चहाट(वा)ळकी – ०४ : डर्टी फर्स्ट

३१ डिसेंबर ला ऑफिस मध्ये कधीच विशेष काम नसते. त्यात देखील ज्याचे काम पाश्चिमात्य देशांवर विसंबून असेल त्यांची तर नाताळ नंतर चंगळच.  सरत्या वर्षाला निरोप देणे आणि नवीन वर्षाचे स्वागत करणे याच्या नियोजनातच मेंदूचा बराच भाग कार्यमग्न रहात असल्याने बाकीच्या रोजच्या कामांकडे अंमळ दुर्लक्ष्यच होते. साहेब पण आधीच थर्टी फर्स्टच्या गुंगीत असतो त्यामुळे तो पण काही विशेष बोलत नाही. कधी एकदा ६ वाजतात   आणि घरी पळतो असे भाव चेहेऱ्यावर घेऊन फिरणारी माणसे उगाच दुसऱ्याच्या बे जवळ जाऊन (आजकाल टेबलाला बे म्हणतात बे … आम्हांला एक तर बे म्हटले कि नागपूरकर आठवतात किंवा बे ऑफ बेंगाल आठवतो) उगीच “मग आज काय प्लान ३१ स्ट चा?” “ओली का सुकी?” “घरीच? का कुठे बाहेर हॉटेल वर?” असले एक ना अनेक प्रश्न विचारून वात आणतात. किंवा आपण कश्या पद्धतीने सरत्या वर्षाला निरोप देणार आहोत आणि ती कशी आगळीवेगळी आहे हे सांगून उगीच न्यूनगंड वाढवत राहतात. यांची थर्टी फर्स्ट कशी रंगली, किती बाटल्या संपल्या ते किती जण आडवे झाले याची सोमरसभरित वर्णने दुसऱ्या दिवशी कुणाला सांगितल्या शिवाय यांचा उतारा होत नाही.
अश्यातच कुणी एखादा संस्कृती रक्षक भेटला तर मग लपण्या साठी आडोश्याला जागा पण मिळत नाही. नेमका अश्या वेळीच त्यांना हिंदू असल्याचा साक्षातकार होतो आणि त्यांचा जाज्वल्य अभिमान जागा होतो. आपण आपली साधी माणसे जगरहाटी प्रमाणे वागावे…. सगळे जग या ग्रेगोरियन तारखे प्रमाणे चालते की नाही. मग नविन वर्षाचे उत्साहाने स्वागत केले तर बिघडले कुठे??? अहो वाढदिवस तारखेनेच साजरा करता ना?? पगार तारखेने येतो का तिथी ने??? आणि बरे आम्ही झेपेल तितकिच थर्टी फर्स्ट साजरी करतो आणि गुढीपाडवा अगदी साग्रसंगीत पारंपारिक पद्धतीने. आणि हो आजकाल एक नविनच फ्याड निघाले आहे. गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री अमावास्येच्या किर्रर्रर्र अंधारात फटाक्यांची रोषणाई करायची ….. त्याला पण हजेरी लावतो. आकाशातील आतिशबाजी बघुन मान अवघडायची वेळ आली तरी बेहत्तर पण शेवटच्या लवंगीचा शेवटच्या सुरसुरीचा आवाज ऐकुनच घरचा रास्ता पकडतो. थर्टी फर्स्टला मात्र बरेच जण रास्ता आधी मोजतात आणि त्या भानगडित गल्ली चुकतात. मग उगीच कशाला नको त्या ठिकाणी हिंदु अस्मिताची खिंड लढवत बसायची. पण समोरच्याला आपण कसे संस्कृतिचे पाईक आहोत हे दाखवून दिल्याशिवाय यांचा कंडू शमतच नाही. आणि दुसऱ्या दिवशी हेच हिन्दू संस्कृति सम्राट डोळे तारवटलेल्या अवस्थेत ऑफिस मध्ये येऊन लिम्बु पाण्याचा मारा करतात तेंव्हा यांची बेगडी संस्कृति कुठल्या पेल्यातल्या पेयात फसफसुन बाहेर पडते ते सांगायला कुणाचीही गरज लागत नाही.
या वर्षीची थर्टी फर्स्ट मस्त थंडीची गुलाबी शाल पांघरूनच आली होती. दुसऱ्या दिवशी ऑफिस ला जायचे म्हणून सगळ्या धामधुमीला काट मारून टेलिव्हिजन वरील मायमराठीचा कैवार घेतलेले दिलखेच अदा आणि अंगविक्षेपानी भरगच्च कार्यक्रम बघितले आणि झोपी गेलो. थोड्याच् वेळात कसलेसे भयानक स्वप्न पडले आणि घामाघुम होवून जागा झालो. बायकोला म्हणालो “स्वप्नात काळाकुट्ट काळोख बॉम्बस्फोट आणि किंकाळ्या ऐकल्या.” बायको म्हणाली “झोपा, एक तारखेचा एक वाजला तरीही अजून काही मर्काटांची थर्टी फर्स्ट संपली नाहिये. त्यांचाच आरडा ओरडा आणि फटाके वाजवणे चालु आहे. झोपा आता त्यांना माणसात यायला वेळ लागेल.” त्यांच्या या असल्या सेलिब्रेशनला शिव्या देत कधी झोप लागली ते कळलेच नाही.
एक तारखेला ऑफिसला जात होतो तर शहराला जाग यायचीच होती. नेहेमी सकाळच्या धावपळीत गुंग असलेले शहर आज दिवसभर दंगा करून, रात्रीचे जागरण करून निवांत झोपलेल्या एखाद्या तान्ह्या बाळासारखे भासत होते. शहराच्या आसमंतातली थर्टी फर्स्ट ची धुंदी, नशा का काय म्हणतात ती अजूनही उतरली नव्हती. वर कधी नव्हे ती तुरळक गर्दी नविन वर्षाची पहिलीच तारीख उदासीन करत होती. बाकी सगळे जरी नित्यनेमाचे असले तरी वातावरणात थर्टी फर्स्ट रात्रीच्या सारखा जल्लोष … तजेला नव्हता. अश्या वेळेला हमखास आठवण होते ती बाबुची आणि त्याच्या चहापान युक्त गप्पांची. आज असेल चहा का नववर्षाची सुट्टी घेतली असेल बाबू ने हा विचार करत करतच ऑफिस पाशी पोचलो. नेहेमी प्रमाणे बाबू मोठ्या भांड्यावर त्याच्या हातातील मोठ्या डावेने चहा ढवळत बसला होता. मला बघताच बाबू म्हणाला “साहेब आज तुम्हीच पहिले. कुणीच आलेलं नाहीये अजून. या खालीच चहा प्यायला … थोड्या गप्पा पण मारू. नाय तरी आज आरामच आहे. मोठे साहेब पण येणार नाहीयेत …. लंबी छुट्टी वर गेले आहेत म्हणे”. मी हो म्हणून वर सटकलो, “आयला … याला बरी सगळी खबर असते … साहेब कुठे गेलाय, ऑफिस मध्ये कोण कोण आलंय” (स्वगत)

खरंच काही ऑफिस बॉय सोडले तर बराचसा कर्मचारी वर्ग अजून आलेला नव्हता. माझ्यासारखी थोडक्यात थर्टी फर्स्ट साजरी केलेली ४-५ टाळकी वगळता ऑफिस मध्ये शुकशुकाट होता. आणि जे होते त्यांच्या मध्ये २०१४ चे सेलिब्रेशन आणि लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिस याबद्दल जरा नाराजीच होती. या पुढे तरी पुढील वर्षी तरी १ तारखेला सुट्टी मंजूर करून घ्यायला हवी या आणि अश्या सारख्या अनेक विविधांगी मुद्द्यांवर गोलमेज परिषद चालू होती. सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन स्थानापन्न झालो. उत्तरादाखल आलेल्या शुभेच्छांमध्ये हा आपला सण नाही, आम्ही साजरा करत नाही असा देखील सूर होता. अर्थात या सगळ्या सुरावटी कडे दुर्लक्ष्य करून मी खाली चहापाना साठी गेलो आणि आमचा “चाय विथ बाबू” कार्यक्रम सुरु झाला.

“काय मग साहेब केले का सेलिब्रेशन??” – बाबु
“नाही रे … सेलिब्रेशन कसले करतोस? आम्ही ना ग्लासातले ना तंगडीतले. आमचे सेलिब्रेशन पावभाजी, भेळ, मिसळ, मसाला दुध, आईसक्रिम अश्या कोजागिरी मेन्यू वर संपते. रात्री १२ पर्यंत उगीच जागत बसायचे, एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आणि झोपी जायचे. हेच गेली कित्येक वर्षे चालू आहे. मुलं तर दमून भागून केंव्हाच झोपून जातात. मग उरतो आम्ही दोघेच.” – मी
“अहो मग जायचे ना कुठे तरी फिरायला … मुलाना पण ख्रिसमस ची सुट्टी असते. आणि इथे पण काही विशेष काम नसेलच. जायचे जरा लोणावळा, लवासा, अलिबाग, मुरबाड किंवा तिथे विरार वसईच्या पुढे कुठेतरी. जास्त सुट्टी मिळाली तर येवा कोंकण आपलोच असा.” – बाबु
“अरे कसले काय …. साहेब जातो सुट्टीवर त्यामुळे आम्हाला झकत ऑफिस मध्ये थांबावे लागते. आणि तसेही तू म्हणतोस त्या सगळी कडे आधीच गर्दी झालेली असते. जे अंतर जायला २ तास लागतात तेच अंतर अश्या वेळी ४-४ तासात देखील कापता येत नाही. सगळ्या जणांना इच्छित स्थळी पोचण्याची घाई झालेली असते. आणि तिथे जाऊन काय तर रात्रभर दंगा, मोठमोठ्या आवाजात डीजे. यात हाती काय लागते तर अस्वस्थता, जीवाचा कलकलाट. त्यात वर तळीरामांचा उच्छाद, त्यांची भांडणे, हे सगळे नको होऊन जाते. याच कारणामुळे नियमित वर्षा सहलीला जात होतो ते पण बंद झाले.” – मी
“अहो मग इथे कुठे तरी जायचे ना हॉटेल मध्ये वगैरे” – बाबु
आज बाबु माझे वैचारिक चावे घेण्याच्या मूड मध्ये होता. एवढे सांगून देखील या महात्म्याला का समजत नव्हते कि बाबा रे सध्या ज्या प्रकारे हे उत्सव साजरे केले जातात ते मलाच काय माझ्या सारख्या बऱ्याच माणसांना झेपत नाहीत. आम्ही पुरोगामी असलो तरी आम्ही आमची संस्कृती सोडलेली नाही. तरी देखील ज्या इंग्रजांनी आमच्यावर वर्षोनुवर्षे राज्य केले त्यांचे सण जरी नावापुरते का होईना आम्ही साजरे करतो. आम्ही वर्षातून एकदाच शिमगा करतो पण यांचा प्रत्येक सण शिमगोत्सवा सारखा साजरा केला जात असेल तर ते न झेपणारे आहे.
“अरे किती प्रचंड गर्दी असते त्या हॉटेल मध्ये. तासंतास थांबून जेंव्हा नंबर लागतो, बसायला टेबल मिळते तोपर्यंत अन्नावरची वासना आणि पोटातली भूक दोन्ही मृतवत झालेल्या असतात. आणि अश्या वेळी समोर जे येईल त्याच्या दर्ज्याची कल्पना/अपेक्षा न केलेली बरी. आपल्या नंतर देखील तिथे इतके लोकं रांगेत उभे असतात कि तिथला वेटर देखील कधी एकदा हे ऑर्डर संपवतात आणि जागा रिकामी करतात अश्या निरागसतेने बघत असतो. त्याला बघुन डेझर्ट पण डेझर्ट सारखे वाटायला लागते” – मी
“छे! तुम्ही सगळा मजाच घालवला. मला वाटले काहीतरी रसभरीत वर्णन ऐकायला मिळेल तर कसले काय …. तुम्ही तर पार गळपटले. मी आणि बायको मस्त चौपाटी वर गेलो … भेळ पूरी खाल्ली …. गाडी वरचा फालूदा खाल्ला आणि घरी येऊन निवांत झोपलो. पोरं गेली होती त्यांच्या फ्रेंड्स कडे. पोरगा आता वयात आलाय. दरवाजा उघडताना पाहिले कुत्र्यासारखे हुंगले त्याला … खात्री केली आणि मगच घरात. दोघांना व्यवस्थित पूर्ण कपड्यात धाडले होते. जिथे जाणार तिकडचा पत्ता, फोन नंबर सगळे घेतले होते आणि मगच परवानगी दिली. आधी थोड़ी कुरबुर केली दोघांनी पण मी आणि बायको ठाम होतो. ही माहिती दिलीत तरच जायला मिळेल. साहेब आपण संस्कार करतो पण संगत कशी असेल हे काय सांगू शकतो. मी दिवसभर इथे धंद्यावर … बायको पोळी भाजी केंद्रात नोकरीला. फार पैश्याचे सुख देऊ शकत नाही पण निदान पुरेसे शिक्षण आणि संस्कार तर देऊ शकतोच ना.” – बाबु
“हो रे अगदी खरे आहे. माझी मुले लहान आहेत पण हाच विचार नेहमी करत असतो. रस्त्यावरुन फिरणाऱ्या हुल्लडबाज टोळक्या मध्ये आपले पोर असावे असे कुठल्या आई बापाला वाटेल? त्यात वाढती गुन्हेगारी, वाईट संगती मुळे लागणारी व्यसने यांचा सारासार विचार करण्याची कुवतच हरवत चाललेला तरुण वर्ग बघितला की चिंता वाटते. चिमुटभर पैश्यासाठी काहीही विचार न करता सरसावणारी, मना विरुद्ध घडले की घरातून पळून जाणारी वेळ प्रसंगी जीव देणारी कॉलेज वयीन मुले बघितली की त्यांच्या आई बापाचा विचार मनात येतो. सगळी दुःख सहन करुन मुलांना जन्म द्यायचा, दिवसभर राबुन, कष्ट करून त्यांचे शिक्षण पूर्ण करायचे … त्यांना समाजात वावरण्याची समज द्यायची आणि एखाद्या नाजुक क्षणी लागलेली वाईट संगत जर या सगळ्या कष्टावर पाणी फिरवत असेल तर काय करावे. त्यातून डोलारा सावरला तर ठीक नाहीतर कशाला ९ महीने पोटात पिंड वाढवून त्याला ब्रह्मांड दाखवले असे त्या मायबापाला वाटले तर चुकले कुठे त्यांचे? काल आजूबाजूच्या बिल्डींग मधून १२ वाजताना एकदम गोंगाट, आरडाओरड, किंकाळ्या ऐकायला आल्या. या हल्लकल्लोळालाच जल्लोष म्हणत असतील तर असे उत्सव साजरे न केलेलेच बरे.” – मी
“अहो साहेब, या सगळ्या बेजबाबदारपणाला आपण देखील तितकेच जबाबदार आहोत. नोकरी करणाऱ्या आई बापांचे लक्ष नाही. पैसा आणून दिला कि काम झाले असे थोडीच होते. लहानपणी लालूच दाखवतच मुलांना मोठे केले. पराकोटीचे लाड आणि पराकोटीची शिस्त या दोन्ही गोष्टी नव्या पिढीसाठी मारक ठरू शकतात. आई बाप डीस्कोच्या ठेक्यावर नाचतात मग त्यांच्या मुला मुलींनी त्यांचे अनुकरण केले तर वाईट वाटून घेण्यात काय अर्थ आहे? आज मित्रां बरोबर ओली पार्टी करून आल्यावर घराच्या पायऱ्या सुद्धा न चढता येणाऱ्या बापाला त्याचा मुलगा पायरी सोडून वागू लागला तर त्याला दुषणे देण्याचा नैतिक अधिकार राहतो का? आपल्या लहान मुलांसमोर नवरा बायको तोंड सोडून भांडत असतात आणि ते बघून मुलांनी पुढे जर उलट उत्तरे दिली तर मुल बिघडले असे म्हणून मोकळे होता … पण त्याचे मूळ कारण आपणच आहोत हे लक्षात येत नाही. आपल्या मुला मुलींना मैत्रीपूर्ण वागणूक द्यायचे नवीन फ्याड आले आहे. चांगलेच आहे ते या मुळे सुसंवाद वाढायला मदतच होईल. पण व्यक्ती स्वातंत्र्याला मर्यादा, संयम आणि संस्कारांची चौकट असायलाच हवी नाहीतर अजून काही वर्षांनी थर्टी फर्स्ट डर्टी फर्स्ट व्हायला वेळ लागणार नाही.” – बाबु

साधारण शिकलेला बाबू देखील सभोवतालची परिस्थिती पाहून शहाणा झाला. आपण मात्र अजूनही पैसे कमावण्याच्या कोलुला जखडून घेतले आहे. घरात सुसंवाद राहिले नाहीत तर हे डर्टी फर्स्ट चे लोण हळू हळू गुढीपाडाव्याच्या औक्षणा पर्यंत कधी येऊन पोहोचेल याचा पत्ता लागणार नाही. आजचा चहा जरा जास्तच कडक असला तरी त्याचा तजेला मात्र नववर्ष्याच्या उदासीन वातावरणात हरवला होता.

अनुविना.

चहाट(वा)ळकी – ०२: संधिसाधू राजकारणी

पाकिस्तानातील पेशावर येथे एका शाळेवर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबाराने अनेक कोवळ्या मुलांचे प्राण घेतले, अनेक मुलांना जायबंदी केले. जि मुले वाचली त्यांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याचा विचारच करवत नाही. प्रसार माध्यमांनी या बातमीचे हल्ले वाचकांवर सुरु केले. जगातील मान्यवर लोकांची टिप्पणी ते ट्वीप्पणी, निधर्मी ते स्वधर्मी लोकांच्या राग, लोभ, द्वेष, मत्सर आदी रसांनी ओतप्रोत वाहणारी मनोगते, शब्दबंबाळ रकाने यांचा भडीमार करण्याची ही आयती संधी सोडली नाही. कशी सोडणार? हेच तर ते विकतात. फेसबुक, Whatsapp सारख्या आभासी जगात तर दोन परस्पर विरोधी भावनांच्या, विचारांच्या, संवेदनांच्या नद्या अगदी दुथडी भरून वाहात होत्या …. त्यात एक “झाले ते अतिशय वाईट झाले. दहशतवादाचा समूळ नाश करायलाच हवा” आणि दुसरी याच्या विरोधी “अतिशय उत्तम झाले … पाकिस्तान सारख्या देशात हे आज ना उद्या होणारच होते … आमच्या इथे आतंक पसरवून लाडू वाटता, जल्लोष करता काय?” काही जण होते मध्येच गटांगळ्या खाणारे जे म्हणत होते कि “पाकिस्तान बद्दल झाले याचे काही वाटत नाही कारण आपला एक नंबरचा शत्रू आहे पण त्या बिचाऱ्या लहान मुलांना कशाला मारायचे.” त्यामुळे जे झाले त्याच्या बद्दल सामान्य नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमावस्था वाढवण्या साठी कारणीभूत ठरले फेसबुकी आभासी विश्व.

इतिहासातले दाखले देत आमच्या ऑफिस मध्ये चर्चेला उधाण आले होते. गट अर्थात वर नमूद केल्या प्रमाणे ३ …. जहाल, मवाळ आणि या दोन्ही मध्ये नसलेले.

मवाळ: “कुठलीही हिंसा वाईटच हो मग ती कुठे का केली असे ना? मानवता हाच सर्व श्रेष्ठ धर्म. आणि त्यांनी पण म्हटले आहेच कि अशी हिंसा इस्लाम ला मंजूर नाही म्हणून. अश्याच दहशतवादा मुळे आपले कित्ती नुकसान झाले आहे. सकाळी मुले शाळेत जातात आणि मग बातमी येते कि शाळेत दहशतवादी आले आणि त्यांनी हिंसा केली. काही माणुसकी नाहीच या दहशतवाद्यांना. इतक्या निरागस मुलांवर बंदुकीची नळी ठेवून तिचा चाप तरी कसा ओढता येतो? उगीच कुठल्याही धर्माला टार्गेट करून हे लोकं सगळ्यांनाच दहशतवादी म्हणून मोकळे होतात. याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे आणि निष्पाप जीवांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी १ मिनिटाची शांतता पाळली पाहिजे किंवा कॅण्डल मार्च केला पाहिजे”

जहाल: “काही नाही … मेणबत्त्या कसल्या लावताय? निषेध कसले नोंदवताय? त्या देशाची तीच लायकी आहे. आज पर्यंत आपल्या देशात घुसून आपल्या माणसांना मारल्यावर कधीच तुम्ही इतक्या सहिष्णू प्रतिक्रिया दिल्या नाहीत. तुम्ही काळे फोटो चढवता एक दिवसा पुरते किंवा मेणबत्ती लावून मोकळे होता. अल कायदा सारख्या सापाला आश्रय दिल्यावर एक ना एक दिवस तो पकड्याना चावणारच होता. आणि लहान मुलांचे म्हणाल तर ती मोठी झाल्यावर आपल्या विरूद्धच गरळ ओकणार ना? आणि तसेही त्यांच्या धर्माच्या कृपेने खोऱ्याने मुले असतात त्यांना.”

मवाळ: “अरे रे … किती निष्ठुर विचारांचे आहात … बोलवते तरी कसे तुम्हाला हे सगळे? आम्ही शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवणार. आज ना उद्या त्या दहशतवाद्याना त्यांच्या कृत्याचा पश्चात्ताप होईलच.”

जहाल: “काही पश्चात्ताप वगैरे होत नाही. याना लहानपणापासून जिहादाचेच शिक्षण दिलेले असते. यांच्या मदराश्यांमध्ये इतर शिक्षणापेक्षा हिंदू द्वेषाचे डोस पाजले जातात. नुसते निषेध पाळून यांना काही फरक पडणार नाही. सर्व शक्तीनिशी लष्करी कारवाई करून यांचे समूळ उच्चाटन करायला हवे. आज इस्त्रायल सारखा छोटासा देश या सगळ्यांना पुरून उरतो कारण त्या लोकांचा प्रखर राष्ट्रवाद आणि देशभक्ती. स्वराज्य आणि सुराज्य ची स्थापना करण्यासाठी शस्त्र हाती धरायची तयारी हवी मेणबत्त्या नाही.”

या सगळ्या गोंधळात हरवलेला मी सकाळी आल्या आल्या बाबू चहावाल्याची आतुरतेने वाट बघत होतो. माझ्या मनातल्या या वैचारिक वादळावर त्याचे शब्द म्हणजे अक्सीर इलाज. पण हा पठ्ठा आज नेमका उशीर करत होता आणि मला परत त्या वर्तमानपत्रातील भूतकाळाच्या काळ्या सावल्यांकडे बघायची देखील इच्छा नव्हती. संगणक चालू करून कामाला सुरुवात केली खरी पण बाबूचा कटिंग चहा प्यायल्या शिवाय चालना मिळणे कठीण झाले होते. आजूबाजूच्या कोलाहलात देखील बाबूच्या चहाचा सुगंध लपून राहिला नाही. मनात म्हटले आला एकदाचा हा बाब्या. खरे तर तो माझ्या जागेवर येई पर्यंत धीर धरणे भाग होते.

तो आल्या आल्या चहा भरताना मी विचारले “काय रे बाबू … आज उशीर केलास? मला वाटले तु पण निषेध नोंदवायला गेलास कि काय? किंवा मेणबत्ती घेऊन उभा राहिला आहेस कि काय?”

“काय बोलताय साहेब??? कसला निषेध?? कसली मेणबत्ती ??? ज़रा सकाळी दूध मिळायला उशीर झाला म्हणून तुम्हाला चहा द्यायला उशीर झाला. तुम्हाला काय वाटले त्या लोंढया मध्ये हा बाबू पण सामिल झाला की काय?” इति बाबू.

“हो मग … तुला कधीच एवढा उशीर होत नाही आणि सध्या इतके वातावरण तापलेले आहे की काय विचारु नकोस. वर्त्तमान पत्राचे पाहिले पान वाचावेसेच वाटत नाही. गेले दोन तिन दिवस तर सारख्या त्या दहशतवाद्यांच्या आणि त्या पाकिस्तानच्या बातम्या रकाने च्या रकाने भरून वाहत आहेत”…..

“अहो साहेब” माझे बोलणे मध्येच थांबवत बाबू म्हणाला आणि मी पण जरा सावरून बसलो. “सगळे वाहत्या गंगेत हात धुवून घेत आहेत … भारतातले लोक किती सहिष्णु आहेत. पाकिस्तान सारख्या कट्टर जन्मजात शत्रु वर आलेल्या संकटाने इथे लोकांना किती मानसिक धक्का बसला आहे आणि किती दुःख झाले आहे. पाकिस्तान दहशतवादाला कधीच थारा देणार नाही असे बरेच काही बाहि लिहून आले असेल पण पाकिस्तानची भुमिका ही कधीच भारताच्या दृष्टीने चांगली राहिली नाहिये. अगदी इथे जेंव्हा धुमश्चक्री चालु होती तेंव्हा तिथे आनंदाच्या उकळ्या फूटत पण असतील आणि हे सुद्धा आपल्याला प्रसार माध्यमांनी रंगवुन सांगितले असेल तिथल्या मुठभर लोकांच्या प्रतिक्रिये वरुन. तिथल्या सामान्य माणसाला काय वाटते हे कायम गुलदसत्यात राहिले आहे. तिथल्या नागरिकाला भारतिया प्रमाणे स्वातंत्र्य नाही. आणि सहिष्णुता व्यक्त करणे हे आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिशय महत्वाचे पाऊल आहे.”

(कमाल आहे याला अंतरराष्ट्रीय राजकारण कधी समजायला लागले? एका संभ्रमावस्थेतून दुसऱ्या संभ्रमावस्थेत मेंदुचे भ्रमण होत होते.)

“आमच्या चायवाल्याने देखील हेच केले. त्याच्या कडून उकळीची अपेक्षा असताना हा फुंकर मारून मोकळा झाला त्याच बरोबर जम्मू काश्मीर मधील जनतेचा रोष होणार नाही याची तजवीज करुन ठेवली. इतके वर्षानी तिथे होणाऱ्या निवडणुकी मध्ये भाजपाला काही आशा निर्माण झाली आहे ती हा अशीतशी फुकट जाऊ देईल होय?? पाकिस्तानशी बोलणी नाकारुन त्याने आधीच आपली चाल खेळला आहे. त्यात काश्मीर मधील पुराग्रस्त भागाला पूर्ण सहाय्य दिल्या मुळे तेथील जनतेला प्रथमच भाजपा बद्दल विश्वास निर्माण होतोय. अश्या वेळी आमचा हा बनिया उगीच तोंडाची वाफ घालवणार नाही.”

(मनात विचार आला बापरे काय बडबडतो हा. कस्स कळते याला?? इतका सारासार विचार करण्याची कुवत आपल्यात का नाही.)

“आता इकडच्या लोकांचे म्हणाल तर स्वधर्मी आणि निधर्मी यांचा कलगी तुरा कायम बघायला मिळणार. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत … एक नसेल तर दुसऱ्याला किंमत नाही. तसे दोघेही आतातायीच … एकाने बोंब मारायचा अवकाश दूसरा लगेच शिमगा करायला तैयार. कालांतराने दोघेही विसरून नविन संधी शोधत बसतात.”
बाबू आता निर्वाणीचा टोला हाणणार हे माझ्या सकट त्याच्या इतर श्रोत्यांच्या ध्यानात आले होते.

“एक सांगा हे दोन्ही पक्ष आपल्या घरात म्हणजेच भारतात काही झाले तर कुठल्या बिळात लपून बसलेले असतात??? रोजच्या रोज होणारे स्त्रियां वरचे अत्याचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पैश्यांचे घोटाळे अश्या वेळेस यांचे वाग्बाण कसे काय निष्प्रभ होतात. नक्षलवादी जेंव्हा आपल्याच पोलिसदलाची कत्तल करतात, सिमेवरून शेजारी घुसखोरी करतात त्याच्या विरुद्ध साधा ब्र निघत नाही यांच्या तोंडातून. काहिनाही हे सगळे एकजात संधीसाधू आहेत. ज्यांना काही काम नाही तेच असे बेताल विषय घेऊन चघळत बसतात. आधीच्या मुद्द्यांचा चावून चावून चोथा झाला की आपली प्रसार माध्यमे आणि राजकारणी दूसरा विषय चघळायला देतात आणि यांचा रावंथ परत सुरु होतो. या पेक्षा आपण बरे आणि आपले काम बरे…. चहा घ्या … थंड होईल.

खरच या बाकीच्या चालु असलेल्या वादापेक्षा बाबुचा तरतम विश्लेषक संवाद अधिक मोलाचा … त्याच्या अमृततुल्य चहा प्रमाणेच.

चहाट(वा)ळकी – ०१ : मुंबई ला कोण वेगळे करणार?

आमच्या ऑफिस मध्ये येणारा बाबू चहावाला मोठा आसामी. त्याचे व्यावहारिक तर्क पण आसाम चहा सारखेच एकदम कड़क. मुळात कोकणातला असल्याने साखरेचा हात सढळ असला तरी जिभेवर गोडवा कमीच. बेताची उंची, गोल वाटोळे शरीर, चहाच्या रंगाशी साधर्म्य सांगणारा ताम्बुस काळपट रंग, कंगव्याची गरज न भासेल इतपतच केशसांभार उरलेला, कपाळावर जमिनीला समांतर जाणाऱ्या २ ठसठशीत मस्तकरेषा आणि नाकाच्या सरळ रेषेत उर्ध्वगामी ओढलेले अष्टागंधाचे बोट. पांढरा शुभ्र शर्ट आणि खाली विविध डाग लागलेली मळखाऊ पैंट. ऑफिसच्या जिन्या खालीच एका टेबलावर हा गेली कित्येक वर्ष चहाचा धंदा करतोय आणि आमची अमृततुल्य तृष्णा भागवतोय. रोज सकाळी डाव्या हातात चहाची किटली आणि उजव्या हातात काचेचे ग्लास घेऊन ही मूर्ती आमच्या दरवाज्यात हजर होते. मस्त आलं आणि पातीचहा घालून केलेल्या चहाचा सुवास याच्या येण्याची वर्दी देतो.

प्रत्येकाला चहा देत देत त्याच्या तोंडाची टकळी कायम चालू असते. सगळ्यांशीच त्याचे विशेष सख्य नसले तरी आमच्या दोन चार जणांच्या टेबला पाशी मात्र त्याचे गप्पांचे फड जमतात. त्याचे विशेष जिव्हाळ्याचे विषय म्हणजे राजकारण, सामान्य पब्लिक, टिव्ही वरच्या मालिका आणि क्रिकेट. त्याचे प्रवचन चालते आम्हाला दिलेला चहा संपे पर्यंतच … एकदा का आमच्या हातातील कप रिते झाले कि बाबू “छोट्याश्या ब्रेक नंतर पुन्हा भेटू”म्हणून पसार होतो आणि परत कधी भेटला कि उरलेले प्रवचन पूर्ण करतो. ते जर केले नाही तर कदाचित रात्री झोप लागत नसावी किंवा दुसर्या दिवशी चहाची चव बिघडत असावी असा माझा दाट संशय आहे.

मला बरेच वेळा आश्चर्य वाटायचे कि हा साधा चहावाला एवढ्या वेगवेगळ्या विषयावर आपले मत समर्थपणे कसे मांडू शकतो. “काय नाय साहेब …. डोळे आणि कान उघडे ठेवले कि मुंबई मध्ये सगळ्या गोष्टी कळतात. शिक्षण धड झाले नाही .. मामा मुंबईला घेऊन आला. बघता बघता सगळ शिकवलं मुंबई ने”. खरेच आहे त्याचे म्हणा. कित्येक प्रकारचे रंगाचे ढंगाचे लोकं त्याच्या इथे चहा प्यायला येत असतील आणि याला फुकटात बातमी पुरवत असतील याचा काही नेम नाही. आमच्या साठी मात्र त्याच्या अमृततुल्य चहा सोबत मिळणारे ज्ञानामृत सकाळी सकाळी आमची गात्रे जागृत करून जायची. अशीच ही बाबूची खुमासदार चहाट(वा)ळकी तुमच्यासाठी पण….

“अहो साहेब … हे लोकं वेडे का खुळे?” बाबू कपा मध्ये चहा ओतत म्हणाला. “शिकले सवरलेले हे लोकं काय ना काय कुरापती उचकून काढतात आणि त्या आमच्या सारख्या चहावाल्याला उगीच त्रास देत राहतात”

“अरे देवा! आता तुझे टेबल उचलून नेले कि काय त्या अतिक्रमन विरोधी माणसांनी?” आमच्या ऑफिस बॉयचा उगीच खोचक प्रश्न.

“नाय रे गणेश, माझ्या टेबलाला हात नाय लावू देणार … रीतसर पावती फाडतो मी आणि आपल्या बिल्डींगच्या आवारात असल्याने कुणाची पण हिम्मत नाय” बाबुला मध्येच कुणीतरी प्रश्न विचारला कि बाबूचे कान वाकडे होतात आणि त्याला बाबू त्याच्या मूड प्रमाणे किंवा प्रश्न विचारणार्याची पत बघून वाटेला लावतो.

(इथे आमच्या सारखा चहावाला म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून ती व्यक्ती म्हणजे साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आम्हांला गेल्या सहा महिन्यात कळायला लागले होते. त्यामुळे मी हा प्रश्न विचारण्याचे धाडस केले नाही. ज्या दिवशी मोदी निवडून आले त्या दिवशी बाबू ने आम्हां सगळ्यांना फुकट चहा पाजला होता तो किस्सा परत कधी तरी)

“अहो साहेब, आता मला सांगा तुमच्या ऑफिस मध्ये नवीन साहेब कश्या साठी येतो?? धंदा वाढवण्यासाठीच ना??? मग मुंबई चा विकास करण्यासाठी आमच्या चायवाल्याने जर कुणी साहेब आणायचे ठरवले तर यांच्या पोटात का दुखतंय?” बाबू माझ्या उत्तराची वाट बघत होता.

“अरे बाबू असे काय करतोस. उद्या तुझ्या घरात येऊन तुला कुणी शहाणपणा शिकवायला लागले तर चालेल का?? आता काही जणांना वाटते कि मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचा दिल्लीश्वराचा डाव आहे त्याला कोण काय करणार? आणि या आधी देखील असे प्रयत्न झालेले आहेत मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याचे. शेवटी उठाव झाला, मराठी बांधवांचे रक्त सांडले आणि मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. शेवटी मराठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे ना?” चहाचा घुटका घेत घेत बाबूच्या तोंडून काहीतरी श्रवणीय ऐकायला मिळावे या उदात्त हेतूने मी माझ्या तोंडाची वाफ मोकळी केली.

“कसली हो मराठी अस्मिता??” बाबूच्या या पहिल्याच वाक्याने आजचे निरुपण एकदम झक्कास होणार याची खात्री दिली. “मराठी माणूस राहिलाय का या मुंबई मध्ये? सगळे पळाले विरार, डोंबिवली, बदलापूर सारख्या उपनगरांमध्ये. अहो इथे दोन मराठी माणसे देखील एकमेकांशी इंग्रजी किंवा बम्बैय्या हिंदी मध्ये बोलतात. आज कुठलाही मध्यमवर्गीय मराठी माणूस मुंबई मध्ये घर घेण्याचे स्वप्न देखील बघू शकत नाहीत. दुकानाच्या पाट्या मराठीत करा असा फतवा ठाकर्यांच्या राज ने काढला होता … पण तेरड्याचे रंग तीन दिवस. त्याने पण पब्लीशिटी ष्टंट करून हवा तयार केली “राज”कारणाची. तो अगदी मराठी माणसाच्या भविष्यासाठी गळे काढत असला तरी सध्या त्याला विचारतेय कोण? आणि तसेही हे राजकारणी लोकं आपल्या सोयीचे बघतात.”

बाबूची गाडी सुसाट सुटली होती आणि ती आता राजकारण नावाच्या स्टेशन वर बराच वेळ रेंगाळणार हे नक्की. ते ऐकण्या साठी अजून चार पाच कानाच्या जोड्या सरसावल्या. बाबूचे प्रवचन चालू असताना बाकी कुणी मध्ये बोलायचे नाही हा दंडकच असल्याने प्रत्येक जण आता ही प्रभृती काय सांगणार या आशेवर चहा चा आस्वाद घेत होती.

“राजकारणी लोकं पण मोठे बेरकी … मुद्दा नसला कि असे काही ठेवणीतले विषय अस्मितेच्या नावाखाली भिजत ठेवायचे. अहो असे थोडीच एखादे शहर वेगळे करता येईल ??? काहीतरी कायदा असेलच ना? मुंबई म्हणजे भारताची आर्थिक राजधानी पण सगळी बकाल करून ठेवली या लोकांनी. येणारे परप्रांतीयांचे लोंढे, वाढणारी गर्दी याच्या कडे मतांच्या बेगमी करीता डोळेझाक करणारे राजकारणी. याच भस्मासुराचा व्यवस्थेवर पडणारा ताण आणि विस्कटलेली मुंबई ची घडी. खरे तर जे आज मराठी अस्मितेचा कैवार घेऊन नाचत आहेत त्यांचीच तर सत्ता आहे मुंबई वर गेली कित्येक वर्ष. मुंबई बद्दल बाहेरचा कुणी बोलायला लागला कि यांना आठवते मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र, हुतात्मा दिवस पण मुंबई मधून मराठी टक्का घसरत असताना हेच राजकारणी कुठल्या श्रींच्या वाड्यावर लपून बसतात कोण जाणे.” बाबूच्या वाणीतून अविरत शब्द गळत होते.

अर्थात खरच होतं त्याचे म्हणणे. पण कुणाला पडली आहे इथे? इथे कामकरी, कष्टकरी वर्गच जास्त. उपनगरातून मुंबई मध्ये यावे, ८-१० तास काम करावे आणि झोपायला आपल्या घरी जावे. कधी रिक्षा वाले छळतात तर कधी टक्षि वाले संप करतात. उपनगरीय रेल्वे वेळेत चालली अशी स्वप्न पडली तरी भीती वाटते गाडी चुकण्याची. कधी नळाला पाणी नाही तर कधी ४ – ४ तास वीज नाही. या सगळ्या भानगडीत मुंबईत मध्ये वावरत असतो तो अस्मिता पिचलेला मराठी माणूस….

कपातला चहा संपत आला तरी मनात बाबूच्या बोलण्याचे विचारचक्र सुरूच होते. जाता जाता बाबू म्हणाला “साहेब काय हरकत आहे …. अजून एक मोठा साहेब आला आणि त्यांनी काही सुधारणा केली तर? आणि आमच्या चायवाल्याने आधीच सांगितले आहे तो असे पर्यंत मुंबई महाराष्ट्रा पासून दूर करणार नाही मग कसली चिंता?”