वसंत

vasant-Poem

झाडाची फांदी
फांदी वर पान
पानात भरलय
हिरवे रान

हिरव्या रानाचा
हिरवा चुडा
मातीत मिसळलाय
फुलांचा सडा

फुलाची पाकळी
पाकळीचे रंग
फुलांच्या प्रेमात
वाराही दांग

रानातले तळे
तळ्यातली कमळे
चिखलात उभे
ध्यानस्थ बगळे

आकाशात मेघ त्याची
शाल निळी निळी
पहाटेच्या किरणांना
कड सोनसळी

रानातल्या वाटेवर
वाजते पाउल
कोवळ्या पालवीच्या आड
देतो वसंत चाहुल.

हजारी मोगरा – Clerodendrum chinense

Anuvina-ClerodendrumChinense

काल बरेच दिवसांनी, म्हणजे जवळ जवळ २ महिन्यांनी नागांवला गेलो होतो. एकीकडे सूर्य पश्चिमे कडील लाटांवर हिंदोळे खात अस्तमानास जात होता. त्याने उधळलेले विविध रंग पहातच मी “आत्मबोध” मध्ये शिरलो. पश्चिमेच्या वाऱ्यावर स्वार होत एक वेगळाच मंद सुगंध पसरला होता. त्या सुगंधाचा माग काढत काढत एका झुडूपा जवळ पोचलो. सुगंधाची तीव्रता अजूनच वाढली होती त्यामुळे माझ्या अंगणात पसरलेला सुगंध हा याच फुलांमुळे हे ओळखायला विशेष कष्ट पडले नाहीत. झाडाची काही फुले माझ्या ओंजळीत घेतली आणि माझी ओंजळ त्या सुगंधाने भरून गेली.

मागच्या वेळी आलो होतो तेंव्हा हेमंतने नुकतीच ही झाडे लावली होती. तेंव्हा तो म्हणाला होता मस्त वास आहे या फुलांचा. नाव विचारलं तर म्हणाला मोगरा. थोडाफार वाद घातला मी त्याच्याशी की हा मोगरा शक्यच नाही, मोगऱ्याची पाने अशी नसतातच. “तुला काय माहित? आम्ही याला मोगराच म्हणतो” असं म्हणून त्याने माझी बोळवण केली. हेमंतने १०-१५ फांद्या लावल्या होत्या आणि त्याला फुले नसल्यामुळे ते झाड ओळखता येणे कठीण होते.

या अप्रतिम वास असलेल्या फुलला “हजारी मोगरा” म्हणतात. थोडं फार मोगऱ्या सारखे दिसणे आणि मादक सुगंध सोडला तर याचा मोगऱ्याशी काहीच संबंध नाही. यांची जातकुळी देखील वेगवेगळी आहे. मोगराचे फूल एकेकच असते तर हजारी मोगरा मात्र गुच्छ स्वरुपात असतो. चांगला १५-२० फुले एकत्र येऊन गुच्छ बनत असल्यामुळे “हजारी मोगरा” नाव पडले असावे. बाकी पाने, त्यांचा रंग, त्यांची मांडणी, झाडाचा बांधा सगळंच वेगवेगळे ….कसलेही साम्य नसलेलं.

हजारी मोगऱ्याचे शास्त्रीय नाव Clerodendrum chinese (क्लेरोडेनड्रम चीनेन्स), कुटुंब Lamiaceae. चीन, तैवान, व्हिएतनाम हा या वनस्पतीचा मूळ प्रदेश मानला जातो आणि तिथून ही वनस्पती जगभर पसरली. उष्ण दमट हवामानात हे झाड उत्तम वाढते. बरेच ठिकाणी हिचे वर्गीकरण तण, म्हणजेच निरुपयोगी किंवा बाकीच्या झाडांसाठी अपायकारक म्हणून गणले गेले आहे. यांचा वाढीचा वेग जबरदस्त असून जमिनी खाली पसरलेल्या मुळामधून देखील याला पालवी फुटू शकते. जानेवारी ते मार्च या दरम्यान फुले येतात आणि सगळा परिसर सुगंधी होतो. या झाडाची संधी फांदी जरी तोडून ती जमिनीत रोवली तरी तिला मुळे फुटतात. रातराणी प्रमाणेच हजारी मोगरा देखील रात्री फुलतो. झाडापासून विलग केलेली पांढरी फुले काही तासातच तांबूस काळी पडत असल्याने या फुलांचा उपयोग केला जात नसावा. अश्या या अजून एका चायनीज प्रकाराने दक्षिण भारतात आपले चांगलेच बस्तान बसवले आहे.

शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०५

नानाच्या घरी सकाळी सकाळी बाळू, मधू आणि अप्पाने जाऊन त्याला समजावले. त्यांच्या बोलण्यामुळे नानाला पण चांगला धीर आला. मंडपात गणेश पूजनाची जंगी तयारी चालू होती. सुशीलने फुलांची तर मनोरमाने पूजेची इतर तयारी चोख ठेवली होती. केसरभाई ने ५ किलो मोदक पाठवले. न सांगता सवरता केलेली ही केसरभाईची लुडबुड बाळूला अजिबात आवडली नव्हती. या वर्षी मधू आणि सुलभाचा मान होता पूजा करण्याचा. मधू चक्क धोतर नेसून तर सुलभा छान नऊवारी नेसून तयार होती. सगळे बंडोपंत केळकर भटजींची वाट बघत होते.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४

—————————————————————————————————————————————————————-

बिवलकरांच्या सचिनने केळकर गुरुजी आल्याची वर्दी दिली. भल्या पहाटे बाहेर पडलेले बंडोपंत थकून भागून परत आले होते. त्यात इतक्या पूजा केल्या होत्या त्यांच्या सामानाचे ओझे पाठीवर होतेच. “तासभर उशीर झाला गुरुजींना. कुठेतरी रिद्धी सिद्धींनी बराच वेळ घेतलेला दिसतोय.” नानाच्या अश्या बोलण्याची सगळ्यांनाच सवय झाली होती. शालजोडी घेऊनच बसलेला असायचा नेहेमी.
“आमच्या रिद्धीसिद्धींचे बघतो आम्ही … तुम्ही स्वतःचे प्रेशर सांभाळा नाही तर कधी शिट्टी वाजेल ते कळणार पण नाही” बंडूने वर जाता जाता प्रती टोला हाणत घर गाठले. पाठीमागून लगबगीने अप्पा पण हजर झाला. “बरं झालं अप्प्या आलास ते. त्या खिडकीत पुडी आहे …. मस्त मळती मारून दे. ५ मिनिटात येतोच खाली. सकाळ पासून एकही बार उडालेला नाही” बंड्याने अप्पाला कामाला लावले.
“ते देतो मळून….पण नान्याला काही एक बोलू नकोस. गरज पडलीच तर आम्हांला सांग.” असे म्हणत अप्पाने सकाळपासून घडलेला इति वृत्तांत कथन केला.
“तरी पण वाकडे वळण काही सरळ होतं नाही गाढवाचे” इति बंडोपंत.
“जाऊंदे रे. तू कशाला लक्ष देतोस? तुला त्याचा स्वभाव माहित आहे ना?” असं म्हणत अप्पाने तंबाखु चोळायचे थांबून त्यावर थापडा मारल्या आणि त्याची त्यालाच शिंक आली. “आक् छिंया …..हा बार एकदम कडक झालाय …. मस्त किक बसेल. पण सांभाळून पूजा करायचीये अजून” हातातला ऐवज बंडूच्या तळहातावर ठेवताना अप्पा म्हणाला.
“मधू आणि वहिनी तयार आहेत ना? सगळी तयारी नीट केलिये ना? मी येतोच १० मिनिटात” बंडूने तंबाखूची चिमटी आत सारत अप्पाला विचारले.
“सगळी तयारी आहे. तू ये सावकाश. इतका कडक बार मारल्यावर तुला एकांताची गरज आहे.” १० मिनिटे बंडूला कशासाठी लागणार होती हे अप्पाला पक्के ठाऊक होते.

१० मिनिटे सांगून बरोब्बर १५ मिनिटांनी वे.मू. बंडोपंत केळकर गुरुजी मंडपात आले. नाना ने परत चिमटा काढला. “पगडी झक्कास बसलीये. पण झिरमिळ्या जरा जास्तच झुलताहेत. आज गुरुजी पक्के पुणेकर दिसतात. भिकबाळीची कमी आहे फक्त” बंडू सकट सगळे हसले. बंडोपंत गुरुजींनी पूजेची मांडामांड सुरु केली. विडे, सुपाऱ्या, सुट्टे पैसे, फळे नारळ सगळे मांडून घेतले. आणि इतर तयारी पण आहे की नाही हे एकवार नजरे खालून घातले. शेंडी वरून हात फिरवत मधू ला हाकाटी केली “कुठे आहेत यजमान? चला गणपती जवळ या.” मधू लगेच आला…. आला म्हणजे वाटच बघत होता कधी आपल्याला पूजे साठी बोलावतील. सुलभा मात्र बायकांच्या गराड्यात होती. दोन चार वेळा “सुलभा पवार हाजीर हो” च्या सुरात पुकारा झाला तरी सुलभा पवारांचा कान हलण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी लाऊडस्पीकरवरून “श्री गणेशाय नमः” ऐकल्यावर सुलभा लगबगीने स्टेज वर आली. मधू वैतागून म्हणाला “काय गं? इतका वेळ भटजी बोलावतायत तरी लक्ष नाही? पूजा झाल्यावर गप्पा मारत बसा …कुनी आडवणार नाही.” सुलभा गप्पांमधून अजून बाहेर आली नव्हती. “आहो काय सांगू तुम्हांला. कुलकर्णी आणि बिवलकर वहिनी कित्ती दिवसांनी भेटल्या.बिवलकर वहिनी आत्ताच काही महिन्यांपूर्वी केसरी बरोबर काश्मीरला जाऊन आल्या त्याच्या गमती जमाती संगत होत्या. आपण पण जाऊ या एकदा”
“असूनदे ते नंतर बघू. पूजा झाल्यावर बराच वेळ आहे आपल्याकडे” मधुने सारवासारव केली.
केसरी म्हटल्यावर बंडोपंतांनी कान टवकारले. आणि थोड्या दबक्या आवाजात बंड्या म्हणाला “बिवलकर वहिनी? त्या केसरी बरोबर? अगदी उघड उघड? चायला शिऱ्याचा पत्ता कट बहुतेक. तरीच या वर्षी मालकांचे विशेष लक्ष आहे चाळीवर”
“अहो भाऊजी, तुम्ही पण ना ….काहीही बोलता. केसरी टूर्स तर्फे गेल्या होत्या त्या.” इति सुलभा….तश्याच दबक्या आवाजात.
“याला कुठे माहित केसरी टूर्स पण आहे ते. याला एकच केसरी माहित, आपले मालक केसरी पटेल. हा कसला जातोय टूर्स बरोबर याची उडी कोकणात किंवा फार फार तर गोव्यापर्यंत.” मधुने चान्स मारला.
“मध्या विसरू नकोस मी आत्ता तुझ्या पुढे बंड्या म्हणून नाही तर तुमचा गुरुजी आहे.फुकाची बडबड बंद करा. किती ताटकळत ठेवणार आहात त्या गणरायाला? चला पुजेला सुरुवात करुया. हं. करा आचमन”आपल्या अख्त्यारीचा वापर करून बंडोपंतांनी मधू आणि सुलभाला गप्प केले. मधुच्या मख्ख चेहेऱ्याकडे बघून बंडोपंत म्हणाले “अरे हो तुला सगळे सांगावे लागणार नाही का. तू अंघोळ पण आचमन केल्यासारखी करतोस. त्या भांड्यात जे चमच्यासारखे आहे त्याला पळी म्हणतात. त्यात पाणी भरून ती डाव्या हातात घे. उजवा हात तीर्थ घेताना करतो तसा करायचा. पळीतील पानी उजव्या हातावर घेऊन ते प्राशन करायचे म्हणजे पिऊन टाकायचे. असे ६ वेळा केले की सातव्या वेळेला हातावरून या ताम्हणात सोडून द्यायचे.”
“अहो बंडोपंत, आम्हाला तुमच्या सारखी कृती माहित नसली तरी आमच्या भाव ईश्वर चिंतनात असतो. आम्ही स्वामींचे उपासक. स्वामींची मानसपूजा करतो आणि त्या साठी ही अशी दिखाव्याची गरजच नसते.” मधु वैतागून म्हणाला.
आता हा वाद चिघळणार हे चाळीतल्या पोराने देखील सांगितले असते. बंडोपंत काही बोलणार या आधीच खालून नाना म्हणाला “कोकणात मंगलकार्य सुरु करण्या आधी ताशा वाजंत्री वाजवतात असे ऐकलंय. इथे तर कलगीतुरा जमणार असे दिसतंय. मज्जा आहे बाप्पाची ….एनटरटेनमेंट चा धमाका फ्रॉम मधु आणि बंडू.”

अश्या वाजंत्रीच्या सुरात पुजेला सुरुवात झाली. बंडोपंत सुस्पष्ट आवाजात मंत्र आणि तंत्र समजावून सांगत होते. संकल्प, प्राणप्रतिष्ठा, आवाहन, पंचामृती पूजा, फुले, दुर्वा, आभूषणे, धूप, दीप, नैवेद्य, असे सगळे उपचार यथोचित पार पडले. केसरभाई यांनी आणलेले मोदक तसेच चाळकरींनी बाप्पा करीता आणलेले नैवेद्य पण दाखवण्यात आले. “चला रे सगळ्यांनी आरती करू या” असे म्हणताच बालगोपाळांची एकदम धावपळ सुरु झाली. आरती संग्रहाची शोधाशोध, झांजा – टाळ यांचे वाटप, त्यात लहानमुलांची झोंबाझोंबी असा सगळा गोंधळ आरतीचे ताम्हण तयार होई पर्यंत चालू होता. नानाने माईकचा ताबा घेतला तर अप्पाने तबला पुढे ओढून घेत एकदम कसलेल्या तबलजी प्रमाणे थाप मारली. नानाच्या मते “अप्पा म्हणजे निव्वळ धिंत धिन धिनाक तिंत तिन तिनाक असा एकमेव ठेका वाजवू शकणारा पट्टीचा भजन स्पेशालिस्ट तबलजी आहे. त्यामुळे आरती, भजन वगैरे असले की तो आवर्जून चामडे बडवायला बसतो. बरोबरच आहे म्हणा रत्नागिरीच्या जवळच्या खेड्यात अजून काय काय शिकणार. थोडेसे छंद जपायचे झालं”.

या दरम्यान केसरभाई कधी मागच्या येऊन बसला होता ते कुणालाच कळल नाही. सुखकर्ता दुखहर्ता आरती चालू झाली आणि गुजराथी पठडीतला आवाज कुणाचा हे बघण्यासाठी बाळू आणि नानाने मागे वळून बघितले तर चक्क आरतीला मालकांची उपस्थिती. पंधरा कुर्ता आणि गुजराथी पद्धतीचं धोतर नेसून जोरजोरात टाळ्या वाजवून आरत्या म्हणत होता. देवीच्या आरतीच्या वेळी तर सॉलिड जोरात होता म्हणे. एकंदरीतच वर्षातून एकदा येणारा हा सण आणि त्यात म्हणायला मिळणाऱ्या आरत्या यामुळे लहान थोरांमध्ये जोश, उत्साह ओसंडून वहात असतो. केसरभाई चाळ मित्रमंडळाच्या गणेशोत्सवात देखील अशीच आरत्यांची रांग लागली होती. सगळ्या नेहेमीच्या आरत्या क्रमाने झाल्यावर ज्ञानदेव, तुकाराम, साईबाबा यांचा नंबर लागतो. सगळ्यांची आवडती आरती म्हणजे विठ्ठलाची “येई ओ विठ्ठले”. या आरतीच्या वेळी सगळेच “आरती गायन सम्राट” होतात. बरोबर आहे इतकी खुलेआम सुरमयी बोंबाबोंब करण्याची सुट कुठे मिळणार? निढळावरी करssssssssssssss चा ‘र’ ताणण्यात भलतीच चढाओढ लागली होती. काही जण तर मधली आरती म्हणताच नव्हते डायरेक्ट शेवटचा सूर ताणायचे, मध्येच श्वास तुटला की परत छातीत हवा भरून सूर ताणायला सुरुवात व्हायची. “पंढरपुरी नाना” या शब्दांवर मात्र सगळे खी खी करून हसले. अश्या १०-१५ जोमदार आरत्या झाल्यावर शेवटी नानाने लोटांगण घालायला सुरुवात केली तशी सगळे जण स्वतः भोवती प्रदक्षिणा घालू लागले. मग परत सगळ्यांनी मंत्रपुष्पांजलीच्या वेळी ओरडण्याची हौस भागवून घेतली. त्यांच्या इतकी शुद्ध मंत्रपुष्पांजली म्हणता येण्याची तिळमात्र शक्यता नसल्याने बंडोपंत केळकर गुरुजी समोर चालू असलेली रेकावली संपे पर्यंत शांत उभे होते …..त्यांचं कडे बघून गणपतीला देखील खात्री पटली असती की बंडोपंत श्रद्धांजलीसाठी उभे आहेत. “सभा सदयति” म्हणत शेवटी एकदाची ही स्वार आरती मैफल संपली.

बंडोपंतांनी मधू आणि सुलभाच्या हातात अक्षता आणि फुले दिली आणि डोळे मिटून गणरायाची मनोमन प्रार्थना करण्यास सांगितले. “हे देवाधिदेवा गणराया, प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी देखील केसरभाई चाळीतील आपल्या भक्त मंडळींनी आपला उत्सव साजरा जरत आहेत. तरी आपल्या उत्सवा दरम्यान मंत्रांमध्ये, तंत्रामध्ये तसेच साहित्यामध्ये काही कमतरता उणीव राहिली असेल तर आंम्हा सर्व भक्तांना क्षमा करा. नेहेमीप्रमाणेच या सगळ्या भक्तांवर आपली अनंतकाळ कृपादृष्टी राहू द्यावी. जे विद्यार्थी असतील त्यांना उत्तमोत्तम ज्ञान मिळून दे. जे विवाहेच्छू असतील त्यांना योग्य अनुरूप जोडीदार मिळो. जे नोकरी व्यवसायात असतील त्यांची उत्तमोत्तम प्रगती होवून दे. वृद्ध मंडळीना चांगले आरोग्य, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभो. सगळ्यांच्या अडचणी विघ्ने हरण कर. जे विद्यार्थी असतील त्यांना उत्तमोत्तम ज्ञान लाभो. जे विवाहेच्छू असतील त्यांना सुयोग्य अनुरूप जोडीदार मिळून दे. जे नोकरी व्यवसायात असतील त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन दे. वयोवृद्ध ज्येष्ठ मंडळीना चांगले आरोग्य, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभून दे. हे गणराया या सगळ्या भक्तांच्या अडचणी, विघ्ने आणि चिंतांचे हरण करून अशीच सेवा करण्याची संधी सर्वांना दे ही भक्तांची प्रार्थना स्वीकार करावी. तितक्यात नानाने केसरभाई कडे एक कटाक्ष टाकून आपली इच्छा बोलून दाखवली “आणि पुढील गणेशोत्सव केसर हाइट्स मध्ये साजरा होऊन दे…. गणपती बाप्पा मोरया” सवयी प्रमाणे अप्पा ओरडला “व्हय महाराजा”. अकाल मृत्यू हरणं म्हणत गुरुजींनी यजमानांना तीर्थ प्रसाद दिला. केसरभाईंनी आणलेला प्रसादाचा मोदक खाऊन यजमान तृप्त झाले होते.

गजाननाची प्रतिष्ठापना झाली होती आणि सगळ्यांनी रांगेने दर्शन घेतले. बाळूची शिस्त ना. ;). बच्चेकंपनीने प्रसाद वाटप चालू केला. केसरभाई बाळू जवळ आला आणि म्हणाला “काय बाळूशेठ कसा काय हाये परसाद? मोदक एकदम पेशल हाय पेशल. मला कळल तुम्ही काय ते साखर फुटणे का काय ते देणार म्हणून दिला पाठवून.” मगाशी याच केसरभाईच्या या आतातायीपणावर वैतागलेला बाळू आता मात्र त्या मोदकाच्या गोडव्यात पार विरघळला होता. एकदम आदबीने बाळू म्हणाला “अहो केसरभाई, मोदक पाठवलेत ते उत्तमच झालं. पण आधी थोडी कल्पना द्यायला हवी होती. नशीब आम्ही ऐनवेळी आमचा बेत बदलला नाही ते.” तितक्यात एक पोरगा केसरभाईला प्रसाद द्यायला आला. “थांब जरा दर्सन घेऊन येते” असं म्हणत केसरभाई स्टेजवर गेला. गणपतीला वाकून नमस्कार केला. खुद्द वेदमूर्ती बंडोपंत केळकर गुरुजींच्या हस्ते तीर्थप्रसाद घेतला. खिशातून ५०० रुपयाची नोट काढून दक्षिणा म्हणून पंतांच्या हातावर आणि वाकून नमस्कार केला. सगळ्यांशी गप्पा मारून ख्याली खुशाली विचारून “संध्याकाडी येते” असे सांगून निघून गेला.

हळू हळू सगळे चाळकरी पांगायला लागले. जेवायची वेळ होऊन गेली होती. बाळूने आपल्या यंग ब्रिगेड कार्यकर्त्यांना जेवायला धाडले. जेवण झाल्यावर सगळ्यांना परत बोलावले म्हणजे हा जेवायला आणि त्यानंतरची वामकुक्षी घ्यायला मोकळा. मधू जसा सपत्नीक आला तसाच निघून गेला. नेसलेले धोतर हे कितीही आधुनिक पद्धतीचे आणि सोयीचे असले तरी लेंगा किंवा लुंगी वापरणाऱ्या मधूला अडचणीचे जात होते. मंडपात उरले नाना, अप्पा आणि बाळू तिघेच. ५-१० मिनिटांनी मधू आणि बंडू फ्रेश होऊन आपल्या मित्रांच्या सोबतीला खाली आले. मधू बिडी शिलगवणार इतक्यात नाना म्हणाला “अरे आत्ताच पूजा केलीस ना. इथे धूर सोडलास तर बाप्पा तुझ्या मागून धूर काढेल. विसरलास बाळ्याची आज्ञा. जा मंडपा पासून २२.३ फुट लांब किंवा २५ पावले दूर जाऊन बिड्या सिगारेटी फुका”. मधुने निमुटपणे बिडी ओठातून काढून कानाच्या पाळीवर घुसवली.  गणपतीची पूजा, सगळ्यांचा, विशेष करून केसरभाईचा सहभाग आणि सगळ्यांचे नियोजन मनाप्रमाणे झाले असल्याने पाचही जण खूप आनंदात होते. पण हा या इथल्या चाळीतला शेवटचा गणपती उत्सव. या पुढे या जागी उभ्या राहणाऱ्या टोलेजंग इमारतीतील बाप्पा कसा असेल कुणास ठावूक. बंडोपंत म्हणाले “अरे चिंता कशाला करताय? उत्सव करणारा तोच आणि करवून घेणारा ही तोच आपण फक्त निमित्त. या वर्षीच्या उत्सवाला त्याने आपल्याला सामावून घेतले हेच आपले भाग्य.”

(क्रमशः)