्दल बाहेरचा कुणी बोलायला लागला कि यांना आठवते मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र, हुतात्मा दिवस पण मुंबई मधून मराठी टक्का घसरत असताना हेच राजकारणी कुठल्या श्रींच्या वाड्यावर लपून बसतात कोण जाणे.” बाबूच्या वाणीतून अविरत शब्द गळत होते.

अर्थात खरच होतं त्याचे म्हणणे. पण कुणाला पडली आहे इथे? इथे कामकरी, कष्टकरी वर्गच जास्त. उपनगरातून मुंबई मध्ये यावे, ८-१० तास काम करावे आणि झोपायला आपल्या घरी जावे. कधी रिक्षा वाले छळतात तर कधी टक्षि वाले संप करतात. उपनगरीय रेल्वे वेळेत चालली अशी स्वप्न पडली तरी भीती वाटते गाडी चुकण्याची. कधी नळाला पाणी नाही तर कधी ४ – ४ तास वीज नाही. या सगळ्या भानगडीत मुंबईत मध्ये वावरत असतो तो अस्मिता पिचलेला मराठी माणूस….

कपातला चहा संपत आला तरी मनात बाबूच्या बोलण्याचे विचारचक्र सुरूच होते. जाता जाता बाबू म्हणाला “साहेब काय हरकत आहे …. अजून एक मोठा साहेब आला आणि त्यांनी काही सुधारणा केली तर? आणि आमच्या चायवाल्याने आधीच सांगितले आहे तो असे पर्यंत मुंबई महाराष्ट्रा पासून दूर करणार नाही मग कसली चिंता?”

भेळवाला चाचा

(या कथेतील बरेचसे स्थलकालादी दाखले हे काल्पनिक असून व्यक्तिमत्व मात्र खरे आहे. काल्पनिक गोष्टींचा उपयोग केवळ व्यक्तिमत्व खुलवण्या साठी केला आहे.)

ठाणे कॉलेज मधून डिग्री घेतली आणि तडक पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या विज्ञान संस्था या महाविद्यालयात दाखल झालो. विज्ञान संस्था दादाभाई नवरोजी रोड वर रिगल थेटरच्या समोर असल्याने बरेच वेळा चालतच जायचो. दादाभाई नवरोजी रोडवरील फेरीवाले, दुकानं बघत जाण्यात एक मजा असायची. रोजच्या मिळणाऱ्या पैशांमध्ये गाडीची चैन परवडण्या सारखी नव्हती. महिन्याचे ठराविक असे पैसे मिळत नव्हते त्यामुळे रोजचा हिशोब रोज द्यावा लागे. कॉलेजला कॅंटीन असल्याने आणि आई रोज भरपूर डबा देत असल्याने बाहेरच्या ठेल्यांवर हात मारायची कधी गरजच नाही पडली. एम्.एस.सी. झाल्यावर लगेच BNHS या संस्थेत कामावर रुजू झालो. ही संस्था देखील त्याच परिसरात होती त्यामुळे रोज चालत जाण्या येण्याचा दिनक्रम तसाच होता. पगार चालू झाला असल्याने अधून मधून बाहेर खायचो. त्याच परिसरात फिरून गेट वे वर जीवाची मुंबई करायचो. 😉

एकदा ऑफिस मधून निघायला थोडा उशीर झाला त्यामुळे भूक पण लागली होती. साहेब पण थांबले होते काम करत. दोघांचे काम एकदम संपले तसे ते म्हणाले “चल तुला आज मस्त भेळ खायला घालतो.” आता साहेब घेउन जाणार म्हटल्यावर एखाद्या हॉटेल वर घेउन जाणार, त्यामुळे जरा संकोच वाटत होता. पण त्यांनीच “रस्त्यावरची चालेल ना?” असं विचारून माझ्या मनावरचं ओझं हलकं केलं. रस्त्यावरची भेळ म्हणजे माणशी ५ रुपयांचाच मामला होता. मी एका पायावर तयार. आम्ही चालत चालत बोरा बझार स्ट्रीट च्या कोपऱ्यावर आलो. रस्त्या लगतचा फुटपाथ सगळा फेरीवाल्यांनी व्यापला होता आणि त्या फेरीवाल्यांच्या एका बाजूला हा भेळवाला चाचा. साधारण पन्नाशीच्या आसपास असेल. किरकोळ शरीरयष्टी, अंगात त्याच्या वर्णाला साजेशी अशी मळकट डगलेवजा बंडी, खांद्याला लाल रंगाचा गमछा, मळकट धोती, अर्धे पांढरे झालेले भुरभुरीत केस …. अगदी टिपिकल यूपी, बिहारचा भैया … पण राईच्या तेलाचा मागमूस नसलेला. मुंबईतील फेरीवाल्यांकडे अभावाने मिळणारे चेहेर्यावरचे हास्य आणि अदबशीर बोलणं लक्षवेधक होतं.

साहेब म्हणाले “चाचा, दो मस्त भेल बनाना, मिडीयम तिखा, कांदा ज्यादा”

चाचा: “क्या साबजी, आज बहुत दिनों बाद आना हुवा?” चाचा: “क्या साबजी, आज बहुत दिनों बाद आना हुवा?”

साहेब: “हांजी …. आजकाल थोडा बिझी रेहेता हुं. ऑफिस से निकलनेको टाईम होता है”

चाचा: “आपसे पेहेले ये २ साहबको भेल देनी है. तनिक रुकना पडेगा”

त्याची अस्खलित हिंदी आणि साहेबांची बम्बैय्या हिंदी यात जुगलबंदी चालू होती. मी मात्र भुकेने बेजार झालो होतो आणि चाचा भेळ बनवत होता. टेबलावर एका मोठ्या टोपली मध्ये चुरमुरे होते. एका छोट्या मडक्यात कोळसे पेटवून ते मडके चुरमुर्यांवर ठेवले होते. दर वेळी चुरमुरे घेताना ते मडके एका लकबीने बाजूला करून त्याखाली असलेले गरम गरम कुरकुरीत चुरमुरे चाचा कागदावर घ्यायचा. ३ वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, कांदा, कोथिंबीर, तोतापुरी आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी हे सगळं नीट एकत्र करून त्यावर मस्त बारीक शेव पसरली, लिंबू पिळला आणि एक कडक पुरी टाकली की दुसऱ्या क्षणाला भेळ गिऱ्हाईकाच्या ताब्यात असायची. गप्पा मारताना देखील चाचाचे हात सराईत पण काम करत होते. जणूकाही हातांना सवयच झाली होती. चाचाचे प्रत्येक गिऱ्हाईकाशी बोलणे, नेहेमीच्या गिऱ्हाइकांची केलेली विचारपूस भेळेसारखीच चमचमीत होती, भेळवाला आणि गिऱ्हाईक या व्यावहारिक नात्यापलीकडे जाऊन आपुलकी जपणारी. कुणी कितीही मोठा असेल, घाईत असेल तरीही योग्य क्रमानेच भेळ दिली जायची. इंग्रजीचा गंध नसलेला हा चाचा “first come, first serve” या उक्तीचे इमाने इतबारे पालन करत होता. कागदाच्या त्रिकोणी शंकू मध्ये चाचाने भेळ दिली. जबरदस्त पाणी सुटले होते तोंडाला. भूक पण लागली होती त्यामुळे पहिल्या घासाला तरी चवीचा प्रश्न नव्हता. पहिल्या घासातच या चाचाने आणि त्याच्या भेळीने मला खिशात घातले होते. आधीच त्याच्या व्यक्तीमत्वावर मी फिदा झालो होतो आणि आता ही भेळ. एखादा ऋणानुबंध जुळायला इतकं पुरेसं आहे … नाही का?

नंतर २ – ३ वर्षे भेळेचा आस्वाद घेत होतो. ऑफिस सुटल्यावर चाचा कडे भेळ खाणे हा एक शिरस्ताच झाला होता. चाचाकडे भेळ आणि शेव बटाटा पुरी मिळायची. पण भेळेला जी लज्जत होती ती शेव बटाटा पुरीला नव्हती. चाचा वर्षातून ३ महिने गावी जायचा …. डिसेंबरला गेला की होळी झाली की परत. तो नसताना त्याचा भाऊ आणि पुतण्या धंदा सांभाळायचे. भेळेची चव बदलली नाही पण चाचा सारखी आपुलकी या दोघांकडे नव्हती. दोन भावांमध्ये हाच एक मोठा फरक होता. महानगरपालिकेचा त्रास इतर फेरीवाल्यांप्रमाणे चाचानेही भोगला आहे. अतिक्रमण विरोधी दलाची गाडी आली की हाती लागेल ते जप्त करून घेउन जायची. चाचा जमेल तितके समान वाचवायचा आणि जप्त केलेले समान लाच देऊन सोडवून आणायचा. ज्या दिवशी टेबल नसेल आणि चाचा खाली बसून भेळ बनवत असेल तर समजावे काल चाचाचे टेबल जप्त झाले असणार. दोन चार दिवसांनी परत चाचाचा धंदा टेबलावर विराजमान होत असे. एके दिवशी मी भेळ खात असतानाच फेरीवाल्यांची आरडाओरड सुरु झाली. मनपा ची गाडी आली होती …. समान वाचवण्यासाठी चाचाची एकच धावपळ सुरु झाली. बरंचसं समान वाचवण्यात चाचा यशस्वी झाला पण टेबल आणि चुरमुऱ्याचं टोपलं काही वाचवू शकला नाही. इतर फेरीवाल्यांची पण तीच अवस्था होती. सगळं गाडीत भरल्यावर मनपाचे कर्मचारी टोपलीतल्या चुरमुर्यांवर ताव मारत होत्ते. ते बघून चाचा कळवळला आणि एक जोरदार शिवी हासडली. चाचाच्या तोंडी मी ऐकलेला तोच पहिला आणि शेवटचा अपशब्द. हताश चाचा मला म्हणाला “हरामजादे है सब, चांगेज खान की औलाद, अकेले आते है तो मुफ्त में भेल खाते है और जाब गाडी पे सवार होके आते है तब जो मिलेगा वो लुट ले जाते है. आप चिंता मत करो … हमारे लिये ये सब आये दिनका मामला है” मी म्हटलं “सबकुछ ले जा राहे थे, मुझे लागा मेरी भेल भी लेके जायेंगे” माझे हे वाक्य प्रसंग जरा हलका करण्यासाठी पुरेसे होते. चाचा हसून म्हणाला ” अगर गिऱ्हाईक को हाथ लागायेंगे तो गंगा मैय्या की सौगंध एक एक के हाथ तोड दुंगा. गिऱ्हाईक भगवान होता है और ये सब जानवर” चाचा मधला ‘छोरा गंगा किनारे वाला’ जागा झाला होता. ज्या ठिकाणी ठेला होता त्या ठिकाणी उभे राहून मी आणि चाचा गप्पा मारत होतो. भेळ खाऊन झाली आणि चाचाला पैसे देताना म्हटलं “आज आपके २-४ भगवान ने पैसे डूबाये”. चाचा काहीच बोलला नाही. जणू गिऱ्हाईका बद्दल अपशब्द बोलायचा नाही असा त्याचा दंडकच असावा. चाचा सद्गदीत होऊन म्हणाला “आप नाही भागे? आज पैसा नाही देने केलीये अच्छा मौका था.” मी म्हटलं “चाचा, आपके पांच रुपये छीन कर मुझे क्या मिलेगा? बहुत कम लोग ऐसे मिलते है जो इतने प्यार से खिलाते है. और किसीका पैसा रखना मेरे उसूल में नाही. अगर आज आप नाही मिलते तो कल मै आपका पैसा जरूर दे देता”. चाचा गहिवरला, त्याचे डोळे पाणावले. माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणाला “बेटा, आपने हमे हमारे पिताजी की याद दिला दी” या क्षणा पासून मी चाचाचा साहेब नसून बेटा झालो होतो. मी रस्ता ओलांडून व्हीटी स्टेशन कडे जायला लागलो. एकदाच मागे वळून बघितलं … अपेक्षे प्रमाणे चाचा माझ्या वाटेवरच बघत होता.

पुढे जवळ जवळ ५-६ वर्ष नवी मुंबई येथे नोकरीला असल्याने चाचा आणि त्याची भेळ सुटली. कधी कामानिमित्त त्या परिसरात गेलो तर आवर्जून चाचा ला भेटायला जायचो आणि भेळेचा आस्वाद घ्यायचो. चाचा तेच प्रसन्न हास्य चेहेऱ्यावर ठेवून म्हणायचा “बेटा, आजकाल आते नाही?” मग मी नोकरी बदलल्याचा पाढा वाचायचो. भेळ खाऊन निघालो की चाचा परत येण्याचा आग्रह करायचा.

यशाची अनेक शिखरे पादाक्रांत केली. आणि खऱ्या अर्थाने साहेब झालो होतो. जीवनशैली मध्ये अमुलाग्र बदल झाला होता. यथावकाश लग्न पण ठरले. एकदा होणाऱ्या बायकोला मुंबईला फिरायला घेउन गेलो. जुन्या रस्त्यांवरून फिरताना गप्पांच्या ओघात चाचा आणि त्याची भेळ हा विषय अपरिहार्य होता. ते चालत फिरण्याचे दिवस आणि आत्ताचे अलिशान गाडी मधून फिरण्याचे दिवस यात खुपच तफावत होती. रस्त्यावरील ठेल्यांवर उभं राहून खाणे कधीच बंद झाले होते. पण ५० – ६० रुपये देऊन घेतलेल्या तारांकित हॉटेल मधील भेळेला चाचाच्या प्रेमळ चवीची सर कधीच आली नाही. माझी तळमळ माझ्या होणाऱ्या बायकोने अचूक हेरली आणि चाचाला भेटण्याची इच्छा प्रकट केली. माझ्या अनुमतीची तमा न बाळगता ड्रायवरला गाडी भेळवाल्या कडे नेण्याचे फर्मान सोडले. गाडी बोरा बझार स्ट्रीटच्या कोपऱ्यावर थांबली. चाचाला शोधायला जास्त तसदी पडली नाही. आजूबाजूचे सगळे चित्र जसेच्या तसेच होते, तोच फेरीवाल्यांचा गदारोळ आणि कोपऱ्यावर ठेला घेऊन उभा असलेला माझा भेळवाला चाचा. चाचा आता म्हातारा झाला होता. धंद्याचा पसारा देखील वाढला होता, हाताखाली २ माणसे होती. आता चाचा फक्त पैसे घेण्याचे काम करत होता. चेहेऱ्यावर रोजच्या जीवनातील धकाधकीच्या, कष्टाच्या सगळ्या खुणा रेषांच्या रुपाने झळकत होत्या. हात थकल्यासारखे दिसत होते पण हातांची सफाई तशीच होती. चेहेर्यावरचे हास्य आणि बोलण्यातील आदब तसूभर देखील कमी झाली नव्हती. इतकी वर्षे होऊन देखील चाचाला आपल्या स्मृतीला विशेष ताण द्यावा लागला नाही. “बहुत बडे हो गये हो बेटा. आजकल बिलकुल आते नाही?” चाचा म्हणाला. मी फक्त हसलो. एखाद्या प्रश्नाला उत्तर न देता चेहेर्यावाराचे हास्य कायम ठेवण्याचे कसब या कॉर्पोरेट जगताने शिकवले होते, त्याला तो बिचारा चाचा पुरता अनभिज्ञ होता. माझ्या शेजारी उभ्या असलेल्या तरुणीला बघून चाचाने विचारलं “बहुरानी?” त्याचा असा थेट प्रश्न बघून माझी होणारी बायको जरा चपापली. ज्या आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सगळे दबकून असतात तिथे हा रस्त्यावरचा चाचा आम्हाला “बेटा, बहुरानी” संबोधतो म्हणजे त्याचे आणि माझे खूप जिव्हाळ्याचे नाते असणार हे तिने ओळखले. मी म्हणालो “हा चाचा, ये आपकी बहुरानी”. चाचाने आशीर्वाद दिले “सदा खुश राहो”.

चाचाने स्वतःच्या हाताने आम्हाला भेळ बनवून दिली. माझ्या आधी ४ – ५ जण भेळेसाठी उभे होते. धंद्याचा जुना नियम चाचाने माझ्यासाठी मोडला होता. पोटभर भेळ आम्ही दोघांनी खाल्ली …. अगदी २ -२ प्लेट खाल्ली. इतके वर्षांचा उपास सुटत होता. त्या दिवशी पहिल्यांदा चाचाने भेळेचे पैसे घेतले नाहीत आणि उगाच श्रीमंतीचा बडेजाव आणून मी पण आग्रह केला नाही. चाचा जवळच उभ्या असलेल्या गाडी पर्यंत सोडायला आला. गाडीत बसल्यावर बायकोने नुकतीच घेतलेली पिशवीभर सफरचंद चाचाला दिली. चाचा नको म्हणत असताना देखील बळेच त्याच्या हातात ठेवत म्हणाली “चाचा, बहुरानी बुलाते हो तो ये मेरी भेट रखनी पडेगी”. चाचाचा नाईलाज झाला आणि पाठीवर हात ठेवून म्हणाला “बेटा जैसा तू है वैसीही बहु पाई है. इसे खुश रखना और कभी याद आये तो जरूर चले आना. मै खुद मेरे हातोंसे बनाके दुंगा”. गाडी चालू झाली. थोडं पुढे गेल्यावर एकदाच मागे वळून बघितलं … अपेक्षे प्रमाणे चाचा माझ्या वाटेवरच बघत होता. पण या वेळी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू होते आणि हवेत असलेले हात आम्हा दोघांना आशीर्वाद देत होते.