चहाट(वा)ळकी -०९: धोबीपछाड

“साहेब … डुबले ना पैसे. भरवश्याच्या म्हशीला टोणगा. दक्षिण आफ्रिकेवर चांगली पैज लावली होती. आणि नेमके हरले. उगीच नाय त्यांना चोकर्स म्हणतात. जे गेल्या रविवारी कमावले ते सगळे या रविवारी गमावले. नशिबच घाण्या तो क्या करेगा गण्या?” उगीचच शब्दाला शब्द जुळवून गण्याने नवीन म्हणीला जन्म दिला. पण त्याच्या या हिंदी मिश्रित मराठी जुळवाजुळवी मुळे आमच्या बे मध्ये खसखस पिकली. जागतिक क्रिकेट विश्वकप स्पर्धे मध्ये गेले दोन्ही सामने भारताच्या संघाने जिंकल्यामुळे समस्त क्रिकेटप्रेमींचे दोन्ही रविवार सत्कारणी लागले होते. या विजयांमुळे सोमवारी ऑफिस मधील स्वयंघोषित क्रिकेट वाचाळवीरांची तडाखेबंद फटकेबाजी चालायची. अगदी ज्यांनी आयुष्यात कधी पीच देखील बघितले नसेल त्यांच्या रोमारोमात समालोचक, पंच (पहिला, दुसरा, तिसरा), समीक्षक, एखादा खेळाडू या सगळ्यांचा एकाच वेळी शिरकाव होतो. आणि मग कुणी कुणाला ढापला, कुणाला मामा बनवला, कुणाला गोलंदाजीची अक्कल नाही, कुणाला फलंदाजी जमत नाही, कोण वशिल्याचा तट्टू आहे, कुणाला नुसते फिरायला नेले आहे या सगळ्याची माहिती सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अगदी धावत्या समालोचना सारखी मिळते. या सगळ्या फटकेबाज लोकांच्या कोंडाळ्यात नेमका मीच अलगद सापडतो. कारण मुळात माझ्यासाठी क्रिकेट हा निव्वळ बघण्याचा खेळ असल्यामुळे मी क्रिकेटचे सामने बघताना देखील (आणि निकाल लागल्या नंतर देखील) माझ्यात कसलेच परिवर्तन होत नाही. आणि दुसरे म्हणजे आपण इथे कंठशोष करून तिथे उभ्या असलेल्या ११ जणांना काडीमात्र फरक पडणार नसल्याने उगीच आपण आपल्या तोंडाने फटाके कश्याला उडवा? दर मॅचच्या वेळी आपण मौका मौका करत बसायचे.

“अरे सट्टा वाईट. उगाच क्रिकेट वर पैसा कशाला लावतोस? कधी कधी पैसा मिळतो पण नुकसान देखिल होऊ शकते. आधीच लक्ष्मी चंचल त्यात आपल्या कडे येणारी लक्ष्मी तुटपूंजी मग असले बेभरवशी धंदे करायचे कशाला??? पैसा खेळवण्याची चटक लागते रे अश्याने … आधी आपण पैश्याला खेळवतो मग पैसा आपल्याला.” मी उगीच जरा दरडावणीच्या सुरात गण्याला म्हणालो. “आहो साहेब …. तो तसला सट्टा नाय काय … ही अशी साधीच पैज लावली होती हो त्या बाबू बरोबर. पाकिस्तानच्या सामन्याची पैज तो जिंकला होता आणि आफ्रिकेच्या सामन्याची पैज मी हरलो.” गण्या अतिशय निरागसतेचा आव आणत म्हणाला. “अरे मर्त्य माणसा म्हणजे दोन्ही वेळा तूच हरलास. उगाच सोस ना तुला … त्याने भारतावर पैज लावली असेल आणि तू आशा धरून बसला असशील कि पाकिस्तान आणि आफ्रिका जिंकेल. पण शेवटी भारताचेच पारडे जड निघाले. आणि तू पैज लावून डुबलास. हा हा हा … आता येत्या सामन्या साठी खुळचटपणा करून त्या अरबांवर पैज लावू नको म्हणजे झाले. अर्थात आपला संघ तुझे नशीब बलवत्तर असेल तरच जिंकेल. कर्म धर्म संयोगाने गेल्या दोन सामन्यात प्रत्येक खेळाडू आपले काम चोख पार पाडताना दिसत आहेत. पण उगीच हवा डोक्यात जाऊन मोका मोका चे धोका धोका नको व्हायला.” मी आपले समजावणीच्या सुरात सांगण्याचा प्रयत्न केला आणि कदाचित गण्याला तो पटला असावा.

“बरा सापडलास गण्या …. काढ दोनशे रुपये. दोन्ही सामन्यांच्या दोन्ही बेट हरलास आणि आता मात्र पळतोस काय? अरे सैनिक दिलेला शब्द, दिलेली जुबान मोडत नाहीत. काय साहेब बघितले का क्रिकेट सामने.” गण्याला धारेवर धरत बाबूने मला विचारले. क्रिकेट हा बाबूचा जीव कि प्राण. सकाळी एखादा क्रिकेट सामना असेल तर याला चहा आणायला हमखास उशीर होणार. तुमच्या माझ्या सारख्या लोकांप्रमाणेच सचिन तेंडुलकर, विराट कोहली, धोनी हे आवडत जरी असले तरी विशेष ओढा त्याच्या जमान्यातल्या गावसकर, कपिल देव, रवी शास्त्री, वेंगसरकर यांच्या कडेच जास्त …. अपवाद म्हणजे एकमेव तेंडल्या. क्रिकेटच्या व्हिन्टेज कालखंडात बाबू शिरला की त्याला बाहेर काढणे कठीण व्हायचे. कधी कधी वाटायचे की बाबूच्या डोळ्यांनी बघितलेले क्रिकेट हे आजच्या लोकांकरीता अगम्यच असणार.

“विश्वकप समाने बघतो अधून मधून …. पण अजून तशी रंगत यायला सुरुवात झालेली नाही. पहिलाच सामना भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर होता. सामान्य भारतीयांसाठी तो सामना जिंकला म्हणजे आता पुढे चषक कुणालाही मिळाला तरी हरकत नाही. जरी या सामन्याला वाजवी पेक्षा महत्व असले तरी ती प्रत्येक भारतीय क्रिकेट प्रेमीची भावना आहे. धोनीच्या संघाने पाकिस्तानला हरवून तमाम भारतीयांना विश्वचषक जिंकल्याची अनुभूती मिळवून दिली. तो रोमांचक सामना बघितला. नवीन तरुण खेळाडूंनी सचिन, युवराजची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. हे खूप बरे वाटले. ऑस्ट्रेलिया मध्ये गेले काही महिने तळ ठोकून असलेला, आधीचे तिरंगी मालिकेतील सामन्यांमध्ये सपाटून मार खाल्लेला भारतीय संघ हाच का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. इतका अमुलाग्र बदल .. तोही इतक्या कमी कालावधी मध्ये?? हे केवळ रंग बदलू सरड्याला किंवा एखाद्या मुरब्बी राजकारण्यालाच शक्य आहे …हा हा हा)” मी दिलेल्या राजकारणी उपमे ने हलकेच हश्या पिकला.

“साहेब आपला संघच असा आहे. आधी आपले पत्ते उघड न करता बाकीच्यांना गाफील ठेवणार आणि वेळ आली कि हमला. उगाच त्या आधीच्या फुटकळ मालिकांमध्ये राब राब राबून काय फायदा. त्यात ऑस्ट्रेलिया आणी न्युझीलंड म्हणजे वेगवान उसळत्या खेळपट्ट्या … त्यात कुठे चेंडू लागला, धडपड झाली तर सगळे मुसळ केरात. आधीच दर चार वर्षांनी येणारी हि मोठी संधी ….. या विश्वचषक स्पर्धेत खेळलो तरी पुढच्या स्पर्धेत खेळायला मिळेल कि नाही याची शाश्वती नाही. म्हणून घोडा मैदाना पर्यंत कळ काढायची …. म्हणजे एकदा पानपतात उतरले कि लुटुपुटू लढायांना कोण विचारतोय? साहेब… मोठी मोठी टार्गेट्स … यु नो?” गण्याने भारतीय संघाच्या चतुराईपूर्ण खेळकाव्याची मेख सांगितली आणि हा महामानव भारतीय संघाच्या थिंक टांक मध्ये जायचे सोडून इथे टेबले साफ करणे, फायली लावणे अशी यःकश्चित कामे का करत बसला आहे असा पुसटसा विचार मनात डोकावून गेला.

“मग शहाण्या एवढे सगळे माहित होते तर कशाला भारत हरेल म्हणून माझ्याशी पैजा लावल्यास? आणि वर हरल्या नंतर पळून जातोस?” बाबूने परत एकदा मूळ मुद्द्या वरून गण्याला छेडले. “साहेब खरे सांगू का …. गेल्या खेपेला भारता मध्ये विश्वकप स्पर्धा खेळवली गेली तेंव्हा जितकी मज्जा आली तितकी अजून तरी येत नाहीये. मुळात भारतीय संघात सचिन नसणे हीच गोष्ट जरा अवघड जातेय. पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सोडले तर बाकीचे पेपर जरा सोप्पेच आहेत. मुळात दक्षिण आफ्रिकेसारख्या संघाला हरवल्यामुळे रंगत वाढली आहे. प्रत्येक सामन्यात सांघिक कामगिरी विशेषतः क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मध्ये झालेली प्रगती वाखाणण्याजोगी आहे. रोहित, रैना, शिखर, विराट हे जबाबदारीने खेळताना बघून आधी कुणाच्याच खिजगणतीत नसलेला हा संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जातोय. अर्थात यात शामी, उमेश यादव, अश्विन, सर जडेजा आदी गोलंदाजांचे देखील तितकेच श्रेय आहे हे विसरून चालणार नाही. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि या सगळ्याला मिळालेली धोनीचे कल्पक नेतृत्व यावरून मागल्या खेपेला मिळालेला चषक भारत राखू शकेल असा विश्वास निर्माण झाला आहे हे नक्की” गेल्या तीन लढती मधील सारांश बाबूने एका दमात उद्धृत केला.

“बाबू खरं सांगू का …. सचिनची जागा नजीकच्या काळात कोणी घेईल असे तरी दिसत नाही. या संघात युवराज हवा होता असे राहून राहून वाटते. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणा बद्दल गाफील राहिला. आता मात्र इतर संघांविरुद्ध आग ओकतोय. तिथे श्रीलंका आणि न्यूझीलंडने चांगलीच मुसुंडी मारली आहे. इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धा खेळतोय असे पहिल्या सामन्यापासूनच कुठे वाटले नाही. बाकी वेस्टइंडीज संघ त्यांच्या स्वभावानुसार लहरी आणि स्वच्छंदी वाटतो. राहता राहिला प्रश्न लिंबूटिंबू संघांचा …. क्षमता, उर्जा असून देखील केवळ अनुभव कमी पडल्याने त्यांचे दादा संघां विरूद्धचे सामने एकतर्फी होतात. त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी मोठ्या संघांबरोबर त्यांचे सामने ठेवण्याची तजवीज ICC ला करायला हवी तरच क्रिकेटचा प्रसार होईल.” – मी विश्वचषका मध्ये सहभागी झालेल्या संघांचा गोषवारा सांगितला.

“अहो साहेब … सचिन सारख्या दिग्गजांचे देखील हेच म्हणणे आहे. छोट्या देशांसोबत जास्त सामने खेळा, विश्वचषकातील संघांची संख्या वाढवा. मुळात या दादा संघांच्या अर्थपूर्ण भरीव वेळापत्रकामुळे वेळच कुठे आहे या छोट्या देशांचे दौरे करायला. भारतीय खेळाडूंची एकदा का IPL वर बोली लागली कि देशांतर्गत सामने खेळायला देखील त्यांना वेळ नाही. तिथे मिळणाऱ्या झटपट पैश्या मुळे क्रिकेट मध्ये आधीच अभावाने सापडणारी नजाकत, तंत्रशुद्धपणा हळू हळू नामशेष होवू लागला आहे. २०-२० सारखे सामने म्हणजे गोलंदाजांचे मानसिक खच्चीकरणच. २० षटके हाणामारी केली कि झाले … खेळ वेगवान आणि थरारक जरी झाला असला तरी त्याला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांची सर नाही. तसेही आताशा क्रिकेट सभ्य गृहस्थांचा खेळ आहे असे म्हणणे धाडसाचे ठरेल. स्लेजिंग, शिस्तभंग, सामने निश्चिती, सट्टा यांची काळी सावली हळूहळू या खेळावर पडू लागली आहे. सचिन सारखा दिग्गज खेळाडू देखील त्याच्या कारकिर्दी मध्ये याच्या विरुद्ध चकार शब्द देखील बोलू शकला नाही. मात्र आपल्या आत्मचरित्रामध्ये त्याचा उल्लेख करून काय साध्य केले हे त्यालाच ठाऊक. प्रचंड  आर्थिक उलाढाल असलेल्या या खेळाकडे राजकारण्यांचे लक्ष न गेले तरच नवल. क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकी मधून याच राजकारणी लोकांनी अलगद शिरकाव केला आणि महत्वाच्या पदांवर आपली वर्णी लावून घेतली आणि भारतीय क्रिकेट पैश्या भोवती डोलू लागले. अर्थात याचा थोडाफार फायदा खेळाडूना पण झाला. सामना संपल्यावर कुठलेही बक्षीस घेताना माईक समोर एखादा खेळाडू जेंव्हा ‘भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न साकार झाले किंवा भारतासाठी खेळणे हा मोठा सन्मान आहे’ असे उर भरून बोलत असतो तेंव्हा त्याला ओरडून सांगायची इच्छा होते कि अरे बाबा तुला खेळण्यासाठी जी संस्था पगार देते त्या संस्थेने न्यायालयात छातीठोकपणे सांगितले आहे कि हा संघ भारताचा नसून तो BCCI चा आहे. त्याच्या मनात ढीग आहे पण त्या नियामक मंडळाला तसे वाटत नाही हि मोठी शोकांतिका आहे.” – बाबू च्या शेवटच्या वाक्याचा आणि ग्लास मधील चहाचा चटका एकदम जाणवला.

बाबूचे शेवटचे वाक्य धक्कादायक असले तरी वास्तव होते आणि त्याची सल बाबू सारख्या क्रिकेट शौकिनाला वाटणे सहाजिकच होते. हे सगळे असून देखील तुमच्या माझ्या सारखा सामान्य क्रिकेटप्रेमी आपल्या संघाचा विजय म्हणजेच भारताचा विजय जल्लोषात साजरा करणार. चौखूर उधळलेल्या भारतीय संघाला आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा.

शंभरी

Anuvina-Abs100

वर्डप्रेसचं जग खरच अजब आहे. उभ्या आडव्या रेषा, फराटे मारून एखाद्या होतकरू चित्रकाराला असिमांत विशाल असा कैनवास मिळाला तर जो आनंद होईल तोच आनंद या वर्डप्रेस मुळे मला देखिल झाला. माझ्या सारख्या असंख्य शब्द वेड्या मंडळीच्या भावनांना वाट करून देणारे अथांग विश्व म्हणजे हा वर्डप्रेस. या विश्वाचे अंतरंग उलगडून पाहिले तर नवरसांच्या विविध पैलूंचे विधिवत दर्शन होईल. मिसळपाव वरून कधी फिरत फिरत वर्डप्रेस च्या या मराठी भाव विश्वात दाखल झालो ते कळलच नाही. ब्लॉगर हा वर्डप्रेस चा जुळा भाऊ पण सापडला पण वर्डप्रेस जास्त आवडलं. मी काही फार मोठा वाचन वेडा नाही …. अहो जिथे लोक एका रात्रीत किंवा 24 तासात संपूर्ण पुस्तकाचा फडशा पाडतात (आणि तरी भूक भागली नाही अशी वर तकरार पण असतेच.) तिथे एखाद दुसर्या पानाने माझे पोट भरते. पण इथल्या अनुदिनींवर, त्यांच्या विश्वात जीव रमतो. तर अश्या या आकाशगंगे मध्ये मला “अनुविना” नावाचा एखादा तारा गवसेल हे ध्यानी मनी देखिल नव्हतं. ज्या माउलीने मला कायम प्रोत्साहन दिले, मला माझ्या करियर मध्ये अमुल्य मदत केली त्या आदरणीय गणपुले काकुंबद्दल काहीतरी लिहावे असे ठरवून माझी अनुदिनी चालु केली. काहीतरी नविन करत होतो, ज्याची कधी कल्पना देखिल केली नव्हती. आणि असा हा शब्दांचा प्रवास शंभराव्या लेखा पर्यंत येऊन पोचला आहे.

तसा मी बऱ्याच बाबतीत आरंभ शूर असे आमच्या तीर्थरूपांचे मत …. पण शब्द वेगळे म्हणजे “तेरड्याचे रंग तिन दिवस”. नशीब मी फार काही प्रयोग केले नाहीत नाहीतर त्यांनी मला प्रेमाने ए तेरड्या म्हणूनच हाक मारली असती. अर्थात त्यांचेच असे नाही तर माझ्या कुठल्याही नूतन प्रयोगा बद्दल जवळच्या, लांबच्या, अतिदुरच्या (असल्या अनेकार्थी अती असलेल्या सुहृद मित्र परिवाराच्या देखील) सगळ्याच सृजनांच्या मते बघुया किती दिवस हे नाटक (सभ्यपणे सांगायचे झाल्यास थेरं) टिकते ते अश्याच प्रेमळ भावनांनी भारलेला असायचा. त्यामुळे निंदकाचे घर असावे शेजारी असे म्हणण्यात काहीच अर्थ नव्हता कारण सगळेच निदक….. पण खरे हितचिंतक. त्यामुळे हि अनुदिनी चालू केल्याचे आधी कुणालाच सांगितले नाही. आणि जेंव्हा हि अनुदिनी शत-नेत्री झाली तेंव्हा आहाहा काय वर्णाव्या लोकांच्या प्रतिक्रिया …. तूच लिहिलेस सगळे? इथपासून कुठूनतरी उचलले असशील इथपर्यंत आणि माहित नव्हते हे गुण तुझ्यात आहेत इथपासून ते छान लिहितोस इथपर्यंत. इतक्या संमिश्र प्रतिक्रियांचे भाव पटल माझी अनुदिनी वाचलेल्या पाहिलेल्या ओळखीच्या सगळ्याच लोकांच्या चेहेऱ्यावर उमटलेले पाहताना आनंद पोटात माझ्या मायीना अशी अवस्था व्हायची माझी. पण आज त्यांच्या आणि इतर वाचकांच्या प्रेमा मुळेच शंभरी गाठण्याचा योग आला.

सगळ्यांच्या शंका कुशंकाना, पूर्वग्रह यांना नेस्तनाबूत करून लिखाणाचे (टायपिंगचे) काम चालू ठेवले. माझा हुरूप वाढवून माझ्या कडून शब्दांचे रतीब पाडून घेणाऱ्या काही माक्षिकापाती लोकांच्या मुळेच हा प्रथम शतकी योग येत असल्याने त्या सगळ्यांना विनम्र अभिवादन. 🙂 … तसेच अनुदिनी वाचण्याची सक्ती करून ज्यांना ज्यांना मानसिक त्रास, धक्का, बौद्धिक जाच झाला/दिला असल्यास त्यांची क्षमायाचना करण्यासाठी या पेक्षा वेगळा मुहूर्त शोधून सापडणार नाही.

दिसामाजी काहीतरी टायपावे या उदात्त हेतूने रोज काही न काही विचार इथे उमटायला लागले. वाचकांची वाढणारी संख्या … आपण लिहिलेले शब्द कुणीतरी आवर्जून वाचत आहे हि कल्पनाच निश्चितच सुखावणारी होती. मग सुरु झाली धडपड … आपले लिखाण अजून जास्तीतजास्त लोकां पर्यंत पोचवण्याची. त्यात या वर्डप्रेस ने “इथे लिहा … तिकडे दिसेल” अशी sharing ची सुविधा उपलब्ध करून दिल्या मुळे फेसबुक वरच्या वेगवेगळ्या समुहा मध्ये लेख दिसतील असा बंदोबस्त केला. माझ्या या अट्टाहासा मुळे काही ग्रुप वरून माझी गच्छंती झाली तो भाग वेगळा. ;). या रोज काहीतरी लिहून लोकांच्या गळी उतरवण्याच्या प्रकारात शेवटी शेवटी मलाच माझ्या वाचकांची दया वाटायला लागली आणि मी हे अत्याचार कमी करायचे ठरवले.

वजन कमी करायला जिम मध्ये आलेला माणसाचा आवेश पहिले काही दिवस एकदम दांडगा असतो आणि नंतर अंगातल्या स्नायूंनी बासरी वाजवायला सुरुवात केली कि वजन कमी करण्याच्या विचारांना ओहोटी लागायला लागते. काही जण प्रयत्न सोडून देतात तर काही आज थोडं उद्या थोडं असे करत आशेच्या हिंदोळ्यांवर झुलत राहतात. अनुभवाशिवाय परिपक्वता येत नाही असे म्हणतात ते असे. तद्वत शब्दांचे (आणि वाचकांचे) लचके तोडण्याची भूक हळू हळू कमी होत होत शेवटी माझ्या प्रतिभेला संतृप्तावस्था प्राप्त झाली. त्यामुळे अनुदिनीवर लेख प्रकाशित होण्याच्या कालावधी मध्ये अंतर पडू लागले. ते इतके कि जिथे दर दोन दिवसात एकदा अत्याचार व्हायचा तो चक्क आठवड्याला एकदा … कधी कधी महिन्याला एकदा असे झाल्याने वाचकांना श्वास सोडायला उसंत मिळू लागली. मी लिखाण बंद केले कि काय अशी शंका येऊन उन्मादाच्या भरात काही जणांनी माझ्या या ओघवत्या (ओघळत्या) छंदाची चौकशी देखील केली. पण अश्या मायबाप वाचकांचा निरास होवू नये याची योग्यती खबरदारी घेतल्याची जाणीव त्यांना माझ्या अनुदिनीवर करून दिली. त्यांच्या या काळजी मुळेच या स्टोन ला हा माईलस्टोन गाठता आला त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी आहे.