छत्री

जरा उशिरा का होईना पण पावसाला सुरुवात झाली. मुंबईच्या उपनगरांमध्ये काही ठिकाणी दमदार आणि दणक्यात आगमन झाले. आता सगळ्या नव्या जुन्या कवींनी त्यांच्या लेखण्या सरसावून कवितांचा पाऊस पडायला सुरुवात केली असेल. अश्याच कवितांमध्ये मला एक नवकवी “किंचित महाशब्दे” यांची “छत्री” ही नवकविता सापडली. दोन महिने पूर्ण पावसाळा काढल्यावर छत्रीची हालत काय झाली आहे ते या कवितेत मांडले आहे. त्यांचे नाव उघड न करण्याच्या अटी मान्य करून ही कविता इथे देत आहे.

पाउस थेंब झाला
क्षणात बरसुनी आला
तिच्या सकट मजला
चिंब भिजवूनी गेला.

चाहूल पावसाची
लागताच लगबग झाली
तिलाच शोधत होतो
पण हाती नाही आली

बळेच धरुनी तिजला
खेचून ओढले मी
उगीच केली कुरबुर
जेंव्हा पट्टे सोडले मी

मुठीवर देऊनी जोर
वस्त्रात घातला हात
हलवून तिचे अंग
डोकावून पाहिले आत

आताशा तिच्या उघडण्याची
मी आशाच सोडलेली
तिच्या काळ्या देहाला
अगणित भोके पडलेली

दोन महिने संगतीची
अशी अनोखी मैत्री
दर पावसात भिजणारी
माझी काळी छत्री

-कवी “किंचित महाशब्दे”

सरीवर येते सर

सरीवर येते सर
घेऊन हिरवा मोहोर
रानावनात गारवा
फुलापाना आला बहर

सरीवर येते सर
वाढे पावसाचा जोर
भिजलेल्या झोपडीला
थेंब थेंबाची झालर

सरीवर येते सर
मेघ धरू लागले ग फेर
विजांशी खेळताना
होतो वाराही मुजोर

सरीवर येते सर
वाहू लागले निर्झर
ओल्या अंगणात माझ्या
नाचू लागले ग मोर

सरीवर येते सर
जाऊ नको दूर दूर
तुझ्या मिठीत होईल
माझे आकाश बेजार.

सरीवर येते सर
झाले चांदणे धुसर
तुझ्या माझ्या सोबतीला
चिंब रातीचा प्रहर.

दारी पाऊस पडतो …

दारी पाऊस पडतो, ढगं दाटुन हे आले,
चिरेबंदी घरं माझे धुक्यात हरवले

दारी पाऊस पडतो, माझं कोरडं अंगण,
भिजलेला चन्द्र अणि विझलं चान्दण

दारी पाऊस पडतो, माझी खिड़की उघडी,
कधी वाळेल का माझी ओलेती गोधडी

दारी पाऊस पडतो, वारं सुसाट सुटलं
परसात झाडं माझं पाण्यान पेटलं

दारी पाऊस पडतो, तुझं अंग चिंब चिंब,
अगतिक झाला, पावसाचा थेंब थेंब

दारी पाऊस पडतो, माझ्या मनात वादळ,
ओल्या मिठीत थिरके तुझ्या प्रणयाचा खेळ

“अनुविना”
२९ जुलै २००९