व्हॅलेंटाईनस् डे – पूर्वार्ध

valentines_Digu

आज सकाळ पासूनच दिगुचे मन एकदम उल्हासित झाले होते. शाळेत जाताना दिगुच्या ७ वर्षाच्या चिमुरडीने ‘हॅप्पी व्हॅलेंटाईनस् डे’ म्हणून दिलेल्या गोड गोड पापा मुळे असेल कदाचित. इतक्या छोट्या झंपीला बरं लक्षात व्हॅलेंटाईनस् डे वगैरे असं म्हणुन विचार झटकण्याचा प्रयास केला तरी पण मनात निर्माण होत असलेलं गुलाबी धुकं हटायला मागत नव्हतं. पूर्वीचे व्हॅलेंटाईनस् डे …. त्यात सुद्धा दोन प्रकार लग्ना आधीचे आणि लग्ना नंतरचे ;). यात विशेष तफावत नसली तरी त्याचा गुलाबी रंग हळू हळू फिका पडायला लागला होता. संसारातील बाकीच्या रंगांची जास्त दाटीवाटी झाली होती कदाचित. लग्नापूर्वी वर्षातील महत्वाच्या दिवसांमध्ये गणना होत असलेला हा व्हॅलेंटाईनस् डे बजेटचा विशेष विचार न करता गाजवला जात होता …. लग्ना नंतर काही वर्ष “जागवला” जात होता. घरातील सरकारचं मन आणि मत हळू हळू पालटायला लागलं आणि बजेटच्या अभावी व्हॅलेंटाईनस् डे सामान्य दिवस वाटायला लागला. छ्या …. आता आपण काय इतके तरुण राहिलोय या वाक्या खाली काय काय दबून गेलंय???? …. हळू हळू सगळंच. 😉

“चल मला उशीर होतोय. गाडी चुकेल माझी…… तुला काय …. केंव्हाही गेलं तरी चालतंय” दिगुच्या बायकोच्या या एका वाक्याने जाता जात नसलेलं गुलाबी धुकं एकदम नाहीसं झालं आणि परत नेहेमीचा करडा रंग दिसू लागला. ऑफिस मधील वातावरण तसं जरा गुलाबी होतं त्यामुळे मनात परत गुलाबी धुक्याचा खेळ चालू झाला. जुने दिवस आठवून दिवस भर दिगू मधेच खुद्कन हसायचा…. आठवणीत रमायचा. किती रम्य आणि गुलाबी दिवस होते ते. तरुणाईने ओसंडून वाहणारे रस्ते, कॉलेज आणि फडके रोड. एकत्र खाल्लेली कॅडबरी, कॅन्डी. प्लास्टिकच्या पिशवीत मिळणारे थंड (कधी कधी मऊ पडलेले) पॉपकोर्न घेऊन एकत्र बघितलेला डी डी एल जी पिक्चर. हाताला तिचा स्पर्श व्हावा म्हणून अंधारात चाललेली धडपड, ते बघून मग तिनेच हातात हात घेऊन खांद्यावर डोकं ठेवलेलं. सगळं सगळं आठवलं की पुन्हा तीच हुरहूर, रोमांच जाणवायचे. पण डोक्यावरून हात फिरवताना एकेकाळी भरगच्च केसांचा कोंबडा मिरवलेल्या डोक्याचे पानिपत झाल्याची जाणीव व्हायची आणि मन, मेंदू ,शरीर सगळंच भूतकाळातून वर्तमानात परत यायचं. हे असं दिवसातून बरेच वेळा झालं अर्थात तो या दिवसाचाच महिमा. प्रेमाचा वारकरी या दिवसापासून कसा काय दूर राहणार?

“नाही नाही ते काही नाही. आपण काय अजून इतके म्हातारे नाही झालोय. आणि रोमान्स करायला वयाची थोडीच अट आहे? स्मृतीभ्रंश झालेल्या माणसाला त्याच्या भूतकाळातील आठवणींना उजाळा दिला तर त्याची स्मृती परत येते असं ऐकलं होतं. बघू आज कसं काय जमतंय ते.  व्हॅलेंटाईनची पुंगी वाजली तर वाजली ;)” असा विचार करत जाताना बायकोसाठी काहीतरी वेगळं व्हॅलेंटाईन डे सरप्राईझ घेऊन जायचं असं ठरवून दिगुने कामाच्या पुढे आतल्या गुलाबी धुक्याला आवर घातला. ऑफिस मध्ये एकत्र जेवताना मित्रांकडून विचारणा झाली पण त्यांचे मोठे मोठे प्लान ऐकून “आमचा रोजच व्हॅलेंटाईनस् डे असतो … वेगळा साजरा करायची गरजच नाही” असं घासून घासून विरलेलं, चावून चावून चोथा झालेलं वाक्य दिग्याने फेकलं आणि परत आपल्या गुलाबी धुक्यात हरवून गेला.

घरी जाताना बाजारातील “तरुणाई”च्या दुकानात शिरून काहीतरी भेटवस्तू घ्यायचे ठरवून दिगू बाजारात शिरला. या व्हॅलेंटाईनस् डेला काहीतरी हटके करावं हाच प्रयत्न. सगळीकडे तरुण तरुणींचे लोंढेच्या लोंढे फिरत होते. दुकानांचे विचाराल तर प्रत्येक दुकानावर संत व्हॅलेंटाईनची सावली होती. जसं नाताळच्या वेळी प्रत्येक दुकानात एक सांता असतो तसच इथे लाल गुलाबी बदाम लटकलेले होते. त्यात काही “तरुणाईची” दुकानं होती … म्हणजे जिथे कायम कॉलेज कुमार/कुमारींचा घोळका असतो. नवीन नवीन लेटेस्ट फ्याशनेबल वस्तूंच्या या दुकानात माझ्या सारखा एखादा चुकून आत शिरलाच तर त्यांच्या चेहेऱ्यावर अंकल टाईप आयटम कुठून आला असेच भाव असतात. पण आज मात्र ते तसे नव्हते. दुकानाच्या बोर्ड पासून अगदी जमिनीपर्यंत विविध आकाराचे रंगाचे असंख्य हार्ट (बदाम नाही ….) टांगून ठेवलेल्या दिसल्या. जवळ जाऊन बघितलं तर मस्त मऊ मऊ उश्या होत्या तोरण लावून लटकवलेल्या.  दुकानाचा दरवाजा सापडत नव्हता अशातच एक तरुण त्या उश्यांना बाजूला सारून बाहेर आला. मग दिगुपण असाच आत शिरला. आत मधील वातावरण तर लाल आणि गुलाबी होतं. दुकानात पण अश्या बऱ्याच वस्तू लटकवलेल्या होत्या. हार्टचे असंख्य प्रकार दिगुच्या हार्टची धडधड वाढवत होते. लटकवलेले टेडी बेअर हळूच दिगुच्या कानाला गुदगुल्या करत होते. पंख्याच्या वाऱ्यामुळे व्हॅलेंटाईनस् डे साठी स्पेशली बनवलेल्या विंडचीमचा चिवचिवाट, टणटणाट चालू होता. हे सगळं आपल्या वेळी नव्हतं याची दिगुला प्रकर्षाने जाणीव झाली.

दिगुचे निरीक्षण चालू असतानाच काउंटर पलीकडील ललनेने दिगूला “सर” म्हणून हाक मारली. “अंकल”ची सवय झालेल्या दिगुचे लक्ष “सर” म्हणून गेले नाही. “व्हॅलेंटाईनस् डे साठी तुमच्या लव्ह ला काही घ्यायचे आहे का तुम्हांला?” दुकानात आजूबाजूला कुणी नाही आणि हा प्रश्न आपल्यासाठीच आहे आणि मगाशी कुणीतरी “सर” आपल्यालाच हाक मारली याची जाणीव झाल्याने दिगुने समोर बघितले तर ही ललना पण लाल रंगाच्या वेशात होती. तिच्या आजूबाजूच्या २-३ मुली पण तशाच आणि गल्ल्यावर बसलेला मुलगा पण लाल्याच. कावीळ झाल्यावर सगळं पिवळधमक दिसतं तसं आज आपल्याला सगळं लाल दिसतंय की काय अशी शंका दिगुला आली.

LoveCushion“काही नाही …. जरा गिफ्ट घ्यायचं होतं. आज व्हॅलेंटाईनस् डे ना.” काहीतरी संभाषण चालू करायचं म्हणून दिगू म्हणाला.
“काय आवडतं तुमच्या व्हॅलेंटाईनला?” ललना म्हणाली.
अरेच्च्या या अश्या बाबतीत तिला काय आवडतं हे दिगुला माहीतच नव्हतं त्यामुळे नेमकं काय घ्यावं असा प्रश्न त्याला पडायला लागला.
“काही तरी चांगलं दाखवा” असं जुजबी मागणी केली.
त्या ललनेने एखाद्या तरुणीला शोभतील असे “लेटेस्ट ट्रेंड ” म्हणत बऱ्याच वस्तू दाखवल्या. गॉगल, रिस्ट बंध, ज्वेलरी पासून ते भेटकार्ड ….ती हार्टची उशी, टेडी बेअर पर्यंत. परंतु दिगू कुठे तरी हरवला होता. या सगळ्या वस्तू देऊन काय करणार असा साधा मध्यमवर्गीय प्रश्न त्याला पडला. आपलं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फसणार याची चिंता त्याला सतावू लागली.
त्याचा उडालेला गोंधळ बघून त्या ललनेने अजून भेडसावणारा प्रश्न विचारला “सर, बायकोसाठी का मैत्रिणीसाठी?” आता मात्र दिग्याला घाम फुटला. कपाळावर घर्मबिंदू जमा होऊ लागले. “नाही नाही …. बायको साठीच पाहिजे. तुमच्या कडे साधारण पस्तीशीच्या बायको कम मैत्रिणीसाठी काही आहे का?” दिग्याने अवसान गोळा करून प्रश्न विचाराला. “सर ही उशी घ्या ना. एकदम सॉलिड आहे. लेटेस्ट ट्रेंड. वॉशेबल पण आहे. ” ललनेने उशी पुढे करत म्हटले. “उशी? नको नको.” आता तिचा मऊपणा पण टोचायला लागला होता. “अजून काही महिन्यांनी तिला अभरा शिवायची वेळ येईल” अभरा म्हणजे काय ते बहुतेक तिला कळले नाही हे जाणवून दिगुने अभरा म्हणजे पिलो कव्हर असे स्पष्टीकरण दिले. हे सगळे संभाषण ऐकून दुकानातील बाकीच्या ललना खुदुखुदू हसत होत्या. पण बहुतेक दिगुच्या गळ्यात ती उशी मारायचीच या आवेशाने ती ललना दिगुला गळ घालायला लागली. “साहेब मस्त उशी आहे … मऊ, एकदम सिल्की ….. उशीला कुशीत घेऊन पण छान झोप लागेल.” आता मात्र दिगू पार हलला …. ही बया या उशी वरून अजून काय काय बोलेल याचा अंदाज येऊ लागल्या मुळे हळू हळू काढता पाय घेऊ लागला. “नको नको हे असं सगळं नको. घरात आधीच माणसांपेक्षा जास्त उषा आहेत त्यात ही नको अजून” असं म्हणत त्याने पाठ फिरवली. “सर पण हार्ट शेप, मऊ मऊ सिल्की नसेल ना …..” असे काहीतरी शब्द त्याच्या कानावर पडले. हवालदिल झालेल्या दिगुने मागे वळून पण बघितले नाही. परत बाहेरचा रस्ता शोधत तो त्या बदामाच्या तोरणांमधून बाहेर आला. मोकळा श्वास घेण्यासाठी दोन क्षण थांबला तितक्यात आतून त्या ललनांचे हसणे ऐकले. “कशाला पिडत होतीस त्या अंकल ना” “नो वे …. कळतच नव्हतं त्याला काय घ्यायचं ते … पण क्यूट होता”. क्यूट हा शब्द ऐकल्यावर दिगुला जरा हायसं वाटलं पण त्याचा व्हॅलेंटाईनस् डे ला काय द्यायचं हा प्रश्न तसाच होता ….अनुत्तरीत.

6 thoughts on “व्हॅलेंटाईनस् डे – पूर्वार्ध

    • तुमचा अनुभव दांडगा असून अशी अवस्था आहे तिथे आमच्या सारख्यांचे ज्यांचे एक तप पण पूर्ण व्हायचंय त्यांनी काय म्हणावे महेंद्र साहेब?
      बाकी कमेंटी बद्दल दिलसे धन्यवाद.

यावर आपले मत नोंदवा