प्राचार्य – भाग ०१

विज्ञान शाखेत प्रवेश मिळवायला पुरेसे गुण न मिळाल्याने आणि पुढील शिक्षण विज्ञान शाखेतुनच करायचे असा हट्ट असल्याने महाविद्यालयीन प्रवेशा साठी ससेहोलपट सुरु झाली होती. बऱ्याच कॉलेजांचे उंबरठे झिजवता झिजवता हक्काचे टिळक नगर महाविद्यालय हातातून निसटले होते. बाकीच्या ठिकाणी देखिल निराशाच पदरी पडली. मनाचा हिय्या करून परत टिळक नगरच्या तत्कालीन प्राचार्याना भेटलो. त्यांनी किमान शब्दात नकार कळवुन माझी बोळवण केली. त्यांचे पण बरोबरच होते म्हणा… जेंव्हा मला प्रवेश मिळत होता तेंव्हा घेतला नाही आणि आता कुठेच मिळत नाही म्हणून माझ्या परत येण्याने त्यांचा आत्मसन्मान दुखावला होता. खरे तर त्यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना असून सुद्धा मी परत का गेलो असा प्रश्न मला बरेचदा पडतो.

शेवटी जिल्हा परिषदेचे पाय धरले आणि माझ्या सारख्या काही समदु:खी, प्रलोभनांना फसलेल्या, फिरून फिरून दमलेल्या ३० – ३५ विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन शिक्षणाची सोय केली. किडलैंड या डोम्बिवलीच्या शाळेच्या खांद्यावर आमची जबाबदारी झटकून झेड पी मोकळी झाली. कॉलेज चालु झाले पण शिक्षणाच्या नावाने आनंदी आनंदच होता. शाळाच ती, त्याच सोयींमध्ये कॉलेज कसे चालवणार? शेवटी व्हायचे तेच झाले. अकरावी चे शिवधनुष्य आमच्या पेक्षा शाळेलाच जड झाले आणि आमची जबाबदारी परत एकदा झेड पी वर येउन पडली. याच अस्थिर वातावरणात जिथे वर्ष फुकट जाते की काय अशी चिंता लागुन राहिली असताना परत प्रवेशासाठी धडपड करणे म्हणजे एक दिव्य होते. आणि परत अश्याच एखाद्या शाळेत आमची सोय केली तर मग कॉलेजच्या शिक्षणाची पुरे वाट लागली असती. पण आमचा भवितव्याचा निर्णय आधीच झाला होता. झेड पी ने ठाणे, डोम्बिवली परिसरातील प्रत्येक महाविद्यालयात २ – २, ३ – ३ विद्यार्थी घुसवुन टाकले. यादी जाहीर झाली … माझ्या आणि माझा मित्र अमित भुस्कुटे याच्या नावापुढे टिळक नगर महाविद्यालय हे नाव वाचले आणि एक अनाहूत भीती वाटायला लागली. परत तेच प्राचार्य … शालेय जीवनात दहा बारा वर्षे अनुभवलेला धाक, शिस्त किमान एक वर्ष तरी सामोरे जावे लागणार.

पहिल्या दिवशी जेंव्हा कॉलेज मध्ये गेलो तेंव्हा माहेरी आल्या सारखं वाटलं. ज्या वातावरणाची गेली ११ वर्षे सवय होती त्यात नवखेपणा कुठून येणार. या कडक शिस्तीला, नजरेच्या धाकाला आम्ही चांगलेच सरावलो होतो. शिपायाचा निरोप आला “तुम्हाला सरांनी बोलावले आहे. घरी जाताना भेटून जा”. हे त्याचे शब्द म्हणजे “यमाने तुम्हाला बोलावले आहे …. लाकडे पेटवून तयार रहा” अशा स्वरुपाची भासली. दिवसाचे तास संपले आणि परत शिपाई म्हणाला “भेटून जा सरांना … नाहीतर जाल तसेच”. आमचा वर्ग आणि प्राचार्यांची केबीन हे अंतर म्हणजे जेमतेम १०० मीटर असेल पण तेच १०० मैल वाटत होते. हृदयाची धडधड कमालीची वाढली होती … पोटात येणार्या गोळ्याचे भाऊबंध शरीरातील इतर कुठल्या कुठल्या अवयावात अचानक उत्पन्न झाले होते याचे अनुमान लावणे खरच शक्य नव्हते. मजल दरमजल करत आम्ही त्यांच्या केबीन च्या दरवाज्यात उभे राहिलो. आत येऊ का हे विचारताना मान खाली आणि नजर आमच्या पायाच्या अंगठ्या वर खिळलेली हा अंगवळणी पडलेला शालेय शिरस्त्याचे पालन त्यावेळी देखिल झाले …. अगदी नकळत. सिंहाच्या पिंजर्याच्या दरवाज्यात उभे राहणे …. त्या नंतरच्या डरकाळ्या …. भीतीने उडालेली गाळण … वेताच्या छडीचे दोन चार वार …. विद्यार्थी नेस्तनाबूत .. परत एक “दाखला” देणारी डारकाळी …. हा क्रम वर्षोंवर्ष पाठ झालेला …. अनुभवलेला. पण ही वेळ वेगळी होती …काहीच अपराध केला नसल्याने शिक्षेची भीती नव्हती. विद्यार्थ्यांवर जरब असणे हा त्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग होता.

आतून आवाज आला “या”. नजर वर करून बघितले तर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. प्रसन्न चेहेर्याचे हसरे प्राचार्य मी कधीच बघितले नव्हते. क्षणार्धात केबिन मधील वातावरण सुसह्य वाटत होते. त्यांची भेदक नजर अचानक सौम्य वाटायला लागली पण आवाजाला तीच धार होती. “मीच झेड पी मध्ये सांगून तुम्हांला या महाविद्यालयात प्रवेश दिला. म्हटलं माझी मुले आहेत परत माझ्या कडेच पाठवा. अकरावीत तुमची आबाळ झाली आता नीट मन लावून अभ्यास करा”. नेहेमीच ताशेरे ओढणारे शब्द या वेळी मात्र हळुवार फुंकर मारून गेले.

5 thoughts on “प्राचार्य – भाग ०१

  • धन्यवाद विवेक,
   आपण सगळ्यांनीच थोड्या फार फरकाने हा अनुभव घेतला आहे. पण तेच शिस्तीचे संस्कार सध्या कुठे तरी कमी पडत आहेत असे वाटते. सध्याच्या शिक्षकांच्या हातातील छडी गेली आणि त्यांचा धाक पण संपुष्टात आला.
   अशीच भेट देत रहा. 🙂

 1. आमच्या एन.डीं.ची आठवण झाली दादा एकदम. सोलापूरच्या एस.ई.एस. तंत्रनिकेतनाचे सद्ध्याचे प्राचार्य आणि तेव्हाचे (१९९१-९४) आमचे इलेक्ट्रॉनिक्सचे विभागप्रमुख श्री. एन.डी. कुलकर्णी सर…

  तीन वर्षे त्यांच्या शिस्तप्रिय अनुशासनाखाली काढलेली. प्रसंगी “साला, कॉलेज आहे का प्राथमिक शाळा?” असले उदगारही रागाने काढलेले कारण एन.डी.सरांची शिस्त तशीच होती. पण डिप्लोमा पुर्ण झाल्यावर बी.ई. साठी सतरा ठिकाणी वहाणा झिझवणे सुरू झाले. ९४ साली अजुनही ऒनलाईन लिस्ट्स किंवा कॉलेजला नंबर लागणे हे प्रकार फ़ारसे नव्हते. तरीसुद्धा डिप्लोमाच्या अंतीम वर्षाच्या अवघ्या ७८% मार्कांवर पुण्यात सी.ओ.ई.पी. ला प्रवेश मिळाला तेव्हा आनंदाचा “शॉक”च बसला होता. पण पहिल्याच दिवशी जोशीसरांनी (तेव्हाचे इलेक्ट्रॊनिक्सचे एच.ओ.डी.) बोलावून घेतले आणि सांगितले की एन.डी. नी तुमच्यासाठी खास शिफ़ारस केलेली आहे. “हा माझा विद्यार्थी आहे म्हणून नाही तर खरोखर डिझर्व्हींग आहे म्हणून माझ्या तत्वांना मुरड घालून त्याच्यासाठी शिफारस करतोय. त्याला एक संधी देवून बघा” . म्हणून आऊट ऑफ़ द वे जावून तुम्हाला प्रवेश ते ही फ़्री सीट मिळालीय. एन.डी.सरांची लाज राखणे आता तुमच्या हातात आहे. हे सांगितले तेव्हा डोळ्यात पाणीच आले होते.

  परवा खुप वर्षांनी एनडींना भेटलो. सर त्यांच्या नेहमीच्या सकाळच्या राऊंडवर होते. (दोन विद्यार्थी आणि प्युन्स बरोबर घेवून) मैदानावर कुठे कचरा नाहीये ना हे चेक करणे हा सरांचा दिनक्रम) . तिथेच मैदानावर त्यांच्या पायावर डोके ठेवले. तर सरांच्या डोळ्यात पाण्याच्या धारा.

  “मग विशालभाऊ, काय म्हणते तुमचे ट्रिंबल?”

  मी शॉक्ड… “सर तुम्हाला कसे कळले मी ट्रिंबलमध्ये आहे ते? गेल्या कित्येक वर्षात आपला संपर्कही नाहीये.”

  “अरे बाबा, लेकरं कितीही लांब गेली तरी बापाला नजर ठेवावीच लागते. आणि माझ्याशी जरी संपर्क नसला तुझा तरी गेल्या १५-२० वर्षात आपल्या कॉलेजची २५-३० मुले तू वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपन्यातुन चिटकवून दिली आहेस ना, मग झाले की! मला माझी पोच मिळाली. अजुन काय हवे. आणि इतक्या वर्षानंतर का होइना आठवण ठेवून भेटायला आलासच ना? झाले तर. चल मला अजुन बरीच कामे आहेत. संपर्कात राहा रे बाबांनो..” एवढे बोलून सर त्यांच्या नित्यकर्माला लागले.

  माझ्या आयुष्याचे सोने केले होते त्यांनी. त्यामुळे मी त्यांना विसरणे शक्यच नाही. पण २० वर्षानंतरसुद्धा आपल्या विद्यार्थ्याला त्याच्या नावासकट लक्षात ठेवणे हे आमचे एन.डी.च करु जाणोत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s