शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४

गणपतीच्या आगमनाच्या वेळी चाळकरींनी न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद दिला. अगदी ज्यांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना व्हायची त्यांनी देखील वेळात वेळ काढून हजेरी लावली होती. सगळ्यांना एकाच गोष्टीचे अप्रूप वाटत होते ते म्हणजे केसरभाई आणि त्याच्या कुटुंबियांचा सहभाग. चाळीतील कुठल्याही सणा-समारंभापासून स्वतःला अलिप्त ठेवणारे केसरभाई आणि कुटुंबीय या शेवटच्या गणपती उत्सवाला मात्र चाळकरींमध्ये मिसळून गेली होती. नुसताच नावाला सहभाग नव्हता तर मालक आणि भाडेकरू हा भेदभाव बाप्पाच्या चरणी अर्पण करून केसरभाई ढोल ताश्यांच्या ठेक्यावर मिरवणुकीत नाचला. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. अवघी केसरभाई चाळ मोरयामय झाली होती. नेहेमी केसरभाई च्या हेतुंवर शंका घेणारा बाळ्या देखील अवाक झाला होता. या सगळ्यात नाना मात्र वाढत चाललेला खर्च आणि त्यात भरीसभर म्हणून ही सत्यनारायणाची पूजा याचा ताळमेळ कसा लावायचा याच चिंतेत होता.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३

—————————————————————————————————————————————————————-

पूजेची तयारी

आदल्या दिवशी सगळ्यांनीच आग्रह केल्यामुळे अप्पाने कोकणवारी पुढे ढकलली. अप्पा आता ५ दिवसांनी होणारे केसरभाई चाळ मित्रमंडळाच्या गणपतीचे विसर्जन करून मगच जाणार होता. अर्थात आतल्या गोटातली बातमी वेगळीच होती. या वर्षी काही कारणाने दुसऱ्या माळ्यावरील सरखोत बाई त्यांच्या भावाकडे गणपतीला जाणार नव्हत्या म्हणे. असो, चाळकरी काय काय पण उठवतात. 😉

भल्या पहाटे उठून बाळ्याने मंडपाची झाडलोट केली. अप्पाने केलेली लायटिंग नीट चालू आहे ना याची खात्री करून घेतली. इतक्यात मंडपाच्या एका खांबाजवळ एक कुत्रं नैसर्गिक विधीसाठी एक पाय उचलण्याच्या बेतात असतानाच बाळ्याने त्याच्या पेकाटात झाडू मारला “रांडेच्या गणपती बाप्पाच्या खांबाला तरी ओला करू नका. दिसला खांब की उचलला पाय”. असे पहिले सनईचे सूर कुत्र्याने आळवले. आता बाकीच्या मंडळीना उठवावे असा विचार करून प्रथम नानाच्या खोलीजवळ गेला. दरवाजा वाजवणार इतक्यात आतून मनोरमा वहिनींचं बोलणं कानावर पडलं. “अहो कशाला इतकी काळजी करताय खर्चाची? गणरायाच मार्ग काढेल यातून. वर जर काही पैसे लागले तर ते आपण देऊ किंवा तुमच्या मित्रांना सांगा, ते काही नाही म्हणणार नाहीत. …… तुम्ही बोलला नाहीत काही पण काल पासून बघतेय मी तुमचं टेन्शन. आणि काल जेंव्हा तुम्ही लपवून बिपीची गोळी घेतलीत तेंव्हा खात्रीच पटली. काल रात्रभर धड झोपला नाहीत तुम्ही. आता पूजा झाल्यावर दुपारी दोन घटका झोप काढा म्हणजे फ्रेश वाटेल लागलाच तर संध्याकाळी डॉक्टर कडे जाऊ. …… चला आवरून घ्या. उत्सव सगळ्यांचाच आहे जास्तीच्या खर्चाचा भार सगळ्यांनीच उचलू. मी हळू हळू पूजेची तयारी करते.”

नानाने वाढणाऱ्या खर्चाचे इतके मनावर घेतले हे ऐकून बाळूला खूप वाईट वाटलं. दोनचार दिवस नानाचं गप्प राहणं, कुणात जास्त न मिसळणं खर्चाच्या प्रत्येक गोष्टीवर आक्षेप घेणं आणि या वरून त्याला आलेलं टेन्शन त्याला ठाऊक होतं. पण इतकं? अगदी बिपीची गोळी घेण्या इतकं? या सगळ्या गोष्टी बाळूला अस्वस्थ करत होत्या. रोजचा राबता असून सुद्धा त्याचं हे अनपेक्षित वागण्या मुळे खरं तर बाळू थोडा चिडला पण होता, पण ही वेळ रागावण्याची नसून नानाला आधार देण्याची आहे याची जाणीव होती. झर झर जिने चढून बाळ्या मधू आणि अप्पा कडे गेला. त्यांना सगळी परिस्थिती सांगितली. वेदमूर्ती बंडू गुरुजी पहाटे पहाटेच गणपती पूजे साठी बाहेर पडले होते त्यामुळे त्याला बोलावण्याचा प्रश्नच नव्हता.
“चायला या नानाच्या नानाची टांग. वेडझव्याला इतकं सांगून सुद्धा कळत नाही म्जानाजे काय? मागेच सांगितलं खर्चाची चिंता करू नको आपण सगळे बघून घेऊ म्हणून. आत्ताच जाऊन भोसडतो त्याला. अरे इतकं टेन्शन घेतलं तर खापायचा फोकालीचा.” अप्पाचा तोल सुटला.
“अप्प्या भलतं सलतं बोलू नकोस.त्याला आपल्या आधाराची गरज आहे. असं बोलून अजून त्रास होईल त्याला. तू तिथे काही एक वाकडं तिकडं बोलू नकोस, फक्त आमच्या बरोबर ये.” मधुने खडसावून सांगितले.
तिघेजण नानाच्या दरवाज्याजवळ आले..दरवाजा वाजवला. नानानेच दरवाजा उघडला. रात्रभर डोळ्याला डोळा न लागल्यामुळे नाना तर्राट दिसत होता.
“काय नाना आवरलं का? काय वाहिनी पूजेची तयारी झाली का?” चाचपणीच्या स्वरात मधुने विचारले.
“तुम्ही सगळे आत्ता कसें काय? कश्यासाठी पैसे हवे आहेत का? मी येतो आवरून, तुम्ही व्हा पुढे” नानाचा आवाज पार टेकलेला होता.
“अरे भावोजी, तुम्ही? आज सकाळी सकाळी काय काम काढलात? या ना बसा. चहा घेणार?”
नानाच्या बायकोचे बोलणे अर्धवट तोडत बाळू म्हणाला “टाकला जाऊन भांडे लपवायला मला आवडत नाही वाहिनी. मगाशी मी तुमचं बोलणं बाहेरून ऐकलं …. मुद्दामून नाही पण योगायोगच म्हणा ना. पण त्यामुळे नानाची खरी परिस्थिती कळली.”
“तुम्ही सगळे बसा मी आलेच चहा घेऊन” असे म्हणून मनोरमा आत निघून गेली.
बाळू नानाला म्हणाला “नाना, अरे इतकी काळजी नको करूस… आम्ही आहोत ना सगळे? जो वाढीव खर्च येईल तो सगळ्यांनी मिळून करू. आणि जो जमाखर्च आहे तो तर उघड आहे त्यामुळे वाजवी पेक्षा जास्त खर्च का झाला असे कुणीही तुला विचारणार नाही. कुणीही तुझ्यावर वैयक्तिक टाच आणणार नाही ….आणि आम्ही अनु देणार नाही. अरे, हा सगळ्यांचा उत्सव आहे, विघ्नहर्त्या गणरायाचा सोहळा आहे. तूच जर असं टेन्शन घेतलंस तर कसं चालेल?”
बाळूचे वक्तव्य संपते न संपते तोच मधू पण म्हणाला, “अरे वेळ आलीच तर माझा एक दिवसाचा गल्ला ठेवीन बाप्पाच्या पायाशी. पण नाना तू काळजी करू नकोस. सगळी कडे इतका उत्साह असताना तुझा असा चेहेरा बघवत नाही.”
“पैश्याचे काय घेऊन बसलास नाना? तो विघ्नहर्ता बसलाय ना सोड त्याच्यावर सगळं. त्याचा उत्सव कसा उत्तम रित्या साजरा करून घ्यायचा याची सोय तोच करेल. अरे उत्सव म्हटला की जमाखर्च जरा लोंबकळनारच. पण तुझ्या सारखा बँकवाला असा फाफलला तर कसं व्हायचं? आणि या भानगडीत तुझ्या अती टेन्शन मुळे काही झालें तर…..” मधू डोळे वटारून अप्पा कडे बघत होता म्हणून पुढील शब्द घशातच विरले.
बाळू उठला नानाच्या बाजूला बसला. त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाला “आपल्या कडील वर्गणीची शिल्लक संपली की विचार करू ….. सगळ्यांनी मिळून विचार करू. आता हा वेडेपणा सोड आणि आवरायला घे. दाढी वगैरे कर, आपल्याला सगळ्यांना ५ दिवस बरीच कामे आहेत”
“वहिनी, मस्त आलं मारून चहा द्या नानाला. मस्त तरतरी येईल एक दोन घोट घश्यात गेल्यावर. आतला चहा कमी झालं की हा असा विचित्र वागतो. एक कप रिचवलनी की बघा त्याचे प्रेशर कसें नख शिखांत उसळी मारायला लागेल.” अप्पाचा डोळा मिळणाऱ्या चहावर होता.
बाळू चला रे निघूया, बरीच कामे पडली आहेत असे म्हणताच आतून मनोरमा वहिनी म्हणाल्या “भाऊजी थांबा चहा घेऊन जा. तुम्ही मगाशी आलात तेंव्हाच सगळ्यांसाठी चहा ठेवला होता.”
पडत्या फळाची आज्ञा मानून अप्पा लगेच खाली बसला आणि बाकीचे दोघे उभेच आहेत हे बघून म्हणाला “अरे बघताय काय असे माझ्याकडे? बसा वहिनी चहा घेऊन येतात ना. तसेच गेलो तर फुकट जाईल ना सगळा?”
“तू पण ना एक नंबरचा लोचट आहेस अप्प्या” असे म्हणत दोघे परत खाली बसले. यांचा संवाद ऐकून नाना गालातल्या गालात हसत होता. यांच्या येण्याने त्याला खरंच खूप धीर आला होता. आता अजिबात टेन्शन वाटत नव्हतं. सगळ्यांनी चहा घेतला.
“नाना निघतो आम्ही. आवरलं की ये खाली. वहिनी पूजा ११ वाजता आहे आणि बंडू गुरुजींनी ११ वाजताचे टाईम दिले आहे. म्हणजे १२ वाजणार हे नक्की पण आपण तयार पाहिजे. तुमची तयारी झाली की निरोप द्या. कुणाला तरी पाठवतो वर घेऊन यायला” बाळू म्हणाला आणि सगळे बाहेर पडले. जिन्यात चर्चेला ऊत आला…  “बरं झालं आपण गेलो ते …. काय अवस्था झाली होती ….” वगैरे वगैरे….

सगळे चाळकरी हळू हळू मंडपात जमा झाले. पुरुष मंडळी सलवार कुर्ता आणि वर असली तर पांढरी टोपी तर स्त्रिया छान पैकी साडी नेसून सजून सावरून आल्या होत्या. बाळूची यंग ब्रिगेड पण जमा झाली होती. सुशीलने फुलांची व्यवस्था आधीच करून ठेवली होती. २ मोठे हार, दुर्वांची कंठी, गणपतीला छानसा मुकुट, गणपतीची आभूषणे या खेरीज जवळ जवळ २ परड्या भरून विविध रंगांची फुले आणली होती. महिला वर्गाच्या खास आग्रहास्तव अजून एक फुलांची परडी निव्वळ रांगोळी आणि सजावटीसाठी मागवली होती. मंडपाचा दर्शनी भाग फुलांच्या रांगोळीने सजवण्याची जबाबदारी महिला मंडळाने घेतली होती. संस्कार भारतीच्या कथित रांगोळी मध्ये रांगोळीची आणि रंगांची प्रचंड नासाडी होते म्हणे. त्यावर अप्पाने टोमणा पण मारला होता ‘फूल’संस्कार रांगोळी म्हणून आणि सरखोत बाईंनी एक जळजळीत कटाक्ष टाकल्यावर तोंड बंद झाले (असा नानाचा दावा आहे). सुशीलने ही सगळी तयारी मंडपात आणून ठेवली आणि रु. ३००० मात्र असे लिहिलेले बिल बाळूच्या खिशात कोंबले.

एक माणूस तडक मंडपात आला आणि ५ किलो मिठाईचा बॉक्स स्टेजवर ठेवला. डोक्यावरचा घाम पुसत एक चिठ्ठी बाहेर काढली. “बालू सेठ कौन है?” असं बाळूलाच विचारले. आपण ज्याला विचारले तोच बाळु आहे हे समजल्यावर बाळूच्या हातात ती चिठ्ठी ठेवली आणि तसाच काही न बोलता निघून गेला. बाळूने बॉक्स थोडासा उघडून पहिला. वर केशराच्या काड्या लावलेले ताजे ताजे माव्याचे मोदक होते. बाळूला वाटले दिली असेल नानाने ऑर्डर मोदकांची. पण इतके मागवायची गरज काय? ठरले होते ना साखर फुटाणे द्यायचे म्हणून? असंच काही खुळचटपणा करुन हा खर्च वाढवतो आणि मग लागतं याचं रक्त संप पुकारायला. असा विचार करताना निदान किंमत किती आहे हे बघण्यासाठी बाळूने चिठ्ठी उघडली. आकडा होता रु. २५०० मात्र आणि वर नाव होतं केसरभाई. ती चिठ्ठी त्याने अप्पाला दाखवली आणि म्हणाला “हा केसरभाई काय समजतो काय स्वतःला? आज अचानक चाळीतल्या गणपती बद्दल प्रेम उफाळून आलं. इतका खर्च चाळीच्या नावावर करण्या आधी विचारायचं तरी. आता याचे पैसे कोण देणार? उगीच लुडबुड चालवलीये”. अप्पा म्हणाला “हे बघा बालू सेठ, वो माणूस ने इसका पैसा मांगा क्या? मग झालं तर याचे पैसे केसरभाई ने दिले असतील तर प्रश्नच नाही. आणि अती झाले तर सरळ सांगेन मी त्याला त्याच्याच टोन मधे … शाला ..इतका सामान आणला त्याचा पैसा कोन देनार? पैसा काय झाडाला लागते?” अप्पाने केसरभाईची हुबेहूब नक्कल केली आणि एकच हशा पिकला. प्रसंग हलका करण्यासाठी इतके पुरेसे होते.

१०:३० वाजत आले होते. नाना हातात पूजेचे तबक घेऊन हलकेच जीना उतरत होता. ते बघताच अप्पा पुढे झाला आणि नानाच्या हातातून तबक घेतले. नाना सकाळ पेक्षा खुपच फ्रेश वाटत होता. नाना म्हणाला “अजून तयारी आणायचीये. फळे, नारळ, सुपाऱ्या अजून वरच आहेत. मधूचे आवरलं का? या वर्षी त्याची वर्णी लागली आहे ना?”
अप्पा म्हणाला “तू शांत पणे  बस. किंवा मंडपात खुर्च्या लावून घे त्या पोरांकडून. मी घेऊन येतो बाकीची तयारी.”
नाना म्हणाला “लवकर ये वेळ नको घालवू. …. आणि हो मी पहिल्या मजल्यावरच रहातो, नाहीतर पोहोचशील सवयीने दुसऱ्या मजल्यावर ;)” … नाना ने केलेला विनोद म्हणजे नाना ताळ्यावर आल्याचे लक्षण होते.
“बस्स का नान्या … साल्या तू पण पेटला का आता?” हे उघड पणे आणि ‘चायला याच्यावर प्रेशर होतं तेच बरं होतं आता हैराण करेल फोकलीचा’ हे मनातल्या मनात बडबडत अप्पा तयारी घेऊनच आला. खाली खुर्च्या मांडायचे काम चालू होते इतक्यात धावत पळत मधू आला. बाळ्याने त्याला नखशिखांत निरखले. नेहेमी गल्ल्यावर असताना घातलेला तेलाचे, बेसन पिठाचे डाग पडलेला कळकट शर्ट आणि खाली तितकाच कळकट लेंगा. त्याला पाहून बाळ्या प्रचंड वैतागला. “अजून आवरले नाही तुझे? की असंच बसणार आहेस कळकट शिरोमणी सारखा? निदान धुतलेले स्वच्छ कपडे तरी घालून यायचेस. बरं, सुलभा वहिनींचे कुठपर्यंत आले? त्या कुठे आहेत? तो बंड्या यायच्या आत या रे … आज भटजी आहे ना तो आपल्या साठी म्हणून उगीच मिरवेल शेंडी उडवत”
“बाळ्या उगीच वैतागु नकोस. मी आलोच १० मिनिटात. सुलभा आवरतिये. माझ्या साठीच थांब्लीये. अरे सकाळीच फोन आला आपण नाना कडून गेलो तेंव्हा. शेजारच्या गल्लीतील गणपतीच्या नाश्त्याची ऑर्डर होती. आणि बंड्याचा पण फोन आला होता थोडा उशीर होईल म्हणून. त्याची गाडी अर्धातास लेट धावत आहे ;). त्यामुळे काळजी नाही. मी आलोच कपडे बदलून.” असे म्हणत मधूने काढता पाय घेतला. “शेजारच्या गल्लीतला गणपती वडापावचा ब्रेकफास्ट करतो की काय? इथे आमचे कार्यकर्ते उपाशीच आहेत. मागास पासून वास येत होता वड्यांचा … सगळ्यांचे लक्ष तुझ्या दुकानाकडे. पण तू रिक्त हस्तानेच आलास. ;)” नान्याने शाब्दिक चिमटा काढला. हे ऐकताच मधू हसला आणि म्हणाला “सुटला एकदाचा आपला गणपती. नान्या देवळात आला ना”.

बरोब्बर ११:१५ या वर्षीच्या गणपती पूजेचे मानकरी यजमान मधू पवार यांचे सपत्नीक आगमन झाले. सौ. सुलभा छान नऊवारी साडी नेसली होती. केसांचा अंबाडा आणि त्याच्या कडेशी मस्त मोगऱ्याचा गजरा. चाळीतल्या जुन्या वृद्ध मंडळीना काही क्षण का होईना कृष्णधवल जमान्यातील सुलोचना बाईंची आठवण झाल्याशिवाय राहिली नसेल. श्री. मधू पवार तर चक्क पांढरे शुभ्र धोतर, पंधराशुभ्र झब्बा, डोक्यावर टोपी आणि खांद्यावर ओढणी वजा उपरणे घेऊन पूजेसाठी तय्यार होते. या अश्या वेशात मधूला बघायची सवय नसलेल्यांना जरा हे प्रकरण जडच होते. आणि अशी संधी अप्पा थोडीच सोडणार? “अरे व्वा. झक्कासच एकदम. आज कसा पांढराशुभ्र बगळ्यासारखा दिसत आहेस. पण वहिनींना शोभत नाहीस हो. शेवटी बायकांचे नटणे तेच खरे नाहीतर इतर म्हणजे कपडे बदललेले बुजगावणेच की. बरे आता हे कमरेला गुंडाळलेच आहेस तर जरा सांभाळून. काष्टा खोच्लायस ना फुटभर आत नाही तर सुटायचा. उगीच इकडे तिकडे नाचू नकोस गणपती आणताना नाचलास तसा. नाहीतर चुकून उडी मारशील …. तू राहशील हवेत आणि धोतर जमिनीवर … सगळे इथेच आरती करायला लागतील …घालिंग लोटांगण करत” (घालीन लोटांगण तसेच इतरही काही शब्दांचा अपभ्रंश आजकाल सढळहस्ते बऱ्याच आरत्यांमध्ये आढळतो त्याचाच हा एक नमुना)
मधू गालातल्या गालात हसला आणि म्हणाला “छे रे, असे सुटणार नाय काय. स्पेशल धोतर आहे हे. रेडीमेड. लेंगा घालतो तसेच घालायचे…नाडी घट्ट बांधली म्हणजे झाले. काष्टा पण मागून शिवलेला आहे म्हणजे कितीही उड्या मारल्या तरी कुठलेही लोटांगण होणार नाही. अगदी नैसर्गिक आणीबाणीच्या वेळी चैनची पण सोय आहे.”
“अरे वाह … या धोतराची आणि धोतर घातलेल्या माणसाची भलतीच ‘चैन’ आहे म्हणायचे” नानाने पण चान्स मारला. इथे महिला वर्गाची सुलभा वहिनींवरून कुजबुज चालू झाली….साडी मस्तच आहे…खोपा छान आलाय…साडी कुठून आणली….दागिने कुठे घडवले….अगदी हातावरच्या मेंदी पासून ते पायातल्या तोड्यांपर्यंत सगळ्या बद्दल कुजबुज झाली. आणि हळू हळू कुजबुज चर्चेमध्ये रुपांतरीत झाली. आणि इकडे पुरुष मंडळींमध्ये मधूला बेजार करणे चालूच होते.

या सगळ्या धबडग्यात वेळ कसा गेला तेच कळले नाही आणि एकदम अप्पा म्हणाला “काय ११:४५ झाले. भटजी विसरला की काय पूजेचे? वाट बघयला भारीच पडतं बुवा. सुशील अजून ३० मिनिटे वाट बघू नाही तर दुसरा भटजी पकडून आण. नाहीतर नान्या तुझ्या गळ्याला जानवे आहेच. तूच सांग पुस्तकी पूजा. बंड्याला बघू नंतर”

तितक्यात बिवलकरांचा सचिन ओरडत आला “बंडू काका आले…. बंडू काका आले” आणि लगबग सुरु झाली.

1 thoughts on “शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४

यावर आपले मत नोंदवा