दिवाळीचा फराळ

Faral

शाळेत असताना चाचणी परीक्षा संपता संपता वार्षिक सणवारांना सुरुवात व्हायची. दसर्याला लुटलेल्या आपट्याच्या पाना आडून दिवाळीची अलगद चाहुल लागायची. पण मधेच सहामाही परीक्षेचा उभा असलेला बागुलबुवा पार करणे जीवावर यायचे. दिवाळीच्या सुट्टीची स्वप्ने रंगवतच शेवटचा पेपर कसा तरी लिहिला जायचा. कारण वेध लागलेले असायचे दिवाळीचे, फटाक्यांचे, फराळाचे, आणि नवीन कपड्यांचे. शेवटचा पेपर बाईंच्या हाती सुपूर्द केला की आम्ही शेपटी वर करून धावणार्या वासरासाराखे उण्डारत घरी यायचो. घरात दिवाळीची तयारी केंव्हाच सुरु झालेली असायची. आपली परीक्षा असली तरी घरातली सणाची तयारी थांबते का? लहान होतो तेंव्हा या सगळ्यात कधी पडावे लागले नाही. त्यामुळे किल्ला बनवणे यालाच अग्रक्रम. पण जसजसा इयत्ता वाढत गेल्या तसं हे चित्र बदलत गेलं. परीक्षा संपली की दिवाळी साठीची मी करायची कामे या शीर्षकाची एक यादीच तयार असायची. त्यात बाहेरून सामान आणण्याच्या चकरा ठरलेल्या. महत्वाची कामे म्हणजे ओझी वहाणे आणि साफसफाई. दिवाळीचा फराळ काहीही झाले तरी घरीच करण्याचा शिरस्ता असलेले दिवस ते…त्यामुळे फराळ अस्सल घरगुती. चिवडा, चकल्या, लाडू, शंकरपाळे, करंज्या आधीच फ़स्त होण्याची खात्री असल्याने दिवाळिच्या आठवडाभर आगोदर फराळाची भट्टी जमायची. बर थोडेथोडके पुरत नसे. 2-3 किलोच्या चकल्या, तितकेच शंकरपाळे, 30-40 लाडू, 5-6 किलोचा चिवडा…. असं सगळ करायचे म्हणजे दर दिवशी एक जिन्नस. सगळ घर फ़राळमय व्हायचे …. चार पाच दिवस नुसतं चव घेतो असं म्हणून पोट भरायचं. अगदी लहान होतो तेंव्हा आई निक्षुन सांगायची “फ़राळ करत असताना तू अजिबात जवळ येऊ नकोस… पदार्थ बिघडेल.” असा कसा बिघडतो हे तिचे तिलाच माहीत. ताई मदत करायची…. म्हणजे तिच्या मुळे पदार्थ बिघडत नव्हते असं नाही पण माझी लुडबुड आणि बडबड जास्त त्यामुळे फराळकरींचे लक्ष विचलित व्हायचे.

कळायला लागल्या पासून मी पण या फराळकरींमध्ये सामील झालो.  विशेषतः शारीरिक श्रमाची कामेच जास्त अंगावर पडायची. चकलिचे पीठ मळणे, शंकरपाळ्याचे पीठ तिम्बणे किंवा शेजराच्यांचा सोर्या घट्ट असेल तर चकल्या पाडणे. ही सगळी शक्तिची आणि सक्तीची कामे माझ्या वाट्याला यायची. सोर्याच्या बाकीच्या चकात्यांशी खेळणे बंद झाले आणि दिवाळीच्या आधी चकल्या, शेव पाडण्याच्या निमित्ताने सोर्या कायम हातात राहिला. नंतर दांडी फिरवून चकल्या शेव पाडणार्या पितळी सोर्याची सोय झाली आणि कष्ट थोड़े कमी झाले. पण पारंपारिक रित्या घट्ट लाकडी सोर्याचे महत्त्व तसुभर कमी झाले नाही. अश्या माझ्यासारख्या चकलीपाडेकरीं वर अंजली नामक कंपनीचे अनंत उपकार आहेत. स्टीलचा स्प्रिंग असलेला यंत्रात्मक सोर्या त्यांनी बाजारात आणला आणि माझे दिवाळीतिल शक्तिप्रदार्शनाचे प्रयोग कमी झाले. (तेंव्हा लग्नात बायकोचे नाव बदलतात हे नुकतेच समजले होते आणि बायकोचे अंजली नामकरण करण्याचे ठरवले पण नात्यातच एक अंजली नावाची काकू असल्याने तो बेत बारगळला. आणि जेंव्हा प्रत्यक्ष लग्नाची वेळ आली तेंव्हा अंजली हा brand बाजारातून गायब झाला होता. प्रेस्टीज, hawkins, सुमित अश्या काही कंपन्यांची मक्तेदारी होती …. आता ही नावे ठेवली तर कंकण सोडतानाच काडीमोड झाला असता.).  त्यावेळी चाळ वजा बिल्डिंग मध्ये रहात असल्याने कधी कधी सामूहिक रित्या फ़राळ बनवण्याची प्रक्रिया चालायची. म्हणजे चिवडा आमच्या कड़े, चकल्या कासखेडीकर, शंकरपाळे बिबिकरांकडे असे जिन्नस वाटप व्हायचे. पण हा उपक्रम जास्त तग धरू शकला नाही.

खरी मज्जा असायची ते दर दिवशी पदार्थ पूर्ण झाल्यावरची. आई एका वाटीत तो पदार्थ देऊन देवा पुढे ठेवायला सांगायची. कोणताही पदार्थ केला तरी आधी तो देवा पुढे मगच त्याची चव घ्यायची अशी श्रद्धाच होती. किंवा पदार्थात काही न्युनत्व राहिले नसेल याची खात्री म्हणा हवे तर. मी वाटी ठेवल्या ठेवल्या लगेच उचलून परत आई कडे जायचो. आई रागवायची अरे थोडा वेळ तरी वाटी ठेव देवाची नजर तरी पडून दे. पण आम्हा बाळगोपाळाना कुठे आलाय धीर? बराचसा फराळ असा चव घेण्यातच अर्धा व्हायचा. आणि आमची दिवाळी, पाच सहा दिवस आगोदरच चालु व्हायची. बाहेरुन कुणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी वेगळा काढून उरलेला फराळ आमच्या करता मुक्त ठेवण्यात यायचा. आम्ही इतके फराळमय व्हायचो की कधी कधी मस्त कुरकुरीत चिवड्यावर शेव आणि ओला नारळ घालून रात्रीच्या जेवणाचा बेत व्हायचा. सकाळी चकली, कडबोळी नाश्त्याला असायचे. तर संध्याकाळी शंकरपाळे गरमा गरम चहा ची सोबत करायचे.

कालमाना परत्वे घरातील स्त्रीला नोकरी निमित्ताने बाहेर पडावे लागले आणि घराघरात दुसर्याच्या घरात बनवलेला आयता फराळ प्लास्टिकच्या पिशाव्यांमधून त्यावर असलेल्या “घरगुती” लेबल घेउन आपल्या स्वयंपाक घरापर्यंत पोचला. अगदी सातासमुद्रा पलिकडे असलेल्या लेकाला किंवा लेकीला असे “घरगुती दिवाळी फराळ” पोचवण्याची व्यवस्था बिनदिक्कत होते….तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची… पूर्वी सिझनल असलेले हे पदार्थ दिवाळीत किंवा लग्न मुंज समारंभात बनवले जायचे ते आता बारमाही झाले आणि त्यांची फराळ स्वरुपातली रुची कमी झाली. सहज उपलब्धता आणि उत्तम दर्जा या दोन शब्दांपायी आम्ही दिवाळीच्या आधी घराघरातुन येणार्या खमंग सुवासाला मुकलो. देवापुढे ठेवलेल्या वाटीची मज्जा आता कालबाह्य झाल्या सारखी वाटते. अर्थात शेकोटी थंड झाली तरी त्याची धग आत जागी असते. त्या प्रमाणे अजुनही काही “आईची स्पेशलिटी” असलेले पदार्थ घरीच बनतात आणि तेवढ्या पुरती एखादी वाटी चव घेण्या आगोदर देवासमोर ठेवली जाते…. पदार्थ बनवण्यात कुठलीही त्रुटी राहिली नसेल या त्याच जुन्या खात्रीने….श्रद्धेने …. आणि विश्वासाने.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s