सुट्टी आणि मी : भाग ०१

मुलीची परीक्षा संपल्यावरचा पहिलाच शनिवार आणि मला सुट्टी. आठवड्याचे ५ दिवसच कामाचे असल्याने शनिवार रविवार मी निष्काम असतो. ओघाओघाने मुलीला पण ५ दिवसच शाळा असल्याने उरलेल्या दोन दिवसात आम्ही दोघे “धिंगाणा” घालण्या व्यतिरिक्त काहीही करत नाही असे माझ्या शिस्तप्रिय पत्नीला वाटते. शनिवारी सकाळचे नित्यकर्म आटपून चहाचा (सकाळ पासूनचा दुसरा) घोट घेत घेत देशात चाललेल्या घोटाळ्यांच्या बातम्या चाळत बसलो होतो. तितक्यात माझे कन्या रत्न झोपेतून उठून डोळे चोळत चोळत माझ्या मांडीवर येऊन पहुडली. या भानगडीत वर्तमानपत्राचा चोळामोळा झालेला आहे, चहाच्या कपाचा फुटबॉल होता होता वाचला होता हे तिच्या ध्यानीमनी पण नव्हतं. मी म्हणालो “काय माऊ, आज उठल्या उठल्या लादी गोडी? बोला काय हवं ते बोला” बरयाच मागण्या होत्या परीक्षेच्या आधी पासून तुंबलेल्या त्या सगळ्या एका झटक्यात माझ्यापुढे मांडल्या. बहुतेक स्वप्नात हे सगळं आलं असणार. काय आहे … आपण अगोदर दिलेली आमिष, लालूच, वचनं कालमानापरत्वे विसरून जातो पण ही मुलं मात्र सगळं लक्षात ठेवतात आणि योग्य वेळी आपल्याला कोंडीत पकडून आपला बाजीप्रभू करतात. सगळ्यात मोठी मागणी होती फिरायला जायची. सगळं बोलून झाल्यावर तिचा रेटा चालू झाला …. “आपण कुठे तरी फिरायला जाऊ”. मि म्हटलं “हो जाऊ या ना …. आज बागेत जाऊ, उद्या मॉल मध्ये जाऊ, केंव्हातरी मुंबई बघायला जाऊ. “नाही नाही असं फिरायला नाही, कुठे तरी लांब जाऊ … हॉटेलमध्ये राहू, खूप खूप मस्ती करू, शॉपिंग करू” माझ्या कन्येचा प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या भात्याला गदागदा हलवत होता. मी जरा सारवासारव करत म्हणालो “पण हे प्रॉमिस केलं नव्हतं मी” कन्या माझ्या वरताण “मग काय झालं आत्ता कर ना” अडलेल्या हरीच्या अविर्भावात तिच्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं (म्हणजे तिने ते घेतलं). काम फत्ते होताच टुणकन उडी मारून ही स्वारी आई कडे पळाली. बहुतेक शाळा संपली आहे हे लक्षात न येता माझी शि.प्रि. बायकोने तिला फैलावर घेतले “उठल्या उठल्या चिकटलीस त्याला? जा आधी आवरून घे … तू ही तसलीच आणि तुझा बाबा म्हणजे ….” आताशा माझे कान सवयीने बंद झाले होते आणि मी घोटाळे वाचण्यात रंगून गेलो.

आज्ञाधारक मुलीने सगळे पटापट आवरले आणि कागद पेन घेऊन माझ्या समोर नाचवू लागली. “बाबा चल आपण प्लान करू. काही असेल तर तु लगेच कागद पेन घेऊन बसतोस ना म्हणून मीच घेऊन आले”. माझ्या लेकीने अगदी चंगच बांधलं होता. तिचं पण बरोबरच आहे म्हणा … सगळ्या मैत्रिणी फिरायला कुठे ना कुठे गेल्या आहेत आणि त्या आल्यावर त्यांनी केलेली गम्मत जम्मत सांगणार मग मी त्यांना काय सांगू हा यक्ष प्रश्न. कागद पेन घेऊन बसणार तितक्यात शि.प्रि. ची आज्ञा झाली “कुठेही जायचं नाहीये. आणि आता सगळी कडे बुकिंग फुल असणार. तिला विचारूनच ५ दिवसांच्या उन्हाळी शिबिरात तिचं नाव टाकलंय. नंतर आपण नागांवला जाणार आहोत. तिथे ताई, कलश, माधुरी आणि ओम … सगळे येणार आहेत.” झालं, आमचा प्लान कागदावर येण्या आधीच बारगळला होता. आणि डोळ्यांच्या मागे भरून ठेवलेल्या अश्रूंच्या टाकीची तोटी हळूहळू वाहायला लागली होती. “आपण प्लान तर करू, तु काळजी करू नको … या सुट्टीत नाही तर दिवाळीच्या सुट्टीत जाऊ” माझ्या समजूतदार पोरीला माझे हे सांत्वनपर शब्द एकदम जादूच्या छडी सारखे वाटले. डोळे पुसतच तिने मान डोलवली आणि म्हणाली “आपण दोघंच जायचं … तिला नाही न्यायचं.” आमच्या कुणावर जर माझी पोर नाराज असेल तर ती आमचा उल्लेख तो/ती असाच असतो हे मी जाणून असल्याने तिच्या वाक्यातली “ती” म्हणजे कोण हा प्रश्न मला पडला नाही. मी फक्त बरं म्हटलं. मी कुठे जायचं हे विचारण्याच्या आताच कन्यका म्हणाली “बाबा आपण काश्मीरला जाऊया. मला बर्फात खेळायचंय आणि बोटीत पण बसायचंय त्या देवयानी सारखं.” “माऊ सध्या तु जरा जास्तच सिरियल्स पाहतेस ना? त्या “देवयानी” सिरीयल मध्ये दाखवलं असेल काश्मीर. ” माझा थोडा तक्रारीचा सूर ऐकून कन्या वैतागली. “अरे ती देवयानी नाही माझ्या वर्गातली मैत्रीण. तिने मला दिवाळीच्या सुट्टीतले तिचे काश्मीरचे फोटो दाखवले” मी म्हटलं “अगं आत्ता बर्फ नसतो मग आत्ता गेलं तर तुला बर्फात खेळता येणार नाही.” मग बर्फ आत्ता का नसतो, दिवाळीतच का असतो? …. बाकीच्या वेळी जर तिथे बर्फ नसतो तर तिथे गोळेवाल्यासारखा विकत मिळत नाही का? या अश्या शंका “वितळे” पर्यंत मी बर्फ या विषयावर निरुपण केले आणि तिची जिज्ञासा थंडगार केली. प्लानिंग आत्ताच करायचं पण जाऊया दिवाळीत या वर ती ठाम होती. तिच्या समाधानासाठी एक ढोबळ आराखडा तयार केला आणि लेक खुश. आईला सांगून तिने तो कागद तिच्या डेस्क वर चिकटवला. रात्री शि.प्रि. म्हणाली “कशाला आत्ता पासून सांगून ठेवतोस? आणि आत्ता इतका खर्च करून तिच्या काही लक्षात राहणार आहे का? थोडी मोठी झाल्यावर जाऊ” मी म्हटलं “जाऊ या गं … याच कारणाने गेल्या ३-४ वर्षात कुठेही लांब नेलं नाही तुम्हांला” बायको मनापासून खुश झाली होती. 😉

पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ६

आमच्या अश्या शांत आणि मार्मिक संवादामुळे एकंदरीत वर्गातील इतर पालकांची करमणूक मात्र झाली. काही पुरुषांनी नंतर खाजगीत मला हे देखील सांगितले कि पुढील मिटिंग ला तुम्ही येणार असाल तरच आम्ही येऊ. शिक्षिका देखील पहिल्याच पालकांच्या बैठकी दरम्यान मुलांची चौकस बुद्धी आणि त्यांना मिळणारी वागणूक या माझ्या पत्नीने विचारलेल्या प्रश्नांवर खुश होत्या. “आता बघ मी कशी बोलते” असा पवित्रा घेऊन जशी आम्हांला घरी ढकलत ढकलत मुद्द्यावर आणून ठेवते तसाच अविर्भाव इथे पण दाखवला असल्याने बऱ्याच मातांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. मुलांची प्रगती त्यांचा पुढील वार्षिक अभ्यासक्रम यावर जुजबी चर्चा होऊन सभा तहकूब झाली. “तुम्ही थांबा बाहेर मी आलेच” याचा अर्थ तुमच्या अपरोक्ष मला टीचर ना काहीतरी विचारायचे आहे हे कळण्या इतपत मी मुरलेला असल्या कारणाने मी आणि मुलगी तिथून बाहेर पडलो.

काही पालक नंतर माझ्याशी सुसंवाद साधत असतानाच हिचे तेथे आगमन झाले. एक वेगळीच लकाकी होती तिच्या चेहेऱ्यावर, अगदी भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडर वरील बायकांच्या तोंडावर असते तशीच. कदाचित आमच्या बद्दल (मी चे आदरार्थी बहुवचन) प्रशंसनीय गौरवोद्गार काढले असावेत अशी उगाच शंका मनात येऊन गेली. “काय म्हणत होते बाकीचे पेरेंट्स” – ती. मी म्हटले “त्यांना मी सामुपदेशक वाटलो …. मी पण मग बाण सोडला … आपण इतरांशी जसे वागतो तसच दुसरे कुणी आपल्याशी वागले तर कसे वाटेल हा विचार करून वागा. सर्वसामान्य माणसेच पुढे सर्वमान्य होतात आणि कीर्तन संपवले” पुढे मी जे काही बोललो ते ऐकून घेण्याच्या ही मनस्थितीत दिसत नव्हती. गाडीला किक मारली … आणि अहो आश्चर्यम् … एका किक मध्ये गाडी चालू झाली पण. तिघे जण स्वार होऊन घरा कडे निघालो. मुलगी पुढे उभी राहून नेहेमीपणे अविरत बडबड करत होती. बायको जरा जास्तच जवळीक साधत कानात म्हणाली “मग येणार ना पुढच्या मिटिंगला? टीचर म्हणत होत्या तुमच्या मिस्टरांना आणू नका, खूप बोलतात आणि इतर पालकांचे लक्ष वेधून घेतात. मध्येच हायपर काय होतात. But seems to be a good father, मी पण म्हणाले आहेच तो असा वेगळा वेगळा”. अशी मिश्कील संधी मी थोडीच सोडणार? “छे छे मी येणारच …. मी बघितले, मी बोलत असताना त्यांचा तरुण शिक्षक आणि पालक वर्ग कसा भान हरपून बघत होता माझ्याकडे” – या वेळी कोपर मारायला जागा न मिळाल्याने कमरेवर नाजूक चिमटा मात्र बसला होता.

या पेरेंट्स मिटिंग मुळे एक मात्र झाले, आज कित्येक वर्षांनी परत एकदा त्या बेंच वर बसायचे भाग्य मिळाले. पाय मुडपून बसायला लागत असल्याने आपण मोठे झालो आहोत याचे भान असले तरी वर्गात बसायला मिळाल्याचा आनंद अवर्णनीय होता. तो काळा फळा, त्याच्या चौकटीवर ठेवलेले डस्टर, खडू, पोलिश केलेले टेबल, दोन हात असलेली लाकडी खुर्ची, दोन्ही बाजूला असलेल्या खिडकीतून वाहणारी वाऱ्याची झुळूक मला परत माझ्या शालेय जीवनातील मोर पिसार्याप्रमाणे जपलेल्या आठवणींच्या गावी घेऊन जायला आतुर झाले. बऱ्याच गोष्टी काळाच्या पडद्या आड गेल्या असल्या तरी एकंदरीत माझे शालेय जीवन माझ्या पालकांसाठी जिकरीचेच होते असे मानायला हरकत नाही. त्या वेळी अश्या मिटींगा असत्या तर केवळ माझ्या सारख्या काही मुलांमुळे दर महिन्याला न घेता दर आठवड्याला भरवल्या गेल्या असत्या आणि आमच्या मातोश्रींनी तिथेच १५ मिनिटे मला उभे केले असते. दर आठवड्याला शाळेत विसरलेल्या वस्तूंमुळे खाल्लेला मार आणि त्या परत आणण्यासाठी पितृपक्षाकडून झालेली बोळवण कसा विसरू शकेन. काही शिक्षकांनी जितका मार दिलाय तितकेच प्रेम आणि संस्कारही दिलेत. रानडे सर, कुलकर्णी सर, भंडारी सर, महाजन सर, शिंपी सर, कुलकर्णी बाई, बर्वे बाई, पळधे बाई, टांकसाळे बाई, अत्रे बाई, गोखले बाई, महाजन बाई, संगीत शिक्षिका दाणी बाई, शिवणकाम शिक्षिका साखरे बाई (यादी बरीच मोठी आहे) यांच्या सारख्या अगणित शिक्षकांनी आमचे जीवन समृद्ध करण्या साठी जि धडपड केली आहे, जे अतोनात कष्ट घेतले आहेत त्याला तोड नाही. त्यावेळी चालू असलेल्या विद्यार्थी दशेमुळे कदाचित ते क्लेशदायक, निरर्थक वाटत असले तरी आता आयुष्यातल्या अनुभवाने उमगले कि सगळे गुरु निष्णात होते, भरभरून ज्ञानदान करत होते पण त्यांच्या कडून आत्मसात करायला कुठे तरी कमी पडलो.

Anuvina-parentsMeet-border

पेरेन्ट्स मीट (पालकांची सभा): भाग ५

शाळेची बस निघून गेली आणि तिच्या बरोबर घाईत असणारे पालक पण निघून गेले. आता वर्गात १०-१५ निवडक पालक आणि समोर त्यांच्या शंकांचे निराकरण करणारा शिक्षक वर्ग इतकेच जण होते. एक एक पालक आपापल्या मुलांच्या प्रगतीच्या अनुषंगाने त्यांच्या शंका विचारत होते पण शेवटी सूर तक्रारीचाच असायचा. पालकांचे संदर्भ आणि त्यावर शिक्षकांचे निरुपण उत्तम चालले होते. पालक आणि शिक्षकांचे संवाद ऐकल्यावर वाटलं की सगळी कडे चित्र जवळ जवळ सारखंच आहे. काही पालक विशेषतः “मातृ”खाते चेहेऱ्यावरूनच त्रस्त वाटत होतं आणि “पितृ”खाते पिडीत(मुलांना आणले नव्हते नाहीतर ते निश्चित शोषित वाटले असते). व्यक्ती, प्रकृती हाच काय तो फरक. सगळ्या शिक्षिका एखाद्या मानसोपचार तज्ञ असल्या प्रमाणे समुपदेशन करत होत्या. मुलं खात पीत नाहीत, ऐकत नाहीत, हट्ट करतात, लक्ष देत नाहीत असे सर्वांगीण प्रश्न होते. आता यात त्या गुरुमाउली काय करणार हा माझ्यासाठी एक अभेद्य प्रश्न होता. काही आशयपूर्ण आणि काही निरर्थक प्रश्नांनी माझी मात्र करमणूक होत होती. एकूण काय तर कुटुंबामध्ये कसलाच समन्वय नाही, संवाद नाही. चालू होती ती निव्वळ ओढाताण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठीची खेचा खेच. विचारात गढून गेलेल्या माझ्या मेंदूने मझ्यातला युरेका जागवला आणि मी कोण आहे कुठे आहे आजूबाजूला काय चालू आहे याचा विचार न करता दोन्ही हातानी टाळी वाजवली. आरती करताना देखील माझ्या टाळीचा आवाज माझ्या व्यतिरिक्त कोणालाच ऐकायला जात नाही पण नेमका त्या वेळी मात्र जोरदार आवाज झाला आणि परत एकदा उपस्थितांच्या नजरेच्या केंद्रस्थानी मी होतो.

“Do you want to say something? You don’t need to clap, just raise your hand” असं कुठल्या तरी बाई म्हणाल्या. पुढे किती तरी वेळ माझे कान फक्त उघडे होते आणि डोकं खाली करून बसलो होतो. काही असेही होते ज्यांना आपल्या मुलाची प्रगती/अधोगती जाणून घ्यायची इच्छा होती. त्यांच्या शंकांचे निरसन झाल्यावर शिक्षकवर्गाचे आभार मानून ते निघून गेले. आता मागे राहिलो आम्ही आणि अजून काही टाळकी. माझ्या बायकोने तिच्या पर्स मधून एक मोठा कागद काढला. त्यावर बरेच प्रश्न लिहिलेले होते.बायको नुसती नट्टापट्टा न करता पूर्ण तयारीनिशी आलेली बघून मी अगदी सदगदित झालो. मी म्हटलं “मी पण दिले असते २-४ प्रश्न”. ठसक्यात उत्तर आले. “मला माहित आहे तुझे प्रश्न काय लेव्हलचे असू शकतील. मी सगळेच यात कव्हर केले आहेत.” मी परत प्रश्न विचारण्याच्या उद्देशाने हात वर केला. तितक्यात त्या सायन्सच्या टीचर कोमोली मुखर्जीनी आम्हालाच विचारले “आर्यांचे पेरेंट्स ना?” आणि जो होवू नव्हे तो गोंधळ झाला, बोटांचे चाळे करत असलेल्या आर्यांच्या हातावर बसणारी चापट माझ्या हातावर बसली. दबक्या आवाजात आर्याला दामटवत असताना बायकोचा नेम आणि टार्गेट दोन्ही चुकले होते. आमची ही धडपड बघून वर्गात खस खस पिकली नसती तरच नवल. आणि त्यातच बायकोच्या चेहेर्यावर “नेहेमीचीच शोभा करून घेता (म्हणून मी तुला कुठे नेत नाही)” असे भाव. इतक्यात तिच्या मुख्य वर्गशिक्षिका म्हणाल्या “तुमची मुलगी अतिशय बडबड करते आणि त्यामुळे इतर मुलांचे लक्ष वेधून घेते. एका जागी शांत पण बसत नाही.” मी सॉलिड खुश इतका कि मी माझ्या चेहेर्यावरचे भाव लपवता लपवू शकलो नाही. … चला, निदान हा गुण तरी बापाच्या गुण(सुत्रातून) आलेला आहे. आणि नेमके उलट भाव माझ्या बायकोच्या चेहेर्यावर. ती काही बोलणार इतक्यात मीच विचारले “पण मग अभ्यासाचे विचारल्यावर उत्तरे देते ना?” पलीकडून उत्तर “हो” आले आणि (आम्ही बसलो होतो तिकडच्या) वातावरणात थोडा गारवा आला. “अहो काय सांगू … ती इतकी गोड बोलते ना … आम्ही घरी गप्पच मारत असतो. फुल धुमाकूळ आणि करमणूक असते …. आमच्या घरात आम्ही तिला FM ची बालवाहिनी म्हणतो …. ह्या ह्या ह्या” या माझ्या वक्तव्याची शिक्षा लगेच मिळाली. परत एकदा कोपर लागले आणि परत एकदा तोच दबका आवाज तिच्या अंतरात्म्याकडून आलेला “आता मिटिंग होई पर्यंत तू काहीच बोलायचे नाहीयेस”.  एक भयाण शांतता आणि माझ्या कानात मुलीची कुजबुज “आई जाम भडकली आहे …. बाबा आता तू काहीच बोलू नको”. शक्य तितके करुण भाव चेहेर्यावर आणण्याचा प्रयत्न करत मी पुढील संभाषण ऐकू लागलो.

माझ्या पत्नीने सगळे प्रश्न आणि (कु)शंका एका डायरी मध्ये लिहून आणल्या होत्या त्यातल्या बऱ्याच मुद्द्यांचे निराकरण झाले होते. मुलीची एकंदरीत शिक्षण आणि अवांतर विषयांमधील प्रगती विचारली. त्यांच्या उत्तराने बायकोचे समाधान झाले असणार कारण शेवटी निर्वाणीचा प्रश्न आला “तुम्ही जी शाळेत शिस्त लावता किंवा अभ्यास करून घेता या व्यतिरिक्त आम्हीअजून काही करायला हवय का?” टीचर म्हणाल्या “तिला रोज १५ मिनिटे एका जागी न बोलता न हालचाल करता उभं करा. इथे आम्ही इतक्या लहान मुलांना असे करू शकत नाही” आणि माझ्यातला बाप जागा झाला. “चंचलपणा तिचा स्वभावगुण आहे. वयोमानापरत्वे तो कमी होईल. तिची काही चूक झाली असेल तरीही आम्ही उगीच मारझोड न करता तिला योग्य ती शिक्षा करतो. ती शांत बसत नाही म्हणून मी तिला सक्तीने अजिबात उभी करणार नाही आणि ती जितकी चंचल आहे तितकीच समजूतदार देखील. आमचा धाक, आमची जरब हे केवळ नजर आणि आवाजाने ठेवतो. तिच्या अभ्यासात काही कमी असेल तर जरूर सांगा आमच्या कडून आम्ही योग्य तो प्रयत्न करू. मला एक आठवड्याची मुदत द्या ती वर्गात तास चालू असताना कुणाशीही गप्पा मारणार नाही आणि इतर मुलांचे लक्ष पण वेधून घेणार नाही …. पुढच्या मिटिंगच्या वेळी आपण या वर परत चर्चा करू किंवा आढावा घेऊ .. पण आपण सांगत असलेला उपाय मला मान्य नाही” वर वर वेंधळा बावळट अशी माझी प्रतिमा गेल्या अर्ध्या तासात झाली असल्याने कदाचित अश्या परखड, सडेतोड प्रतिक्रियेची अपेक्षा ना बायको ने केली होती आणि ना ही त्या शिक्षक वर्गाने. मुलगी खुश … बापाने आपली बाजू सांभाळून घेतली म्हणून. तरी देखील मी माझ्या बायको कडे बघण्याचे टाळले फक्त एवढेच जाणवले कि ती हात मात्र झटकत होती. (असणारच ना कारण या वेळी कोपर मारता आले नाही, संभाव्य धोक्याच्या जाणीवेने मीच एका हाताने घट्ट पकडून ठेवले होते.) प्रसंगावधान राखून बायकोने पुढील प्रश्न जास्त वेळ न लावता विचारून घेतले आणि मला काही बोलायची वेळच आली नाही.

(क्रमशः)