शुक् शुक् – भाग ०१/०२

image

“सांजच्याला सूर्य बुडायची येळ आणि धोंडीबाची म्हस अडयची वेळ एकच येनार आणि वरून आज अमोश्या? मागच्या दोन चार टायमाला म्हशीची वीत जगतच न्हवती. कालच पारावर भेटला तवा उगा बोल लावत बसला होता. कुणाचा तरी कोप झालंय, मरीआईला बोकड द्यायला हवा. आणि नेमका मी भेटलो तसं लोटांगण घातलं, म्हनला या खेपेस या. तुमचा हात लागला तर ही वीत नक्की जगलं. आता मी काय द्येव हाय? जायला काय न्हाय पण येताना रातच्याला पंचायीत…. बरं घरी शहरातून पोरगं आलाय … कारभारणीने मस्त मटन केलंया. म्हन्जे रातच्याला परतायलाच हवं” सकाळचा बाजार उरकून घरी जाताना सदुभाऊ सवताशीच बडबडत जात होता.

गाव तसं लहानच ५ – ५० घरांच. गाव कसलं मोठा पडाच तो. शेती आणि जंगलामुळे विखुरलेली घरं. गावच्या मध्यभागी चावडी, पंचायत आणि बाजार. सरकारी परिवहनाचा लाल डब्बा दिवसातून ३ फेऱ्या मारायचा. गावात म्हातारी मंडळीच जास्त, तरुण मंडळी सगळी शहराकडे. गावात शहरीकरणाच्या दोनच खुणा, एक म्हणजे बेभरवशी वीज आणि हातावर मोजण्या इतके दूरध्वनी संच. “शेल्फोन” एकच,  तो सुद्धा फक्त सरपंचांकडे. “ब्येश्नेल” ची कृपा.   सदुभाऊ गावातला वैदू, अगदी माणसांपासून प्राण्यांवर उपचार करणारा. हाताला चांगलाच गुण होता त्याच्या. वैदू हा त्याचा पिढीजात धंदा, प्रत्येक पिढीने पुढच्या पिढीला दिलेला. अडल्या पडल्या माणसाला मदत करण्यात, त्याच्यावर उपचार करण्यात सदूने कधीही हयगय केली नाही. सदुभाऊच्या मुलाने, सखारामने अगदीच परंपरा सोडली नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी एका आयुर्वेदिक औषधांच्या कारखान्यात कामाला होता. सखाराम यशोदेला, आपल्या बायकोला आणि मुलगा किसन यांना घेऊन २-४ दिवसांच्या सुट्टीसाठी घरी आला होता. रात्री मटणाचा बेत ठरवल्यामुळे सदू बाजारातून मटन घेऊन जात असतानाच धोंडीबाने संध्याकाळी त्याच्या कडे येण्यासाठी गळ घातली आणि धंद्याचे इमान राखण्यासाठी सदू तयार झाला. सदुभाऊ तसा धडधाकट, वयाच्या पन्नाशीत देखील २-४ जणांना लोळवेल असा गावरान गडी पण अंधाराला प्रचंड घाबरायचा. घरातली वीज गेली की झोपताना देखील ३-४ कंदील लावून झोपायचा. त्यात भर म्हणजे त्याचं घर गावाच्या वेशीवर, वस्तीपासून लांब. धोंडीबा कडून येताना अंधार पडेल म्हणून तो जरा कुरबुर करत होता.

संध्याकाळी ५:३० च्या सुमारास धोंडीबा धावत धावत सदुभाऊकडे आला. पडवीतून त्याने हाक मारली “सदू चल बिगीनं, म्हस लई वरडतिये. कुठल्याबी वाख्ताला वील”. काहीश्या नाखुशीनेच सदू धोंडीबा बरोबर निघाला. पडवीत उभं राहून एक तमाखुचा बार भरला. पाठीवर जडीबुटीची झोळी टाकली, हातात काठी आणि येताना अंधार पडेल म्हणून एक कंदील बरोबर घेतला, बायकोला हाकाटी केली आणि धोंडीबा बरोबर गावाकडे निघाला. मुख्य रस्त्याने जायला अर्धातास लागेल म्हणून आडवाटेने दोघे चालू लागले.  ही पाऊलवाट बापदेवाच्या देवराई मधून जात होती. देवराईच्या घनदाट झाडीत सूर्याच्या किरणांना पण प्रवेश नव्हता. पायात घातलेल्या वाहाणांच्या आवाजा बरोबर सुकलेल्या पानांची कर कर, मध्येच वाऱ्यामुळे होणारी पानांची सळसळ आणि या सगळ्यावर रातकिड्यांचे कर्कश्य आवाज वातावरणातील भेदकता वाढवत होते.   धोंडीबाला काहीच वाटत नव्हतं. सदुभाऊ असल्याने  तो मस्त शीळ घालत निश्चिंत चालत होता. आधीच भेदरलेला सदू वैतागून म्हणाला “जरा गप् रा की उगा त्वांडाची पिपानी कर्तुया. राना वनात शीळ घातली की कीडं माग काढतात म्हाईत न्हायी व्हय?” वाटेत लागलेल्या बापदेवाला नमस्कार करून २० मिनिटाच्या पायपिटीनंतर दोघे धोंडीबाच्या घरापाशी पोचले.

धोंडीबाच्या म्हशीची अवस्था एकंदरीत बिकट होती. पोट फुगलेलं, हंबरून दमल्या मुळे जीभ बाहेर लटकत होती. गोठ्यामध्ये शेणाचा सडा पडून राडा झाला होता. सदू ने तिला पाणी पाजलं आणि झोळीतून आणलेला कसला तरी पाला खायला दिला. म्हैस थोडी शांत झाली. धोंडीबा म्हणाला “चल कारभारणीने चा टाकलाय. चा पी, पान सुपारी घे आणि मग लागू कामाला”. चहा पिवून झाल्यावर सदू ने धोंडीबाला गोठ्यातले शेण काढून गोठा साफ करायला सांगितला. खराब झालेली चादर जमिनीवर घालायला सांगितली आणि २ हांडे गरम पाणी आणायला सांगितलं.  परत सदूने म्हशीला काही खायला दिलं आणि कसलं तरी तेल तिच्या मागे लावलं आणि म्हणाला “धोंडीबा … काय बी कर पण प्वार हुईस्तो हिला बसू देऊ नगं”. “व्ह्यय, जी” म्हणता धोंडीबा लक्ष ठेऊन होता. म्हैस बसायला लागली की “च्याक च्याक, ए ह्या ह्या ह्या बसू नग … तरास हुईल” असं कधी प्रेमाने तर कधी “ए रांडे, बसू नग म्हनल तरी बसत्ये काय?” असं म्हणत तिच्यासमोर उगीच काठी हलवायचा. इथे सदुभाऊ बाकीची तयारी करत होता. तासाभराच्या प्रयत्ना नंतर एकदाची म्हैस व्यायली. सगळं व्यवस्थित आहे बघून घामाघूम झालेले सदू आणि धोंडीबा गोठ्याच्या पायरीवरच बसले. म्हशीच्या चिंतेतून मुक्त झालेल्या सदूला आता चिंता लागली होती पडलेल्या अंधाराची.

सदुभाऊ आणि धोंडीबा घरात आले. धोंडीबाच्या बायकोने आधीच कंदील साफ करून, वात लावून ठेवला होता. सदुभाऊ हळूच धोंडीबाच्या कानात कुजबुजला “लई घाम गाळला तुझ्या म्हशीनं. काही शेर पावशेर हाये काय जरा घसा गरम कराया? आता रानातून एकलाच जानार, जरा बर वाटतं”. धोंडीबा खुश “अरं, हाये मंजी? एकदम ताजी आनी पिवर, मोहाची हाय, कालच मंगू कातकरी देऊन गेलं” दोघांनी मिळून घसा गरम केला आणि सदुभाऊ वाटेला लागला. कडक मोहाच्या दारूची चांगलीच झिंग चढली होती. चालता चालता “असं पिलेल्या मानसास्नी द्येव बी बिचकून असत्यो असं म्हनत्यात. आता मला कुनाचीच भीती न्हायी मंजे न्हायीच” असं काहीतरी बरळत होता. “ह्यो रस्ता लई लांबचा हाय आणि त्यात मदोमद सम्शान बी लागतंय. अरे द्येवा मंजी अंधार बी आणि भूतं बी. चायला आली का पंचाईत … त्या परीस राईतली वाट बरी, बापदेव असल साथीला.” कंदील फुल मोठा करून सदू राईच्या वाटेला लागला.

(क्रमशः)

5 thoughts on “शुक् शुक् – भाग ०१/०२

  1. मस्त अगदी कथा जरा सडेवर येते तोच क्रमशः आणले.
    आता पुढच्या भागासाठी वाट पाहणे आलेच
    तो पर्यंत बाकीच्या कथा वाचून घेतो.

    • धन्यवाद निनाद,
      खरं तर एका भागात बसवायची होती …. उगीच पाल्हाळ नको म्हणून पण ती गेली वाढत म्हणून दोन भागात केली. दुसरा भाग वाचण्याच्या निमित्ताने परत भेट द्याल आणि सडे वरून कडेलोट होणार नाही अशी अशा करतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s