असा कसा हा राम

दिल्लीत एका स्त्रीवर माणुसकीला काळीमा फासणारी दुर्घटना घडली. अर्थात आत्ता पर्यंत सर्व स्तरांवर या बाबत बरेच बोलले गेले लिहिलेही गेले. माईकचे बोंडूक तोंडासमोर धरून बातमीदार कंठशोष करत होते. कधी कधी याच बातमीदारांनी त्या पिडीत तरुणीचा शाब्दिक बलात्कार केला. पत्रकारांच्या लेखण्यांसोबत पेटत्या मेणबत्त्या सरसावल्या. वृत्तपत्रांचे माथळे ठळक आणि भडक विशेषणांनी झळकू लागले. गरमागरम कढई मधून पॉपकॉन टपाटप उडावेत तसे मान्यवर व्यक्तींचे मतप्रदर्शन उडत होते, फुलत होते. अगदी शशी थरूर, रामदेवबाबा, मोहन भागवत, शीला दीक्षित तसेच अनेक समाजसेवक यांची चढाओढ चालू होती. आता इतकी भयानक घटना घडली म्हणजे हे सगळे ओघाओघाने होणारच होते. मिडीयाला पण टी आर् पी वाढवायचा होता ना.

भारताला संत महंतांची वानवा नाही. पूर्वी त्यांचे कार्यक्षेत्र देव, धर्म, अध्यात्म आणि फार फार तर राष्ट्रधर्म इतपत मर्यादित असायचे. बाकी कुठल्याही क्षेत्रात त्यांनी कधीच ढवळाढवळ केली नाही. कारण त्यांना त्यांचे सामर्थ्य ज्ञात होते. त्यांच्या क्षेत्राच्या सीमा माहित होत्या. स्वतःच्या अध्यात्मिक उन्नत्ती बरोबरच समाजाची उन्नत्ती करण्याची साधी सोपी विचारसरणी आणि त्या अनुषंगाने आचारसरणी देखील होती. त्यांना कधीच सांगावे लागले नाही मी महात्मा आहे, संत आहे, मी तुमचा उद्धार करीन वगैरे वगैरे, ज्यांना त्यांची अनुभूती आली त्यांनी त्या त्या संतांच्या शिकवणीचा अंगीकार केला.

सध्याचा काळ थोडा वेगळा आहे. इथे जनसमुदायाला पटवून द्यावे लागते की मी संत आहे, महात्मा आहे, महाराज आहे, बापू आहे, अम्मा आहे, ताई आहे, देवी आहे ई.ई. मग त्या साठी पद्धतशीर मार्केटिंग केले जाते, सभा भरवणे, बैठका घेणे, सत्संगाचे आयोजन करणे, आश्रमशाळा उभ्या करणे, आयुर्वेदिक वनौषधी/उदबत्त्या विकणे. अश्या प्रकारचे उपद्व्याप करून त्या त्या GOD MAN ला आपले अध्यात्मिक शक्ती प्रदर्शन करावेच लागते. हे सगळे कमी पडेल की काय म्हणून अधून मधून देशात घडणाऱ्या विविध घडामोडींवर आपले स्मित हास्य कायम ठेवत, पांढऱ्या दाढ्या कुरवाळत, डोळे मिचकावत, दोन्ही हात वर करून एखादे स्फोटक विधान करणे अतिशय आवश्यक असते. काय आहे आता हे पण सगळे त्या फुटकळ आस्था, संस्कार, भक्ती, श्रद्धा या आणि अश्या अनेक कचऱ्या गणिक झालेल्या वाहिन्यांवर झळकून झळकून कंटाळले असतील. मुख्य प्रवाहात येण्यासाठी मग काहीतरी विधाने करून समस्त मिडीयाचे लक्ष वेधून घेण्याचे काम यांना करावे लागते. मग त्यातून त्यांचे जगात हसे झाले, त्यांच्या बुद्धीची लक्तरे टांगली तरी काहीही फरक पडत नाही कारण त्यांना त्यांच्या सारखेच मुर्ख अनुयायी मिळालेले असतात. आणि ते माना डोलवत असतात “वा वा काय ज्ञानी आहेत …. काय बोलले….सामर्थ्य लागतं” वगैरे वगैरे. समाजातील विचारवंत अश्या मुक्ताफळांकडे दुर्लक्ष करतात पण विचार करण्याची खरी गरज आहे ती त्यांच्या मागे मागे धावणाऱ्या सामान्य लोकांनी.

दिल्लीच्या घटनाक्रमात काल अजून एका GOD MAN ने उडी मारली. आणि नेहेमी प्रमाणे जोरदार आवाज झाला. आसारामबापूनी विराट जनसमुदायासमोर आपली पांढरीशुभ्र दाढी कुरवाळत मुक्तफुले उधळली. ज्या मुलीवर अत्याचार झाले, बलात्कार झाला त्या साठी त्या नराधमांच्या इतकीच ती पण दोषी होती म्हणे. टाळी एका हाताने थोडीच वाजते. इतकं बोलून शांत बसले तर ते “बापू” कसले? बस मध्ये चढण्या आधी सरस्वतीचा जप केला असता तर असा प्रसंग घडला नसता. जेंव्हा ती मुले हिच्यावर अतिप्रसंग करत होती तेंव्हा या मुलीने त्यांना भाऊ मानून त्यांची मनधरणी करायला हवी होती अश्याने तिच्या शीलाचे रक्षण झाले असते. आईशप्पथ, या आधीच्या सगळ्या मूर्खांच्या वक्तव्या कडे दुर्लक्ष केले होते पण या एका वाक्यामुळे ही पोस्ट लिहायला घेतली. अश्या जबाबदार व्यक्तीने केलेली अशी बेजबाबदार विधाने ऐकली की यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच.

उद्या हे महाशय असं पण म्हणतील की सगळ्या मुलींनी स्वतःच्या बचावासाठी जवळ राखी बाळगावी. कुणी अतिप्रसंग करू लागलाच तर शिताफीने त्याच्या मनगटाला राखी बांधावी म्हणजे तो तुमचा भाऊ होईल आणि तुम्हांला बहिणी प्रमाणे मान सन्मान देईल. काय बोलावं या वक्तव्यावर, या भूमिकेवर? आणि अशी वक्तव्य करणाऱ्यांच्या मूर्खपणावर? हे जर का इतकं सोप्पं असतं तर जेंव्हा दुःशासनाने द्रौपदीच्या वस्त्रांना हात घातला त्याच वेळी पदराची चिंधी करून तिने दुःशासनाला भाऊ नसते का केले? उगाच का त्या कृष्णाला साकडे घालावे लागले? जिथे एक नर आणि एक मादी याच संकल्पना उरतात तिथे भाऊ काय आणि बहिण काय? जिथे एखादा नराधम बाप सुद्धा आपल्या पोटाच्या पोरीचे शीलहरण करतो, जिथे पिता समान सासरा आपल्या सुनेला बाटवतो (कधी कधी अश्या कामात एक स्त्री असून सुद्धा माते समान सासूची देखील फूस असते) तिथे अशी वायफळ बडबड चालू शकेल? त्या पिडीत मुलीने त्या नराधमांची गयावया केली नसेल? त्यांना झिडकारले नसेल? सगळं जर सहज घडलं तर त्याला अतिप्रसंग म्हणत नाहीत हे जरा यांना कुणीतरी समजवायला हवे. नुसता विचार करून सुद्धा अंगावर काटा येतो. असो….

अश्या तथाकथित संतमहंतांच्या किती नादी लागावे हे त्यांच्या समोर बसून माना डोलावतात त्यांनीच ठरवावे हेच उचित. व्यक्ती-विचार स्वातंत्र्याचा दुरुपयोग या पेक्षा वेगळा असू शकतो?