वसंत

vasant-Poem

झाडाची फांदी
फांदी वर पान
पानात भरलय
हिरवे रान

हिरव्या रानाचा
हिरवा चुडा
मातीत मिसळलाय
फुलांचा सडा

फुलाची पाकळी
पाकळीचे रंग
फुलांच्या प्रेमात
वाराही दांग

रानातले तळे
तळ्यातली कमळे
चिखलात उभे
ध्यानस्थ बगळे

आकाशात मेघ त्याची
शाल निळी निळी
पहाटेच्या किरणांना
कड सोनसळी

रानातल्या वाटेवर
वाजते पाउल
कोवळ्या पालवीच्या आड
देतो वसंत चाहुल.

खरं आणि खोटं

कित्येकदा खोटे बोललो
तुला बरं वाटावे म्हणुन
आता तूही खोटे बोलतेस
मला खरं वाटावे म्हणुन

पाहुनी तुला

पाहुनी तुला पापणीची
ओलावली कडा जराशी
डोळ्यात स्वप्न माझ्या
आतुर होती जराशी

धुंद कोवळ्या मिठीचा
स्पर्श हळुवार झाला
वेणीत मोगऱ्याच्या
रंगून गेली जराशी

घेता जवळी मला तू
शब्द हरवून गेले
निसटून बंध सारे
बंदीनी तुझी जराशी

ओढून आकाश सारे
बरसले तुझ्यावरी मी
ओंजळ चांदण्यांनी
उजळून गेली जराशी