हरवलेले क्षण

सदर लेख महाराष्ट्र मंडळ, दुबई यांच्या त्रैमासिका मध्ये नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचा दुवा सोबत देत आहे.
http://mmdubai.org/publications/
——––—————————————
उन्हाळ्याची सुट्टी लागल्या वर आलेला पहिलाच विकांत आणि सुट्टी नंतरचा पहिलाच आकांत. स्थळ अर्थातच घर.

“अगं बास झाले किती वेळ त्या टैब वर खेळत बसणार आहेस?? सुट्टी लागली आणि काही वेळा साठी तुला तो टैब खेळायला दिला तर तू तासन तास तेच घेउन बसतेस. आणि दादा काय करतोय? अरे देवा … हा laptop ला चिकटला आहे. तरी मी तुम्हाला सांगितले होते नको असल्या महागड्या वस्तु आणुन देऊ मुलांना खेळायला ….. घर कोंबडे होतील दोघे अश्याने” – इति आमच्या सौ.

“अग आई असं काय करतेस? अत्ता तर कुठे टेंपल रन खेळून झाले आणि आता सब वे सर्फर खेळणार. मग तो बार्बीचा गेम डाऊनलोड करणार …. बाबा ने प्रॉमिस केलंय मला” – इति आमची ८ वर्षाची कन्या.

दहा वर्ष्याच्या सुपुत्राने बापाचा दाखला देऊन आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

मग आता मुलांची बाजू घ्यायचे काम माझ्या खांद्यावर. “खेळू दे ग …. आत्ताच तर सुट्टी लागली आहे दोघांना. आणि बाहेर खेळायला जायला जागा तरी आहे का? संध्याकाळी जाऊ बागेत फिरायला” असं म्हणून मी पुस्तकात डोकं खुपसलं पण वाचनात लक्ष मात्र लागत नव्हत. “आणि बाहेर खेळायला जायला जागा तरी आहे का?” या माझ्याच वाक्याने मी अस्वस्थ झालो. पिढी दर पिढी जे अनिवार्य बदल घडतात ते या पिढीचे बालपण हिरावून घेण्या इतपत भयंकर असतील हे कधीच वाटले नव्हते. घरातील एकत्र कुटुंब पद्धत त्या नंतर आलेली चाळ संस्कृती आणि आता असलेली विभक्त 2BHK जनरेशन. घराचे मोकळे आवार कमी होत गेले आणि चाळीतली घरे एका व्हरांड्याने जोडली गेली. समस्त चाळकरी मुले एकत्र येऊन कल्ला करून धुमाकूळ घालायची. संस्कृतीची देवाणघेवाण चाळीच्या व्हरांड्यात देखील टिकून होती.  हम दो हमारे तीन चे आकुंचन होत होत हम दो तेच राहिले पण हमारे तीन च्या जागी एक किंवा गेला बाजार २. आमच्या वरच्या कुलकर्ण्याने फार मेहेनतीने मुला साठी ३ मुलींच्या वर संख्या नेली. आणि आता हे सगळे कुटुंब रस्त्यावरून जात असताना लोकं सर्कसची जाहिरात बघतात तशी त्यांच्याकडे बघतात. 2BHK मध्ये तर बंद दरवाज्यांमुळे सगळ्याच गोष्टी चार भिंती मध्ये डांबल्या गेल्या …. आणि त्यात कामी आले मुलांचे बालपण आणि त्यांचे खेळण्या बागडण्याचे क्षण.

आमच्या वेळी अस नव्हतं, खरच नव्हतं. तंत्रज्ञान आमच्या बालपणाच्या सावलीला देखील नव्हते. मोजकेच दूरचित्रवाणी संच आणि त्यावरचे मोजकेच कार्यक्रम. विरंगुळ्या साठी रेडिओ होता पण नेमके आपण चालू करायला आणि धीरगंभीर आवाजाच्या माणसाने बातम्या सांगायला एकच वेळ यायची. पण मन रमवण्या साठी सवंगड्यांची आणि खेळांची कमतरता कधीच नव्हती. सकाळची कोवळी उन्हं अंगावर घेत भोवरे फिरवायचे. सायकल चे निकामी टायर एका बांबूच्या काठी ने गल्ली भर पळवायचे. अगदी टायर गाडीच्या शर्यती लागायच्या गल्लीबोळा मध्ये. तहान लागली तरी चिंता नसायची. ज्या घरा समोर थांबाल त्या घरातून हक्काने पाणी मिळायचे. अश्याच गल्लीबोळा मध्ये क्रिकेटचे सामने देखील रंगात यायचे. टीव्ही वर बघतो ते आणि या क्रिकेट मध्ये जमीन आसमानाचा फरक. घरीच फळी कापून किंवा नारळाच्या थर्पिलाला तासून बनवलेली एक संध bat, रबरी चेंडू, स्टंप म्हणून बांबूच्या काठ्या, स्टूल, मोडलेली खुर्ची किंवा काहीच नसेल तर तीन विट्कुर. खेळ सुरु. क्रिकेट नसेल तर विटी दांडू. मस्त दोन्ही बाजूनी तासलेली विटी आणि तिला टोलवण्या साठी एक काठी. स्वस्त आणि मस्त खेळ. मुलांच्या या खेळांमध्ये मुली यायच्या नाहीत. पण मग त्या आईच्या अवतीभोवती किंवा भातुकली खेळणे, घर घर , शाळा शाळा यात रममाण असायच्या. त्यात त्यांचे आवडतीचे खेळ काचापाणी किंवा ठिकरी (कपची) असेच असायचे. मला त्या ठिकरीची खूप गंमत वाटायची. विशिष्ठ पद्धतीने चौकोन काढून त्यावर १ ते ९ संख्या लिहायची. फरशीचा तुकडा किंवा कौलाचा तुकडा त्या चौकोनात नेमका फेकायचा आणि लंगडी घालत तो उचलायचा. जमलेल्या सवंगड्यांच्या संख्येवर खेळ अवलंबून असायचे.

दुपारच्या जेवणा नंतर घरातील मंडळी वामकुक्षी घेत असताना कमीतकमी आवाजात खेळता येतात ते पत्ते. झब्बू (गाढवडाव), मेंढीकोट, ल्याडीज, नाटे ठोम (not at home चा अपभ्रंश), गुलामचोर, बदामसात, रम्मी अश्या अनेक खेळांनी आम्हाला कुटाळ कंपनी ठरवले. या बरोबरीनेच सापशिडी, व्यापार, ल्युडो, कॅरम, मामाचे पत्र हरवलं किंवा डोंगराला आग लागली पळा पळा, रुमालपाणी, संगीत खुर्ची अश्या खेळांनी आमची दुपार सुसह्य केली.  बैठ्या खेळांचा कंटाळा आला कि सावलीच्या जागा बघून गोट्या, डफ यांचे डाव रंगायचे.

उन्हं उतरल्यावर मात्र मैदानी खेळांना उत यायचा. डब्बा ऐसपैस, लगोरी, खांब खांब खांबोळी, लंगडी, कबड्डी, डुक्कर मुसुंडी, मधला कावळा, विषामृत, सोनसाखळी, दगड का माती, अबाधुबी, पकडा-पकडी असे आणि या सारखे इतके खेळ होते कि रोज एक खेळ खेळायचा म्हटला तरी आवर्तन पूर्ण व्हायला किमान ८-१० दिवस तरी लागले असते. चहापान करून मग या खेळांना सुरुवात व्हायची ते थेट अंधार पडे पर्यंत. तेंव्हा पायातल्या चपला, घाम, धूळ, माती यांची कधीच तमा वाटली नाही. कित्येक वेळा पडलो धडपडलो पण परत उठून खेळायला तय्यार. तेंव्हा मित्र मंडळी देखील पुष्कळ असायची. आणि हे खेळ खेळण्यासाठी रग्गड जागा. खेळ देखील एका पैश्याचा खर्च न करता खेळता येण्याजोगे.

हे सगळे खेळ खेळून दमलेला जीव देवा समोर दिवे लागणी झाली कि हातपाय धुवून नतमस्तक व्हायचा. शुभंकरोती, पाढे आदी परवचांचे पठण झाल्यावर जेवण करून बत्ती गुल झालेली असायची. अर्धवट झोपेत आईच्या पाय चेपून देण्या बरोबरच कानावर चार प्रेमाचे शब्द पडायचे “खेळ खेळ खेळतो आणि दमतो बिचारा. कुठून इतकी शक्ती येते कोण जाणे?”

———————————————————————————————————————————————————-

“अरे बाबा चल ऊठ ना लवकर, नेहेमी बुक वाचता वाचता कसा झोपून जातोस रे. किती वेळ झाला आम्ही तुला उठवतोय. आपण बागेत जायचे आहे ना? आई म्हणत होती तुमच्या लहानपणी तुम्ही वेगळेच गेम खेळायचा ….. ते आम्हाला पण सांग. जे जे जमतील ते ते आपण खेळू.” चेहेर्या वरचे पुस्तक मुलीने बाजूला करत फर्मान सोडले. कन्या, चिरंजीव आणि त्या दोघांची जन्मदात्री तयारच होते. बागेत जाऊन तिघा चौघात मिळून कोणता खेळ खेळावा हाच एक यक्ष प्रश्न होता.