सुकामेवा

सध्या का कुणास ठावुक पण इतके दिवस बंद कप्प्यात साठवून ठेवलेल्या काही आठवणी अचानक सतावु लागल्यात. आठवणी आहेत, कडू आहेत तितक्याच गोड देखिल आहेत पण म्हणून मी आठवणींचे पुस्तक कधीच उघडून बसत नाही. पण क़ाही आहेत अत्तराच्या कुपी सारख्या ….कप्पा उघडला की लगेच मनात दरवळणार्या …. त्यांचा सुवास देखिल सगळी कडे भरुन राहतो. मग तो कप्पा बंद करावासा वाटत नाही.

माझ्या आधीच्या आमच्या सगळ्या पिढ्यांचा धंदा म्हणजे पौरोहित्य. आजोबा तर उच्च विद्याविभुषित आणि वेद पारंगत. त्यामुळे वडिल देखिल याच व्यवसायात आणि पारंगत. यजमानांच्या घरी जाउन धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करणे हाच काय तो उद्योग. भरभराट नसली तरी मानमरातब मात्र भरपूर. जिथे जे मुबलक तिथे त्याची किंमत नसते असच काहीसे चित्र आमच्या घरी देखिल होते. पण आई वडिलांनी मिळालेल्या चीज वस्तुंची कधी नासाडी होऊ दिली नाही आणि आम्हाला पण तीच सवय लावली. प्रत्येक गोष्टींचा योग्य विनियोग केला. पौरोहित्य करून जे सामान मिळायचे त्यात तांदुळ, गहू, साखर, गुळ, विविध प्रकारची फ़ळे, नारळ यांची रेलचेल असे. या गोष्टी कधीच विकत आणाव्या लागल्या नाहित. आमच्या पुरते ठेऊन आई बाकीचे शेजारी पाजारी वाटुन टाकायची. नारळ, पंचे, कापडं वगैरे विकून तिच्या आणि आमच्या हातखर्चा साठी लागणारे पैसे सहज जमायचे. सीताबाई विड्याची पाने दर आठ दहा दिवसांनी येऊन हक्काने घेऊन जायची. वयाने आई पेक्षा मोठी असलेली एक गावकरी बाई आपल्या आगरी लहेज्यातुन मला दादा अणि माझ्या बहिणींना पोरी म्हणायची याचं खुप अप्रूप वाटायचे.

पूजेच्या साहित्या मध्ये खारका, बदाम, हळकुण्ड, अक्रोड इत्यादी माफक जिन्नस देखिल असायचे. पूजाविधि कुणाकडे झालाय यावरून यातील जिन्नस कमी जास्त व्हायचे …. इतकच काय त्याची प्रत पण अवलंबून असायची. एक विशिष्ठ प्रकारची खरीक असायची पिवळट रंगाची, अतिशय गोड. बाबा तिला साखरी खारीक म्हणायचे. आलेल्या सामानात ती दिसली रे दिसली की एक एक आमच्या तिघांच्या हातावर ठेवीत. अर्थात या गोष्टी मुबलक असल्याने आम्हाला त्याचे विशेष वाटायचे नाही. किंवा बरेच वेळा त्यांना लागलेल्या हळद कुंकू या मुळे खायची इच्छा व्हायची नाही. तीच गत बदामांची. आधी बत्त्याने ते फोडा आणि मग ते थोड़े खाऊन बघा खवट असेल तर चमचा भर साखर खाल्ल्या शिवाय तोंडाला चव येत नसे. वडिलांनी अक्रोड, खारीक, बदाम यांच्या पौष्टिकतेचे सगळे संस्कार आमच्यावर करण्याचा प्रयत्न केला. पण यश काही आले नाही. आम्ही आपले त्यांच्या देखत गपगुमान हे सगळ पाण्याच्या घोटा सरशी रिचवायचो. पण आईची मात्रा काही चालायची नाही. धाक अणि प्रेमातला हाच काय तो फरक.

२०-२५ वर्षांपूर्वी बोर्नव्हिटा, होर्लिक्स तत्सम पावडरीची रेलचेल नव्हती. आणि असले लाड परवडणारे देखिल नव्हते. सगळ्या प्रकारच्या भाज्या, धान्य, कडधान्य खा मग बाकीच्या पावडरी चूर्ण यांची गरजच काय? अशी विचारसरणी त्यामुळे तीर्थरुपांच्या मागे लागुन देखिल असल्या चुर्णांचा प्रसाद मिळवणे शक्य नव्हते. पण बहुतेक त्यांनी एक शक्कल लढवली असणार. ते म्हणाले आपण घरीच बनवू ती पावडर. त्यावेळी घरगुती पदार्थाना एक वेगळेच महत्व होते. आणि “घरगुती” या शब्दाचा अर्थ पण वेगळा होता …. स्वतः च्या घरात बनवलेल म्हणजे “घरगुती” … आजकाल दुकानात मिळणार्या घरगुती भाजणीच्या पिठा प्रमाणे दुसऱ्याच्या घरी बनवलेले कमर्शियल “घरगुती” नाही काही.

प्रायोगिक तत्वावर त्यांनी आपल्या मुलांसाठी ही पौष्टिक पावडर बनवण्याचे ठरवले. आलेल्या सामानातुन त्यातल्या त्यात चांगले वाटणारे सुपलीभर खारिक, बदाम, अक्रोड आदी जिन्नस जमा केले. व्यवस्थित धुऊन आणि वाळवुन घेतले. सुपारी कातरण्याच्या अडकित्त्याने आधी खारका कापून त्यातल्या बिया बाजूला काढल्या. मग अडकीत्त्यानेच त्याचे बारीक तुकडे केले. बत्त्याने बदामाचे जाड कठीण कवच फोडले. प्रत्येक बदामाचा छोटा तुकडा खाऊन बघायचा, खवट कडवट असेल तर बदाम फेकून द्यायचा. चांगला असेल तर त्याचे पण अडकित्याने तुकडे करायचे. अक्रोडाची पण अशीच गत. अक्रोड जास्त खराब निघायचे. अगदी वरून उत्तम प्रतीचे वाटणारे अक्रोड आतून खुळखुळा असायचे. अडकित्त्याने सगळ्याचे बारीक तुकडे करून त्याचे मिक्सर मधून बारीक चूर्ण केले. गोडी वाढावी म्हणून चवीला साखर घातली. चांगली डबा भर झाली ती. सुरुवातीला नियमित पणे त्याचे चर्वण व्हायचे. बाबांचा प्रयोग आवडला होता आणि बऱ्या प्रमाणात यशस्वी देखील झाला होता. अगदी दुधात टाकून मसाला दुध म्हणून मिटक्या मारत प्यायलय देखील. त्या नंतर देखील असे प्रयोग झाले पण पहिला प्रयोग जमून गेला. नंतर मात्र बाबांनी असं काही बनवल्याचे आठवत नाही. कारण काही वर्षांनी घरात होर्लीक्स, बोर्नव्हिटा चे डबे दिसू लागले. पूजेच्या सामानात खारीक बदाम कमी होऊ लागले आणि कालमानापरत्वे “घरगुती” ची व्याख्या बदलू लागली.

परवाच सामानात साखरी खारीक बघितली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पण ही आत्ताची साखरी खारीक दिसायला जुन्या खारके प्रमाणे असली तरी आकाराने बरीच लहान होती. नीट धुवून चव बघितली तर साखरीच काय तर तिच्या खारीक असण्यावर पण संशय येऊ लागला. तसंही आता पूजा साहित्याच्या दुकानात पूजे साठी विशिष्ठ प्रतीचे खारीक बदाम अक्रोड नारळ सुपाऱ्या मिळातात. त्या इतक्या सुकलेल्या असतात की त्याचा सुकामेवा बनवणे निव्वळ अशक्य. आकाराने अतिशय लहान आणि निव्वळ पूजे साठी वापरता येतील असे. पूजा झाली की निर्माल्यात टाकून देण्या सारख्या. बर चौरंग तरी कुठे मोठे राहिलेत?  कुटुंबाच्या आकारा बरोबरच चौरंग पण लहान झालेत ना मग त्यावर मावेल असेच साहित्य हवे ना.

सुकामेव्याची पावडर पण घरगुती मिळायला लागली आहे. दुधात विरघळणारी …. एव्हरेस्ट च्या मसाला दुध पावडर सारखी …. पण लहानपणीच्या आठवणींचा मेवा आणि वडिलांच्या प्रेमाची पौष्टिकता त्यात नाही.

8 thoughts on “सुकामेवा

 1. “​माझ्या घरी बाबा अजूनही पौरोहित्य करतात आणि ‘सुकामेवा’ चा हा वारसा आता पुढच्या पिढीला ट्रान्स्फर होतोय … :)”
  पोस्ट मस्त …. खरच जुने दिवस आठवले ….

  • चला म्हणजे आपण समदुःखी आणि समसुखी देखील. सगळ्याच गोष्टींचा वारसा पुढल्या पिढीला ट्रान्स्फर होतोय. 😉
   धन्यवाद.

 2. छान स्वगत . लहानपणी पूजेला घरी येणारया गुरुजी ंच्या घरातील मुलांची कित्ती मज्जा असेल ना असं वाटायच. आज इतक्या वर्षांनी दुसरी बाजू कळली ..
  कुटुंबाच्या आकारा बरोबरच चौरंग पण लहान झालेत ना – अगदी खरं .
  आवडली पोस्ट.

  • धन्यवाद पद्मश्री….
   प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. जी जास्त उजळ तीच समोर येते. पण आम्ही खूप मज्जा केली हे मात्र खरे आहे.
   अनुदिनीला अशीच भेट देत रहा.

  • आजकाल खास ठेवणीतले पूजेचे साहित्य मिळते आणि बरेच वेळा तेच घेतले जाते. अश्या बऱ्याच आठवणी आहेत …. शब्दात उतरवायला मला देखील आवडेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s