शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०६

माफ करा…आज बरेच दिवसांनी या कथेचा ६वा भाग लिहून पूर्ण झाला. पुढच्या भागात ही कथा संपेल आणि तो भाग पण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन.

मागील भाग:
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०१
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०२
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०३
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०४
शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०५

वेदमूर्ती बंडोपंत केळकर गुरुजींच्या सुस्पष्ट मंत्रघोषात गणपतीची प्रतिष्ठापना यथासांग पार पडली. मधू आणि सुलभा पवार दाम्पत्याने यजमान पद भूषवले. धोतर कुर्ता घातलेला मधू आणि नौवारी नेसून सजलेली सुलभा खुपच छान दिसत होते…. अगदी दृष्ट लागण्या जोगे. केसरभाई मात्र पुजेला आवर्जून उपस्थित होता.
——————————————————————————————

सकाळीच पूजा झालेली असल्यामुळे नंतर विशेष काही कार्यक्रम नव्हते. केसरभाई आणि कुटुंबीय संध्याकाळी दर्शनाला आले होते. जाताना बाळू आणि कंपनीला भेटून पूजेचे आयोजन उत्तम झाले असल्याची पावती दिली. रोजच्या तेल पाण्याची, फुले, हार, नैवेद्य आणि प्रसादाची सगळी व्यवस्था केसरभाईंनी केली होती. हे कळताच नानाचं ब्लड प्रेशर शिट्टी वाजवायला लागलं. शेवटी न राहवून आपल्या मोडक्या तोडक्या बंबैय्या हिंदीत तो केसरभाईला म्हणाला “देखो केसरभाई, हमारा गणेशोत्सवका बजेट जो है ना वो थोडा कमीच है. और आप ऐसे बिना पूछे अपने जेबसे ऐसी उधळपट्टी करेंगे तो अपुन के बजेट की तो वाट लाग जायेगी” नानाच्या तोंडातून असे संजय दत्त स्टाईल शब्द ऐकून सगळेच चपापले. केसरभाई नाना कडे बघून मिश्कील हसत होता.
बाळू नानाची री ओढत म्हणाला “तुम्ही ती मिरवणूक, ती वाजंत्रीची सोय केलीत. मोदकांचा प्रसाद पाठवलात पण हे सगळं आमच्या बजेटच्या बाहेर जातंय”
“आणि या सगळ्याचा त्रास नानाला झाला. त्याच्या रक्तान उसळी मारलंनीत. परत काही झाले असते म्हणजे निस्तरावे चाळकरींना लागले असते.” अप्पाने तलवार चालवली.
इतकं सगळे बोलत असून सुद्धा केसरभाई गप्पच होता. २-३ मिनिटे शांततेत गेल्यावर केसरभाईच्या तोंडून शब्द बाहेर पडले. “तुमी लोग खर्चाची चिंता कशाला करते? मी हाये ना. काय पण काळजी करू नको. मी बघते सगळा. तुमचा बोलून झाला असेल तर आता मी काय सांगते ते बघ. मी जे काय पण तुम्हांला न विचारता केले त्याचा रोकडा मागितला काय? जो चीज मी आणला त्याचा पैसा मीच देनार. उलट तुमाला पण अजून पैसा लागला तर सांग. मी तुमाला पैसा देते. आप लोग इतने बरसोंसे इस घर में रह रहे हो. ये जगह जब मैने बेच दी तब मुझे मालूम था की कोई टेनंट मुझे किसी बात पार तकलीफ नाही देगा. और आप सब ने मुझे अच्छा कोऑपरेट किया. उसी दिन मै आप सबको बोला की आजसे हम सब एकही लेवल पे है. अब मै मालिक नही. इस चालने मुझे बहुत कुछ दिया. बहुत अच्छी अच्छी यादे जुडी है इसके साथ.” केसरभाई बोलता बोलता खूप भावूक झाला होता. “आपका अपनापन मै कभी भूल नाही पाऊंगा. अगर इस चाल केलिये मै कुच्छ करना चाहता हुं तो वो मेरा हक है. और मुझे बहुत अच्छा लागता है आप सबके साथ. मेरे बर्तावसे अगर आपको कुछ तकलीफ हो गयी है तो मुझे माफ करना”. मधूला वाटलं की आता केसरभाई आसवं गाळणार म्हणून लगेच खिशात हात घालून रुमाल तयार ठेवला होता. तितक्यात केसरभाईनेच स्वतःच्या खिशातून रुमाल काढून न आलेले अश्रू पुसले आणि फरफरून भरलेलं नाक रिते केले. त्याची कृती बघता मध्याने आवंढा गिळला आणि मनातच म्हणाला बरं झालं आपण रुमाल पुढे नाही केला. घसा खाकरून झाल्यावर केसरभाई या पाचही जण काय प्रतिक्रिया देतील या  उत्सुकतेने त्यांच्या चेहेऱ्याकडे आलटून पालटून बघत होता. पण केसरभाईंच्या या अश्या आतडे पिळवटून केलेल्या अनपेक्षित वक्तव्यामुळे हे पाचही जण जणू स्तंभित झाले होते. सगळे एकमेकांकडे पहात होते आणि अप्पा म्हणाला “ठीक आहे. तुमची तशी इच्छा असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण जे काही करणार असाल ते आम्हाला पण सांगा. आम्हाला पण जमेल तशी मदत करूच.” केसरभाई चालेल म्हणाला आणि आवजो करून निघणार इतक्यात बंडोपंतांनी त्याला थांबवला. “केसरभाई मग उद्या तुम्ही आणि भाभीच सत्यनारायणाची पूजा करा”. बाकीच्यांनी पण बंड्याच्या मताला दुजोरा दिला. केसरभाई खुश झाला आणि म्हणाला “एकदम माजा मनातला बोलला बंडू शेठ. मी आणि बायडी तयार हाय. सकाळी १० ला येतो”. नाना मात्र तटस्थ होता. त्यांनी परत बजेटची शंका काढली कारण सत्यनारायणाची पूजा उत्सवाच्या रुपरेषेत धरली नव्हती. केसरभाई परत हसला आणि म्हणाला “नाना साब, मी आत्ताच सांगितला ना …मी सगळा खर्चा करते म्हणून मग काय प्रॉब्लेम हाय?” “केसरभाई चोपडीचा वसूल आहे. जो पर्यंत रोकडा जमा होत नाही तो पर्यंत खर्चात धरत नाहीत” नाना मिश्कील हसत म्हणाला. बाकीच्यांना काहीच कळले नसले तरी केसरभाईला बरोब्बर समजलं. त्याने सरळ १००० रुपयांच्या पाच नोटा काढून नानाच्या हातावर ठेवल्या. उद्या सकाळी अजून ५ देतो असे सांगून केसरभाई निघून गेला. अप्पा जरा नाराज झाला नाना वर..म्हणाला “काय बोलतस ते तुला तरी कळता का? अरे तो इतकं म्हणाला ना सगळा खर्च तोच करणार तरी पण त्याला पैसे द्यायला भरीस पडलंनीच तू. एका रात्रीत जणू तो पळूनच जाणार होता जसा?” मधुने पण अप्पाला दुजोरा दिला. नाना स्पष्टपणे म्हणाला “व्यवहार हा व्यवहार असतो. रोकडा हातात आला की आपला. मी खर्च करीन असं तो ढीग बोलला पण जोवर पैसे समोर ठेवत नाही तोवर कसा विश्वास ठेवणार? माझे व्यवहार रोखठोक असतात. नाही आले पैसे तर आपलीच लागेल सगळ्यांची. कुणाला हे पटत नसेल तर ही जबाबदारी घ्यावी आणि मला यातून मुक्त करावे”. आधी पासूनच केसरभाई वर विशेष विश्वास नसलेला बाळू मात्र सहमत होता. त्याने आपला लष्करी बाणा दाखवलाच. “बरोबर आहे नाना तुझं. ५ दिवसांचा उत्सव, आपण वापरणार वर्गणीतून आलेले पैसे त्यामुळे हिशोब चोख हवा. जमा किती आहेत त्यावरूनच ठरेल ना खर्च किती करायचा? उगाच हवाल्याच्या टवाल्या हव्यात कशाला? म्हणाला ना खर्च करीन खर्च करीन मग टाकू दे ना जरा दमड्या झोळीत”. बाळूचे विचार ऐकून आता मात्र बाकीचे माना डोलवू लागले.

चाळीत गणपती असल्याने खूप उत्साहाचे वातावरण होते आणि या उत्साहाला केसर रूपी मायेचा मुलामा चढला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी केसरभाई मंडपाच्या इथे एका इसमाला घेऊन एक बोर्ड तयार करत होता. मधुने आपल्या चष्म्याची बैठक नीट करून बोर्डावर जे काही लिहिलं होतं त्याची सार्वजनिक घोषणा केली. “उद्या केसरभाई चाळी मध्ये गणेशोत्सवाप्रित्यर्थ सत्यनारायण महापूजेचे आयोजन केलेले आहे. सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.” बाजूलाच नाना आणि अप्पा होतेच. “बरे झाले याला मराठी येणारा रंगारी मिळाला. नाहीतर याची मराठी म्हणजे नारायण नारायण म्हणत प्रत्यक्ष विष्णुच अवतरला असता. ” नाना हळूच कुजबुजला आणि त्याचे हे बोलणे ऐकताच मधू खी खी करून हसला. इतक्यात केसरभाई त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला “काय …कसा झालाय बोर्ड? एकदम चोक्कस”. तितक्यात बाळू पण आला आणि त्यने पण बोर्डावर एक नजर टाकली. थोडा चिंताजनक चेहेरा करून म्हणाला “केसरभाई, महाप्रसाद म्हणजे जेवण? उगीच घाट घालताय इतका.चहा कॉफी नास्ता वगैरे ठीक आहे डायरेक्ट जेवण म्हणजे ….” त्याचे बोलणे अर्धवट तोडत केसरभाई म्हणाला, “हे बगा बाळू शेठ, तुमी काय बोलू नका, आमचा महाराज है ने त्याने सगडी अरेंजमेंट केली हाय. चाळी मंदी १० घर म्हणजे जवळपास ४० माणस, बिल्डर आणि आमचा माणस धरून आजून २० जन व्हाढणार. मेनू एकदम सादा, पुरी भाजी पुलाव आणि जिलेबी. मधू शेठ तुमाला सकाळच्या नाश्त्याची ओर्डर द्यायची हाय. पोहा चहा आणि कॉफी. काय होईल बिल ते सांग नंतर पेमेंट करून टाकते. पण आत्ता हे हजार रुपया घेऊन ठेव.” असं म्हणून केसरभाई ने मधूच्या हातात ५०० रुपयांच्या २ नोटा टेकवल्या. मधूला धंदा मिळाला म्हणून मधू खुश आणि एक वेळचं जेवण फुकट मिळणार म्हणून चाळकरी खुश. सगळी कडे तोंडाची वाफ उडत होती….”भाग्य लागतं असा मालक मिळायला” “यात पण काहीतरी गोम असणार त्याचा नाहीतर एकदम पुळका बरा आला चाळीचा.” “एक दिवसाचे भाडे पण कधी सोडले नाही आणि आज हजारो खर्च करायला तयार?” “काळा पैसा खपवायचा असेल म्हणून इतका उदार झालाय.” एक ना अनेक मुद्द्यांवर चर्चा. हे पाच जन मात्र या सगळीकडे दुर्लक्ष्य करून विघ्नहर्तामय झाले होते. केसरभाईंच्या रुपाने त्यांना विघ्नहर्ता पावला होता.

2 thoughts on “शेजारधर्म : चाळीचा गणेशोत्सव ०६

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s