पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग १

Anuvina-parentsMeetमाझ्या कन्येचे इतर चारचौघांप्रमाणे प्लेग्रुपचे उंबरठे झिजवून झाल्यावर यथावकाश शाळेत जायला लागली. लागली म्हणजे आधी काही दिवस तिला खेचत खेचत, कधी ढकलत ढकलत शाळेच्या बस मध्ये चढवावी लागली. तिची विद्यार्थी दशा (पुलंच्या भाषेत) चालू होण्या आधी शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांचे “वर्कशॉप” ठेवले होते. ऑफिस मध्ये किंवा काही नवीन शिकायचे असेल आणि त्यात थोडा मोकळा टाईमपास करायचा असेल तर वर्कशॉप घेतात हे माहित होतं त्यामुळे शाळा चालू होण्याआधी पालकांचे वर्कशॉप हे काहीतरी नवीन होतं. त्यामुळे मी सपत्नीक त्या वर्कशॉपला हजेरी लावली. त्यात शाळेची माहिती (आणि महती सुद्धा) सांगितली गेली. शाळेचे कधीही शिथिल न होणारे कडक नियम सांगितले. मुलांबरोबरच पालकांना पण काही नियम लागू होते हे बघून मला पण विद्यार्थी असल्या सारखे वाटायला लागले. काही नियम जरी जाचक नसले तरी निश्चित शाळेत कुणी यायचे आहे मी का माझ्या मुलीने हा मोठा प्रश्न मला पडला होता. थोडक्यात काय तर मुलांची शाळा सुरु होण्या अगोदर त्यांच्या आई वडिलांची “शाळा” घेण्यासाठी हे वर्कशॉप.

मी नसत्या शंका कुशंका विचारेन या भीतीने माझ्या चतुर पत्नीने आधीच नजरेच्या धाकाने मला गप्पा बसवले होते आणि पुढचा अनर्थ शिताफीने टाळला होता. आणि नेहेमी प्रमाणे माझ्या पत्नीला “म्हणून मी तुला कुठे नेत नाही” हे पालुपद म्हणायची संधी हुकली होती. या सर्व पिनल कोड छाप नियमांमध्ये एक दमदाटी वजा नियम “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पालकांची सभा घेतली जाईल आणि आपल्या पाल्याची प्रगती जाणून घेण्यासाठी या सभेला उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे. नंतर कुठलीही तक्रार गृहीत धरली जाणार नाही” अधोरेखित केलेला होता. तेव्हाच या सभेला आवर्जून भेट द्यायची असं मनाशी ठरवूनच तेथून बाहेर पडलो.

शाळा चालू झाली आणि माझी आजपर्यंत घरात बागडणारी खेळकर मुलगी हळूहळू शालेय जीवनात रुळायला लागली होती. तशी अधून मधून थोडी कुरबुर चालायचीच पण कसलं तरी आमिष दाखवून वेळ मारून न्यायचो. शाळेत जाताना छान नटून थटून गेलेल्या माझ्या मुलीचा अवतार येताना विस्कटलेला असायचा. म्हणजे घरातून बाहेर पडताना सरस्वती आणि परत येताना कधी कडक लक्ष्मी किंवा कालीमाता (जीभ न लोंबलेली) आणि तत्सम अवतार. संध्याकाळी रंगायचा तिच्या शाळेतील गप्पांचा फड. कोण टीचर फेव्हरीट आहेत कोण लाड करतं, कोण गोड बोलतं कोण नुसते खेकसतं, अगदी ताज्या घडामोडी सांगितल्या प्रमाणे बातम्या मिळायच्या. कधी कधी घरातच वर्ग भरायचा ज्यात मी एकटाच विद्यार्थी आणि कन्या म्हणजे समस्त शिक्षकवृंद … दर ५-१० मिनिटांनी शिक्षक बदलणार आणि २०-२५ मिनिटात शाळा संपलेली असायची.

दिसा माजी दिस जात होते आणि शेवटी तो योग आला …. पालकांच्या सभेचा. माझ्या आणि बायकोच्या मनात असलेले सगळे प्रश्न आम्ही कागदावर उतरवले. माझा एकच प्रश्न होता “ती शाळेत काय करते?” बाकीचे सगळे बायकोच्या चाणाक्ष मेंदूतून जसेच्यातसे कागदावर उतरलेले. यादी अंमळ जरा मोठीच होती पण मला माहित होतं माझी मुलगी ही इतरांप्रमाणेच सर्वसामान्य असल्याने सगळ्यांना पडलेले प्रश्न हे सारखेच असणार. शनिवारी भल्या पहाटे ८ वाजता उठून तयार झालो. जिच्या साठी ही उठाठेव होती त्या कन्येला पण “शाळेच्या गणवेशात” उभी केली. दोघेही जण पायात चपला घालून पुढील आदेश मिळण्याची वाट बघत थांबलो. ५ – १० मिनिटांनी माझी सौभाग्यवती लग्नाला जावं तसं नटून बाहेर आली. मी माझ्या वाणीमध्ये अतीव मार्दव आणून विचारलं “आपण शाळेतच चाललोय ना?”. तिने पण तितक्याच लाघवी आवाजात उत्तर दिलं, “पहिल्यांदाच जोतोय ना. त्यामुळे चांगलं इम्प्रेशन झालं पाहिजे. नाहीतरी तुला बघून होणार नाहीच म्हणून निदान मला बघून तरी समजतील ‘चला निदान मुलीची आई तरी नीट आहे’ कारण जाताना आपली मुलगी माझ्या सारखी सवरलेली असते आणि येतना ती तुमच्या वळणा वर येते” आमची जुगलबंदी थांबण्याची वाट न बघता माझ्या मुलीने जिन्याची वाट धरली. हे बघून आम्ही तिघे आमच्या आयुष्यातील पहिल्यावहिल्या पेरेन्ट्स मीट ला निघालो.

सगळं कसं सुरळीत चालू होतं. मला अगदी चुकल्याचुकल्या सारखं वाटत होतं. इतक्या सहजतेने शनिवारची सकाळ जाण्याची सवय नाहीये ओ. दाराला कुलूप लावले आणि अगदी दोन चार वेळा जोर लावून ओढून ते पक्के बसले असल्याची खात्री केली. एकदा ते तसंच उघडं राहिलं होतं त्या नंतर मी नेहेमी दरवाजा लावल्यावर अशी ओढाताण करतो. मी जन्मजात वेंधळा असल्याची हिला खात्री असल्याने तिने पण एकदा कुलूप ओढून पाहिले. मी म्हटलं “असून दे आता…. नाहीतर नंतर उघडणार नाही. आणि नाव माझ्यावर घेशील” माझ्या या विनोदावर मुलगी अतिशय खुद्कन हसली त्यामुळे माझ्या बायकोच्या ओठांवर देखील हसू आलं. खरंच आज ती खुपच सुंदर दिसत होती. (असून दे उगीच विषयांतर नको). कधी नव्हे ती स्कुटर पण पहिल्या झटक्यात चालू झाली. स्कुटरवर टांग मारली …… मुलगी पुढे बोर्ड वर उभी राहिली आणि बायको पाठी मागे …. बसताना मला अजिबात धक्का न लावता, गाडी न हलवता बसली. हो, नाही ती नेहेमी घोडी वर बसतात तशी गाडी वर बसते. ;).

रस्त्यातील यथेच्छ खड्डे चुकवत, सकाळच्या ट्राफीक मधून सरपटत (दोन्ही पाय रस्त्यावर घासत असल्या कारणाने सरपटत म्हटले आहे) आम्ही एकदाचे आमच्या कन्येच्या शाळेपाशी पोहोचलो. माझी गाडी stand ला लावण्याची पद्धत बघून गेटवरील शिपाई तिथूनच ओरडला “साहेब येका लायनीत लावा बाईक, वाकडी, तिरकी लावू नका … नंतर आमालाच तपलिक होते”. “अहो …. जरा stand तुटलाय. …. काळजी करू नका दिवसभर अशीच उभी राहिली तरी पडणार नाही” त्याच्या चेहेऱ्यावरची चिंता बघून मी म्हणालो. “काय कडक मध्ये आलेत आणि गाडी बघा …” पुढचं त्याचं पुटपुटण मी काही ऐकलं नाही. पण बायको लगेच म्हणाली “बघ आता तो शिपाई पण नावं ठेवतोय. बस्स झालं तुझ्या वडिलोपार्जित स्कूटरचे कौतुक. या दिवाळीत आपण गाडी घ्यायचीच” (याचा अर्थ तिने त्या शिपायाचे बोलणे ऐकले असावे). शाळेच्या इमारतीत शिरण्या आधी १० – १२ फुटी सरकत्या ग्रील जवळ आलो. इतक्या मोठ्या दरवाजा असताना आत शिरण्यासाठी मात्र जेमतेम २-३ फुटीच “फट” ठेवली होती हे बघून मला आश्चर्य वाटले. आणि दरवाज्या जवळ ३-४ शिपाई कम सुरक्षा रक्षक उभे होते. ते आता माझी तपासणी करतील म्हणून त्यातल्या त्यात किरकोळ दिसणाऱ्या शिपाया समोर उभा राहिलो. तितक्यात हिनेच दुसऱ्या एकाला विचारले “first standard ची parents meet” कुठे आहे हो?” त्यांनी नीट स्थळ सांगितल्यावर माझ्या दंडाला धरून मला आत घेऊन गेली. “कुठे त्याचा समोर उभा राहिलास सेक्युरिटी चेक ला उभं राहतात तसं …. आपण शाळेत आलोय ….” सवयी प्रमाणे पुढंच मी काही ऐकलं नाही.

(क्रमशः)

2 thoughts on “पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग १

यावर आपले मत नोंदवा