पाहुनी तुला

पाहुनी तुला पापणीची
ओलावली कडा जराशी
डोळ्यात स्वप्न माझ्या
आतुर होती जराशी

धुंद कोवळ्या मिठीचा
स्पर्श हळुवार झाला
वेणीत मोगऱ्याच्या
रंगून गेली जराशी

घेता जवळी मला तू
शब्द हरवून गेले
निसटून बंध सारे
बंदीनी तुझी जराशी

ओढून आकाश सारे
बरसले तुझ्यावरी मी
ओंजळ चांदण्यांनी
उजळून गेली जराशी

सरीवर येते सर

सरीवर येते सर
घेऊन हिरवा मोहोर
रानावनात गारवा
फुलापाना आला बहर

सरीवर येते सर
वाढे पावसाचा जोर
भिजलेल्या झोपडीला
थेंब थेंबाची झालर

सरीवर येते सर
मेघ धरू लागले ग फेर
विजांशी खेळताना
होतो वाराही मुजोर

सरीवर येते सर
वाहू लागले निर्झर
ओल्या अंगणात माझ्या
नाचू लागले ग मोर

सरीवर येते सर
जाऊ नको दूर दूर
तुझ्या मिठीत होईल
माझे आकाश बेजार.

सरीवर येते सर
झाले चांदणे धुसर
तुझ्या माझ्या सोबतीला
चिंब रातीचा प्रहर.

दारी पाऊस पडतो …

दारी पाऊस पडतो, ढगं दाटुन हे आले,
चिरेबंदी घरं माझे धुक्यात हरवले

दारी पाऊस पडतो, माझं कोरडं अंगण,
भिजलेला चन्द्र अणि विझलं चान्दण

दारी पाऊस पडतो, माझी खिड़की उघडी,
कधी वाळेल का माझी ओलेती गोधडी

दारी पाऊस पडतो, वारं सुसाट सुटलं
परसात झाडं माझं पाण्यान पेटलं

दारी पाऊस पडतो, तुझं अंग चिंब चिंब,
अगतिक झाला, पावसाचा थेंब थेंब

दारी पाऊस पडतो, माझ्या मनात वादळ,
ओल्या मिठीत थिरके तुझ्या प्रणयाचा खेळ

“अनुविना”
२९ जुलै २००९