चहाट(वा)ळकी -०६: ओ.बा.माने हाजीर व्हावे

भाजपाचे सरकार आल्यावर बाबू ने केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आणि बाबू भलताच खुश झाला. “अटलजींना येत्या पाच वर्षात भारतरत्न मिळतय का नाय ते बग …. पाहिजे तर पैज लावतो” असे म्हणत पुढे केलेला बाबूचा हात अजूनही त्याच्याच काय पण सगळ्या ऑफिस च्या लक्षात आहे. बाबूच्या पैजा म्हणजे त्याच्या व्यवसायाशी निगडित…. अतिशय माफक. आठवाड्याचा चहा फुकट जर तो हरला तर किंवा जिंकला तर ऑफिस ला चहा पार्टी. तरी पण त्याची विधाने म्हणजे साक्षात सत्यवचन. जणू जिभेवर कुठेतरी तीळ घेऊन जन्माला आलेल्या भविष्यवेत्त्या सारखा.. कुणीही कितीही कान फुंकण्याचे प्रयत्न केले तरी याचे ब्रिदवाक्य ठरलेले, “नाय पटत?? मग लावा पैज”. मग अश्यावेळी समोरचा पैज वगैरे लावण्याच्या भानगडीत न पडता त्याच्याशी समेट करून सुटका करून घ्यायचा. पण आपले आडाखे बरोब्बर असतील याची त्याला खात्री असायची. त्यामुळे फुकटचा चहा पाजण्याची वेळ क्वचितच त्याच्यावर यायची.

२६ जानेवारी जवळ यायला लागला तशी स्वारी जास्तच खुशीत होती. जुन्याजाणत्या मंडळींना अटल बिहारी वाजपेयीं बद्दल जशी आस्था आणि आपुलकी आहे तीच आमच्या बाबूच्या मनात नखशिखांत भरलेली आहे. अजूनही त्याचे असेच मत होते की जशी त्याच्या चायवाल्याला एक हाती सत्ता मिळाली आहे तशीच जर अटलजींना मिळाली असती तर देशाचे १०-१५ वर्ष्यापुर्वीच भले झाले असते. पण जी किमया मोदींनी केली तेवढा करिष्मा अटलजींचा नसता हे देखील तो प्रांजळ पाने कबुल करतो. कारण अटलजी जरा मवाळ वृत्तीचे, कविता त्यांचे शब्द यांच्यात रमणारे तर मोदी आरे ला कारे करणारे, एकदम सडेतोड. बाबूला या दोघांचे हे टोकाचे गुण भावतात आणि बाबू हळवा होतो.

बाबू जास्त शिकला नसला तरी त्याला राजकारण, समाजकारण याची उत्तम जाण होती. अस्सल कशिदेकारी हिंदी मध्ये केलेल्या अटलजिंच्या शुद्ध भाषेतल्या कविता मात्र त्याला काही कळायच्या नाहीत. (अर्थात आमच्या हिंदीचा पाया हा अस्सल बंबैय्या हिंदी असल्याने बहुतांशी भेसळ नसलेल्या कविता कळणे तसे कठीणच) काहीही असो … या २६ जानेवारीला पंडित मदन मोहन मालवीय आणि अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न मिळणार म्हणून बाबू भलताच खुश होता. २६ जानेवारीच्या सोहोळयाचे थेट प्रक्षेपण बघायचे असल्याने सकाळी चहाचे दुकान बंद असणार आहे अशी नोटिस त्याने आधीच काढली होती.

आपल्या देशाच्या प्रजासत्ताक दिना निमित्त मोदींनी ओबामांना आवताण दिले आणि बाबूचा पापड मोडला. काही वर्षांपूर्वी मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला होता याचा राग अजूनही बाबूच्या मनात सलत होता. आता मोदी लाटेपुढे अमेरिका पण ओली झाली हे बघून तो सुखावला असला तरी पण अमेरिका नरेशांचे येणे त्याला काही विशेष रुचले नव्हते. त्याच्या लेखी अमेरिका म्हणजे तद्दन अप्पलपोटा देश, एक नंबरचा स्वार्थी आणि असंस्कृत. स्वतःचे अंगण स्वच्छ ठेवून दुसऱ्याच्या अंगणात दंगा करणारे पुंड राष्ट्र असे त्याचे स्पष्ट मत. ढोबळमानाने रास्तच होते म्हणा. आज काही अंशी पाकिस्तानला दिलेले झुकते माप ही अमेरिकेची आंतरराष्ट्रीय खेळी आहे जेणे करून रशिया आणि चीन वर अंकुश ठेवता येईल आणि प्रसंगी पाकिस्तानच्या भारतातील कुरापतींकडे दुर्लक्ष्य करून आशिया खंडात अशांतता कशी नांदेल याची बेगमी करता येईल. बाबूची अमेरीकेबद्दलची मते अशी स्पष्ट होती. मला नेहेमी आश्चर्य वाटते की इतके विचार करण्यासाठी लागणारे वाचन हा इसम कुठे करतो?

२३ जानेवारीला सकाळी माझ्या ग्लासात चहा ओतत बाबू म्हणाला, “साहेब, बघितलात मोदींचा करिष्मा आणला कि नाही त्या अमेरिका नरेशला भारतात? जातोय कुठे? त्याला कळून चुकलंय या चायवाल्याशी पंगा घेण्यात काय पण अर्थ नाय. मोदींच्या अमेरिका वारीच्या वेळी झालेली गर्दी बघून अनेक गोऱ्या लोकांचे घारे डोळे पांढरे फटक पडले असतील.”

मी: “हो रे बाबू, ओबामा पण घाबरला असेल की इतके भारताचे पंतप्रधान येऊन गेले पण रस्त्याच्या कडेला गर्दी करून त्यांचा तिरंगा दाखवण्या व्यतिरिक्त जंगी स्वागत कुणाचेच झाले नाही. आणि हा नरेंद्र भाई येतो काय … सभा घेतो काय …. हजारोंनी जमाव जमतो काय …”

“नुसता जमाव जमला नव्हता काय … त्यांनी तर एका नावाजलेल्या ज्येष्ठ पत्रकाराला प्रसाद पण दिला होता. मोदींना मिळणारा इतका मोठा पाठिंबा बघून ओबामा म्हणाला असेल बरे झाले याला या वेळी व्हिसा नाकारला नाही. नाय तर काही खरे नव्हते. सगळे एणाराय (NRI) लोकं नाराज झाली असती आणि आल्या पावली परत भारतात आली असती.” आमचा ऑफिस बॉय गण्याने मध्येच नाक खुपसले.

“पैजेवर सांगतो कुणीही परत आले नसते …. खुळा की काय तू गण्या? तिथल्या मोहरांचे मोह आवरून इकडले छदाम घेऊन झोळी भरायला ते काय येडे आहेत. इथे दुसर्या देशात प्रसिद्ध झालेल्या लोकांमध्ये एखादे भारतीय नाव सापडले रे सापडले की इकडच्या मिडीयाचे अनिवासी भारतीय प्रेम उफाळून येते. त्या बॉबी जिंदालचेच बघ. इकडचे लोक ओरडत होते अमेरिकेत राजकारणी असला तरी अनिवासी भारतीय म्हणजे मुळचा भारतीयच आहे हो तो. पण त्याच बॉबी जिंदालने इकडच्या लोकांना कसे तोंडावर आपटवले ते विसरलास? चक्क मी केवळ अमेरिकन आहे आणि इथे मिळणाऱ्या सुख सोईंसाठी माझे वडील भारत सोडून अमेरिकेत आले. एकदा तिकडची चटक लागली तर तू तरी येशील का परत?” बाबूने गाण्याला फटकारलं आणि गण्याचे श्रवणाचे काम परत चालू झाले.

“आमचा चायवाला पक्का गुज्जू भाई. तो असली संधी सोडणार थोडीच? पाठवलेन अवताण … प्रजासत्ताक दिनाला हाजीर व्हा प्रमुख पाहुणे म्हणून. मनात असो अथवा नसो पण शिष्टाचार संभाळण्यासाठी का होईना ओबामाला झक्कत यावेच लागले. त्या शपथविधीच्या वेळी नाय का त्या नवाझ शरीफची गोची केली होती. निमुटपणे आला आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाऊन गेला.” बाबूने ओबामाच्या येण्याचे मूळ कारण उद्धृत केले.

“अरे ओबामा काय उगाच नाही येतोय इथे. ओसामा संपला, आता पाकिस्तानात काही रस राहिला नाही त्या अमेरिकेला. बरे पाकिस्तानच्या मदतीने पोसलेला अजगर आता पाकिस्तानलाच गिळंकृत करायला निघाला आहे आणि त्याच्याशी अमेरिकेला विशेष स्वारस्य उरले नाहीये कारण त्याबदल्यात अमेरिकेने पाकिस्तानला योग्य ते सहाय्य अमेरिकी अंकल गेले कित्येक वर्षे करत आलेत. म्हणून तर येण्याच्या आधी व्हाईट हाउस वरून त्या पाकड्यांना सज्जड दम भरला गेला ओबामांच्या भेटीच्या वेळी भारताच्या सीमेवर काही गडबड कराल तर याद राखा.” – मी

“पण म्हणजे अमेरिका किती चालबाज आहे हे लक्षात आले का साहेब? आम्ही तिथे असताना तुमच्या तोफा बंद करा, दोन चार दिवस कळ सोसा. तुमच्या घुसखोरांना ताजेतवाने होऊ द्या. त्यांना त्यांच्या बायका मुलांबरोबर वेळ घालवू द्या तेवढीच त्यांची प्रजा वाढायला मदत होईल. आमचा पाय इथून निघाला की चालू द्या तुमची जुनी शांततेची बोलणी. आणि इथे म्हणे त्या ओबामाला तोफांची सलामी देणार आहेत.” – बाबू

“त्यात पाकिस्तानने आता लाल झेंड्या बरोबर सख्य वाढवायला सुरुवात केली आहे. लाल झेंडा आणि निळा झेंडा एकमेकांच्या सावलीत देखील उभे रहात नाहीत. आणि या मितीला चायनीज लाल झेंड्याला रोखण्याची ताकद केवळ तिरंग्यात आहे. त्यामुळे भारताशी सलगी वाढवण्याची अशी सुवर्णसंधी अमेरिका नरेश अजिबात सोडणार नाहीत.” चहाच्या घोटासरशी आलेले ढोबळ विचार मांडल्यावर मी बाबू कडे प्रतिक्रियेच्या अपेक्षेने बघत होतो. नेमके त्याच वेळी बाबू गण्या कडे बघत होता.

“साहेब बरोब्बर बोलताय …पण मी काय बोलतो हे चायनीज जाम ब्येक्कार …. कसल्या त्या लाल गाड्या … तो शेजवान सॉस ….पोटाची पार वाटच लागते. मी तर म्हणतो ……..” गण्या वेगळ्याच विश्वात नांदत होता. गण्याचे हे असंबद्ध बोलणे मध्येच थांबवून बाबू म्हणाला, “साहेब चीन ला टक्कर देणे जाम मुश्कील दिसते. आपला सगळा बाजार त्या चायनीज वस्तूंनी भरलेला आहे. आणि स्वस्त असल्यामुळे भारतीय माल कुणीच घेत नाही. आता हा ओबामा नुसता येऊन उपयोग नाही. भारता बरोबर व्यावसाईक सहकार्य वाढवले, काही नियमांच्या नाड्या सैल सोडल्यान तर त्याची भेट सार्थकी लागेल असे म्हणायला हरकत नाही. नाही तर नळी फुंकली सोनारे … इकडून तिकडून गेले वारे.” – बाबू

“ही त्याची भेट किती सार्थकी लागेल याची मला शाश्वती वाटत नाही. पण काही चांगल्या उपक्रमांची नांदी असू शकते. पण त्याचे वेळी ओबामा दाखवायचे दात बरोबर घेऊन येतोय का खायचे दात हे बघावे लागेल. कारण याच ओबामाने मागे एकदा बाहेरच्या लोकांना नोकर्या देण्या पेक्षा स्थानिक लोकांना प्राधान्य द्या असे सांगून अनिवासीय भारतीयांच्या गोटात खळबळ माजवलेली होती. ही त्याची भेट आपल्या तिकडच्या लोकांच्या घर वापसी साठी फायदेशीर ठरली तर उत्तमच. पण काहीही म्हण बाबू तुझा चायवाला खरच ग्रेट आहे. जबरदस्त प्लान करून शपथविधी स्वतःच्या मर्जीनुसार करून घेतलान आणि आता साक्षात अमेरिका नरेश बराक भाऊ ओबामांना निमंत्रण देऊन या ६६व्या प्रजासत्ताक दिन अगदी बिनबोभाट पार पडेल याची बेगमी करून ठेवली.” – मी

“अगदी मनातले बोललात साहेब. बघू काय करतात हे बराक भाऊ ओबामा २६ जानेवारीच्या मुहूर्तावर. भेटू मंगळवारी २७ जानेवारीला परत.” – बाबू

आजूबाजूला तीन दिवसांच्या सुट्टीचे आडाखे बांधणे चालू झाले होते. त्या ओघात प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन बाबू आमचे रिकामे झालेले चहाचे ग्लास उचलून कधी निघून गेला ते कळलेच नाही.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s